मंगळवार, ३० एप्रिल, २०१३

जादुटोणाविषयक कायदा



श्री. नरेंद्र दाभोळकर यांची IBN लोकमत वर झालेल्या (http://www.ibnlokmat.tv/showvideo.php?id=287232) मुलाखतीचा काही भाग बघितला आणि मग जादुटोणाकायद्याचा मसुदा काय आहे हे वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली. श्री प्रकाश घाटपांडे यांच्याकडे विचारणा केली तेव्हा त्यानी मला (http://www.mahans.co.in/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=53&Itemid=68) दूवा दिला. तेथिल मजकूर वाचल्यावर पुढील वि़चार डोक्यात आले.




मी उपस्थित केलेले मुद्दे हे कायद्याला विरोध मानले जाऊ नयेत पण पण प्रस्तावित कायद्याने उपस्थित केलेले प्रश्न मात्र मानले जावेत.


<भोंदूबाबा आणि जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींचा आश्रय घेत आहेत.> याविषयीची आकडेवारी कुठे बघायला मिळेल. उदा अंदाजे किती भोंदूबाबा आणि जादूटोणा करणाऱ्या व्यक्ती आज महाराष्ट्रात कार्यरत आहेत. यातिल आर्थिक उलाढाल साधारण किती? ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे की घटते आहे?

<अनिष्ट व अघोरी प्रथा> "अनिष्ट" हा शब्द संदिग्ध आहे. आणि यामुळे गैरवापराची शक्यता वाढते कारण "अनिष्टता" ठरवणार कशी?

नवीन कायदा करण्यासाठी सध्याचे कायदे अपुरे आहेत असं सप्रमाण सिद्ध केलेलं पण दिसत नाही.

आत्ता कायद्याची व्याप्ती १२ कलमांपुरती मर्यादित दाखवली गेली असली तरी पुढे ती व्याप्ती वाढविण्यासाठी चळवळी, आंदोलने, उपोषणे इ दबावतंत्रे अमलात आणली जाउ शकतात. कायद्याची व्याप्ती १२ कलमांपुरतीच राहील ही ग्वाही कोणीच देऊ शकत नाही आणि दिली तरी ते हास्यास्पद ठरेल. ("स्त्रीकडे टक लाऊन बघणे" हे अलिकडे एका कायद्यात अलिकडे घातलेले कलम).

"जारणमारण, करणी किंवा चेटूक" याची व्याख्या केलेली दिसत नाही.

कायद्याचं स्वरूप काळाच्या ओघात कसं बदलेल याचा कायद्याचा गैरवापर कसा होतो, याच्या अनुभवावरून याचा अंदाज बांधणे सोपे आहे. एक वानगीदाखल उदाहरण म्हणून "नवस बोलणे" या प्रथेचं उदा आपण घेऊ. बरं, हे "नवस बोलणे" ही प्रथा जादुटोणा आहे की नाही ठरवण्याचे काम न्यायालयावर सोपवले की तक्रारदार मोकळा होऊ शकतो. "नवस बोलणे" हे जादुटोणा मानता येईल का याचे उत्तर "हो" असे मानले तर मोठ्ठा हाहाकार उडेल. नवस बोलणे हे जर जादुटोणा मानले तर नवसांना उत्तेजन दिले म्हणून देवस्थाने आणि त्यांचे भाविक धोक्यात येऊ शकतात. नरबळी हा जादुटोणा मानावा, असं हा कायदा सुचवितो. पण पशुबळी हा जादुटोणा मानायचा का, या मुद्द्यावर केस ठोकता येऊ शकते.

जादुटोणाकरणार्‍याने "मी अमुक विधी स्वखुषीने करत आहे" असं स्टॅम्पपेपरवर लिहून घेतलं तर तो कायद्याच्या कचाट्यातून मुक्त होऊ शकतो का?

गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

सुवर्णसिद्ध जल : एक अनुभव



(सूचना: आयुर्वेद, होमिओपथीला सर्पतेल (snake oil) समजणार्‍यांनी हा लेख वाचला नाही किंवा प्रतिसाद दिला नाही तरी चालेल.)


आयुर्वेदांत सोन्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. होमिओपथीमध्ये पण ऑरम-मेट हे औषध शुद्ध सोन्यापासून बनवतात. अलिकडे बरेच आयुर्वेदतज्ञ सुवर्णसिद्ध जल लहान मुलाना द्यायला सांगतात. मला याबद्दल कुतुहल निर्माण झाले असता मी नेट वर शोध घेतला. तेव्हा कुणाचे अनुभव वाचायला मिळाले नाहीत. बरीचशी चर्चा वैद्यामध्येच होताना दिसली. बालाजी तांब्यांबद्दल मला फारसे प्रेम नाही, पण त्यांच्या खालील लेखात आयुर्वेदीय दृष्टीकोनातून सोन्याचे महत्त्व थोडेफार समजले (http://epaper.esakal.com/esakal/20091211/4729257057489860031.htm).

पारंपरिक पद्धतीमध्ये सोन्याची वस्तू पाण्यात टाकून ते पाणी बराच वेळ उकळवावे सांगितले आहे. मी ही पद्धत थोडी बदलली कारण माझ्यादृष्टीने इंधन आणि वेळ वाचविणे हे महत्त्वाचे मुद्दे होतेच पण वेळखाऊ पद्धतीमुळे एखाद्या उपचाराकडे  लोक पाठ फिरविण्याची शक्यता पण निर्माण होते.

मी केलेल्या बदलानुसार अर्धे फुलपात्र प्यायचे पाणी घेतले आणि सोन्याची अंगठी घेतली (सोन्याची तार असलेली वस्तू घेऊ नये कारण ती तापवल्यावर तुटू शकते. माझी एक साखळी अशी तुटली आहे.)

सोन्याची अंगठी गॅसवर तांबडी भडक (red hot) होई र्यंत तापवावी. याला दोन ते तिन मि पुरतात. तापलेली अंगठी मी मग फुलपात्रातील पाण्यात टाकतो. पाण्यात ती चुरचुरुन गार होते.

ही प्रक्रिया मी एकंद्र तिनदा करतो.

अशा रितीने "सुवर्णसिद्ध जल" तयार होते. हे पाणी प्यायल्यावर (मी हा उद्योग रात्री करतो) मला खालील अनुभव ९५% पेक्षा अधिकवेळा आले आहेत (so in my own case I have experienced beyond placebo effect).

o शारीरिक आणि मानसिक तणाव १५-३० मि मध्ये पूर्ण नाहीसा होतो.
० एखादे बेन्झोडायझेपॅम घेतल्याप्रमाणे गाढ झोप लागते.

सोनं हा रासायनिक दृष्ट्या बर्‍यापैकी स्थिर असल्याने जडधातूचे शरीरात होणारे दुष्परिणाम या प्रयोगामुळे होणार नाहीत असे वाटते. मी हा अनुभव शेअर करण्याचे कारण हा प्रयोग जास्तीतजास्त लोक करू शकले तर जास्तीत जास्त परिणाम कळायला मदत होईल.

बुधवार, २४ एप्रिल, २०१३

कथा एका पीएचडीची...



http://www.loksatta.com/sampadkiya-news/ph-d-very-easy-20848/

वरील लेख नुकताच वाचला. तो वाचल्यावर मला एका पीएचडी प्रबंधांची आठवण झाली. गोपनीयतेच्या कारणास्तव सर्व तपशील देत नाही पण बाकी सर्व घटना पूर्ण सत्य आहेत.

मी संगणकीय संगीतावर काम करत असताना डॉ. किरण रेगे (प्रा. मे. पु. रेगे यांचे चिरंजीव) माझे सहकारी आणि एका अर्थाने माझे बॉस पण होते. त्यांनी त्यांच्या शेजारीच माझी बसायची व्यवस्था केली होती. आमच्यामध्ये बरेच विषय कॉमन असल्याने बर्‍याच गप्पा चालायच्या. आम्ही जेवायला पण एकत्र असायचो. असंच एकदा मला डॉ. रेग्यांच्या टेबलावर एक प्रबंध दिसला. मी तो कशासंबंधी आहे, असे विचारल्यावर, "तुला वाचायचा असेल तर वाच आणि मग मला काय वाटते ते सांग", असे म्हणून त्यांनी मला वाचायला दिला.

तो प्रबंध एका पीएचडीच्या विद्यार्थ्याचा होता. त्या प्रबंधाचा विषय तेव्हाचा अत्यंत ज्वलन्त असा संशोधन विषय होता. डॉ. रेग्यांच्याकडे तो प्रबंध तपासण्याकरता आला होता.

तो जाडजुड प्रबंध मी कुतुहलाचा विषय म्हणून वाचायला घेतला. पण मला दोन प्रकरणांपलिकडे जाता आले नाही. लिखाणाच्या क्लिष्ट शैलीमुळे मला प्रतिपाद्य विषय आणि प्रतिपादन यापैकी कशाचाच बोध न झाल्यामुळे ३-४ दिवसांनी डॉ. रेग्यांना तो परत दिला आणि सर्व डोक्यावरून गेल्याचे सांगितले.

माझ्या वाचनानंतर मात्र डॉ. रेग्यांनी तो प्रबंध तपासायला सुरुवात केली. पुढे कित्येक दिवस ते नियमितपणे त्या प्रबंधाचे वाचन करत आणि बारीकसारीक टिपणे काढत. अधूनमधून मला एखाददुसरा प्रश्न विचारत आणि अधुनमधुन मला टिपणे वाचायला देत. अगदी विरामचिन्हांच्या चुकांपासून त्यांनी त्या प्रबंधाच्या सर्व नोंदी त्यांच्या टिपणांमध्ये ठेवल्याचे मी स्वत: बघितले होते. तो प्रबंध तपासून झाला आणि त्यांनी तो टिपणांसह त्यांच्या टेबलावरच्या एका पुस्तकांच्या चळतीमध्ये ठेऊन दिला.

...नंतर बरेच दिवस गेले. एक दिवस अचानक मला भलतीकडून डॉ. रेग्यांनी राजीनामा दिला असल्याचे कळले. ती बातमी ऐकून मला धक्का बसला कारण रोज अनेक विषयांवर एकत्र गप्पा मारताना डॉ. रेग्यांनी राजीनाम्याविषयी ताकास तूर लागू दिला नव्ह्ता. दोन दिवसांनी मी त्यांना हिय्या करून ऐकल्याचे खरे आहे का विचारले, तेव्हा त्यांनी हो असे सांगितले. अमुक अमुक तारीख माझा शेवटचा दिवस आहे, असेही मग म्हणाले.

मला तेव्हा अचानक त्या पीएचडी प्रबंधाची आठवण झाली आणि मी डॉ. रेग्यांना विचारले, "तुम्ही त्या पीएचडी थेसिसचे काय केलेत?"

त्यावर एकदम दचकून मला म्हणाले, "अरे, बरं झालं तू आठवण केलीस". असं म्हणून तो थेसिस त्यांनी शोधून काढला आणि कंप्युटरवर संबंधित विद्यार्थाच्या मार्गदर्शकाला पत्रवजा रिपोर्ट लिहून तयार केला. ते पूर्ण झाल्यावर त्याची एक प्रत छापून मला वाचायला दिली. त्या एक पानी अहवालाचा गोषवारा असा होता -

"मी मूलत: इलेक्ट्रीकल इंजिनिअर असून माझी स्वत:ची पीएचडी अमुक विद्यापीठातून अमुक विषयात केली आहे. त्यानंतर माझी सर्व करीअर टेलीकम्युनिकेशन या विषयात आहे. सध्या मी भारतात मात्र या या विषयात काम करत आहे. केवळ यास्तव हा प्रबंध माझ्याकडे तपासण्यासाठी पाठविण्यात आला असावा, असा माझा अंदाज आहे."

"या प्रबंधात एकूण चार प्रकरणे असून त्यातील चवथ्या प्रकरणाचा संबंध दुरान्वायाने माझ्या सध्या चालू असलेल्या संशोधनाशी लावता येईल. त्यामुळे पहिल्या ३ प्रकरणांवर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. मात्र चवथ्या प्रकरणात मला पीएचडी देण्यालायक काहीही दिसले नाही. याची कारणे पुढीलप्रमाणे ..."

"तरीही या प्रबंधाच्या बाकीच्या परिक्षकांना या प्रबंधाची पहिली ३ प्रकरणे पीएचडी देण्या योग्य वाटली तर या विद्यार्थाला अवश्य पीएचडी देण्यात यावी"

हे वाचल्यावर मला हसु आलं आणि मी ते पत्र डॉ. रेग्यांना दिल्यावर त्यांनी ताबडतोब सही करून लिफाफ्यात घालून ते सीलबंद करून संबंधित विद्यापीठाला पाठवून दिले...

सोमवार, ८ एप्रिल, २०१३

मराठी विश्वकोशाची विश्वासार्हता




महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या मराठी विश्वकोशातील माझे पणजोबा कै विठठल सीताराम गुर्जर यांच्या वरील कै. स गं मालशे यांनी लिहीलेली नोंद नुकतीच वाचली. मला ही नोंद धेडगुजरीपणे, अर्धवट माहितीवर, एकंदर "उरकून" टाकायचे अशा थाटात लिहीलेली  वाटली. या एका नोंदीवरून विश्वकोशातील इतर नोंदींच्या दर्जाचा अंदाज बांधला तर मराठीला ज्ञानभाषा करण्याच्या उद्देशाने तयार केला गेलेला विश्वकोश कितपत विश्वासार्ह मानायचा असा प्रश्न पडतो,

-------------विश्वकोशातील नोंद----------------------------------------
गुर्जर, विठ्ठल सीताराम : (१८ मे १८८५ – १९ सप्टेंबर १९६२). मराठी कथाकार. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कशोळी ह्या गावी. मुंबईच्या एल्फिन्स्टन स्कूलमधून प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजात ते दाखल झाले; बी. ए. मात्र झाले नाहीत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे हे शिष्य होत. मासिक मनोरंजनाचे संपादक काशीनाथ रघुनाथ मित्र हे त्यांचे स्नेही होते. त्यांच्या उत्तेजनाने; तसेच वंग कथाकार प्रभात कुमार मुखर्जी ह्यांच्या कथा मुळातून वाचता याव्यात ह्या इच्छेने गुर्जरांनी बंगाली भाषेचा व्यासंग केला. काही वर्षे मासिक मनोरंजनाच्या संपादनकार्यात ते सहभागी होते.

द्राक्षांचे घोंस (१९३६) हा त्यांचा एकच कथासंग्रह प्रसिद्ध झालेला असला, तरी त्यांनी लिहिलेल्या कथांची संख्या सु. ७०० आहे. मासिक मनोरंजन, विविधवृत्त  इ. नियतकालिकांतून त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या बऱ्याचशा कथा अनुवादित-रूपांतरित आहेत. त्यांत पाल्हाळही आढळतो. तथापि १९२० नंतरच्या मराठी कथेला नीटस रूप देण्यात आणि रंजक वळण लावण्यात गुर्जरांच्या कथेने महत्त्वाचा हातभार लावलेला आहे.

बंगालीवरून त्यांनी काही कादंबऱ्या मराठीत आणल्या. शब्दशः भाषांतरे करण्याऐवजी रोचक रूपांतरे करण्याकडे त्यांचा कल होता. मूळ बंगाली कथा-कादंबरीकार आणि गुर्जरांनी त्यांच्या साहित्यकृतींची केलेली रूपांतरे ह्यांपैकी काही पुढीलप्रमाणे :रमेशचंद्र दत्त -जीवनसंध्या (१९०९); प्रभातकुमार मुखर्जी - संसार असार (१९१४), पौर्णिमेचा चंद्र (१९२०), स्वप्नभंग (१९३७), नागमोड (१९४६); शरत्‌चंद्र चतर्जी -देवदास (१९३७), चरित्रहीन (२ भाग, १९४८-४९), शेवटचा परिचय (१९४९); रवींद्रनाथ टागोर - संगम (१९३५).

गुर्जरांनी काही नाटकेही लिहिली; परंतु त्यांपैकी एकही यशस्वी झाले नाही. गडकऱ्यांच्या एकच प्याला ह्या नाटकासाठी त्यांनी रचिलेली पदे मात्र लोकप्रिय झाली. कशोळी येथेच ते निवर्तले.

--------------------------------------------------------

या नोंदीबद्दल माझे ठळक आक्षेप असे:
० गुर्जर कशोळीचे  नसून कशेळीचे रहिवासी होते

० ही नोंद तयार करण्यासाठी कोणती माहिती आधार म्हणुन वापरली याचा उल्लेख (इंटरेनेट आवृत्तीमध्ये तरी) नाही.

० "बी. ए. मात्र झाले नाहीत." - मला घरातून कळलेल्या माहितीनुसार कै. गुर्जर आजारपणामुळे बीए पूर्ण करू शकले नाहीत. कै गुर्जर ज्या काळात बीए करत होते त्याकाळात शिक्षणात अनंत अडचणी होत्या. आर्थिक अडचणी, घरच्या जबाबदार्‍यांपासून ते पटकी, विषमज्वरासारखे तेव्हा जीवघेणे ठरणारे आजार शिक्षण अर्धवट ठेवण्यास पुरेसे असायचे. मात्र बीए न होऊ शकलेल्या गुर्जरांचा "द्राक्षांचे घोंस" हा कथासंग्रह मुंबई विद्यापीठाने एमए साठी नेमला होता, ही माहिती देण्याचे मालशे यांनी टाळले आहे. मला हा खोडसाळपणा वाटतो.

० कोणतीही चरित्रात्मक नोंद ही संतुलित असावी अशी माफक अपेक्षा ठेवणे गैर ठरणार नाही. संतुलीत म्हणजे चरित्रनायकाची बलस्थाने योग्य त्या पद्धतीने नोंदली जायला हवीत.  कै. स. गं. मालशे गुर्जरांच्या बलस्थानांकडे साफ कानाडॊळा करतात. वयाच्या ५१ व्या वर्षापर्यंत गुर्जरांनी तीसहजार पृष्ठांचे लिखाण केले असे त्यांच्या १९३६ साली प्रसिद्ध झालेल्या "धृव" मासिकातील मुलाखतीमध्ये संपादकांनी म्हटले आहे. ही मुलाखत कै. म. ना. अदवंतांनी लिहिलेल्या आणि साहित्य अकादमी तर्फे प्रसिद्ध झालेल्या गुर्जरांच्या चरित्रात यथामूल समाविष्ट केलेली आहे. गुर्जरांनी लिहीलेल्या तीसहजार पृष्ठांचा उल्लेख अक्षरी आहे (म्हणजे एक शून्य चुकून जास्त पडले असंही म्हणायला जागा नाही). आज कुणालाही तीसहजार या आकडयावर विश्वास ठेवणे किती कठीण जाईल याची मला पूर्ण कल्पना आहे.

० वरील नोंदीत मालशे म्हणतात की गुर्जरांनी लिहीलेल्या गोष्टींची संख्या ७०० आहे. मराठीतील नामवंत कादंबरीकार कै. दत्त रघुनाथ कवठेकर यांनी मला शाळेत असताना "तुझ्या पणजोबांनी एक हजार गोष्टी लिहील्या" असे माझ्या पाठीवर हात ठेवून सांगितले होते. तेव्हा १००० हा आकडा ऐकूनच मला किती अभिमान वाटला होता ते मी शब्दात सांगू शकणार नाही. कै. म. ना. अंदवंतांनी लिहीलेल्या चरित्रात गुर्जरांनी स्वत: मांडलेल्या हिशेबात ८००हून अधिक गोष्टी लिहील्याचे म्हटले आहे. याशिवाय त्यांनी लिहीलेल्या कांदंबर्‍या, नाटके, प्रहसने हे वेगळेच.
 चरितार्थासाठी एव्ह्ढा मोठा लेखनप्रपंच एखादी व्यक्ती करते तेव्हा ती व्यक्ती लेखनाला मागणी असल्याशिवाय नक्कीच करणार नाही. स्वत: गुर्जरांनी प्रकाशकांचा कधीही अनुनय केला नाही. आणि त्यांच्या हिशेबी स्वभावाचे जे किस्से मी घरात ऐकले आहेत त्यावरून त्यांनी मोबदल्याशिवाय लिखाण केले नसणार हे नक्की. तेव्हा गुर्जरांच्या गोष्टींची संख्या कमी करून कै. मालशे यांनी काय साधले असेल? याला कर्तृत्वावरून बोळा फिरविण्याचा नतद्रष्ट्पणा एव्हढेच म्हणावे लागेल.

० " त्यांत पाल्हाळही आढळतो." - हे पाल्हाळ मूळकथेतून आले की गुर्जरांनी घुसडले याबद्दल मालशे "ब्र"ही काढत नाहीत.

० "गुर्जरांनी काही नाटकेही लिहिली; परंतु त्यांपैकी एकही यशस्वी झाले नाही." - गुर्जरांचे संगीत नंदकुमार हे नाटक त्यातल्या संगीतासाठी गाजले. गंधर्व नाटक मंडळीने या नाटकांचे प्रयोग केले. नुकत्याच गाजलेल्या "बालगंधर्व" या चित्रपटात याचा ओझरता उल्लेख आहे. हे नाटक आकाशवाणीच्या पुणे केंद्राने जतन केले आहे आणि माझ्या विनंतीवरून दोन वेळा प्रसारित पण केले होते.