मंगळवार, २२ मे, २०१२

भाकिताचा पुन्हा पडताळा

मी खाली दिनांक २९ ०४ २०१२ रोजीच्या नोंदीमध्ये ग्रहणाच्या कालावधीमध्ये मोठ्या आपत्तीचे भाकित केले होते. ते इटलीच्या भूकंपाने खरे ठरले होतेच. त्यात आणखी एका आपत्तीची भर पडली आहे. ही आपत्ती म्हणजे आंध्रात झालेला रेल्वे अपघात.

या शिवाय बल्गेरीयात आणखी एका भूकंप (५.८ रिश्टर स्केल) आजच झाल्याचे वृत्त आहे. http://www.google.com/hostednews/afp/article/ALeqM5gWUuOg2nQhkEusTJyHShLu47T-Tg?docId=CNG.083833085acfb87a2eafecefbd831ed9.4f1

रविवार, २० मे, २०१२

भाकिताची प्रचिती - इटलीतील भूकंप




मी आजच्या सूर्यग्रहणा विषयी खाली केलेल्या भाकिताचा पुन्हा एकदा पडताळा आला आहे. मी खाली मोठ्या भूकंपाचे भाकित केले होते. रिश्टर स्केल्वर ६ इतक्या तीव्रतेचा इटलीत असा भूकंप झाल्याची बातमी आहे.  पाच जण दगावल्याचा बातमीत उल्लेख असून अनेक ऐतिहासिक वास्तूना या भूकंपामुळे हानी पोचली आहे.

ज्योतिष परिपूर्ण शास्त्र नाही म्हणून मला भूकंपाची जागा आणि तीव्रता अचूक सांगता आली नाही. पण मी सांगितलेल्या कालावधित आणि नेमकी वर्तवलेली घटना घडली आहे, हे कुणीही नाकारु शकणार नाही.

रविवार, २९ एप्रिल, २०१२

भाकीते करण्याचे ’ग्राफीकल एफिमेरीस’ (आलेखी-पंचांग) तंत्र



एबर्टिनने मध्यबिंदू तंत्राबरोबर ज्योतिषात आणखी एक मोलाची भर घातली. याला पाश्चात्य ज्योतिषात ’ग्राफीकल एफिमेरीस’ असे संबोधले जाते. मराठीत आलेखी-पंचांग ही संज्ञा या तंत्रासाठी योग्य ठरेल. या तंत्राचा उपयोग विशिष्ट कालावधीतील ग्रहांची भ्रमणे एखाद्या पत्रिकेशी कशी interact करतात याची एकत्रित कल्पना यावी यासाठी केला जातो. पारंपरिक पंचागात ग्रहांच्या स्थितीची कोष्टके दिली असतात. पण पारंपरिक पंचागातील ही मांडणी  एखाद्या पत्रिकेत गोचर भ्रमणांचे होणारे योग एकत्रित पणे तपासण्यास उपयोगी नसते. भाकीतात अचूकता आणण्यासाठी गोचर भ्रमणांचे होणारे योग एकत्रित पणे तपासणे आवश्यक ठरते. तसेच समकक्ष (equivalent) योगांचा एकत्रित अभ्यास ’ग्राफीकल एफिमेरीस’ मध्ये चटकन करता येतो.

आलेखी-पंचागात इष्ट कालावधी साठी उभ्या अक्षावर ० ते ३६०, ० ते १८०, ० ते १२० किंवा ० ते ९० अंश दर्शवले जातात. आणि आडव्या अक्षावर काल दर्शवला जातो. इष्ट कालावधी एक वर्षाचा असेल तर आडव्या अक्षाचे १२ महिन्यांसाठी १२ भाग केले जातात. सोयीचे एकक घेउन दररोज  किंवा विशिष्ट अंतराने ग्रहांचे बदलते अंश बिंदू स्थापून दाखवले जातात. आपल्याला हव्या त्या ग्रहांसाठी ही प्रक्रिया पार पडली की जो आलेख तयार होतो, तो आलेख  विशिष्ट कालावधीचे ’ग्राफीकल एफिमेरीस’ असते.

खाली उदाहरण म्हणून मंगळ आणि गुरुचे भ्रमण सन २०१२ करता कसे दिसेल ते दिले आहे. याशिवाय अमावस्या-पौर्णिमां पण या आलेखात दर्शविलेल्या आहेत.



या आलेखावर नजर टाकली असता असे लक्षात येईल की -

  • मार्च २०१२ मध्ये मंगळ-पौर्णिमेची
  • मे २०१२ मध्ये गुरु -सूर्यग्रहणाची अमावस्या  यांची युति होते .  ही अमावस्या मोठ्या आपत्तीला (भूकंप वगैरे) आमंत्रण देणारी ठरावी. प्रभाव काल +/-५ दिवस.

  • नोव्हेम्बर २०१२ मध्ये गुरु- चंद्र्ग्रहणाची पौर्णिमा यांची युति होते. (  ही  पौर्णिमा मोठ्या आपत्तीला (भूकंप वगैरे) आमंत्रण देणारी ठरावी. प्रभाव काल +/-५ दिवस )



हे सर्व फलिताच्या दृष्टीने जबरदस्त योग आहेत. पारंपरिक पंचागात अशी एकत्रित माहिती न मिळाल्याने आगामी काळाचा विचार करून अंदाज बांधण्यात चूका होण्यास भरपूर वाव असतो.


आता अशी आरेखित केलेली भ्रमणे जातकाच्य़ा पत्रिकेशी कशी interact करतात हे तपासण्यासाठी काय करतात हे पाहूया. यासाठी आलेखी-पंचागात उजवीकडे जातकाच्या पत्रिकेतील ग्रह त्यांच्या अंशांप्रमाणे उभे मांडतात. असा ग्रह मांडल्यानंतर कालाच्या अक्षाला समांतर अशी एक रेषा काढतात. पत्रिकेतल्या जेव्हढ्या ग्रहांचा विचार इष्ट कालावधीसाठी करायचा तेव्हढ्या ग्रहांची भ्रमणे अशा स्वरूपात मांडली की आलेखी-पंचांग खाली दिल्या प्रमाणे दिसते.


उदाहरण म्हणून मी गुरु, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लुटो आदि ग्रहांची सन २०१२ मधिल भ्रमणे घेतली आहेत. शिवाय या कालावधीतील ग्रहणे आणि अमावस्या-पौर्णिमां पण यात मांडल्या आहेत. उजवी कडे मांडलेले ग्रह श्री अमिताभ बच्चन यांच्या पत्रिकेतील आहेत. ते सायन राशी चक्रानुसार आहेत. या आलेखावर नजर टाकली तर असे लक्षात येते की सन २०१२ मधिल दोन ग्रहणे (मे आणि नोव्हेम्बर) श्री अमिताभ बच्चन यांच्या हर्षल आणि शनिला सक्रिय करतात. शिवाय त्यांची जन्मवेळ जर बरोबर असेल तर जन्मचंद्र शनीच्या भ्रमणाखाली येतो. माझ्या अंदाजानुसार मेपासून पुढचा काळ श्री  बच्चन यांना जास्त त्रासदायक ठरू शकतो.


पूर्वी आलेखी-पंचांग हाताने तयार करत असत आता संगणकामुळे हव्या त्या कालावधीसाठी असे पंचांग  चुटकीसरशी तयार करता येते. (माझ्या कडे असलेल्या Janus 4.3 या सॉफ्टवेअरमध्ये या सर्व सोयी आहेत).  ग्रहयोगांच्या एकत्रित आणि समग्र अभ्यासास फार मोठी मदत या तंत्रामुळे होते.




शनिवार, २१ एप्रिल, २०१२

इकडचं तिकडचं...


आजच माझ्याकडे आलेल्या जातकांनी मला एका  तान्ह्या मुलीची पत्रिका कराल का? अशी पृच्छा केली. अधूनमधून हा प्रश्न मला केला जातो आणि अशा विनंतीला मी नम्रपणे नकार देतो. खरं तर यात माझेच आर्थिक नुकसान आहे. पण काही तत्त्वे पाळायचीच हा निर्धार असल्याने, मला असे नुकसान झालेले चालते.

तान्ह्या मुलांची पत्रिका करू नका असे सांगण्यामागे माझी निश्चित अशी कारणे आहेत. केवळ तान्ह्याच नाही तर २० वर्षांपर्यंत आणि सत्तरीनंतर (काही अपवाद वगळता) पत्रिका बघू नये असे माझे  स्पष्ट मत आहे. याची कारणे अशी-

विशीपर्यंत व्यक्तीची स्वयंनिर्णयाची क्षमता पूर्णपणे विकास पावलेली नसते. सहसा आईवडिलांवर मुले अवलंबून असतात. सत्तरीनंतर तब्येत ठणठणीत नसेल तर हळुहळु परावलंबित्व यायला सुरुवात होते. अनेक इच्छाना मुरड घालावी लागते. मनमुरादपणे वानप्रस्थाश्रमाचा काल व्यतीत करणे सर्वच ज्येष्ठाना शक्य असते नाही. थोडक्यात या परावलंबीत्वामुळे  एकंदरच संधी आणि निर्णय यावर मर्यादा असतात/यायला लागतात.

सांगायचे तात्पर्य असे की २० ते ७० या मधल्या काळात, सर्वसाधारणपणे स्वयंनिर्णयाचा हक्क बजावू शकणारी व्यक्तीच वेगवेगळ्या शक्यता/संधीना विवेकाने प्रतिसाद देऊ शकते. हे परावलंबी व्यक्तींच्या बाबतीत होऊ शकत नाही. पत्रिका ही केवळ शक्यता दाखवत असल्याने बंदिस्त आयुष्य जगणार्‍या व्यक्तींच्या आयुष्यात या शक्यता प्रत्यक्षात  येऊ शकत नाहीत.

दूसरा मुद्दा असा की पत्रिकेवरून काही ज्योतिषी अशी भाकीते करतात की मुले किंवा ज्येष्ठ यांच्या जीवनावर अशा भाकीतांची दाट छाया पडते. याचा अत्यंत मनस्तापदायक अनुभव भारतीय ज्योतिषांकडून मला स्वत:ला आलेला आहे. (मला वाहनापासून धोका सांगितल्यामुळे मला वयाच्या २३व्या वर्षापर्यंत सायकल चालवायला घरातून परवानगी मिळाली नाही. कल्पना येण्यासाठी मी माझा फक्त एकच अनुभव इथं सांगितला).

तेव्हा घरात नवीन पाहूणा आला तर ज्योतिषाकडे धावत सुटू नका...

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

अमिताभ बच्चन : भाकीताचा पडताळा

मी २० फेब्रुवारीच्या खालील पोस्ट मध्ये एप्रिल २०१२ मध्ये श्री अमिताभ बच्चन यांचा पोटाचा विकार एप्रिल २०१२ मध्ये बळावेल असे भाकीत केले होते.
http://rajeev-upadhye.blogspot.in/2012/02/blog-post_7074.html

वृत्तपत्रातील ताज्या बातम्यावरून हे भाकीत खरे ठरले आहे असे दिसते.
http://www.hindustantimes.com/Entertainment/Tabloid/Big-B-blogs-about-pain-gets-taken-aback-by-media-attention/Article1-838381.aspx

माझ्या ब्लॉगचे एक वाचक आणि माझे कॉलेज मित्र श्री मंदार कुलकर्णी यांनी ते माझ्या निदर्शनास आणुन दिल्याबद्दल त्यांचे आभार!

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

दशा पद्धतीबद्दल माझे काही आक्षेप

भारतीय ज्योतिषात जातकाच्या पत्रिकेतल्या एखाद्या घटनेचा कालनिर्णय करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या दशा आणि महादशा मला खटकतात. मी माझ्या प्रॅक्टीसमध्ये त्या वापरत नाही. "ऋषीमुनीना जास्त अक्कल होती" या गृहीतकावर ठाम श्रद्धा असणारी मंडळी मला शिव्या देतील आणि त्या झेलायची माझी आनंदाने तयारी आहे.

या दशा पद्धतीचा शोध घेत असताना मला अशी माहिती कळली की ४० पेक्षा अधिक दशापद्धती अस्तित्वात आहेत. पण विंशोत्तरी दशा ज्योतिषी अधिक वापरतात. म्हणजे वेदनाशामक ओषधे अनेक उपलब्ध आहेत पण ब्रुफेन जास्त वापरले जाते. पण ब्रुफेन परिणामकारक ठरत नाही तेव्हा डॉक्टर इतर पर्यायांचा विचार करतात. तसा (भारतीय) ज्योतिषी इतर पर्यायांचा विचार करताना दिसत नाहीत.

पण मला जो मुद्दा मांडायचा आहे तो वेगळाच आहे. दशा पद्धतीमध्ये ज्या क्रमाने दशा येतात तो क्रम कसा व का अस्तित्वात आला आणि दशांच्या आवर्तनाचा कालावधी कसा निश्चित केला गेला आहे, याबद्दल कोणीच कुठे बोलताना दिसत नाही. म्हणजे आहे हे असे आहे, पटलं तर बघा. अशातला प्रकार. ज्योतिषाला शास्त्र म्हणून प्रतिष्ठा मिळायला ज्या अडचणी येतात, त्यापैकी ही एक.

दूसरा मुद्दा असा की जास्त अक्कल असणारे हे शास्त्रकार आज जर पुनर्जन्म घेऊन परत जन्माला आले तर या दशा पद्धती आहेत तशा स्वीकारतील की त्यात सुधारणा करतील? या सुधारणा करताना ते तर्काचा आणि आधुनिक साधनांचा आधार घेतील की आपापल्या लहरीपणे करतील? हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण म्हणजे हर्षल, नेप्च्यून आणि प्लुटो या अलिकडे सापडलेल्या ग्रहांचा दशा पद्धतीत अंतर्भाव करायचा कोणताही प्रयत्न किंवा विचार झाल्याचे मला तरी ठाउक नाही. ज्या हवामान खात्याचे अंदाज आपण चेष्टेवारी नेतो ते हवामान खाते सुद्धा त्यांच्या वापरातील मॉडेलमध्ये कालानुरुप बदल करत असते. डॉक्टर सुद्धा ब्रुफेनचा उपयोग होत नसेल तर वेगळे पर्याय शोधतात. "तुम्ही आणि तुमची डोकेदुखी" म्हणून सोडून देत नाहीत. कोणतही उपयुक्त मॉडेल अथवा डिझाइन हे विस्तारक्षम असायलाच हवं...

सांगायचा मुद्दा एव्हढाच की दशापद्धत ही कल्पनाविलासावर आधारीत असून त्यात सुधारणेला वाव नाही कारण तिचा विस्तार कालानुरुप होऊ शकत नाही. आज अस्तित्वात असलेल्या ४०हून अधिक दशापद्धती अशा विस्तारक्षम मॉडेल मधून विकास पावल्या आहेत का, याचे उत्तर आत्ता तरी नाही असेच द्यावे लागेल.

मात्र गोचर पद्धतीवर आधारीत कालनिर्णय करताना त्यात कालानुरुप मूळ गृहितकांशी सुसंगत असा विस्तार झालेला आहे कारण हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांच्या भ्रमणांचा अंतर्भाव त्यात झालेला आहे. गोचर भ्रमणांवर आधारीत कालनिर्णय हा कल्पनाविलासावर आधारित कालनिर्णय नाही.

तेव्हा "ऋषीमुनीना जास्त अक्कल होती" असा युक्तीवाद कोणी करायला लागला तर त्यात किती तथ्य आहे हे कळणे तुम्हाला फारसे अवघड वाटायला नको.

गुरुवार, २२ मार्च, २०१२

बंधुराजांसाठी पत्रिकामेलन

माझ्या एका मामेभावाला सध्या "कर्तव्य आहे". हा माझा भाऊ चांगला शिकलेला आहे म्हणजे अमेरीकेत चांगल्या विद्यापीठात संगणक अभियांत्रिकीत एमेस केलेला आहे. शिवाय मायक्रोसॉफ्ट मध्ये गेले ५-६ वर्षे तरी टिकून आहे. माझ्यावर त्याच्यासाठी पत्रिकामेलन करायची जबाबदारी आलेली आहे. हे आमचे बंधुराज ज्या मुलींची माहिती पसंत पडेल त्या मुलींचे जन्मटिपण मला कळवतात. मग मी त्याला पत्रिका जुळते की नाही हे कळवतो.

नुकतेच माझ्या भावाने मला चार मुलींची जन्मटिपणे पाठविली आणि माझे मत मागितले. मी त्याला दोन पत्रिका जुळत असल्याचे आणि उरलेल्या दोन जुळत नसल्याचे सांगितले. आणि नेमके झाले असे की न जुळणार्‍या पत्रिकेतली एक मुलगी त्याला खूप आवडली होती तिच्या इतर माहितीवरून. त्याने मला मेल पाठवून विचारले की "दादा, मला तू नको म्हटलेल्या मुलींपैकी एक खूप आवडली आहे. तू का नाही म्हणतोयस ते जरा खुलासेवार सांगशील का?"

वास्तविक या मुलीला ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून नाही म्हणताना मला अवघड गेले. त्याचे कारण सर्वाना कळावे म्हणून या लेखाचा प्रपंच.

या मुलीच्या मूळ पत्रिकेत टोकाचे चांगले आणि त्रासदायक असे योग आहेत (अर्थात चांगले योग असल्यामुळेच तीचे आयुष्य असे घडले की ती माझ्या भावाला पसंत पडली. यात शंकाच नाही). अशा परिस्थितीत उपवर वधू आणि उपवर मुलगा यांच्या पत्रिकेतले प्रत्येक ग्रह दूसर्‍या पत्रिकेतील ग्रहांची कसे interact करतात हे आधुनिक ज्योतिषी बघतात आणि संभाव्य नातेसंबंधातील चढ-उतारांचा अंदाज बांधतात. या संभाव्य नातेसंबंधाची कल्पना जातकाला दिल्यावर जातकाने आपल्याला काय झेपेल वा काय झेपणार नाही याचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असते. पण आपल्याकडे हा निर्णय ज्योतिषाला घ्यायला भाग पाडले जाते. असो.

या माझ्या भावाला आवडलेल्या मुलीच्या मूळ पत्रिकेत काही महत्वाचे योग आहेत ते असे -
* ख-मध्याजवळ ६ अंशातील शुक्र-मंगळ युती, या मंगळाचा हर्षल बरोबर केंद्र योग, शुक्राचा नेपच्यून बरोबर नवपंचम योग आणि प्लुटो बरोबर लाभ योग (हे दोन्ही योग जोरदार आहेत). एकंदर मामला नुसता रोमॅंटीकच नाही तर या व्यक्तीची सेक्सची गरज above average आहे हे नक्की. पण शुक्राने तयार केलेली शुक्र=मंगळ -शनी ही रचना कामसुखात वैफल्य आणि असमाधान दाखवते.
* लग्नाशी अंशात्मक युतीमुळे ताकदवान झालेला शनि - हा शनी ताकदवान असल्यामुळे मूळ पत्रिकेतील कोणत्या मध्यबिंदू रचनेत शनि अंतर्भूत आहे हे पहावे लागते. ते बघितले असता षोडषांशात शनि=शुक्र-नेपच्यून तसेच शनि= रवि-शुक्र या मध्यबिंदू रचना तयार झालेल्या दिसतात. या पण रचनांची फले वरीलप्रमाणेच म्हणजे कामसुखात वैफल्य आणि असमाधान दाखवते.
* चंद्र-प्लुटो २ अंशातील केंद्रयोग - भावनिक प्रक्षोभाची प्रवृत्ती
* बुध-नेपच्यून केंद्रयोग - स्वत:ला किंवा इतरांना फसवत राहण्याची प्रवृत्ती.

थोडक्यात या मुलीची एकदोन तरी प्रेमप्रकरणे बर्‍यापैकी पुढे (सर्व अर्थानी!) जाऊन फसलेली असणार.

पण एव्हढ्यावर ही पत्रिका मी तरी नाकारणार नाही. कारण लग्नानंतर अनेक लोक बदलू शकतात. पण त्यासाठी एकमेकांच्या पत्रिका खर्‍या अर्थाने पूरक असायला हव्या. त्यासाठी वर म्हटल्या प्रमाणे एका पत्रिकेतील प्रत्येक ग्रह दूसर्‍या पत्रिकेतील ग्रहांशी कसे interact करतो ते पहायला हवे. यासाठी या पत्रिका एकमेकांसमोर मांडल्या असता पुढीलप्रमाणे ग्रहयोग दिसतात-



यात डावीकडील चिन्हे माझ्या भावाच्या पत्रिकेतील ग्रहांची यादी आहे. मधली यादी ग्रहयोगांची चिन्हे आहेत. आणि उजवीकडील चिन्हे मुलीच्या पत्रिकेतील ग्रह दर्शवतात (ही सर्व चिन्हे आंतरराष्ट्रीय असून ज्याना कळत नाहीत तो खरा ज्योतिषी नाही). या यादीवर जर नीट नजर टाकली तर असे दिसेल की मुलीच्या पत्रिकेतील बलिष्ठ शनि माझ्या भावाच्या रवि आणि शुक्राशी युति करतो.

माझ्या मते ही युति या दोघांच्या संसाराला किंवा नातेसंबंधाना मारक आहे कारण यात पत्नी डॉमिनेटींग होतेच शिवाय कुटुम्बसुख कमी होऊन आर्थिक अडचणी कायम उभ्या राहतात. आता कुटुम्बसुख कमी म्हणजे भांडणे होतीलच असं नाही तर एकमेकांचा सहवासाच्या संधी कमी. नवरा-बायको वेगवेगळ्या गावात काम करत असतील तर वरील प्रमाणे शुक्राचे योग असलेली व्यक्ती आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहण्याची शक्यता अमेरीकेसारख्या देशात कमीच..

तेव्हा मी माझ्या भावाला दिलेला पुढे न जाण्याचा सल्ला तुम्हाला पटतोय का ते पहा...

रविवार, ११ मार्च, २०१२

गणपतीचा शोध

लोकहो,

लहानपणी मी गणपतीभक्त होतो. याचे प्रमुख कारण लंक्यांच्या स्कॉलरशिपच्या क्लास मध्ये संकष्टीला आणि गणेशोत्सवात अथर्वशीर्षाची २१ आवर्तने व्हायची. तेव्हापासून बर्‍यापैकी नियमित पणे अथर्वशीर्षाची आवर्तने मी करत असे. पण "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्‍या देवाला भज" असे आई म्हणायची. आईला असे कसे विचारले तर उत्तर देता येत नसे मग मला आईचा राग यायचा. पण मी मात्र माझी गणेशभक्ती मी नेटाने पुढे चालु ठेवली होती.

पुढे मी पुण्याला टिळक विद्यापीठात संस्कृत मध्ये विशारद (बीए) करायला जाउ लागलो. दूसर्‍या वर्षी आम्हाला वैदिक साहित्य अभ्यासायला होते. शिकवायला प्रा. सुचेता परांजपेबाई होत्या. त्यांनी आपल्या पूजाविधींमधले अनेक मंत्र निरर्थकपणे शतकानुशतके जपले जात असल्याचे सांगितले. उदा. मंत्रपुष्पांजलीचा आणि गणपतीचा काहीही संबंध नाही, हे कळले तेव्हा मी उडालोच. परांजपेबाईनी असेही सांगितले की वेदांत गणपती कुठेही नाही आणि केवळ गणपती या शब्दामुळे "गणांनां त्वा गणपतिं..." ही ऋचा गणपतीच्या पूजेत ओढून ताणून लोकांनी वापरायला सुरुवात केली. पण हे काहीच नाही, पुढे जे कळले त्यामुळे माझा गणपतीवरच्या श्रद्धेला सुरुंग लागला. परांजपे बाईनी सांगितले की गणपती ही नीच देवता आहे, सूर्य, अग्नि, विष्णु या वैदिक देवतांप्रमाणे ती उच्च देवता नाही. यावर मी वर्गात बाईना प्रश्न केला की नीच देवता म्हणजे काय तर त्यांनी सांगितले की ती अनार्यांची देवता आहे, जसे सोट्या, म्हसोबा, वेताळ या जशा नीच देवता आहेत. मी उडालोच आणि दूसर्‍याक्षणी माझी गणपती वरची श्रद्धा पार उडाली. आई मला जे सांगत होती, त्यात वावगे नसावे असे वाटू लागले.

यानंतर जवळजवळ वीस-बावीस वर्षे गेली. अचानक प्रा. दामोदर कोसंबी या प्रखर बुद्धिमत्तेच्या विद्वानाने लिहीलेल्या मिथ अ‍ॅण्ड रिअ‍ॅलीटी या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचत असताना रंजक माहिती कळली की गणपती हा शंकरापासून झालेला पुत्र नव्हे. (म्हणजे तो शंकर-पार्वतीचा अनौरस पुत्र ठरतो.) पुराणकथांमागे आजच्या नीतिमत्तेला न झेपणारे वास्तव लपलेले असते याचा हा एक दाखला होता. याच पुस्तकात लोकदैवतांचे ब्राह्मणीकरण कसे होते याची रोचक चर्चा कोसंबीनी केली आहे. त्यामुळे गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.

तरीही गणपती ही नीच देवता आहे याचा मला अधिकृत पुरावा हवा होता आणि तो मिळवण्यासाठी मी तडफडत होतो. गणपती हा विघ्नकर्ता म्हणजे त्रासदेणारा. ही आईने सांगितलेली माहिती खरी की खोटी हा प्रश्न अधून मधून सतावायचा. पण त्याचेही उत्तर मला काळाच्या ओघात मिळायचे होते. दरम्यान मिसळपाव वरील एक सदस्य श्री श्रावण मोडक यानी लोकायत वाचायला सांगितले. बहुतांश लोकांची अशी समजूत असते की प्राचीन भारतात एकच संस्कृती अस्तित्वात होती ती म्हणजे वैदिक संस्कृती. पण तसे नसून त्यावेळेस वैदिक संस्कृतीला समांतर अशी म्हणजे दासांची (अनार्यांची) संस्कृती पण अस्तित्वात होती ती म्हणजे लोकायत.

अचानक स रा गाडगीळ यांनी लोकयताचा मराठीतून करून दिलेला परिचय वाचनात आला. त्यात गणपतीच्या शूद्रत्वाचे अधिकृत दाखले त्यांनी दिले आहेत. हे दाखले अनेक धर्माग्रंथांचे आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ.  गणपती हा विघ्नकर्ता आहे हे अनेक ग्रंथ अधोरेखित करतात.

एक शोधवर्तूळ पूर्ण झाले. माझी आई बरोबर ठरली. ती आज हयात असती तर तिला नक्कीच आनंद वाटला असता.

जाता जाता - गणपती अथर्वशीर्षाचा आणि अथर्ववेदाचा काहीही संबंध नाही अशी माहिती नुकतीच "लोकदैवतांचे विश्व" या रा. चिं. ढेर्‍यांच्या पुस्तकात मिळाली.

मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे.


पी.एस. २८ एप्रिल २०१२
गणपतीला मी हद्दपार केला ते शूद्र देवता म्हणून असा अनेकजण समज करून घेतील. पण तसे अजिबात नाही. मी त्याला हद्दपार केला त्याचे विघ्नकर्तृत्व सिद्ध झाल्यामुळे. माझी मूळ समस्या वेगळीच आहे. शूद्र देवतांचे ब्राह्मणीकरण/उन्नयन होऊ शकते. गुन्हेगारांचे शुद्धीकरण आणि पुनर्वसन होऊ शकते. धर्मत्याग केलेल्याला धर्मात परत येण्यासाठी धर्माचे दरवाजे उघडे आहेत, पण शूद्रांचे ब्राह्मणीकरण/उन्नयन होऊ शकत नाही. हे काही केल्या पटत नाही... 

शनिवार, ३ मार्च, २०१२

१४ मार्च २०१२ रोजीची अत्यंत शुभ गुरु-शुक्र युती

आगामी काळात लवकरच म्हणजे १४ मार्च २०१२ रोजी सायन वृषभ राशीत ९ अंश ३३ मिनिटांवर (म्हणजेच निरयन मेष राशीत १५ अंश ३२ मि वर ) गुरु-शुक्र युती होत असून हा अत्यंत जोरदार शुभ योग आहे. ही शुभ युती गोचर मंगळ आणि प्लुटो यांच्या बरोबर अंशात्मक नवपचंम योग करत असल्याने विशेष जोरदार शुभ बनली आहे.

या युतीमुळे सायन वृषभ रास ७-११ अंश (निरयन मेष रास १३-१७ अंश), सायन कन्या रास ७ -११ अंश (निरयन सिंह रास १३-१७ अंश), सायन मकर रास ७-११ अंश (निरयन धनु रास १३-१७ अंश) हे क्षेत्र अत्यंत शुभ बनले आहे.

या क्षेत्रात ज्यांच्या जन्मपत्रिकेत लग्न, ख-मध्य किंवा रवि, चंद्रादि व्यक्तिगत ग्रह या क्षेत्रात असतील तर आगामी काळ या जातकांना शुभ जाणार हे नक्की.

आनंददायी घटना एव्हढे शब्द या ग्रह रचनेचा फलादेश सांगण्यास पुरेसे आहेत. कोणताही नवा प्रकल्प सुरु करण्यास हा १२ मार्च ते १४ मार्च हा कालावधी अत्यंत शुभ आहे.

या शिवाय कोणत्याही सनातील खालील जन्मतारखाना ज्यांचे जन्म झाले आहेत त्यांना ही युती अत्यंत शुभ जाईल.

२८ एप्रिल ते २ मे
३० ऑगस्ट ते ४ सप्टेम्बर
२८ डिसेंबर ते २ जानेवारी

लोकहो, या शुभ कालावधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या!