शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०१४

चुकीचा संदेश

प्रिय चार्वी

फेसबुकावर एक भिरभिरणारा एक व्हीडीओ नुकताच पाहीला आणि मला धक्का बसला. स्त्री-सक्षमीकरणाचा संदेश चुकीच्या रितीने त्यात दिला आहेच पण त्याचे परिणाम समाजमनावर किती विचित्र परिणाम होऊ शकतात याचा विचार त्या क्लिपच्या (बिनडोक) निर्मात्याने अजिबात केलेला दिसत नाही.

तू अशा परिस्थितीत सापडलीस आणि अशीच वागलीस तर बाप म्हणुन मला ते अजिबात आवडणार नाही. विचार कर गर्दीमध्ये जर हे घडलं तर तर तिथला जमाव नाहक एका निरपराध तरूणाला मरेपर्यंत मारू शकतो. विचार न करता प्रत्युत्तर म्हणजे सक्षमीकरण नाही.

मग काय करायचे?

शक्यतो दुर्लक्ष करायचे, किंवा न चिडता समज द्यायची (याला आपला समाज दूर्दैवाने कमकुवतपणा मानतो.) तरी पण परत कुणी त्रास देत असेल तर बाजुला व्हायचे. त्रास देणारी व्यक्ती मग मागे आलीच तर अवश्य चप्पल उगारावी. यामुळे त्रास कोण देत आहे हे ठरवायला/कळायला मदत होईल.

बिनडोक लोकांच्या हातात एखादे ताकदवान माध्यम गेले की अशा कलाकृती निर्माण होतात.

-- डॅड

संदर्भ - http://www.scoopwhoop.com/inothernews/girl-slaps-guy/

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०१४

रॅपो

अ ला ब चे म्हणणे कळत नाही किंवा पटत नाही.

त्याला/तिला काही सांगितलं तरी कळतच नाही, 
असं म्हणून ’अ’ ला निकालात काढणे किती सोप्पे? 

कितीही तर्कशुद्ध म्हणणे असले तरी 
रॅपो नसेल तर स्वीकारले जाणार नाही. 

Everyone has preferred channels to accept or assimilate. 

रॅपो हा ब नेच निर्माण करायचा असतो!

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४

श्री श्याम मानव यांस,



श्री श्याम मानव यांस,


तुमच्या व्याख्यानाचा सदर व्हीडीओ सकाळी आवर्जुन बघितला. खरं तर बघणार नव्हतो. पण बघितल्यानंतर एक प्रश्न निर्माण झाला आहे आणि तो सतावतो आहे. अंधश्रद्धांमुळे शोषण होते हे सध्या युक्तिवादाकरता मान्य करतो. पण तुम्ही ज्या प्रयत्नवादाचा पुरस्कारकरता तो तरी शोषणविरहित आहे याची खात्री तुम्ही देऊ शकलात तर मी ज्योतिष सोडुन देईन.

म्हणजे असं आहे बघा, वैद्यकीय उपचारांकरता मी विज्ञानोक्त उपचार स्वीकारले तरी वैद्यकीय व्यवस्था माझे शोषण करतेच. हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगायची आवश्यकता नाही. हे शोषण अंधश्रद्धेच्या शोषणापेक्षा पवित्र आणि सुसह्य (बुद्धीनिष्ठ!) आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

शिक्षणक्षेत्राबद्दल असेच म्हणता येईल.

हे उदाहरण पटकन सुचले म्हणून दिले. पण प्रयत्नवादाशी संबंधित कोणते क्षेत्र शोषणमुक्त आहे, हे शोधणे हा एक कदाचित मौजेचा विषय आहे. कारण प्रयत्न करणारी व्यक्ती अडलेली असते, गरजु असते आणी म्हणुनच ती शोषणासाठी एक उत्तम बकरा ठरते.

माणसं आशेवर जगतात. आशेशिवाय तुमचा प्रयत्नवाद्पण पंगु आहे आणि आशा टिकवायला आजुबाजुचे लोक, परिस्थिती असमर्थ ठरते तेव्हा इतर कोणत्याही निरुपद्रवी मार्गाचा अवलंब करणे यात मला गैर वाटत नाही.

असो. मी तुमच्या ज्योतिषांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेतच. त्यात आता ही एक भर...


आपला

राजीव उपाध्ये.

ps://www.youtube.com/watch?v=HuxCfG4iCkM

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४

कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की...



लोकहॊ,


कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की काही मित्रांच्या आग्रहाखातर चालु केलेले माझे फेसबुकवरील फोटॊग्राफीवरील पेज आज १ वर्षाचे झाले. त्याला एकंदर ७६३ लाईक्स मिळाले. मला अनेकांकडुन उत्तेजन सतत मिळाल्याने सतत नवे काहीतरी करत राहण्याची उर्जा मिळत राहीली आणि आपल्या मर्यादांची जाणीव पण जागी राहीली.


या प्रवासात माझं एक व्हाईट लेन्स घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आता पुढे माझी काही फोटो एसे करायची आणि Hasselblad वर काम करायची इच्छा आहे.


कृपया आपला लोभ असाच राहु द्यावा, ही विनंति.


https://www.facebook.com/RajeevUpadhyePhotography

रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

वजननियंत्रणाची ऐशीतैशी



आज सकाळी पेपर उघडला आणि एक लिफलेट हातात पडले. ती एक वजन नियंत्रण कार्यक्रमाची जाहिरात होती. अशा प्रकारच्या जाहिरातीत लोकांच्या मनावर ठसविण्यासाठी काही सक्सेस स्टोरीज म्हणुन काही व्यक्तींचे उपचारपूर्व आणि उपचारोत्तर फोटो दिले होते. अशा प्रकारच्या लिफमेट मध्ये स्थान मिळालेल्या व्यक्तीमध्ये एक पॅटर्न दिसतो. यामध्ये ४० शी ओलांडलेले सहसा कुणीही दिसत नाही. फोटो उपचारोत्तर लगेच काढलेला असतो, त्यामुळे टिकाऊ परिणामाचा दावा किती खरा किती खोटा याचा पत्ता लागत नाही. ज्या लोकांमध्ये पचन आणि उर्जेशी संबंधित संतुलन मूलत: बिघडलेले असते, त्यांच्यात अशा कार्यक्रमाचा किती परिणाम होतो याविषयी कुणी काहीही बोलताना दिसत नाही.

माझे स्वत:चे वजन चाळीशी नंतर एकदम प्रमाणाबाहेर वाढायला लागले. त्यानंतर मी याविषयावरचे ताजे संशोधन तपासायला सुरुवात केली. हे करत असताना वजन वाढण्याची कारणे असंख्य असतात असे लक्षात आले. उदा.

o चयापचय वयोपरत्वे कमी होणे
० थायरॉईडच्या कार्यक्षमेत घट
० जीवनसत्त्वांच्या (विशेषत: ड ) पातळीत घट
० आहारात कॅल्शियम-मॅगनेशियमचा अभाव
० स्वादुपिंडावरील ताण
० चयापचय कमी करणारी औषधे (रक्तदाबावरील, मनोविकारांवरील औषधे)
० स्नायविक दुर्बलता निर्माण करणारी औषधे (मुख्यत: स्टॅटीन)

मी माझ्या वजनवाढीच्या चिकित्सेसाठी जेव्हा व्यवसायिक आहारतज्ञांचा सल्ला घेतला तेव्हा  माझ्या असे लक्षात आले की यच्चयावत आहारतज्ञ हे अत्यंत बिनडोक असतात. त्यांच्याकडे वरील कारणांसाठी काय करायचे याची उत्तरे तर नसतातच पण "उष्मांक-नियंत्रण" आणि व्यायाम या लाडक्या मंत्राचा जप एव्हढया भांडवलावरच त्यांनी दुकान थाटलेले असते. स्नायविक दुर्बलता निर्माण झालेली असेल तरीही हे आहारतज्ञ व्यायाम करत/वाढवत नाही म्हणुन अंगावर खेकसायला कमी करत नाहीत.

नुकतेच "उष्मांक-नियंत्रण" या लाडक्या समजाला छेद देणारे काही संशोधन नुकतेच वाचनात आणि पहाण्यात आले. "उष्मांक-नियंत्रण" करूनही कायमस्वरूपी वेट्लॉसची ग्वाही देता येत नाही, हा मुद्दा अधोरेखित करणारी काही संशोधने देत पुढे देत आहे.

० https://www.ted.com/talks/sandra_aamodt_why_dieting_doesn_t_usually_work  सांद्रा आमोट या न्युरॉलोजिस्ट बाईंचा टेड टॉक
० http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2895000/ - उष्मांक नियंत्रण दीर्घकालीन परिणाम देत नाही, किंबहुना त्याचेही दुष्परिणाम असतातच

आणखी एक दूर्लक्षित मुद्दा -
० http://www.biologicalpsychiatryjournal.com/article/S0006-3223%2814%2900385-0/abstract  - ताणामुळे लठ्ठपणा वाढतो

तात्पर्य, एखाद्या आहारतज्ञाने अमक्या सेलेब्रिटीचे वजन कमी केले म्हणून तो/ती आपले करू शकेल याची खात्री देता येत नाही. वजनवाढीच्या कारणांचा शोध न घेऊ शकणारा  आहारतज्ञ हा बिनडोक समजावा. व्यायाम करायलाच हवा पण व्यायामाची काठीन्यपातळी आपल्याला झेपेल एव्हढीच ठेवावी आणि स्वत:च्या वकुबानुसारच वाढवावी. जिम प्रशिक्षकाच्या दबावाला जास्त किंमत देऊ नये.

शनिवार, २ ऑगस्ट, २०१४

आगामी ग्रहयोग - गुरु-शुक्र आणि शनि-मंगळ युती



येत्या १० ऑगस्ट रोजी सायन सिंह-कुंभ राशीत १८ अंशावर पौर्णिमा होत असुन ही पौर्णिमा गोचर शनीशी केंद्र योग करते. त्याच बरोबर शनिबरोबर मंगळाची युती चालु होते. अंशात्मक शनि-मंगळ  युती दि २६ ऑगस्ट रोजी होते. एकंदर आगामी कालावधी बर्‍याचजणाना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

सायन वृश्चिक, कुंभ, वृषभ, सिंह रास १२ अंश ते २२ अंश,  हे क्षेत्र या ग्रहयोगांनी प्रभावित केले असल्यामुळे या अंशात कुणाचे जन्मरवि, जन्मचंद्र, लग्न किंवा ख-मध्य असतील तर आगामी काळ अडथळे, अपघात, आजारपण इत्यादीनी त्रस्त करायची शक्यता आहे.

वरील क्षेत्रात इतर अन्य ग्रह असल्यासही आगामी काळ काहीना काही प्रमाणात त्रासदाय्क ठरायची शक्यता आहे.

वरील ग्रहयोगांशिवाय येत्या १८ ऑगस्ट रोजी होणारी गुरु-शुक्र युती सायन सिंह राशीत ७ अंश १४ मि. वर होत असुन एक अत्यंत शुभ योग आहे. या युतीने सायन सिंह, तूळ, धनु, कुंभ, मेष, मिथुन
या राशीत जन्मरवि, जन्मचंद्र, जन्मलग्न किंवा जन्मख-मध्य असतील तर आगामी काळात काही ना काही शुभ घटना घडुन प्रगतीचे पाऊल पुढे पडायची शक्यता संभवते.

बराच मोठा जनसमुदाय या योगांमध्ये येत असल्याने जन्मतारखांचे गणित देऊ शकत नाही.

रविवार, २० जुलै, २०१४

जीवसृष्टीचा शोध : निरर्थक उद्योग


माणुस अवकाशात जीवसृष्टीचा पृथ्वी व्यतिरिक्त शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पण माझ्या काही मूलभूत शंका आहेत...

समजा जीवसृष्टीचा शोध लागलाच तर ते जीव आपल्यापेक्षा मूलत: वेगळे असतील का? एकपेशीय जीव, प्राणी आणि वनस्पती यापेक्षा तिथे निराळी जीवसृष्टी असु शकेल का? मला वाटतं नाही. याची मुख्य कारणे अशी की, तिथली मूलद्रव्यं, तिथले पिरीयॉडिक टेबल आपल्यापेक्षा वेगळे नसणार. साहजिक ही मूलद्रव्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट नियमांनी तीच संयुगे निर्माण करणार. कदाचित त्यांचे प्रमाण कमी-जास्त बदलेल, जसे वाळवंटात पाण्याचे प्रमाण कमी असते.

थोडक्यात निसर्गाचे मूलभुत नियम तिकडे वेगळे असायचे कारण नाही. आता हाच युक्तीवाद पुढे खेचला तर असे लक्षात येते की अंतराळातील जीवसृष्टी आपल्यापेक्षा फार वेगळी असेल असं नाही फक्त तेथील वातावरणानुसार काही जीवांचे प्राबल्य असेल. उदाहरणार्थ, अंतराळातील एखादा ग्रह जर फक्त पाण्याने आच्छादलेला असेल तर तिथे कदाचित फक्त जलचरच सापडतील. कदाचित तिथले काही जलचर पृथ्वीवर अस्तित्वात नसतील किंवा यायचे असतील. एव्हढेच... पण पाण्याखाली वसती करून राहणारा मानव तिथे अस्तित्वात यायची शक्यता किती. मला वाटतं शून्य. कारण पृथ्वीवर अजुन मनुष्य पाण्याखाली वस्ती करू शकत नाही.

थोडक्यात पृथ्वीवर कोट्यवधीवर्षात निसर्गनियमांच्या मर्यादांनी जे घडु शकलेलं नाही ते अवकाशातील जीवसृष्टीमध्ये पण घडु शकायची शक्यता पण शून्यच वाटते. निसर्गाचे नियम तिथे पण तेच असल्याने त्याच्या मर्यादा पण त्याच असणार.

म्हणुनच मला अंतराळातील जीवसृष्टीचा शोध एक निरर्थक उद्योग वाटतो...

रविवार, १३ जुलै, २०१४

"श्रेय"


४-५ वर्षापूर्वीची गोष्ट... एका पुरोगामी प्रतिष्ठितास मी एका प्रकल्पाची कल्पना सांगितली. त्यांनी हा प्रकल्प करता येईल असे उत्साहाने सांगितले .  पण मग हळुच मला एक थेट प्रश्न टाकला त्याने मात्र मी पार उडालो.

या गृहस्थानी विचारले, "या प्रकल्पाचे श्रेय कुणी घ्यायचे?"

मी नंतर त्या प्रकल्पाचा विचार डोक्यातुन काढुन टाकला...

याउलट दुसरा एक अनुभव. मी संगणक संगीतात काम करत होतो तेव्हा डॉ. किरण रेगे प्रा. सहस्रबुद्ध्यांच्या बरोबरीने माझ्या कामावर देखरेख ठेवायचे. मी त्यांच्याबरोबर बरोबर माझ्या प्रकल्पासंबधित अनेक तांत्रिक बाबींवर चर्चा करत असे. मी माझा १ला संशोधन निबंध लिहीला तेव्हा प्रा. सहस्रबुद्ध्यांनी मला डॉ. रेग्याना त्यांचे नाव सहलेखक म्ह्णुन लावायचे का? असे विचारायला सांगितले. मी डॉ.  रेग्यांना तसे विचारले तेव्हा त्यांनी नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले, "तुला हवंच असेल, तर एक तळटीप देउन ’ऋणनिर्देश’ कर"! माझ्या याच निबंधाला त्याच संस्थेतल्या दुसर्‍या एका हलकट व्यक्तीने त्याचे नाव लावले नाही म्हणुन कायमचा डुख धरला.

माझ्या सदसद्विवेक-बुद्धीनुसार सामुहिक यशापयशात प्रत्येक घटकाची योग्य ती दखल घ्यायलाच हवी. पण ती त्या त्या व्यक्तीच्या योगदानाच्या प्रमाणात असावी. या संबधीची मार्गदर्शक तत्त्वे मला लिखित स्वरूपात कधी सापडली नाहीत.

आणखी एक मजेशीर अनुभव ... राज्य मराठी विकास संस्थेने एक सेमिनार आयोजित केला होता. त्यात निंबध पाठविण्यासाठी मला सेमिनारच्या निमंत्रकबाईंचा फोन आला ( या बाई ज्ञानपीठ पुरस्कार समितीवर पण होत्या). त्यांनी मला काही कसलाही आगापिछा न ठेवता सांगितले, "तुम्ही तुमचा निबंध अमुकतमुक व्यक्ती बरोबर लिहा आणि पाठवा". ते ऐकुन माझे डोके फिरले. ज्या व्यक्तीबरोबर मला निबंध लिहायला सांगण्यात आला होता ती व्यक्ती आमच्या संस्थेच्या ग्रंथालयात पुस्तकांवरची धूळ झाडायचं काम करायची.  याच सेमिनारमध्ये निबंध वाचनाचे आमंत्रण मला मिळाल्याची बातमी  ऐकल्यावर पुण्यातल्या एका प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञांनी मला बोलवुन सांगितले, "तू स्वतंत्र पेपर लिहू नकोस. मी तुला मुद्दे देतो". मला तात्पर्य समजले. मी प्रा. मे. पु. रेग्यांकडे माझी नाराजी याबद्दल व्यक्त केली. नंतर मला आयोजकबाईनी फोन करून स्वतंत्रपणे लिहीण्यास ’परवनागी’ दिली. माझा निबंध सादर केल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी म्हणजे प्रा. रमेश तेडुलकरांनी धावत येऊन माझे कोतुक केलेच पण दुसर्‍या दिवशीच्या मटामध्ये  सेमिनारच्या वार्तांकनात मला बर्‍यापैकी जागा मिळाली.

माझे संगणकीय-संगीताचे काम मला निधी पुरविण्यास अनेक संस्था उत्सुक असुन बंद पाडण्यास भाग पाडण्यात आले. पदोन्नती रोखणे हा खच्चीकरणासाठी सर्वोत्तम मार्ग  असतो.
आज मी मागे वळुन, भावना बाजुला ठेवुन, त्रयस्थपणे सगळ्या घटनाक्रमांकडे बघतो तेव्हा एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते. माझ्या कामामुळे मला जो लाईमलाईट मिळाला त्यात प्रा. सहस्रबुद्ध्यांशिवाय कुणी खर्‍या अर्थाने वाटेकरी होऊ शकत नव्हते (आणि अनेकजणांचे खरे दु:ख तेच आहे).  संबंधित संस्थाचालकांना प्रा. सहस्रबुद्धे किती सलत होते, संगणक-विभागाची जागा बळकावण्यासाठी त्यांना किती भयानक अपमानास्पद वागणुक देण्यात आली याचे असंख्य साक्षीदार आहेत.  असो...

’श्रेय’ या विषयावरून ज्या आठवणी जाग्या झाल्या त्यात आणखी एक किस्सा सांगितल्याशिवाय राहवत नाही.

१९९४ मध्ये दिल्ली-दूरदर्शनला माझी मुलाखत राष्ट्रीय प्रसारणातील बातम्यासाठी घ्यायची होती आणि त्यांचे पथक पुण्याला येऊन थडकले. पण त्यामुळे माझ्यासमोर एक नैतिक अडचण निर्माण झाली. मी पदोन्नतीसाठी तडजोड करून माझे संगणक-संगीत विषयक काम थांबवले होते. असे असताना दूरदर्शनला मुलाखत देणे म्हणजे संस्थाचालकांची मूळव्याध चिघळणार होणार हे नक्कीच होते. मग मी दूरदर्शनच्या पथक प्रमुखाला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली. त्यावर त्यांनी मला "काळजी करू नकोस. आपण तुमच्या संस्थाचालकांनाही मुलाखतीत सहभागी करू. ते येतील कसे ते मात्र तू बघ."

आमचे संस्थाचालक लाजत-मुरडत मुलाखतीसाठी तयार झाले. कॅमेरासमोर काय बोलायचे हे माझ्याकडुनच मागविण्यात आले. त्यांच्यानंतर माझी मुलाखत विनाअडचण पार पडली. दोन दिवसांनी राष्ट्रीय प्रसारणामध्ये मुलाखत प्रसारित झाली तेव्हा संस्थाचालकांचा भाग पूर्णपणे कापून टाकला गेला होता...





गुरुवार, १५ मे, २०१४

सुसंस्‍कृत माणसांचा मूर्खपणा



गोष्ट १ली

काल दुपारची ३ ची वेळ

बाहेर अंगणात गलका ऐकु आला म्हणुन बाहेर आलो तर १५-२० जणांचा एक घोळका आमच्या बंगल्याच्या आवरात शिरून आमच्याच बागेतल्या अशोकाच्या शेड्यांकडे नजर लावुन गहन चर्चा करण्यात मग्न झाला होता.

मी त्यांना हटकले तेव्हा त्यातल्या एकाने मला सांगितले की एक कावळा उडता उडता पतंगाच्या मांजाला अडकुन अशोकाच्या झाडाला लटकला होतात. मी त्यांना परवानगीशिवाय आत आले म्हणुन झाडले आणि घरात आलो. पण थोड्या वेळाने गलका परत वाढला म्हणुन परत बाहेर आलो. घोळक्यात कामधाम सोडुन सुमारे १०० जण गोळा झाले. पूर्ण वाढलेल्या अशोकाच्या शेंड्यावरऊन कावळ्याला कसे सोडवायचे याची मसलत  माझ्या घराच्या अंगणात रंगली होती.

कावळा फारच नशीबवान... त्यांच्या जिवावरचा प्रसंग एका पक्षीप्रेमीने पाहिला म्हणुन ... कारण काही मिनीटातच अग्निशमनदलाची गाडी घंटा वाजवत दारात हजर.

अग्निशमनदलाच्या जवानांनी (बहुधा मनातल्या मनात कपाळावर हात मारत) गर्दी पाहुन भराभर हालचाली केल्या. प्रथम काही जण आमच्या गच्चीवरुन ३ मोठे बांबू एकत्र बांधुन शेड्यापर्यंत पोचता येत का अजमावु लागले. तरी पण कावळ्यापर्यंत पोचता येईना तेव्हा शेजारच्या घराच्या गच्चीवरून काही पक्षीमित्र आणि अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करू लागले.

एव्हाना आजुबाजुच्या इमारतीमधुन हे ’नाट्य’ बघायला आणखी १००+ जण गोळा झाले होते.

कावळ्याचे नशीब खरेच बलवत्तर...

सलग २ तासांच्या प्रयत्नानंतर कावळ्याची सुटका झाली तेव्हा जमावाने शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या. मला मात्र दोन प्रश्न सतावत होते - ही भूतदया माणसे अडचणीत असताना कुठे जाते.  आणि जमलेल्या घोळक्यातले किती पक्षीप्रेमी शाकहारी असतील?
-----------------------------------------------
गोष्ट दुसरी

सन १९८८-८९.

आय आय टी मुंबईचा परिसर

माझे काम संपले तोपर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. मी हॉस्टेल कडे जाताना मुलांचा एक घोळका हातात कसले तरी फलक घेऊन रस्त्यावरून विरूद्ध दिशेने निघाला होता.

मी दुर्लक्षकरून तडक मेसमध्ये जेवायला गेलो. तेव्हा काही जणांनी मेसमध्ये एका निषेधसभेचे पोस्टर लावले होते.

मी चोकशी केली. तेव्हा कळले की,

एका वन्यजीवप्रेमीने हॉस्टेल क्र. ८ च्या आवारात एका छोट्या अजगराला पकडले आणि दुसर्‍या दिवशी बोरीवलीच्या उद्यानात सोडुन द्यायचा विचार करून एका पोत्यात बांधुन ठेवले.  पण अजगर भुकेला राहिला तर काय म्हणुन त्याने सरळ मेस मधल्या मार्जारकुळातल्या एका मार्जार शिशुला पकडुन अजगराच्या तोंडी दिले आणि त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था केली.

कॅम्पस मधल्या भूतदयावादी वन्यजीवप्रेमीना ही "अनैतिक" हकीकत समजली तेव्हा ते संतापले. त्यांनी मोर्चा काढुन निषेध सभा बोलवली होती...

मी तेव्हा पण कपाळाला हात मारून घेतला होता...

रविवार, १३ एप्रिल, २०१४

सध्याचे ग्रहमान



लोक हो,

गेले वर्षभर मी वैयक्तिक प्राधान्यक्रम बदलल्यामुळे माझे ज्योतिषविषय्क ब्लॉग लिखाण बंद ठेवले होते. ते मी आता पुन्हा चालु करणार आहे. याच बरोबर माझे ज्योतिष विषयक लिखाण मी फेसबुकवर पण माझ्या एका समूह-पृष्ठावर प्रसिद्ध करणार आहे. जिज्ञासूनी (https://www.facebook.com/CircularReality) या दूव्यावर क्लिक करुन सदस्यता घ्यावी. हे मराठी किंवा इंग्रजी भाषेतून सोयीनुसार केले जाईल.

आकाशात सतत काही ना काही ग्रह योग सतत चालु असतात. प्रचलित समजुतीप्रमाणे हे योग ज्या राशीमधुन होतात, त्या राशींच्या लोकांना कसे जातील हे स्थूल मानाने सांगितले जाते. पण हे असे सांगितलेले भविष्य अनेकदा चुकते कारण ग्रहयोगांच्या प्रभाव क्षेत्राचा विचार राशीनुसार वर्तवलेल्या भविष्यात केला जात नाही.

एखादा ग्रह-योग आपल्यासाठी महत्चाचा केव्हा मानावा? आपल्या पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य यांचे अंश आणि ग्रहयोगाचे अंश समान असतील तर अनुभवाला येण्याची शक्यता जास्त असते. ग्रहयोगाच्या दर्जानुसार या अंशाच्या अलिकडे आणि पलिकडे काही क्षेत्र या योगांचे प्रभावक्षेत्र मानले जाते. म्हणुन अंश समान किंवा प्रभाव क्षेत्रात असतील तर तो ग्रहयोग आपल्यासाठी महत्त्वाचा मानावा.

तेव्हा माझी नम्र सूचना अशी की ज्यांना आपल्या भविष्यात डोकवायचे आहे त्यानी केवळ आपल्या राशीचे भविष्य न बघता आपल्या पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य यांचे अंश जाणुन घ्यावेत आणि मग एखादे ग्रहयोगाचे भाकीत आपल्यासाठी महत्त्वाचे आहे की नाही ते ठरवावे.

सध्याचे ग्रहमान

गुरु-प्लुटो-हर्षल यांच्यात सायन मेष-कर्क-मकर राशीतुन तयार झालेली टि-स्क्वेअर ही रचना अतिशय शक्तीशाली रचना आहे. ज्यांचे रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य या रचनेत सापडले आहेत. त्यांच्या आयुष्यात मोठे आणि आमुलाग्र बदल सध्या चालु असण्याची शक्यता आहे. हे बदल साडेसाती पेक्षा जास्त त्रासदायक ठरू शकतात.

येत्या १५ तारखेला दोन महत्त्वाचे ग्रह-योग पत्रिकेत होत आहेत

- बुध-हर्षल युती

वर उल्लेख केलेल्या टि-स्क्वेअर या रचनेत बुध पण योगदान करत असल्याने ही रचना अधिक बलवान होते. वर म्हटल्या प्रमाणे आयुष्यात मोठ्या बदलाना ज्याना सामोरे जावे लागत असेल त्यांना अचानक अस्वस्थ करणारी बातमी या ग्रहयोगात ऐकायला मिळु शकते.

- पौर्णिमा (चंद्रग्रहण)

सायन मेष-तूळ राशीतुन २५ अंशावर ही पौर्णिमा होत आहे. याच दिवशी चंद्र-ग्रहण पण आहे. पण पौर्णिमेतील रवी-चंद्रांनी कोणतेही महत्त्वाचे योग केले नसल्याने जन्मपत्रिकेत २५ अंशावर जे ग्रहयोग होत असतील त्याप्रमाणे पौर्णिमेची फले मिळु शकतात.

जाता-जाता

नुकताच यु-ट्युबवर उत्क्रांतीवर एक व्हीडीओ (https://www.youtube.com/watch?v=hOfRN0KihOU&list=UUsXVk37bltHxD1rDPwtNM8Q) बघितला. त्यात कळलेली महत्वाची माहिती माझ्या अंदाजाना पुष्टी देणारी ठरली. नारळीकरांच्या कंपुने ज्योतिषाची चाचणी केली तेव्हा तेव्हा मी तेव्हा मतिमंदत्वाचे भाकीत करायला आई-वडीलांच्या पत्रिका बघायला हव्यात असे मत व्यक्त केले होते. याचे कारण असे की गर्भधारणेच्या काळातील आईवडीलांवरचे ताणतणाव जनुकीय-बदल घडवुन कारणीभूत ठरत असावेत असा माझा कयास होता. आत्यंतिक तणावांनी मेंदुच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोच पण उतार वयात अल्झायमर सारखे विकार पण जडु शकतात. त्यामुळे गर्भधारणेच्या काळातील काळातील आईवडीलांवरचे ताणतणाव मतिमंदत्वास कारणीभूत ठरत असणार... हे ताणतणाव पत्रिकेत स्पष्ट्पणे दिसतात हे वेगळे सांगावयास नको.

असो. माझी अपेक्षा पूर्ण न झाल्याने मला चाचणीत भाग घेता आला नाही. पण ही चाचणी विश्वासार्ह किती मानायची हा मुद्दा उरतोच...