बुधवार, २१ जानेवारी, २००९

वास्तूचे लाभणे

वास्तूचे लाभणे

लोक जिवाच्या कराराने स्वत:च्या मालकीच्या वास्तूचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी
झगडतात. हे स्वप्न पुरे झाले की नव्या वास्तुमध्ये स्थलांतरीत होतात, पण कधी
कधी नव्या वास्तूत स्वास्थ्य लाभण्या ऐवजी जुने नष्ट्चक्र चालूच राहते. मग कुणी
तरी सांगते ही वास्तू तुम्हाला लाभत नाही. अमुक करून बघा, तमुक करून बघा.

वास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आलेल्या काही ठळक
गोष्टी अशा -

- घरातील एकाच व्यक्तीच्या अपार जिद्दीने वास्तू उभी राहीली असेल तर बहूधा
कर्जबोजा आणि साठविलेली पुंजी वास्तुच्या निर्मितीत गेली असल्याने नव्या
वास्तूत समस्त कुटुंबाच्या हौशीमौजीला मोठ्या प्रमाणात मर्यादा पडतात. कमावती
व्यक्ती एक असल्यास हे विशेष जाणवते.

- नवी वास्तू ब‍र्याच वेळा मूळ ठिकाणापासून लांब बांधली जाते. वाड्यातून
अपा‍र्टमेंट किंवा, भाड्याच्या ब्लॉकमधून बंगला वगैरे वगैरे. अशावेळेस आपण एका
सामाजिक वर्तूळातून बाजूला पडतो आणि नवीन वर्तूळ तयार व्हायला अनेक कारणांनी
वेळ लागतो.

- जुन्या जागेत अनेक वर्षे अडचणीना तोंड द्यावे लागले असल्यास कुटुंबातल्या
सर्वांच्या स्वभावास वेगवेगळे घट्ट पिळ पडतात. हे पिळ नव्या जागेत सहजा सहजी
सुटत नाहीत.

- नवी वास्तू बांधतांना घरातील एका जरी व्यक्तीचा मनाने सह्भाग नसेल तरी नव्या
वास्तूत मन:स्वास्थ्याला विरजण पडायला वेळ पडत नाही.

ही यादी कदाचित यापेक्षा मोठीही असेल पण मूळ कारणे थोड्याफार तपशीलाच्या फरकाने
हीच असतात. पण लोकांना चमत्काराची अपेक्षा असते. आणि तो घडत नाही म्हणून
पत्रिका बघितली जाते, वास्तूत तोडफोड सूचवली जाते. इतकेच काय, लोक नवे घर
विकायला पण निघतात. माझ्या माहितीतल्या एका आयटी कंपनीच्या मालकाने धंदा वाढावा
म्हणून वास्तूदोष निवारणाचे त‍र्हेत‍र्हेचे उपाय केले पण त्याला आपल्या
कंपनीतील गळकी टॉयलेट्स काही केल्या दिसली नाहीत. असो.

तर मित्रहो तुमच्या परीचयात कुणी वास्तू लाभत नाही म्हणून तक्रार करत असेल तर
त्यांच्या हे मुद्दे जरूर लक्षात आणून द्या...

शुक्रवार, १६ जानेवारी, २००९

नकारात्मक भविष्य का सांगितले जाते?

तमाम ज्योतिषांचे भविष्यकथनाच्या खासियतीप्रमाणे काही ठळक प्रकार सांगता येतात.
काही ज्योतिषी (विशेषत: भारतीय ज्योतिषी) फार ठामपणे बोलतात. भारतीयांचे समूहमन
अनिश्चिततेकडे विशिष्ट नजरेतून बघते. प्रत्येक जीवाच्या आयुष्यातील घटनाक्रम हा
पूर्वनियोजित असतो. हा घटनाक्रम फक्त "ज्ञानी" ज्योतिषाला कुंडलीवरून समजतो,
असा ठाम विश्वास भारतीय जातकांमध्ये असतो. त्यामुळे भारतीय जातक ज्योतिषाकडून
अवाजवी अपेक्षा ठेवतात. मी आज कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घातली आहेत, हे पण
ज्योतिषाने ओळखावे अशी अपेक्षा ठेवली जाते. पुष्कळदा ज्योतिषाच्या कक्षेत न
येणार्‍या समस्या पण ज्योतिषानेच सोडवाव्यात व आपले निर्णय ज्योतिषाने घ्यावे
ही अशीच सर्वत्र अनुभवास येणारी गैरवाजवी अपेक्षा. साहजिक अपेक्षा पूर्ण
करण्याकडे कळत, न-कळत ज्योतिषांचा कल असतो.

याउलट ठराविक काही ज्योतिषी फार गोड बोलतात आणि काही बर्‍याचदा नकारात्मक
बोलतात. पैकी नकारात्मक भविष्यकथनाची कारणमीमांसा करण्याचा हा एक प्रयत्न...

नकारात्मक भविष्यकथन करणार्‍यांचेही दोन गट करता येतील. यातील एक गट हा
गैरहेतूने म्हणजे बहूधा धनाच्या लालसेने जातकाना भीतियुक्त दडपणाखाली ठेऊन
वरचेवर नकारात्मक भविष्य सांगतात. 'चांगले न बोलणार्‍या' ज्योतिषांचा दूसरा गट
आणखी एक गट एका वेगळ्या भूमिकेतून जातकांना सावध करायचे काम करतो. आपण ज्याचा
सल्ला घेतो तो ज्योतिषी कोणत्या गटात मोडतो हे ओळखण्याची जबाबदारी जातकांची
आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे.

माझं अ-शास्त्रीय (म्हणजे व्यक्तिगत) निरीक्षण असे आहे की नकारात्मक भविष्य
जास्त बरोबर ठरते. याचे महत्वाचे कारण असे की सर्वसाधारणपणे माणसाचा कल हा
विनाशाकडे आहे (Destructive human tendencies surpass cosntructive human
tendencies). कित्येकांना माझे हे विधान पटणार नाही पण संपूर्ण मानवजातीचा
आजवरचा इतिहास हेच सांगतो. प्रगत असो अथवा अप्रगत मानवसमाजाचे अस्तित्वाचे
प्रश्न, वेदना संख्येने जास्त व गंभीर आहेत. सुखे थोडी आणि दू:खे फार आणि
म्हणूनच मानवी आयुष्यात घडणार्‍या नकारात्मक घटनांचे प्रमाण जास्त आहे. हे झाले
नकारात्मक भविष्यकथनाचे प्राथमिक कारण. आता पूर्णपणे ज्योतिषाच्या चौकटीतून या
प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न करतो...

अतिशय चांगले (बृहत्त्रिकोण, बृहदायत) आणि अतिशय त्रासदायक (बृहच्चौकोन) असे
तुरळक दिसणारे योग (म्हणजे भौमितिक रचना) सोडले सर्वसाधारणपणे पत्रिकेत चांगले
आणि वाईट असे दोन्ही योग असतात. बृहत्त्रिकोण, बृहदायत, व बृहच्चौकोन
असणार्‍या पत्रिकांमध्ये चांगले अथवा वाईट भाकित ठामपणे करता येते. पण अन्य
पत्रिकांमध्ये त्रासदायक योगांचा विचार अगोदर करावा लागतो. त्रासदायक कालावधी
आपण कसा हाताळतो यावर नंतर येणारा भाग्यकारक ग्रहांचा सक्रियतेचा काळ अवलंबून
असतो. एखादी व्यक्ती खड्ड्यात पडली तर ती सावरून उभी राहील की नाही ते खड्डा
किती खोल आहे यावर अवलंबून असते. तसेच त्या व्यक्तीच्या जवळच्या सहवासातील
व्यक्तींचे ग्रह जर पीडित व्यक्तीला परतपरत खड्ड्यात ढकलत असतील म्हणजेच
नकारात्मक प्रतिसाद देत असतील तर मूळ पत्रिकेतील भाग्यकारक ग्रहांची साथ पुरेशी
पडत नाही. साहजिकच भाग्यकारक ग्रहांचे आणि त्यानी केलेल्या योगांचे परिणाम हे
त्रासदायक योगांच्या पार्श्वभूमीवर तपासावे लागतात.

जाता जाता भारतीय ज्योतिषांची एक खोड येते उघड केल्याशिवाय मला राहवत नाही. ती
म्हणजे सूताने स्वर्ग गाठणे. एका पत्रिकेवरून चराचर सृष्टीचे भविष्य सांगायचा
प्रयत्न करतात. यामूळे लोकांच्या अवाजवी अपेक्षा वाढतात. एखाद्या प्रश्नाचा
विचार करताना त्यासंबधित सर्व व्यक्तींच्या सर्व पत्रिका तपासल्याशिवाय कोणतेही
उत्तर देऊ नये. ज्योतिषात वापरल्या जाणार्‍या प्रत्येक तंत्राच्या मर्यादा
सल्ला देण्यापूर्वी जातकांना सांगणे हे प्रत्येक ज्योतिषाचे नैतिक कर्तव्य आहे
असे माझे स्पष्ट मत आहे.