शनिवार, २७ डिसेंबर, २००८

एका चर्चासत्राच्या निमित्ताने...

परवाच पुण्यातल्या एका नामवन्त वधूवर-सूचक मंडळाने आयोजित केलेल्या एका चर्चासत्राला उपस्थित राहिलो होतो. चर्चासत्रासाठी एक ज्योतिषी व एक डॉक्टरीण बाई आमंत्रित म्हणून उपस्थित होते.

या चर्चेत आयोजकांनी विवाह जुळवणे ही सामाजिक समस्या कशी बनते ही बाजू मांडली. विवाहाच्या आरोग्यविषयक शंकांचे समाधान डॉक्टरीणबाईनी केले. याशिवाय लग्न जुळण्यात पत्रिकेचे असलेले अनन्यसाधारण साधारण स्थान लक्षात घेता, त्याविषयीचे संभ्रम दूर करण्याचे काम ज्योतिषीमहोदयांनी केले.

एकंदर चर्चा अतिशय उद्बोधक झाली. पण जाताजाता वक्त्यांनी मांडलेले काही मुद्दे काही प्रश्न उपस्थित करून गेले. उदा. विवाह हा दोन व्यक्तींपुरता मर्यादीत नसतो, तर तो दोन कुटुम्बाना जोडतो, असे मत चर्चेच्या आयोजकांनी मांडले. पण प्रत्यक्षात कायदा मात्र दोन व्यक्तीनी प्रजोत्पादन करण्यासाठी एकत्र येऊन राहणे एवढाच अर्थ मानतो. दोन कुटुम्बांच्या एकत्र येण्याचा कायद्यात कुठेही विचार केलेला दिसत नाही.

कुटुंबात येणार्‍या मुलीला आर्थिक व्यवहारांची माहिती दिली जात नाही असा पण मुद्दा मांडण्यात आला. त्याचा परिणाम मुलगी सासरी एकरूप होण्यावर होतो, असेही सांगितले गेले. पण एका भयाण वास्तवाकडे यावेळी वक्त्यांकडून दूर्लक्ष झाले. ते असे की, ४९८-अ सारख्या एकतर्फी कायद्यांचा दुरूपयोग करणार्‍या मुलीना आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाली तर आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे असते.

दूसरी एक गोष्ट आयोजकांनी मांडली, ती म्हणजे समानतावादी आधुनिक स्त्रीची दुटप्पी भूमिका. ही स्त्री संसारात नव‍र्‍याने बरोबरीने कष्ट करावेत अशी अपेक्षा ठेवताना उत्पन्नाच्या अथवा खर्चाच्या वाटणीची वेळ आली की सोयिस्करपणे घूमजाव करते. खर्चाच्या बाबतीत "नवर्‍याचे उत्पन्न हे आपलं सर्वांचं आणि माझं उत्पन्न हे फक्त माझा पॉकेटमनी" असा समानतावादी आधुनिक स्त्रीचा सूर असतो. हे निरीक्षण सार्वजनिक व्यासपीठावरून आणि तेही एका स्त्रीने मांडले याचेच मला मोठ्ठे कौतुक वाटले.

विवाहाच्या आरोग्यविषयक बाजूवर प्रकाश टाकण्यासाठी ज्या डॉक्टरीणबाई आल्या त्यांनी मात्र "समुपदेशनास दोघेही आले तर ही समस्या सुटू शकते" असे गुळमुळीत उत्तर बर्‍याच प्रश्नांना दिले. HIV testची आवश्यकता प्रतिपादन करताना ती नेमकी कितीवेळा करावी याचा खुलासा त्यांनी केला नाही. माझ्या माहितीप्रमाणे ही टेस्ट तीन महिन्यांच्या अंतराने दोनदा करणे आवश्यक असते. कामजीवनाविषयीच्या गैरसमजुतीना डॉक्टरीणबाईनी अजिबात हात लावला नाही.

या चर्चासत्रातील तिसरे वक्ते एक नामवंत ज्योतिषी आहेत. बरीच स्थळे ज्योतिषाच्या अर्धवट ज्ञानाने नाकारली जातात, असा महत्त्वाचा मुद्दा ज्योतिषी महाशयांनी मांडला. समाजात अनेक निरर्थक आणि निराधार समजुती कशा तग धरून आहेत हे त्यांनी निदर्शनास आणले. सप्तमस्थानातील मंगळ सोडून बाकी सर्व स्थानातील मंगळ फारसे त्रासदायक नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

या अनुषंगाने मला पत्रिका मांडायची पद्धत आणि त्यातून होणारी दिशाभूल याविषयी लिहायचे आहे. आपल्याकडे पत्रिका मांडण्याचे उत्तर आणि दक्षिण भारतीय असे दोन प्रकार आहेत. यात एका आयतामध्ये बारा भाग करून त्यात ग्रह (आणि त्यांच्या राशी) मांडले जातात.

समजा, १ अंश मेष आणि २९ अंश मेष या ठिकाणी अनुक्रमे मंगळ व चंद्र असल्यास कुंडलीत ते एकाच स्थानात मांडले जातात त्यामुळे पत्रिकेत मंगळ-चंद्र युति आहे असे कित्येक अर्धवट ज्ञानी लोक मानतात आणि पत्रिका टाकून देतात. याच्याच उलट रवि-गुरु, चंद्र-गुरु यांच्यात नसलेल्या नवपंचमादि शुभ योगांचा भास केवळ पत्रिका लिहीण्याच्या पद्धतीमुळे होतो व पत्रिका दूर्मिळ योगाची म्हणून खपवली जाते.

वास्तविक योग्य ते दीप्तांश विचारात घेउन रवि,चंद्र इत्यादि ग्रहांचे मंगळ, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांशी अष्टामांश मालिकेतील योग होत असतील तर ते विवाह आणि व्यावसायिक भागिदारीत अडचणी दाखवतात. तसेच जोडीदाराच्या पत्रिकेतील मंगळ, शनि, हर्षल, नेपच्यून व प्लुटॊ हे ग्रह जातकाच्या रविचंद्रांशी अष्टामांश मालिकेतील योग करत असतील तर ते वैवाहिक अथवा व्यावसायिक नात्यात अडचणी निर्माण करतात.

ज्योतिषी महोदयांनी चर्चेत आणखी एक मुद्दा मांडला तो असा की ३६ गुण जुळण्याचा अट्टाहास पालकांनी करू नये. ३६ गुण जुळले की मुलाची आणि मुलीची रास एक यायची शक्यता असते. असे झाल्यास दोघांचीही साडेसाती एकदमच येते...

बर्‍याच वेळा असे दिसते की काही वेळा कौटुंबिक कलह दीर्घकाळ चालू राहतो. अशावेळेस कुटुंबातील सर्वांच्या पत्रिका एकत्र पाहिल्या तर असे दिसून येते की अशा कुटुम्बातील सदस्यांचे रविचंद्रादि ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ (युति नव्हे) असून ते मंदगती ग्रहांच्या भ्रमणांच्या तडाख्यात एका मागे एक असे सापडतात. साहजिकच ही परिस्थिती १+१ = ३ अशा स्वरूपाची असते.

तात्पर्य, आदर्श पत्रिकेच्या शोधात न राहता व्यावहारिक दृष्टीकोन स्वीकारून पत्रिकेचा उपयोग करून घेणे शहाणपणाचे ठरते.






गुरुवार, ११ डिसेंबर, २००८

गोत्र

परवाच एका साखरपुड्याच्या समारंभाला जाण्याचा योग आला. तेव्हा लांब बसून
त्रयस्थपणे गुरुजी करवून घेत असलेले विधी पहात व ऐकत होतो. मी अमुक गोत्राचा
तमुक कुलोत्पन्न असा-असा संकल्प सोडतो या अर्थाची संस्कृत वाक्ये गुरुजी
उच्चारत होते. संपूर्ण विधीमध्ये या घोषणे पलिकडे गोत्राला काही स्थान नव्हते.
मग गोत्राशिवाय संकल्प करता येत नाही असे मानयचे का? तसं असेल तर ते कोणत्याही
विवेकी बुद्धीला पटणारे नाही. पण गोत्रामुळे या उपवर मुलाच्या लग्नात आलेल्या
अडचणी मी डोळ्यादेखत पाहिल्या होत्या. हजारो वर्षांपूर्वी आमच्या काही रानटी
ऋषिपूर्वजांचे (इतिहासाचार्य राजवड्यांचा शब्द्प्रयोग) आपापसात पटले नाही
म्हणून त्यांनी रोटी-बेटी व्यवहार टाळले. आणि म्हणूनच काही गोत्रे जुळत नाहीत
अशा समजुती प्रचारात आल्या. आजही खेड्यापाड्यात ज्या घराण्यांत वंशपरंपरागत
भांडणे असतात तिथे, तसेच काही वैमनस्य असणार्‍या काही पंथांमध्ये (उदा. शैव व
वैष्णव) रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत.

पण अजूनही वधूवरसूचक मंडळे वधूवरांच्या माहितीची रजिस्टरं तयार करताना
गोत्राच्या अनावश्यक माहितीची मागणी करतात. गोत्र आणि वंशशुद्धीच्या वेडगळ
कल्पना लोक अजूनही घट्ट्पणे उराशी बाळगतात तेव्हा गोत्र संकल्पनेतील पोकळपणा
सर्वांसमोर आणल्याशिवाय राहवत नाही.
गोत्र संकल्पनेतील काही मला उमगलेल्या त्रुटी अशा आहेत -
० गोत्रे कशी निर्माण झाली याचा अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. वेदांच्या
वेगवेगळ्या शाखांचे अध्ययन करणा‍रे ‍ गोत्रांचे जनक मानले जातात. पण
सूक्ते रचणार्‍या अनेक ऋषींना गोत्रे नाहीत. ते गोत्रांचे जनकही मानले जात
नाहीत.
० गोत्राना कायदेशीर मान्यता पण नाही. विवाह कायदेशीर ठरण्यास गोत्र अनिवार्य
नाही. फारच काय सगोत्र विवाहाला कायदेशीर मान्यता आहे.
० ब्राह्मणांची अनेक गोत्रे त्यांच्या उपशाखांमध्ये समान आहेत. उदा. अत्रि,
कश्यप, गार्ग्य, वत्स इत्यादि. आता जी गोत्रे समान आहेत त्यांचे वंशज एकाच
पिंडसूत्राचे (bloodlineचे) सदस्य मानले तर अत्रि (कर्‍हाडे) किंवा अत्रि
(चित्पावन) यांच्यात भेद कसा मानायचा? दूसर्‍या शब्दात असेही विचारता येईल की
हे अत्रि, कश्यप, गर्ग , वत्स वेगवेगळे ऋषि की एकच?
० याशिवाय बर्‍याच जणांची झोप उडेल अशा दोन मुद्दयांचा विचार मला करायचा आहे.
राजवाड्यांच्या भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या पुस्तकातले १लेच वाक्य वाचा.
राजवाडे म्हणतात, "मित्राला किंवा अतिथीला स्वस्त्री संभोगार्थ देण्याची चाल पुरातन कालापासून
पाणिनीच्या कालापर्यंत भारतीयांत होती.
अशा अतिथीसेवेतून जर संतती निर्माण झाली असेल
तर तिचे गोत्र कोणते? भारतामध्ये नियोगाची प्रथा अनेक वर्षे प्रचलित होती. नियोगात जेव्हा पतिकडून शक्य नसेल तेव्हा स्त्रीला हव्या त्या पुरूषाकडून संतती प्राप्त करून घेता येत असे. परवापरवा पर्यंत म्हणजे स्पर्मबॅंका, टेस्टट्युब बेबीचे तंत्रज्ञान अस्तित्वात येइपर्यत एखाद्या आध्यात्मिक गुरूच्या 'प्रसादाने' संतती प्राप्त झाल्याची उदाहरणे अधूनमधून ऐकू येत असत. ज्यांनी शबाना आझमी आणि श्रीराम लागू
यांचा Immaculate Conception हा चित्रपट बघितला आहे, त्यांना आध्यात्मिक गुरू कसा प्रसाद देत ते सहज लक्षात येईल. अशा प्रसादोद्भव संततीचे गोत्र कोणते? सध्याच्या काळात ज्यांना अपत्य नाही ते अनाथालयातून बालकाला दत्तक घेतात. अशा दत्तक बालकाचे गोत्र कोणते?

तात्पर्य, ज्या गोत्रांना आपण अजून घट्ट्पणे कवटाळले आहे ती संकल्पना किती
पोखरली गेली आहे हे आपल्या लक्षात येईल. असो...

मंगळवार, ९ डिसेंबर, २००८

सन २००९ मधल्या अमावस्यांचे शुभाशुभत्व

सन २००९ मध्ये खालील तारखाना अमावस्या होत असून त्यांच्या शुभाशुभत्वासंबंधी
मार्गदर्शन केले आहे. जिज्ञासूंनी त्यांचे आपल्या पत्रिकेसंदर्भातील महत्त्व
ठरविण्यासाठी ग्रहांचे सायन अंश पहावेत.

टीप - "प्रभावित व्यक्ती"ची व्याख्या - गोचर ग्रह पत्रिकेतील ग्रहांशी युति,
प्रतियुति, केंद्र, अर्धकेंद्र, नवपंचम, आदि योग करीत असतील तर त्या व्यक्ती
"प्रभावित" मानल्या जाव्यात.

२६ ०१ २००९ (ग्रहण) ६-३२ कुंभ
गुरुच्या युतीत असल्या मुळे बर्‍याच प्रमाणात शुभ, पण शनि-हर्षल प्रतियुतीत
सापडलेल्या व्यक्तींना अशुभ

२५ ०२ २००९ ६-३२ मीन
शनि-नेपचूनचा मध्यबिंदू अमावस्येशी केंद्रयोग करतो. त्यामुळे ५ ते ८ अंश
मीन-कन्या-मिथुन-धनु
मध्ये ज्यांचे ग्रह असतील त्यांना अशुभ


२६ ०३ २००९ ६-१० मेष
अमावस्येचा प्लुटोशी केंद्रयोग. गोचर शनि-हर्षल प्रतियुतीमध्ये मंगळ हर्षलशी
युति करण्यास जात आहे म्हणून अतिशय अशुभ

२५ ०४ २००९ ५-०१ वृषभ
प्लुटोशी नवपंचम योग. सायन मकर-वृषभ-कन्या राशी मध्ये ४ ते ६ अंशामध्ये ज्यांचे
ग्रह असतील त्यांना काही प्रमाणात शुभ. अशा व्यक्तींच्या आयुष्याला निर्णायक
वळण देणारी.

२४ ०५ २००९ ३-३१ मिथुन
संमिश्र फलदायी.

२३ जून २००९ १-२९ कर्क
गुरू-नेपचून युतीशी नवपंचम योगामुळे काही जणांना शुभ. प्लुटोशी प्रतियुतीमुळे
० ते २ अंश मकर-मेष-कर्क-तूळ मध्ये ज्यांचे ग्रह असतील त्यांना अशुभ

२४ जुलै २००९ २९-२२ कर्क
हर्षलशी नवपंचम योगामुळे प्रभावित व्यक्तींच्या आयुष्यात अनपेक्षित कलाटणी
देणार्‍या घटना.

२० ऑगस्ट २००९ २७-३३ सिंह
मंगळ-प्लुटो-शनि-हर्षल यांच्या अशुभ योगांची छाया असल्यामुळे बर्‍याच प्रमाणात
अशुभ.

१९ सप्टेंबर २००९ २५-५८ कन्या
अमावस्या शनीच्या युतीमध्ये आहे. शनि-प्लुटो केंद्र आणि शनि-हर्षल प्रतियुती
चालूच असल्यामुळे मोठ्ठ्या प्रमाणात अशुभ.

१८ ऑक्टोबर २००९ २४-५५ तूळ
गुरु, प्लुटो, नेपचूनशी शुभ योगांमुळे प्रभावित व्यक्तींना मोठ्ठ्या प्रमाणात
शुभ

१७ नोव्हेंबर २००९ २४-३३ वृश्चिक
संमिश्र फलदायी.

१६ डिसेंबर २००९ २४-४३ धनू
हर्षल बरोबर केन्द्र योगामूळे प्रभावित व्यक्तीना अशुभ.

शनिवार, ६ डिसेंबर, २००८

आपले नवे मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून श्री. अशोक चव्हाण यांची
निवड/नेमणूक झाली आहे. त्यांची जन्मतारीख २८ १० १९५८ अशी वृत्तपत्रात छापून आली
आहे. नुसती जन्मतारीख जेव्हा ठाऊक असते तेव्हा देखिल जातकाच्या भवितव्याबद्दल
बरेच मार्गदर्शन पत्रिकेतून मिळू शकते.

पत्रिकेला uniqueness देणारे चंद्र, लग्न आणि दशमभाव आरंभबिंदू हे अशा वेळी
विचारात घेता येत नाहीत.

चव्हाण यांच्या पत्रिकेत रविगुरू अंशात्मक युति असून रवि प्लुटोशी लाभयोग करतो.
हे एवढे योग चव्हाण यांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचविण्यात कामी आले.
रवि-प्लुटो चे लाभ आणि नवपंचम योग असलेल्या व्यक्ती केवळ स्वत:चाच नाही तर
कुटुम्बाचा, त्यांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींचा देखिल उत्कर्ष करताना
दिसतात. यात आणखी एक योगायोगाचा भाग म्हणजे चव्हाण यांच्या पत्रिकेत मंगळ आणि
प्लुटोचा केंद्रयोग जो हिंसाचार दाखवतो त्याच हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर श्री
चव्हाण यांनी सत्ताश्री संपादन केली आहे. त्यामुळे हिंसाचार आणि क्रौर्य यांची
गाढ छाया नव्या मुख्यमंत्र्याच्या कारकीर्दीवर पडेल असे वाटते.

याशिवाय रवि-नेपचूनची युति श्री चव्हाण यांच्या पत्रिकेत असून ती त्यांना हतबल
बनवेल. २०१२-१३ सालचे शनीचे या युतीवरील भ्रमण त्यांच्या राजकीय घोडदौडीला खो
घालायची शक्यता आहे. सहकार्‍यांपैकी ज्यांचे ग्रह श्री चव्हाण यांच्या
पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न आणि दशमभाव आरंभबिंदू यांच्याशी युति, प्रतियुती,
केंद्र, अर्धकेन्द्र इ. योग करतात त्यांच्या कडून श्री चव्हाण यांच्या पदास
धोका आहे हे नक्की.

२६ जानेवारीचे सूर्यग्रहण श्री चव्हाण यांच्या रवि-नेपचून युतीला कार्यरत करते.
सूर्यग्रहणाचे परिणाम दीर्घकालीन असतात. तेव्हा श्री चव्हाण यांच्या कडून फार
अपेक्षा ठेवाव्यात असे मला वाटत नाही...

रविवार, ३० नोव्हेंबर, २००८

सुसंस्कृत भारतीय

मला कधि कधि स्वत:ला भारतीय म्हणवून घ्यायची लाज वाटते. तुम्हाला नक्कीच
प्रश्न पडेल की हा असा का बोलतो आहे.

मी पुण्यात जीथे राहतो तिथे जवळच ३-४ मंगल कार्यालये आहेत. मी हा मजकूर लिहीत
असताना रस्त्यावर एका लग्नाची एक वरात वाजत गाजत चालली आहे. अधूनमधून
फटाक्यांचे मोठे सर लावले जात आहेत. कुण्या धनदांडग्याच्या घरचा हा विवाह सोहळा
असावा. जणू काही घडलेच नाही असा माहोल आहे. शहाण्या लोकांना मला काय म्हणायचे
ते आता कळले असावे.

देशावर एवढे मोठे संकट कोसळले. प्राणहानी, वित्तहानी झाली त्याचे यत्किंचितही
दू:ख या मिरवणूकीतल्या लोकांना नाही. कदाचित दहशतवादी मारले गेले याचा आनंद या
वर्‍हाडीना झालेला असावा. पण या निर्बुद्ध लोकाना हे कळत नाही की दहशतवादी
मारले म्हणजे दहशतवाद मारला गेला असे नाही.

लग्नसमारंभ स्थगित करणे शक्य नाही हे समजू शकते पण तो साधेपणाने साजरा करण्याची
बुद्धी या लोकांना हिदूंच्या तेहतीस कोटी देवांपैकी एकाही देवाने दिली नाही हे
दूर्दैव.

काही वर्षापूर्वी दिवाळीत कोकणात गेलो होतो. मी ज्या कुटुम्बात उतरलो होतो त्या
कुटुम्बात दिवाळीची कोणतीही धामधूम नव्हती म्हणून मी आडून चवकशी केली. तेव्हा
असे कळले की नुकतेच शेजारच्या घरातल्या कर्त्या व्यक्तीचे अचानक निधन झालेले
होते. खेड्यातल्या अडाणी लोकांकडे जी संवेदनशीलता दिसली ती सुसंस्कृत
म्हणवणार्‍या भारतीय समाजात नक्कीच नाही. तसं असतं तर निदान १३ दिवस तरी
रस्त्यावर लग्नाच्या वाजतगाजत मिरवणूका या देशात निघणार नाहीत.

बुधवार, २६ नोव्हेंबर, २००८

जुनी दारू आणि नवी बाटली...

ज्योतिष शास्त्र आहे की नाही यावर वाद घालून धूळ उड्वत बसण्यापेक्षा ज्योतिष
उपयुक्त आहे की नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. उपयुक्ततता सिद्ध होण्यास
शास्त्रीयत्वाच्या कसोटीची गरज नाही, फक्त अनुभव पुरेसा आहे. मागे एकदा आय आय
टी मधल्या प्राध्यापक जोगांनी लोकसत्तेमधल्या एका लेखाचा संदर्भ दिला होता.
लेखकाचे नाव आठवत नाही, पण त्यातील शेवटचे वाक्य माझ्या लक्षात राहिले आहे. ते
असे, "विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही". ज्यांना या विधानातील विदारक
सत्य पटेल, त्यांनाच ज्योतिषाची उपयुक्ततता पटेल. विज्ञानाने भले कितीही
प्रगती केलेली असो माझ्या जीवनातील अनिश्चितता झेलण्यास ते जितके उपयोगी पडेल,
तितकेच माझ्या जीवनात विज्ञानाचे महत्त्व असेल. माझ्या देशाने पूर्वी महासंगणक
तयार केला आणि आता चंद्र काबीज केला, पण त्याचा माझ्या घराच्या जवळ बसणारा
चांभार, चहाची टपरीवाला यांच्या रोजच्या जीवनक्रमात कसलाही बदल घडला नाही आणि
नजिकच्या भविष्यकाळात तसा बदल घडेल असेही नाही. म्हणून ज्या प्रगतीचा
एखाद्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काही उपयोग नाही, ती त्याला असून नसल्या
सारखीच...किं तया क्रियते धेन्वा या न सूते न दूग्धदा (जी गाय प्रसवत नाही आणि
दूधपण देत नाही त्या गायीचा उपयोग काय)?

तात्पर्य, ज्या विज्ञाननिष्ठेचा, बुद्धिवादाचा फारसा उपयोग नाही त्याची कास
सरसकट धरण्याचा आग्रह धरणे म्हणजे एक प्रकारचा आततायीपणा आहे असे मला वाटते.

आपल्याकडे ज्योतिषाकडे अनेक दृष्टीकोनांतून पाहिले जाते. ज्योतिषाकडे बघायचा
आणखी एक दृष्टीकोन मला अमेरीकेतील एका प्रसिद्ध ज्योतिषीबाईनी (त्या आता हयात
नाही) मला दिला. त्यांचे नाव श्रीमती मॅरी डाउनिंग. त्यांच्या मते ज्योतिष हे
मानवी जीवनातील चक्रीय वास्तवाची प्रतिकृती आहे (Astrology is model of
circular reality in human life). हे चक्रीय वास्तव सुख आणि दू:ख,
अपेक्षापूर्ती आणि अपेक्षाभंग, प्रवृत्ती आणि निवृत्ती, अशा ध्रुवांमध्ये
आंदोलित होत असते.

माझ्या दृष्टीने मॅरी डाउनिंगच्या व्याख्येतील प्रतिकृती हा शब्द मला अतिशय
महत्त्वाचा वाटतो. कोणत्याही रचनेचे रूप आणि कार्य समजावून घेण्यासाठी
प्रतिकृती उपयोगी पडतात. आपण प्रतिकृती अथवा प्रतिक (प्रतिकृती अमूर्त होत जाते
तेव्हा त्याचे प्रतिक बनते) याचे सोपे उदाहरण म्हणून आपण वास्तूविशारदाने
बनवलेल्या घराच्या प्रतिकृतीचे घेऊ. या प्रतिकृतीमुळे आपल्याला वास्तूची कल्पना
करण्यास मदत होते. या प्रतिकृतीमध्ये वास्तूरचनेची सर्व तत्त्वे अमलात आणली जात
नाहीत. म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, वास्तूची प्रतिकृती बनवताना आपण खर्‍या
दगड विटांचा आणी इतर बांधकाम सामानाचा उपयोग करीत नाही. संगणकावर बनवलेल्या
प्रतिकृती मध्ये तर ० आणी १ एवढाच कच्चा माल वापरला जातो. आणि म्हणून ती
प्रतिकृती बनवण्याचा आणी वापरण्याचा उद्योग अशास्त्रीय ठरत नाही किंवा तयार
झालेली प्रतिकृती अंधश्रद्धा होत नाही.

प्रतिकृतीला, ती ज्या उद्देशाने बनवली गेली आहे त्यानुसार, मर्यादा येतात.
पुठ्ठ्याचा वापर करून तयार केलेल्या वास्तूच्या प्रतिकृतीमध्ये प्रकाश किती
खेळेल किंवा याचा अंदाज बाधणे कठीण असते. शिवाय अशी प्रतिकृती बर्‍याचदा
वास्तूच्या बाह्य रुपाचाच अंदाज येण्यास उपयोगी ठरते. अंतर्भागाची तसेच हालचाल,
चलनवलन यांची कल्पना करण्यासाठी, संगणकीय प्रतिकृती उपयोगी पडतात.

हे सर्व सांगायचा खटाटोप एवढयाचसाठी की ज्योतिषाच्या मर्यादा आपण जर समजावून
घेतल्या तर ज्योतिषाचा योग्य उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. माझे आयुष्य
एखाद्या सूत्रात बांधले गेले आहे का?, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास प्रत्येक
व्यक्ती पूर्णपणे स्वतंत्र आहे. एखादे सूत्र ही त्यातील विशिष्ट घटकांच्या
परस्पर संबंधांची प्रतिकृती असते. जन्म आणि मृत्युच्या या अंतिम अवस्थांनी
बद्ध असलेल्या मनुष्याची पत्रिका ही म्हणूनच त्याच्या जीवनात येउ शकणार्‍या
वेगवेगळ्या अवस्थांची एक प्रतिकृती मानली तर त्यात वावगे काय?

ज्यांच्या जीवनाला स्थैर्य लाभले आहे ते ज्योतिषाकडे अनुदार किंवा साशंक
वृत्तीने बघतात. त्यांच्या जीवनातील अनिश्वितता एक तर कर्मधर्मसंयोगाने
मर्यादित असते, किंवा ती मर्यादित ठेवण्यात अशा व्यक्तीना यश मिळालेले असते.
त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या जीवनाला, कशामुळे का असेना, निश्चितता आहे
त्यांना ज्योतिषाबद्दल आकस, अनास्था वाटणे स्वाभाविक आहे.

याच मुद्द्याच्या अनुषंगाने मला एक महत्त्वाचे मत येथे मांडावेसे वाटते. आधुनिक
ज्योतिषी ग्रहांचे परिणाम अजिबात मानत नाहीत. ते ग्रहांच्या भ्रमणांचे किंवा
आकाशात तयार होणार्‍या विशिष्ट भौमितिक रचनांची मानवी जीवनातील अवस्थांशी सांगड
घालायचा प्रयत्न करतात. अशी सांगड घालण्याचा उद्योग अतिसुरक्षित आयुष्य
जगणार्‍या व्यक्तीच्या बाबत बर्‍याचवेळा फसतो. कारण त्यांच्या आयुष्यात नवे
काही घडायची शक्यता फारच थोडी असते. भरभराटीचे योग असणार्‍या सर्वच व्यक्तींची
भरभराट होताना दिसत नाही याचे कारण या स्पष्टीकरणात सापडेल. म्हणूनच ज्योतिष
अनिश्चितता असेल तेव्हाच पहावे.

ज्योतिषाचे निंदक विकृत बुद्धिवादाची इस्त्री सर्वसामान्य माणसाच्या मनावरून
फिरवून परिटघडीचा समाज बनवू इच्छितात काय़? बरं, हा बुद्धिवाद शाश्वत समाधानाची
हमी प्रत्येक प्रयत्नवादी व्यक्तीला देइल याची खात्री कोणीच देत नाही. तसे
असल्यास दूसरा एक प्रश्न उपस्थित होतो. निसर्गाने अशा बुद्धिवादाने मिळणारे
'समाधान' पचविण्याचे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीला दिले आहे काय? तशा चाचण्या
किंवा संशोधन झाले असल्यास मी त्याविषयी अधिक जाणून घेण्यास उत्सूक आहे.

Regards

Rajeev Upadhye
---------------------------
www.yuyutsu.biz
http://rajeev-upadhye.blogspot.com/
--------------------------

सोमवार, २४ नोव्हेंबर, २००८

शनि-हर्षल प्रतियुतीच्या छायेतील त्रासदायक ग्रहयोग


शनि
-हर्षल प्रतियुतीच्या छायेतील त्रासदायक ग्रहयोग

आगामी काळात म्हणजे १२ डिसेंबर ०८ व २६ जाने २००९ रोजी अनुक्रमे पौर्णिमा आणि अमावस्या हे दोन जोरदार चांद्रयोग होत आहेत. हे दोन्ही योग शनि-हर्षल प्रतियुतीच्या छायेत होत असल्याने तीव्र फलदायी ठरतील असे भाकीत वर्तवणे योग्य ठरेल. यापैकी ही पौर्णिमा अशुभ (त्यामुळे कोणत्याही नव्या सुरुवातीस ती वर्ज्य
आहे) असून, अमावस्येला सूर्यग्रहण होत आहे. ग्रहणाची अमावस्या मिश्र फलदायी ठरेल (त्याविषयी सविस्तर नंतर लिहीन).

प्रथम आपण १२ डिसेंबर ०८ रोजी असलेल्या पौर्णिमेचा विचार करू. ही पौर्णिमा सायन मिथुन-धनु रास २१ अंश या अक्षावर होत आहे. या पौर्णिमेची कुंडली मांडली असता खालिल ग्रहयोग दिसून येतात.

रवि केन्द्र शनी
रवि लाभ नेपचून
रवि युति मंगळ
रवि केन्द्र हर्षल

हे सर्व योग अंशात्मक आहेत. याशिवाय रवीच्या युतिमध्ये प्रभावी झालेला मंगळ गोचरीने शनि व हर्षल या प्रतियोगातील ग्रहांबरोबर केंद्र योग करतो.

याचे तात्पर्य असे की शनि व हर्षल प्रतियोगामुळे चालू झालेल्या उलथापालथीचा एक मोठा दणका कोणत्या ना कोणत्या अरिष्टाच्या स्वरूपात (मोठा भूकंप, रेल्वे अथवा विमान अपघात, घातपाती कारवाया) १२ डिसेंबर ०८ च्या मागेपुढे एक आठवडा या कालावधीत मिळू शकतॊ.

आता आपण या पौर्णिमेच्या प्रभावाखाली कोणत्या व्यक्ती सापडल्या आहेत त्यांचा विचार करू... ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत सायन २० ते २२ अंश मिथुन-कन्या-धनु-मीन या क्षेत्रात कोणतेही ग्रह असतील तर त्यांना या पौर्णिमेची
जोरदार अशुभ फले अनुभवाला येतील. या फलांची तीव्रता मूळ पत्रिकेतील ग्रह योगांप्रमाणे असेल.

पुढे दिलेल्या तारखाना रवि कोणत्याही वर्षी २० ते २२ अंश सायन मिथुन-कन्या-धनु-मीन या क्षेत्रात असतो, म्हणून या तारखांना ज्यांचे जन्म झाले आहेत त्याच्या जन्मरवीशी पौर्णिमेतील मंगळ, शनी, हर्षल हे युति, प्रतियुति, केन्द्र हे योग करतात.

या तारखा अशा -
११ ते १४ मार्च ११ ते १४ जून १२ ते १५ सप्टेंबर १२ ते १५ डिसेम्बर

शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने हे योग अतिशय हानीकारक आहेत. शक्य असल्यास कोणतेही धाडस न करणे तसेच सौम्य धोरण स्वीकारून कलह टाळणे हे या काळात शहाणपणाचे ठरेल.

ज्यांना निरयन राशीचक्राप्रमाणे पौर्णिमेचा आपल्या पत्रिकेतील प्रभाव जाणून घ्यावयाचा असेल त्यांनी २५-२६-२७ अंश वृषभ-सिंह-वृश्चिक-कुंभ या क्षेत्रात आपल्या पत्रिकेत कोणते ग्रह आहेत ते तपासावेत.

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २००८

[शनी-हर्षल प्रतियोग] दीर्घकाल टिकणारे अस्थैर्य

शनी-हर्षल प्रतियोग - दीर्घकाल टिकणारे अस्थैर्य

आगामी काळात म्हणजे नोव्हेंबर ०८ ते ऑक्टोबर १० या जवळजवळ दोन वर्ष शनी व हर्षल
हे दोन मंदगती ग्रह मार्गी व वक्री गतीने पाच वेळा प्रतियुति हा जोरदार योग
करीत आहेत. सायन राशीचक्रामधिल १८ अंश कन्या ते १ अंश तूळ, १८ अंश मीन ते १ अंश
मेष, १८ अंश मिथुन ते १ अंश कर्क तसेच १८ अंश धनु ते १ अंश मकर हे मॊठे क्षेत्र
या प्रतियोगानी प्रभावित झाले आहे.

शनी हा स्थैर्यकारक आणि हर्षल हा अनपेक्षित घटनांचा कारक ग्रह आहे. हे दोन ग्रह
गोचरीने जेव्हा युति, प्रतियोग, केंद्र इत्यादि योग करतात तेव्हा त्यांच्या
प्रभावाखालिल क्षेत्रात कुंडलीतील रवि, चंद्र, लग्न, दशम-भाव आरंभ बिंदू आले
असल्यास आयुष्यात मोठ्या उलथापालथ करणार्‍या घटनांना अनपेक्षितपणे तोंड द्यावे
लागते. शनी आणि हर्षलच्या योगात दिसून येणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
घडणार्‍या घटना हतबल किंवा उध्वस्त करतात. झंझावातात अडकलेल्या व्यक्ती प्रमाणे
या योगात अनुभव येतात. सध्या पुण्यात "पोलिसराज"चे एक उदाहरण गाजत आहे. ते
शनी-हर्षल प्रतियोगाचे नमुनेदार उदाहरण आहे. दीर्घकाल टिकणारे अस्थैर्य हा
शनी-हर्षल प्रतियोगाचा स्थायीभाव आहे.

वर म्ह्टल्या प्रमाणे जवळजवळ दोन वर्षे हा प्रतियोग चालू राहील. खाली या
योगाच्या तारखा आणि अंश दिले आहेत.

४ नोव्हे. २००८ १८-५७ सायन कन्या-मीन
५ फेब्रु. २०००९ २०-०० सायन कन्या-मीन
१५ सप्टे. २००९ २४-४२ सायन कन्या-मीन
२७ एप्रिल २०१० २८-४६ सायन कन्या-मीन
२६ जुलै २०१० ००-२५ मेष-तूळ

सायन कन्या-मीन राशींचे फार मोठे क्षेत्र या योगात सापडल्या मुळे समाजाचा फार
मोठा वर्ग या योगाच्या तडाख्यात सापडणार आहे. त्यामुळे मागे शनी-मंगळ
युतिमध्ये सापडलेल्या जन्मतारखांप्रमाणे येथे प्रतियुतीमध्ये सापडलेल्या
जन्मतारखांचे गणित मांडणे अशक्य आहे.

वर नमुद केलेल्या अंशामध्ये जन्म पत्रिकेतील रवी असेल तर शारीरिक अस्थैर्य,
चंद्र असेल तर मानसिक अस्थैर्य, बुध असेल तर बौद्धिक अस्थैर्य, शुक्र असेल तर
आर्थिक किंवा सांसारिक अस्थैर्य दीर्घकाल अनुभवास येते.


Regards

Rajeev Upadhye
---------------------------
www.yuyutsu.biz
http://rajeev-upadhye.blogspot.com/
--------------------------

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २००८

|| धर्मांतर ||

धर्मांतर

राजीव उपाध्ये - सप्टेंबर २००८

धर्मांतर हा माझ्या कुतुहलाचा विषय आहे. त्यात हिंदूचे धर्मांतर हा तर विशेष
कुतुहलाचा विषय. हिदूंना वाटत असलेल्या धर्मांतराच्या चिंतेची मला नेहमीच गम्मत
वाटत आली आहे.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते गणेशोत्सवाचे दिवस होते. पुण्यातील एका
मानाच्या गणपतीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका विद्वानाचे "धर्मांतराची
समस्या" या विषयावर प्रवचन होते. वर म्हटल्याप्रमाणे, हा कुतुहलाचा विषय
असल्यामुळे मी या कार्यक्रमास उपस्थित राहिलो होतो. शुभ्र वेष, शुभ्र दाढी आणि
तुळतुळीत टक्कल असलेले प्रमुख वक्ते पूर्वाश्रमीचे अमेरीकेत एमेस केलेले संगणक
अभियंते होते. आता त्यांनी आपले आयुष्य धर्मप्रचारासाठी वाहून घेतले होते. त्या
विद्वान महाशयानी आपल्या व्याख्यानाची सुरुवात चातुर्वण्याच्या "नव्या"
व्याख्येपासून करायला घेतली. चातुर्वण्यातील प्रत्येक वर्णाचा नवा अर्थ
उपस्थितांपुढे तल्लीन होऊन उगाळत असताना एका विघ्नामुळे या महाशयांची निरूपण
समाधी भंग पावली.

तो दिवस गणपती विसर्जानाचा होता. सदर कार्यक्रम ज्या ठिकाणी चालू होता तेथे
बर्‍याच रहदारीचा एक रस्ता आहे. नेमकी त्यावेळी रस्त्यावरून एक मिरवणूक जाऊ
लागली होती. ढोल-ताशांच्या गजरात प्रवचन-स्थळी लावण्यात आलेला ध्वनिक्षेपक
निरूपयोगी ठरला आणि साहजिकच माननीय वक्त्यांची निरूपण-समाधी भंग पावली.
त्यांच्यातला दूर्वास तत्क्षणी जागा झाला आणि चडफडत त्यांनी शापवाणी उच्चारली -
"These all are real shudras!" एका विद्वानापुढे निर्माण झालेले विघ्न, तो
विघ्नहर्ता पण दूर करू शकत नव्हता. त्या नव-शूद्रांना आपण कोणते पाप केले याचे
भान नव्हते. मनातल्या मनात मी पण टिळकांवर चिडलो होतो. त्यांनी पुच्छविहीन
माकडांच्या हाती दिलेले कोलित ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यास उपयोगी
पडले पण त्याने एक नवे शूद्रत्व निर्माण केले होते...

हिंदूच्या धर्मांतराचा मुद्दा जेव्हा जेव्हा ऐरणीवर येतो तेव्हा तमाम
हिंदूत्ववादी एक गोष्ट लक्षात घ्यायला विसरतात.
हिंदूधर्माकडे आकर्षित होऊन तो स्वीकारणार्‍यांची संख्या किती आणि त्याचा
तिरस्कार निर्माण होऊन तो सोडणार्‍यांची संख्या किती? या मूळ प्रश्नाला आणखी
काही पदर आहेत. उदा. एखाद्या हिंदू नसलेल्या व्यक्तीने हिंदू
व्हायचे ठरवले तर वर्णाश्रम व्यवस्थेत त्याचे नवे स्थान कोणते? या प्रश्नाचे
समाधानकारक उत्तर मला अजून तरी मिळाले नाही. असो.

मला असं वाटतं, धर्माचं यश तो किती वर्षे टिकून आहे यापेक्षा तो किती पसरला आहे
या निकषावर तपासायला हवं. धर्म टिकून राहतो तो त्याने निर्माण केलेल्या
मानसिकतेच्या आणि दहशतीच्या जोरावर आणि तो वाढतो त्याने सोडवलेल्या
प्रश्नांच्या जोरावर.

काही दिवसांपूर्वी मी रिक्षातून जात होतो. रिक्षा, टेंपो किंवा ट्रकमध्ये जी
वाङ्‌मय निर्मिती दिसते ती गुंफाचित्रांचा आधुनिक आविष्कार आहेत असे मला वाटते.
मी ज्या रिक्षातून जात होतो ती येशूच्या वचनांनी आणि चित्रांनी सजवली होती
. त्यामध्ये एका छोट्या चित्राकडे माझे लक्ष वेधले गेले
. त्या चित्रात वधस्तंभावरील येशू रेखाटला होता. पण हा येशू आजवर बघितलेल्या
येशूंपेक्षा निराळा होता. कारण त्याच्या अंगावर जे उत्तरीय होते ते मात्र
भगव्या रंगाचे होते. पाव खाऊन हिंदू बाटले गेले पण भगवे उत्तरीय घेतलेला येशू
मात्र न बाटता येशूच राहिला होता...


Regards

Rajeev Upadhye
---------------------------
www.yuyutsu.biz
http://rajeev-upadhye.blogspot.com/
--------------------------

सोमवार, ८ सप्टेंबर, २००८

कथा दोन साधुंची

कथा दोन साधुंची

डिसेंबर २००७

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट काही सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या
खांद्यावर ऒढून घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने
प्रभावित होऊन प्रेतामधला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, "राजा
तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटतॆ. तुझे कष्ट थोडेफार हलके व्हावेत म्हणून
मी तुला एक गोष्ट सांगतॊ."

"आटपाट नगर होतं. त्यात एकदा आपल्या शिष्यपरिवारासह दोन साधूंनी मुक्काम केला
होता. एक साधूमहाराज त्यांच्या यज्ञयागादि तप: सामर्थ्यासाठी प्रसिद्ध होते.
शिवाय प्रत्येक माणसाचे भूत-भविष्य-वर्तमान जाणून घेण्याचे सामर्थ्य त्यांना
प्राप्त झाले होते. गतजन्मीच्या पापांचे प्रायश्चित्त घेतल्या शिवाय याजन्मीचे
भोग संपणार नाहीत अशी त्यांची शिकवण होती. तर दूसरे केवळ आपल्या अमोघ वाणीने
समोर जमलेल्या भक्तांचे दू:ख निवारण करण्यासाठी प्रसिद्ध होते. दोघांनाही आटपाट
नगरात प्रचंड भक्तबल लाभले होते. त्यात नुकतेच मिसरूड फुट्लेले वितर्कतीर्थ
आणि सन्मतितीर्थ या नावाचे दोन तरूण पण होते.

आटपाट नगरात उपजीविकेसाठी फारशी संधी नसल्याने ते दोघे आलेला प्रत्येक दिवस या
दोन महंतांच्या कार्यक्रमांत व्यतीत करत."

"वितर्कतीर्थ यज्ञयागादि तप:सामर्थ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या साधूंच्या
थाटामाटाने भारावून गेला होता. तर सन्मतितीर्थ गावाबाहेर मुक्कामास असलेल्या
महंतांच्या साध्या शिकवणुकीने प्रभावित झाला होता. वितर्कतीर्थाला प्रभावित
करणारे महाराज त्यांची दैनिक पूजाअर्चा संपली की हत्तीवरून गावात मिरवणुकीने
आपला लवाजमा घेऊन फेरफटका मारत.
गावातील सर्व लोक ही मिरवणूक पाहण्यासाठी गोळा होत आणि यथाशक्ती धनधान्याचे दान
करत. कितीही गैरसोय झाली तरी मिरवणूकीबद्दल गावात नाराजीचा जराही सूर उमटला
नव्हता. कदाचित या साधूमहाराजांच्या तप:सामर्थ्याचा दराराच तसा होता. याउलट
आपल्या अमोघ वाणीने समोर जमलेल्या भक्तांचे दू:ख निवारण करण्यासाठी प्रसिद्ध
असलेले साधूमहाराज मात्र गावाच्या वेशीबाहेर मुक्कामाला होते. त्यांच्या
वास्तव्याने आटपाटनगराच्या रोजच्या व्यवहारात फारसा हस्तक्षेप होत नसे.
त्यांच्या प्रवचनास येणा-या भक्तवर्गाकडून मिळणा-या भिक्षेवर सर्वजण
उदरनिर्वाह करीत. सन्मतितीर्थ या साधूमहाराजांना शरण गेला होता..."

एकदा काय झालं, गावातील नदीवर वितर्कतीर्थ आणि सन्मतितीर्थ संध्याकाळी
अंघोळीसाठी आले असताना पाण्यात डुंबताना दोघांमध्ये गप्पा चालू झाल्या.
गप्पांचा विषय होता, गावात मुक्कामास आलेल्या दोन साधूंची शिकवण आणि त्यांचे
आचरण. तपाचे सामर्थ्य श्रेष्ठ की समस्यांचे निवारण करणारे मार्गदर्शन श्रेष्ठ?
वितर्कतीर्थ आणि सन्मतितीर्थ गप्पांमध्ये एवढे बुडून गेले की की सूर्य मावळतीला
कधी गेला याचे त्यांना भानच राहीले नाही. नदीकाठच्या

जंगलात झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट वाढू लागला. निशाचर श्वापदांच्या आरोळ्या
जशा वाढू लागल्या तसे वितर्कतीर्थ आणि सन्मतितीर्थ भानावर आले आणि पाण्यातून
बाहेर आले. कपडे बदलून आणि ओले पिळे खांद्यावर टाकून त्यांनी गावचा रस्ता
पकडला.


जंगल अर्धे पार होईपर्यंत काळोखाने आपले पूर्ण साम्राज्य पसरले होते. आता
मात्र दोघांची पावले झपाझप पडू लागली. पण तेवढयात सन्मतितीर्थाचा पाय एका
खड्ड्यात पडून मुरगळला. त्याला चालता येणे अशक्य झाले. वितर्कतीर्थाला तर
गावाकडे परतायची घाई झाली होती. संध्याकाळची मठातील स्वादिष्ट प्रसादाची वेळ
टळली असती तर रात्रभर भुकेने तळमळून काढावी लागली असती. या विचाराने अस्वस्थ
होऊन तो सन्मतितीर्थाला म्हणाला "तुला आता बरोबर घेऊन गेलो तर आपण दोघे एखाद्या
वन्य श्वापदाच्या भक्ष्यस्थानी पडू. तेव्हा तू सकाळ होईपर्यंत एखाद्या झाडाच्या
ढोलीत विश्रांती घे. सकाळी मी गावातील लोकांना मदतीला घेऊन येईन आणि तुला गावात
घेऊन जाईन." बराच विचार करून सन्मतितीर्थाने या सूचनेस संमती दर्शवली.

त्यावर वितर्कतीर्थाने अंधारात धडपडत एका विशाल वटवृक्षाची ढोली शोधून काढली
आणि तेथे सन्मतितीर्थाची व्यवस्था करून वितर्कतीर्थाने त्याचा निरोप घेतला. दाट
काळोखाने व्यापलेल्या जंगलात काही पावले चालून जातो न जातो तोच काही कळायच्या
आत वितर्कतीर्थ एका कठडा नसलेल्या पाण्याच्या विहीरीत घसरून पडला.

त्या किर्र शांततेत मोठ्ठा धोंडा पाण्यात पड्ल्याचा आवाज आणि "वाचवा वाचवा" असे
शब्द सन्मतितीर्थाच्या कानावर पडले आणि त्यावरून काय घडले असावे हे त्याने
जाणले. पण तो हतबल असल्याने "सकाळ होई पर्यंत त्याने वाट बघू" असा विचार
करतानाच त्याला झोप लागली. सकाळ झाली आणि सूर्याच्या उबदार किरणांनी
सन्मतितीर्थाला जागे केले. पायाचा ठणका कमी झाल्याने तो लंगडत ढोलीतून बाहेर
पडला आणि वाळलेल्या फांदीची कुबडी करून तर्कतीर्थाला हाका मारु लागला...रात्री
ऐकलेल्या आवाजाच्या दिशेने त्याने जेव्हा शोध घेतला तेव्हा त्याला वितर्कतीर्थ
पडला होता ती कठड्यास भगदाड पडलेली विहीर नजरेस पडली.

त्याने विहिरीत डोकाऊन पाहिले तेव्हा विहीरीच्या पाय-यांवर मूर्च्छा येऊन
पडलेला वितर्कतीर्थ दिसला.

आता आपल्या मित्राला बाहेर कसे काढायचे याचा विचार त्याच्या मनात डोकावताच दूर
अंतरावर त्याला एक स्त्री लाकूडफाटा गोळा करताना दिसली. हातवारे करून आणि हाका
मारून वितर्कतीर्थाने तिच्याकडे मदतीची याचना केली.
जेव्हा ती स्त्री विहिरीजवळ आली तेव्हा सर्व वृत्त सन्मतितीर्थाने तीस कथन
केले. तेव्हा ती म्हणाली, "मी अशीच गावात जाते आणि जो भेटेल त्याला घेऊन येते."
जाण्यापूर्वी तीने विहिरीतून कसेतरी पाणी काढले आणि तर्कतीर्थाच्या तोंडावर
मारले. सरपणाची लाकडे गोळा करताना वेचलेली कंदमुळे सन्मतितीर्थाच्या हवाली
करून ती गावाकडे निघाली.

ती स्त्री गावाकडे निघाली तेव्हा तीने सन्मतितीर्थाच्या गुरूंच्या आश्रमात
निरोप दिला व पुढे वितर्कतीर्थाच्या गुरुंच्या आश्रमात निरोप द्यायला गेली
तेव्हा तपस्वी महाराजांची मिरवणूक गावात नेहमी प्रमाणे चालू झाली होती. तिने
जोरजोरात हाका मारून तपस्वी महाराजांच्या शिष्याचे लक्ष वेधायचा प्रयत्न केला.
महाराजांचे लक्ष तीच्याकडे गेले तेव्हा त्यांनी मिरवणूक थांबवण्यास सांगून एका
शिष्योत्तमास चौकशी करण्यास सांगितले. गुरूंच्या आदेशाप्रमाणे शिष्य त्या
स्त्रीकडे चौकशी करून आला आणि म्हणाला, "गुरूवर्य एका क्षुद्र कुळात जन्मलेला
आणि उद्योग नसलेला गावातील एक तरूण आपला भक्त आहे. तो विहीरीत पडला असून, त्यास
बाहेर काढण्यासाठी ही स्त्री मदत मागत आहे." तपस्वी महाराजांनी काही क्षण डोळे
मिटले आणि ते म्हणाले, "हा तरूण गेल्या जन्मी पाखंडी म्हणून प्रसिद्ध होता.
त्यामुळे त्याचा हीन कुळात जन्म झाला आणि त्याच्या वाट्याला हे दू:ख आले. पण
गावातील लोकांची मदत घेऊन त्याला सायंकालीन पूजेच्या वेळी घेऊन या म्हणजे मी
त्यावर मंतरलेले उदक शिंपडतो म्हणजे त्याच्या पीडेचे निवारण होईल." असे म्हणून
मिरवणुकीस त्यांनी पुढे जाण्याचा आदेश दिला. इकडे गावाबाहेर मुक्काम केलेल्या
साधुमहारांजाचे भक्त त्वरेने जंगलाच्या दिशेने निघाले आणि वितर्कतीर्थ आणि
सन्मतितीर्थाला त्यांनी शोधून काढले आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करून
त्यांना गांवात नेले.

वितर्कतीर्थ मात्र या अनपेक्षित माणुसकीच्या अनुभवाने भारावून गेला. त्याची
तपस्वीमहाराजांवर असलेली श्रद्धा पूर्णपणे उडून गेली. "ज्यांचे तप:सामर्थ्य
माझी वेदना दूर करत नाही त्यांची सेवा करून मला काय मिळणार" असा त्याने
स्वत:शीच विचार केला." त्याने त्यांच्या दर्शनाला जाणे पूर्ण थांबवले. तो
ह्ळुहळु सन्मतितीर्थाबरोबर गावाबाहेर मुक्कामाला असलेल्या गुरूंच्या प्रवचनास
जाऊ लागला. गावात जो भेटेल त्याच्या समोर त्यांचे गोडवे गाऊ लागला.

पण झाले काय की या प्रकाराने मात्र तपस्वी महाराज आणि त्यांचा शिष्यपरिवार
अस्वस्थ झाला. त्यांनी वितर्कतीर्थाला एक दिवस पळवून आणले आणि अंधारकोठडीत
डांबून ठेवले. पण या प्रकाराचा मात्र गावात बभ्रा झाला तेव्हा मात्र तपस्वी
महाराजांनी गावातून काढता पाय घेतला.

येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "आम्हा पिशाच्चांचे एक बरे असते. आमच्या
कुठेही श्रद्धा नसतात. तसेच आमच्यात जातपात, धर्म पण नसतात. त्यामुळे धर्मांतर
आणि धर्मबुडवेपणा पण आमच्यात नसतो. पण मला सांग, तुला यातल्या कोणत्या
महाराजांचे शिष्यत्व स्वीकारायला तुला आवडेल." या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असून
दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायाशी लोळू लागतील."

यावर राजा विक्रमादित्य हसून म्हणाला, "तपस्वी महाराजांच्या लेखी वितर्कतीर्थ
एक क्षुद्र माणुस होता. त्यांच्या परिवारास त्याचा तसा काहीच उपयोग नव्हता.
त्यामुळे याला मदत करून काय साधणार असा सुप्त विचार तपस्वी महारांजांनी केला
असावा. संकटातून किंवा बंधनातून बाहेर पडायला प्रत्यक्ष मदत करणारी प्रवृत्ती
मला श्रेष्ठ वाटते. ही प्रवृत्ती आपापसातील दरी कमी करते."

राजाच्या या उत्तराने वेताळ खूष झाला आणि विक्रमादित्याचा मौनभंग झाल्याने
प्रेतासह झाडावर जाऊन लोंबकळू लागला.