सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

गूढ आणि धक्कादायक१९९२ साली व्हिएन्ना येथे झालेल्या एका जागतिक परिषदेतील कार्यशाळेत माझा संशोधन निबंध प्रसिद्ध झाला होता (मला त्या कॉन्फरन्सला जाता आले नव्हते). त्या पेपरचा प्रथम लेखक मी होतो.

पण काळाच्या ओघात काहीतरी जादू झाली आहे...

तो पेपर नंतर २०११ साली, २०१३,  २०१६ आणि २०१७ मध्ये नंतरच्या संशोधकांनी संदर्भ म्हणून उल्लेख केला आहे.  धक्कादायक भाग असा हे सर्व नंतरचे संशोधक संदर्भाचा उल्लेख करताना माझा उल्लेख द्वीतिय लेखक म्हणून करत आहेत.

हे नंतरचे निबंध खालील प्रमाणे

- http://citeseerx.ist.psu.edu/viewdoc/download?doi=10.1.1.297.2901&rep=rep1&type=pdf
- http://pep.ijieee.org.in/journal_pdf/11-273-14709960557-9.pdf
- https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=21&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjPzIX8kNbVAhUHXLwKHafnBgY4FBAWCCYwAA&url=http%3A%2F%2Fpep.ijieee.org.in%2Fjournal_pdf%2F11-273-14709960557-9.pdf&usg=AFQjCNF8IiiWiGQ06B1LiK8tg9Zv7k5_dg
- https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=25&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjPzIX8kNbVAhUHXLwKHafnBgY4FBAWCEAwBA&url=http%3A%2F%2Fwww.ijarcs.info%2Findex.php%2FIjarcs%2Farticle%2Fdownload%2F3405%2F3409&usg=AFQjCNFRQfvc1CFH2Z_Kpx42MaO3Za5n4A


हा योगायोग किंवा अपघात नक्कीच नाही. कारण संशोधक संदर्भ यादी तयार करताना सहसा काळजी घेतात. पण हे काहीतरी गूढ आणि धक्कादायक आहे.

शनिवार, २२ जुलै, २०१७

इच्छापूर्ती

कुणी काहीही म्हणोत, निसर्गाने मला पुस्तकी हूशारी दिली नसली तरी सुपीक डोके भरपूर दिले आहे. आईवडिलांनी आणि शाळेत कवठेकरसरांनी त्यांच्या कुवतीनुसार माझ्या सुपीक डोक्याची भरपूर मशागत केली. दूर्दैवाने ही सुपिकता मोजायची तेव्हा पद्धतही नव्हती आणि त्यासाठी प्रगतीपुस्तकात रकानाही नव्हता. असता तर माझा नंबर १ला नक्की आला असता.

शाळेत असताना अनेक वेडगळ कल्पनांना बोलुन दाखवायची हक्काची जागा म्हणजे कवठेकरसरांचा हॉबीक्लब! कल्पनाशक्तीला खर्‍या अर्थाने पंख देणारी जागा तेव्हा पुण्यात एकाच शाळेत होती, ती म्हणजे नूमविमधला कवठेकरसरांचा हॉबीक्लब! कवठेकरसरांची दूसरी एक देणगी म्हणजे आमच्या संगीतद्वेष्ट्या घरात जन्म घेऊन त्यांच्यामुळे मला शास्त्रीय संगीताची गोडी लागली आणि माझ्या पणजोबांचे म्हणजे कै. विठ्ठल सीताराम गुर्जरांचे मोठेपण, कवठेकरसरांच्या वडिलांनी म्हणजे कै. दत्त रघुनाथ कवठेकरांनी सांगितल्यामुळे मला कळले.

तर या हॉबीक्लबमध्ये आम्ही आठवीत आणि नववीत असताना बरेच उद्योग केले! बर्‍याच गोष्टी करण्याचे भरपूर मनसुबे पण केले (त्यातले एक म्हणजे खराखुरा म्हणजे १६ मिमि प्रोजेक्टर हाताळून सगळ्यांना खरा सिनेमा दाखवायचा आनंद कवठेकर सरांमुळे मिळाला.). मी तेव्हा आणखी दोन गोष्टीनी खूप झपाटून गेलो होतो - एक म्हणजे ट्रान्समीटर आणि दूसरे म्हणजे स्टीम-इंजिन! या दोन गोष्टीसाठी मी बराच हट्ट, आदळआपट पण केलेली आहे. पण ट्रान्समीटर करू देण्यास कवठेकरसर त्यातल्या कायद्याच्या कटकटीमुळे राजी नव्हते. स्टीम-इंजिन करायला हरकत नव्हती पण योग्य सामग्री आणि त्यासाठी लागणारे वर्कशॉप मिळणे तेव्हा जरा अवघड होते. स्टीम-इंजिनचा आराखडा करण्यात मी असंख्य तास घालवले. साहित्य गोळा करण्यासाठी अनेक वर्कशॉपचे उकिरडे पालथे घातले. घरात कचरा गोळाकरण्यासाठी मार पण खाल्ला. कधी सिलेंडर साठी पाईपचा योग्य तुकडा मिळायचा तर कधी पिस्टन साठी. हे दोन्ही मिळाले तर फ्लायव्हील साठी योग्य धातूचा तुकडा मिळत नसे. वडिलांनी मला सांगितले होते की, "तुझे सगळे साहित्य गोळा झाले की मला सांग. मग मी ते जोडण्यासाठी योग्य वर्कशॉप शोधून देईन." एखादा योग्य तुकडा सापडला की वडिलांना आणि कवठेकरसरांना दाखवायचा आणि त्यांचे मत घ्यायचे हा तेव्हा नेम होता. तेव्हा दोघेही मला नाउमेद न करता गंभीरपणे सूचना करत असत. हे साहित्य गोळा करताकरता दहावी झाली. अकरावीत गेलो. अकरावीत असताना वडिलांना १ला हार्ट अटॅक आला आणि आयुष्य विस्कळीत झाले. मग सगळी स्वप्ने बासनात बांधून ठेवावी लागली होती. त्यात स्टीम एंजिनचे स्वप्न पण गुंडाळले गेले आणि अडगळीत गेले...

आज हे आठवायचे कारण म्हणजे आज सकाळी ऍमेझॉन वर घोटाळत असताना एक खेळणे दिसले. बराच वेळ निरखले तेव्हा मी ४० वर्षापूर्वी डिझाईन केलेल्या स्टिम-एंजिनला कुणी तरी प्रत्यक्षात आणून विकायला ठेवले होते. किंमत रुपये ३००० फक्त. खालच्या प्रतिसादात कुणीतरी आपल्या सत्तरीतल्या वडीलांना ते भेट दिले तेव्हा त्यांना झालेला आनंद वर्णन केला होता. मी बराच वेळ त्या खेळण्यात हरवून गेलो होतो, तेव्हा शेजारी बसलेल्या बायकोला कळेना नवरा एव्हढा एका खेळण्यात का हरवला आहे. तेव्हा मी तिला वरील सर्व हकीकत सांगितली अन् म्हणालो घ्यावे की न घ्यावे कळत नाहीये. आणि मग एक सुखद आश्चर्याचा धक्का बसला...

बायकोने हुकूम सोडला, "घेऊन टाक. माझी तुला वाढदिवसाची भेट!" :D
मग बायकोने कंप्युटरचा ताबा घेऊन लगेच ऑर्डर पण केले आहे.

आयुष्यात मी कदाचित एखादी महागडी कार घेईनही. पण या खेळण्याची सर त्या गाडीला नसेल. Thanks you Aparna!! :D

असो, आयुष्याचा एकंदर ताळेबंद मांडला तर पूर्ण झालेल्या स्वप्नांची संख्या अपूर्ण स्वप्नांपेक्षा किंचित जास्तच आहे. स्वप्ने बघायला शिकविण्यात आईवडिलांचे आणि कवठेकर सरांचे योगदान मोठ्ठे आहे...

शनिवार, १ जुलै, २०१७

प्राणायाम आणि संगीताचे पारंपरिक शिक्षणप्राणायामाबद्दल मला लहानपणापासून एक जबरदस्त आकर्षण आणि कुतूहल होते. पण तेव्हाच्या प्रचलित समज आणि गैरसमजामुळे (लहान मुलांनी प्राणायाम करू नये, तो ’गुरु’च्या मार्गदर्शनाखालीच करावा, इ० इ०) प्राणायामाचा पूर्ण फायदा कधीच मिळवता आला नाही. पण सध्या डॉ. दीक्षितांबरोबर करत असलेल्या एका लेखनप्रकल्पामुळे प्राणायामाचे आकर्षण परत एकदा जागे झाले आहे

डॉ. दीक्षितांनी सांगितलेल्या तंत्रानुसार मला प्राणायामाच्या सरावाचा फायदा तात्काळ झाला असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. सध्या मला ७०%-८०% वेळा रक्तदाब आणि हृदयगति हूकमी (at will) कमी करून नियंत्रणात आणता येते. फेबुवर मी माझ्या प्राणायामोत्तर रक्तदाबाच्या आकड्यांचे फोटो शेअर केले आहेतच पण जनुकीय पातळीवर होणारा फायदा वेगळाच (तो मोजायचा खर्च रु २०,०००/ असल्याने सध्या तो विचार लांबणीवर टाकला आहे).

पण सांगण्यासारखा गमतीचा भाग आणखी वेगळाच आहे...

काही वर्षांपूर्वी उदय भवाळकरांच्याकडे धृपद शिकत असताना आम्ही आवाजाच्या तयारीसाठी पहाटे पाच वाजता तंबोरे घेऊन खर्जाचा सराव करत असू. पहाटे पाच वाजता उठून खर्जाचा अभ्यास करण्यामागे परंपरेचे एक तर्कशास्त्र आहे - पहाटेची वेळ मंद्रसप्तकातल्या सुरांच्या अभ्यासाठी आदर्श असते. मन स्वरावर एकाग्र करता येते वगैरे वगैरे.

पण खरी गंमत पुढे आहे...

थोडा खोल विचार केला तेव्हा असे लक्षात आले की खरजाचा अभ्यास हा एक उत्तम प्राणायाम आहे.  त्याचा शारीरपातळीवर होणारा परिणाम मात्र शरीर शांत करणारा आणि मेंदू बंद करणारा आहे. होय! मेंदू बंद करणारा आहे. प्राणायाम २० मि.पेक्षा जास्त वेळ करायचा नसतो. पण आमचा खर्जाचा अभ्यास  पहाटे पाचला सुरु होऊन सातवाजेपर्यंत चालत असे. म्हणजे प्राणायामाच्या ओव्हरडोसमुळे आम्ही खर्जाचा अभ्यास करून जेव्हा इतर रियाज करायचो तेव्हा आमचा मेंदू अर्धसुप्त किंवा पूर्णसुप्त नक्कीच असायचा. थोडक्यात ब्रेकवर पाय ठेवून गाडी ऍक्सिलरेट करण्याचा प्रकार...

सांगायचे तात्पर्य एव्हढेच की वर्षानुवर्षे मेंदूला inefficient करून मग तालमात्रांची गणिते सोडवत जे पुढे मोठे धृपदीये झाले ते केवळ थोरच नाहीत तर निसर्गाचा एक महान चमत्कार आहेत. एखादी कला काळाच्या ओघात जेव्हा टिकत नाही अशी ओरड जेव्हा होते तेव्हा त्यामागे डोके बंद करणारी शिक्षणपद्धती तर नसेल?

सोमवार, १२ जून, २०१७

लिओ वराडकर आणि भारतीय वंश


आयर्लंडच्या पंतप्रधानपदी नुकतेचे विराजमान झालेले श्री लिओ वराडकर यांना भारतीय वंशाचे ठरवण्याचा जो हास्यास्पद प्रयत्न करण्यात आला, तो वाचून फुकटचे श्रेय लाटण्याच्या भारतीय मनोवृत्तीची दया आली. आधुनिक जनुकशास्त्राला लोकाभिमुख करण्याची गरज यातून अधोरेखित झाली.


वास्तविक लिओ वराडकरांना टीचभर य गुणसूत्र (जे उत्क्रांतीमध्ये क्षीण होत चालले आहे) आणि काही जनुक भारतीय पित्याकडुन मिळाले. बाकी आयरीश आईकडुन मिळालेली जनुकीय देणगी आणि अधिजनुकीय देणगी, लहानपणापासून झालेले आयरीश वातावरणाचे संस्कार एकूण भारतीय देणगीच्या पेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे त्यांना केवळ वडिलांमुळे भारतीय वंशाचे ठरवणे हास्यास्पद ठरते.


काही लोक खवळतील... पण आणखी एक उदा. घेऊन हा मुद्दा स्पष्ट करतो.


भारतीय स्वातंत्र्यलढ्यात चित्पावनांचे अजोड योगदान आहे. चित्पावन समाजाचे (काही अपवाद वगळता) जनुकीय मूळ ज्यू आणि युरिपिअन आहे. उद्या इस्रायलने किंवा युरोपने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे श्रेय लाटायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला चालणार आहे का?

सोमवार, २७ मार्च, २०१७

उणीवकाल माझ्या प्रोफाईलवरचा कव्हर फोटो बदलला, त्या निमित्ताने भ० गी० वर परत एकदा चिंतन झाले. सहस्त्रसूर्यांच्या तेजाशी बरोबरी करणार्‍या कृष्णाला एक युद्ध थांबवता आले नाही या माझ्या आक्षेपाबरोबर आता एका नव्या ’ओरिजिनल’ आक्षेपाची भर -

अर्जुनाला कर्म करण्यास प्रवृत्त करण्यासाठी, ’सहस्त्रसूर्यांच्या तेजाशी बरोबर” करणार्‍या कृष्णाला मोक्ष या भ्रामक कल्पनेचे गाजर दाखवावे लागले.      भ्रामक कल्पनेचे गाजर दाखवून काम करवून घेणे हे एक प्रकारचे ’शोषण’च आहे. या शिवाय ’सहस्त्रसूर्यांच्या तेजाशी बरोबरी’ करणार्‍या कृष्णाला भ्रामक कल्पनेचा उपयोग करावा लागला म्हणजे -

० एक तर सामर्थ्यशाली परमेश्वर बुद्धिवादी नसतो, असा निष्कर्ष काढणे चूक ठरणार नाही.
० बुद्धीवाद कर्तव्यपालनास प्रेरणा देण्यास असमर्थ असतो असा एक उपनिष्कर्ष यातून सहज काढता येतो.
० समजा सामर्थ्यशाली परमेश्वर बुद्धिवादी असे क्षणभर मान्य केले तर अर्जुन राजपुत्र असुनही बुद्धिवादी नव्हता असे स्वीकारावे लागेल

तर सध्या माझी समस्या अशी की ’सहस्त्रसूर्यांच्या तेजाशी बरोबरी’  करणारा कृष्ण बुद्धिवादी होता आणि अर्जुन पण बुद्धिवादी होता असे मानले तर भगवतांनी अर्जुनाला नेमके कसे कर्मप्रवृत्त केले असते.

म्हणुन माझे (’या ठिकाणी’ ’फेसबुकच्या माध्यमातून’) तमाम बुद्धिवाद्यांना असे आवाहन आहे की त्यांनी ताबडतोब ’बुद्धिवादी भगवद्गीतेची’ उणीव युद्धपातळीवर भरून काढावी...

सोमवार, २ जानेवारी, २०१७

Purpose of Sex

What is the purpose of sex in (civilized) human life?

हा प्रश्न मी अनेक विचार करणार्‍या (किंवा तसा दावा करणार्‍या) अनेक लोकांना विचारला आहे आणि संधी मिळेल तेव्हा अजुनही विचारतो. या प्रश्नाची प्रमुख दोन उत्तरे मला वाचन, संवाद किंवा निरीक्षणातून मिळाली आहेत.

ती अशी -

० सेक्स निसर्गामध्ये प्रजनना व्यतिरिक्त एकत्रितपणे आनंद उपभोगायचा मार्ग आहे कारण त्यातुन bonding शक्य होते. हा आनंद एकतर्फी, संमतीशिवाय घेतला गेला तर ती सहसा वासना, बळजबरी, हिंसा असते.
० सेक्स हा फक्त प्रजननासाठी असतो.

यातील दूसरे उत्तर देणार्‍यांचा विचारवंतांचा गट प्राणी जगताकडे बोट दाखवतो. मनुष्येतर प्राणी फक्त प्रजोत्पादनासाठी मैथुन करतात. आनंदासाठी किंवा bonding साठी नाही, असे या गटाचे म्हणणे असते. साहजिक प्रजोत्पादना व्यतिरिक्त सेक्सची गरज ही विकृती किंवा वासना मानण्याकडे या गटाचा कल असतो.  या गटाला मनुष्य पॉलिगॅमस आहे हे स्वीकारता येत नाही किंवा स्वीकारायचे नसते. तसे स्वीकारले गेले तर माणसाच्या मनुष्यत्वाला कुठेतरी धक्का लागत असावा. आता माणसाचे मनुष्यत्व कशात आहे, हा प्रश्न मला तरी अनिर्णित आहे असे मला वाटते. कारण प्रत्येक मनुष्यसमूहानूसार मनुष्यत्वाच्या कल्पना बदलू शकतात.

पण ’सेक्स हा फक्त प्रजननासाठी असतो’ असे मानणा-यांचा गट जेव्हा प्राणी जगताकडे बोट दाखवतो तेव्हा काही गोष्टींकडे कानाडोळा करतो.

० प्राणीजगतात कोणत्याही नराला किंवा मादीकडे कोणत्याही नराकडे किंवा मादीकडे केव्हाही जाता येते.
० प्राण्यांमध्ये प्रजोत्पादनानंतर नर आणि मादी आपापल्या दिशेने जाउ शकतात. कुणाचीही जबाबदारी कुणावरही नसते.

म्ह० वरील मूळ प्रश्नाचे उत्तर म्हणून "प्रजनानासाठी सेक्स" हे तत्त्व स्वीकारताना  प्राणी जगतातील इतर संकेतांकडे कानाडोळा केला. कारण ते गैरसोयीचे ठरणार असल्याने स्वीकारता येणार नाहीत. गैरसोयीच्या प्रश्नांना वेगवेगळ्या तर्‍हेने बेदखल करणे यात मात्र माणसाचे मनुष्यपण नक्की सामावले आहे.

मानववंशशास्त्राच्या थोड्य़ाशाही परिचयाने धर्म आणि संस्कृतीने लादलेल्या काही ’उदात्त’ कल्पना कोलमडून पडतात त्या अशा...

रविवार, १ जानेवारी, २०१७

एक समस्याअलिकडे व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा हिरीरीने बर्‍याचवेळा नाट्य/चित्रपट इत्यादीतून मांडला जातो (राजवाडे ऍण्ड सन्स, काहे दिया परदेस सारखी मालिका काही उदा० म्हणून देता येतील. फार पुढे जाऊन बोलायचे झाले तर कोर्टाचे कौटुंबिक दाव्यांमधले निवाडे पण उदा० म्हणून देता येतील). थोडक्यात व्यक्ती आणि कुटुंबात संघर्ष उभा राहीला तर व्यक्तीला झुकते माप द्यायचा प्रघात वाढला आहे. पण हाच संघर्ष व्यक्ती आणि समाज (किंवा एखादा मोठा गट) यांच्यात उभा राहिला तर समाजाला झुकते माप दिले जाईल. सर्जनशील व्यक्ती (कलाकार) आणि समाज हे सहसा षड्डु ठोकून उभे असतात. आय आय टी, पवई येथील मूडइंडिगो मधल्या चित्राचा वाद (किंवा माझे अलिकडे एका ग्रुपमधून झालेले निष्कासन) हे याचे ताजे उदा० आहे.

थोडक्यात व्यक्ती आणि कुटुंब या वादात व्यक्ती महत्त्वाची आणि व्यक्ती आणि समाज या वादात समाज महत्त्वाचा... हे त्रांगडं काही सोडवता  येत नाही.

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

भानभान

-----


एक काळुंद्री वखवखली

सशाला बघुन हरखली
सशाने पुसले तोंडाला पान
काळुंद्रीचे सुटले भान...

सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

पुतळासमजा तुम्ही एक शिल्पकार आहात आणि

तुम्हाला एका व्यक्तीचा छोटा अर्धाकृती पुतळा घडवायचा आहे.


समजा तुम्ही त्या व्यक्तीकडे जाता आणि मग तुमची

अर्धाकृती पुतळा घडवायची इच्छा व्यक्त करता.

मग ती व्यक्ती तुम्हाला (आनंदाने) सांगते

"हो घडवा की"

मग ती व्यक्ती नंतर तुम्हाला म्हणते,

"मला पुतळा चालेल पण

तो पूर्णाकृती हवा."


मग तुम्ही साधकबाधक विचार करता आणि

पूर्णाकृती पुतळा बनवायला करायला तयार होता.


पण मग नंतर ती व्यक्ती म्हणते

मला माझा पुतळा बनविण्यासाठी

इतके इतके लक्ष रुपये मानधन हवे

कारण पुतळा बनविण्यासाठी मी माझा वेळ खर्च

करणार. आणि माझ्या वेळाला किंमत आहे, वगैरे वगैरे...

(थोडक्यात मला पुतळा पण हवा आणि मानधन पण हवे).


मग तुम्ही काय कराल?

गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

आईस...

आईस,

आज तुझ्याशी खुप बोलावसं वाटतय...

जग आता खूप बदलले आहे आणि तुझ्या मूल्यांची आता पीछेहाट झाली आहे. तू हयात असतीस तर तुला हे पचवता आले असते का? याचे उत्तर आज तरी माझ्याकडे नाही. तुझ्या अखेरच्या दिवसात जगाने मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली. ती म्हणजे -

सभ्यपणा हा एकप्रकारचा कमकुवतपणा असतो.


प्रगती हा नात्याच्या यशाचा एक महत्त्वाचा निकष आहे, असे मला वाटते. ज्या मूर्खांनी आपली फक्त भांडणे बघितली, त्यांना हे कळणार नाही की ती कोणत्या परिस्थितीत झाली. तसेच त्या भांडणांमुळे माझी प्रगती थांबली नाही, तर  तुझी काही स्वप्ने पुरी करता आली. समाजाला न्यायाधीशाच्या भूमिकेत बसायची तीव्र हौस असते पण साक्षीपुरावे तपासायची क्षमता आणि इच्छा नसते.

आजकाल मला पंचतंत्रातल्या, यज्ञासाठी बोकड नेणार्‍या ब्राह्मणाला भेटलेल्या ठगांच्या गोष्टीची आठवण करून देणारी माणसे खूप भेटतात. तू हयात असताना सांगितल्याप्रमाणे, "तुझी आई कशी वाईट", हे मनावर बिंबवायचे खूप प्रयत्न झाले. महत्त्वाचे पुरावे हाती लागले नसते तर मला कदाचित "माझी आई वाईट", हे मला स्वीकारणे मला भागच होते. या लोकांचा दिशाभूल करण्यात हातखंडा असतो. अशी माणसे "अर्धा ग्लास भरलेला आहे"  असे मानणार्‍या व्यक्तीला मानसिक रुग्ण ठरवायला कमी करत नाहीत.

बाकी आपल्या गोतावळ्यात ’भानुमतीचा मुलगा’ या ओळखीने मला जी किक् मिळाली आहे, तशी किक् ’कोण्डो विठ्ठल उपाध्यांचा मुलगा’ म्हणुन कधीच मिळाली नाही.

असो. चार्वीने तुझी चेहेरेपट्टी घेतली असल्याने तुझी आठवण तिच्यामुळे सर्वानाच होते आणी राहील. तुझ्या अनेक लकबी तिच्यात कुठुन आल्या हे एक मोठ्ठे कोडे आहे.

जाता जाता - तू कितीही वाईट असलीस तरी मला "अटक" घडवुन आणायचे जे दोन desparate प्रयत्न झाले त्यातुन मी केवळ तू होतीस म्हणून वाचलो, याची जाणीव मला आयुष्यभर राहील.

तुझा

राजीव