रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

संपादक म० टा० स० न० वि० वि०

संपादक
म० टा०

स० न० वि० वि०

कालच्या म० टा० च्या मैफल पुरवणीमध्ये श्री० तन्मय कानिटकर यांचा लैंगिक अनुरुपतेचा प्रश्न उपस्थित करणारा लेख वाचला. काळजीपूर्वक लेख वाचल्यावर  एखादा प्रश्न समाजाला सोडवता आला नाही तर तो प्रश्न येन केन प्रकारेण गैरलागु ठरविण्यात हूशारी खर्च करायची अशातला हा प्रकार आहे असे वाटते.

मुळात लैंगिक-स्वास्थ्याची गरज माणसाला आहे की नाही या गैरसोईच्या प्रश्नाला श्री. कानिटकर हात घालत नाहीत. याची कारणे दोन असू शकतात - एकतर ते स्वत: अनभिज्ञ आहेत (ही शक्यता त्यांचे फेस्बुक प्रोफाईल तपासल्यावर कमी वाटते) किंवा जो समाज डॊळ्यासमोर ठेऊन त्यांनी हा लेख लिहीला आहे त्या मराठी समाजाची हा विषय पचवायची क्षमता नाही ( दूसरी शक्यता जास्त कारण आपण ते वेळोवेळी सिद्ध केले आहे. र. धो. कर्व्यांना दगड मारायची थोर परंपरा अशी ना तशी जपली आहे.). 

पृथ्वीच्या पाठीवर असंख्य मानवसमूह लग्नसंस्था स्वीकारून नांदत आहेत. लग्नसंस्था स्वीकारण्याची दोन कारणे श्री. कानिटकर आपल्या लेखात देतात. पण लग्नसंस्था रूजण्याचे आणखी एक कारण मानववंशशास्त्रज्ञ देतात ते म्हणजे माणसाच्या अपत्यांना असणारी दीर्घकाळ संगोपनाची गरज भागविण्यासाठी असलेली स्थिर कुटुंबाची गरज. स्थिर कुटुंबासाठी सशक्त लग्न-बंधन आवश्यक आहे. सशक्त लग्न-बंधनासाठी   लैंगिक-स्वास्थ्य आवश्यक आहे, याकडे श्री. कानिटकर यांचे दूर्लक्ष झाले याचे सखेद आश्चर्य वाटले.

सशक्त लग्न-बंधनासाठी लैंगिक-स्वास्थ्य आवश्यक आहे हे नाकारणे म्हणजे आपणच आपली फसवणूक करण्यासारखे आहे, असे मला वाटते. लैंगिक-स्वास्थ नाकारताना समाज अनेक घोडचूका करत असतो - त्यातली महत्त्वाची घोडचूक म्हणजे जे लैंगिक वर्तन साधारण (नॉर्मल) आहे त्याला विकृत ठरवणे.   हे लैंगिकस्वास्थ्य सध्याच्या काळात कसे मिळवायचे या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी समाजाला प्रवृत्त केले असते तर कानिटकरांच्या लेखाची उंची वाढली असती. असो.

कळावे आपला
राजीव उपाध्ये