मंगळवार, ११ ऑगस्ट, २०१५

मी एक दलित आहे



श्रीमंत मला श्रीमंत म्हणत नाहीत
अन् गरीब मला गरीब म्हणत नाहीत
...म्हणुनच मी एक दलित आहे

मुंबईकर मला पुणेकर म्हणतात
अन् पुणेकर त्यांच्यात घेत नाहीत
...म्हणुनच मी एक दलित आहे

हुशार लोक मला मठ्ठ समजतात
अन् मठ्ठ मला हुशार समजतात
...म्हणुनच मी एक दलित आहे

सश्रद्ध मला  त्यांच्यात घेत नाहीत
अन् बुद्धीवादी मला झटकुन टाकतात
...म्हणुनच मी एक दलित आहे

स्त्रीवाद्याना माझा विटाळ होतो
परंपरावादी माझा तिरस्कार करतात
...म्हणुनच मी एक दलित आहे

तर लाईफची गोची अशी आहे की
कोणतेही सरकारी फायदे नसलेला
मी खराखुरा दलित आहे.

- राजीव उपाध्ये

मंगळवार, ३० जून, २०१५

सल्ला



आज मला तिसर्‍यांदा ’मेडिकल लिटरेचर’ वाचु नको असा सल्ला मिळाला. हा सल्ला देणारे तिघेही डॉ आहेत आणि त्या तिघांबद्दल मला अतिशय आदर आहे.

पण मला याबाबत थोडे लाऊड थिंकींग करावेसे वाटते.  -

० माझा मूळ स्वभाव - माझा मूळ स्वभाव अतिशय चौकस असल्याने का, केव्हा, कशाला अशा प्रश्नांची **पटतील अशी उत्तरे मिळणे** माझ्या एकंदर स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्त्वाचे आहे. ही जित्याची खोड मी जिवंत आहे तोपर्यंत तशीच राहणार आहे.

० मी जे ’मेडिकल लिटरेचर’ वाचतो त्याचा मी कोणताही गैरवापर करत नाही. उदा. इतरांना परस्पर सल्ले देणे, स्वत:ला किती कळते हे याचे प्रदर्शन करणे इत्यादि. पण मला कळलेली माहिती मला योग्य वाटल्यास सावधगिरीचा इशारा देउन प्रसृत करणे मला गैर वाटत नाही. तिचा उपयोग कुणी किती करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

० मी स्वत: अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहे. मला स्वत:ला माझे शरीर जे सांगत असते ते सर्व डॉक्टरांना समजते का या विषयी मला शंका आहे.

० डॉक्टरांना त्यांचा त्यांचा जीवनसंघर्ष असतो याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडुन मला पूर्ण क्षमतेने सल्ला/सेवा मिळेल अशी अपेक्षा ठेऊ शकत नाही. शिवाय त्यांना व्यवसायाने घालुन दिलेल्या मर्यादा पण असतात. मग माझ्या प्रश्नांची उत्तरे त्यामर्यांदाच्या बाहेर असल्यास मी हातावर घडी घालुन स्वस्थ बसायचे की माझ्या निसर्गदत्त कुवतीनुसार त्या प्रश्नांची उत्तरे शोधायची? ( आजवरच्या इतिहासानुसार मी शोधलेली ही उत्तरे आजवर तरी ’बरोबर’च निघाली आहेत.)

० मेडिसिन हे क्षेत्र किती खोल आणि व्यापक आहे याची अनुभूती ही मला आजवरच्या वाचनानेच आली आहे. माझ्या आकलन शक्तीच्या मर्यांदांची मला पूर्ण जाणीव आहे. (उदा - मला संख्याशास्त्र कळत नाही हे कबुल करायला मला लाज वाटत नाही. ) माझी ही धडपड डॉक्टरांची  फी टाळण्यासाठी पण नक्कीच नाही.

जाता जाता दोन व्याख्यानांचे किस्से नमूद करावेसे वाटतात- त्यातले एक प्रा. श्रीराम अभ्यंकरांचे आणि दूसरे व्याख्यान डॉ. चंद्रशेखर यांचे.  मला सारखे आठवते (विषय आता विसरलो आहे). त्यांनी सुरुवात शालेय बीजगणितापासुन केली आणि व्याख्यान अत्यंत गुंतागुतीच्या Algebraic Geometry तील तात्कालीन संशोधनापर्यंत नेऊन संपवले. त्या व्याख्यानात एक वाक्य ते पुन:पुन: उच्चारत राहिले - "This is all high school algebra". डॉक्टर चंद्रशेखरांनी त्यांचे व्याख्यान कृष्णविवरांवरील ताज्या संशोधनावरच दिले आणि साठाव्या मिनिटाला खिशातुन घड्याळ काढले आणि म्हणाले "Black holes are the most simple objects in our universe". 

रविवार, २५ जानेवारी, २०१५

अनिसची (बोगस) आह्वाने







सहजच लक्षात आलं,


अनिस मंत्राने आजार बरे करणार्‍यांवर चवताळते आणि

मग त्यांना आह्वान देते की आम्ही अमक्य-तमक्या आजाराचे

इतके-तितके रुग्ण आणुन देतो. त्यांना बरे करून दाखवा.


आता बघा...


एखाद्याने मंत्राने (किंवा तत्सम उपायांनी) आजार

खरोखरच बरे केले असतील तर

ते ’प्लासिबो-इफेक्ट’ मुळे हे नक्की.


’प्लासिबो-इफेक्ट’मध्ये उपचारांवर आणि ते करणार्‍यावर

गाढ श्रद्धा असावी लागते.


आह्वानातील सॅंपलमध्ये असलेल्या रुग्णांमध्ये पूर्वअट असलेली

ही ’गाढ श्रद्धा’ अनिस कुठुन आणि कशी आणणार?

त्याचे प्रशस्तिपत्रक अनिस कशाच्या आधारावर देणार?


म्हणजे अनिसचे हे पण आह्वान बोगस हे नक्की...


दूसरं असं...


आपला आजार प्लासिबो-इफेक्ट्ने बरा व्हावा असं एखाद्याला

वाटत असेल तर त्यात ढवळाढवळ करायचा अधिकार

अनिस सारख्या त्रयस्थ घटकाला आहे का?

शकुन

काल मकरंद दामलेने विचारलेल्या अनपेक्षित (Superstitious OR Optimistic ?) प्रश्नाने भंबेरी उडाली. पण मी शकुनावर विश्वास ठेवतो का याचे प्रामाणिक उत्तर "हो" आणि "नाही" असेच आहे. ’नाही’ अशासाठी की मीठ सांडल किंवा मांजर आडवं गेलं तर मी अपशकुन नक्कीच मानत नाही. पण ज्या बाह्य घटनांनी माझी मानसिक अवस्था बदलते त्या मला शकुनासारख्याच वाटतात. उदा. काही माणसांना माझ्यात सगळं वाईटच दिसत आलेलं असतं, त्यांना फकत माझ्या अपयशाची चर्चा आणि चिकित्सा करण्यात रस असतो. अशी माणसं मी नक्की अपशकुनी मानतो. कारण अशी माणसे भेटले की फक्त चोची मारायचेच काम करतात किंवा कडवट स्मृतीना जागं करायचा प्रयत्न करत बसतात. बर्‍याचवेळा असे लोक समोरून आल्यास मी फुटपाथ बदलतो किंवा आजकाल चक्क अपमान करून हाकलुन देतो. पण अचानक एखादी मनाला प्रसन्न करणारी घटना घडली किंवा व्यक्ती भेटली तर आशा निर्माण व्हायला किंवा टिकुन राहायला मदत होते. विशिष्ट घटना विशिष्ट मानसिक अवस्था निर्माण करतात.


तुमचं मला माहित नाही, पण मला तरी माझी मानसिक अवस्था at will अजुनही बदलता येत नाही, हे कबुल करायला मला लाज कमीपणा वाटत नाही.


मग भारद्वजाचा शकुन का बरं?


७८ साली कोथरूडला राहायला आलो तेव्हा आम्ही अगोदर जिथे राहात होतो तिथे बरीच परिस्थिती विचित्र होती. घर बांधायचा निर्णय आईवडिलांनी मनाचा हिय्या करून घेतला होता. घर बांधुन झाले आणि सगळी पुंजी त्यात संपली. तोपर्यंत जी माफक मौजमजा आमच्या तिघांच्या आयुष्यात होती ती पण संपली. त्या परिस्थितीत अनेक बाबतीत झालेली दडपणुक उफाळुन यायची. मार्क असुनही, धाकट्या भावाला शिकायला मिळाले पाहिजे, म्हणुन आईला मेडिकलला जाता आले नव्हते. पुढे रिझर्व्ह बॅंकेत आईला नोकरी लागली तेव्हा आईच्या हॉकीला तिथे भरपूर वाव मिळाला आणि आर्थिक स्वातंत्र्य (आईचा पगार होता महिना र १८० आणि आजोबांचा रु१४०!) आणि स्थैर्य पण मिळाले. त्यामुळे आई तिथे मनोमन रमली होती. पण लग्न झाल्यावर नोकरी करण्यावर सासर्‍याने नुसती गदा आणली नाही तर मी काही महिन्यांचा तान्हा असताना आईला अनाथाश्रमाचा रस्ता दाखवला होता (आईची ६३ सालची ८पानी विस्तृत सुसाईड नोट मला २०००साली आई गेल्यावर सापडली तेव्हा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मला मिळाली). या मानसिक आघातांनी ती खचली ती कायमचीच...प्रचंड उर्जा असलेल्या व्यक्तीचे सातत्त्याने खच्चीकरण झाले की काय होऊ शकते याचे अत्यंत नमुनेदार उदाहरण म्हणजे माझी आई.


नव्या घरात राहायला आल्यावर मात्र आर्थिक चणचणीमुळे काही प्रश्न नव्याने निर्माण झाले. त्यात जमेची बाजु एव्हढीच की वडिलांना कसलेही व्यसन नव्हते आणि कोणतेही आतबट्ट्याचे व्यवहार त्यांनी कधी केले नाहीत. नेमके त्याच वेळेस आईच्या वडिलांनी आईला सांगितले की, "अगं तुमच्या घराभोवती इतके भारद्वाज आहेत म्हणजे ही तुमची वास्तू तुम्हाला लाभणार बरं का?" आजोबांनी दिलेल्या धीरामुळे काही वेळ का होईना भारद्वाजाचे दर्शन झाले की आईचे मन उभारी धरायचे.


मला आजही भारद्वाज दिसला की आईचा तो उजळलेला चेहेरा आठवतो आणि म्हणुनच तो एक शुभ शकुन वाटतो...

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

पीसी ३६/६३

ऍड. विभा हांडे  आज मोठ्या खुषीत होत्या. आज त्यांची चार मॅटर्स डिसाईड व्हायची होती.  त्यामुळे या कोर्टातुन त्या कोर्टात त्यांच्या खेपा चालु होत्या. त्यात संजय आणि नमिताच्या केसमध्ये संजयची क्रॉस पण आज त्या चालु करणार होत्या. खरं तर क्रॉसच्या अगोदरच हे मॅटर सेटलमेंटला येईल अशी त्यांची अपेक्षा होती. पण या केसमध्ये त्यांची सगळी गणितं चुकली होती...

ऍड. हांडे हे शहरातलं वजनदार आणि थरकाप उडविणारे नाव. ऍड. हांडेंच्या ऑफीसची पायरी चढणारी स्त्री आपल्याला हवा तसा घटस्फोट मिळणार याबाबत निश्चिंत असायची. कायदे स्त्रियांच्या बाजुने असल्याने ऍड हांडेंचा फॅमिली मॅटर्समध्ये चांगला जम बसला होता. घटस्फोटांचे वर्षाचे टारगेट पूर्ण केले की कोर्टात पेढे वाटणार्‍या त्या एकमेव वकील...

नमिताच्या केसमध्ये प्रथम त्यांनी ४९८-अचे हुकूमी हत्यार वापरायचा प्रयत्न केला पण पोलिसांनी तो अयशस्वी ठरवला होता. प्रकरण पुरेसे गढुळ झाले की मग त्या स्त्रीला पोटगीसाठी कोर्टाचा रस्ता दाखवायचा आणि मग प्रकरण ड्रॅग करायचे. मग शेवटी जी पार्टी कंटाळते ती तडजोडीला तयार होते, हा बहुसंख्य वकीलांचा हातखंडा फॉर्म्युला...पण ऍड. हांडेंचे कसब मात्र सगळेजण वाखाणायचे.

संजय वि. नमिताच्या केसमध्ये केस उभी राहीली तेव्हा मात्र सगळे फासे उलटे पडत गेले होते. कोणत्या वकीलाची केस आहे यावरून न्यायाधीश बरेच अंदाज बांधतात. नमितासाठी प्रथम त्यांनी अंतरीम पोटगीचा अर्ज आणला तेव्हा संजयने अर्जाला उत्तर द्यायच्या अगोदरच वकीलाला न विचारता मुलासाठी कोर्टाकडे दहाहजार रुपयांचा चेक पाठवला. चेक आल्यामुळे नमिताचा अंतरीम पोटगीचा अर्ज कोर्टाला निकालात काढावा लागला. खरं तर ९९ टक्के केसेस मध्ये कोर्ट पोटगीचा अर्ज नाकारत नाही.एकदा पोटगी चालु झाली म्हणजे बाई पण खुष आणि केस लांबवणे पण सोपे.  पण इथे उलटे घडले होते.

आता मात्र पंचाईत झाली होती. ऍड. विभा हांडेंपुढे आता केस पुढे चालवायची एव्हढाच पर्याय होता. संजय मुलाच्या प्रेमाने कोर्टात नमतं घेईल ही त्यांची अपेक्षा फोल ठरली होती. मुलाला कोर्टात भेटायचे नाही असे त्याने ठरवले होते.  केस मेरीटवर लढायची हे संजयच्या वकीलाने निक्षुन सांगितले होते आणि बायका आणि त्यांचे वकील कोर्टात कशाकशाची सौदेबाजी करतात हे संजय दर तारखेला कोर्टात बघत होता.

अशाच एका तारखेला त्यांनी केस चालु करायचा प्रयत्न केला. नमिताला साक्षीदाराच्या पिंजर्‍यात त्यांनी उभे केले आणि जज्जसमोर बोलायला सुरुवात केली. जज्जने नमिताकडे एक कटाक्ष टाकला आणि पुढची तारीख दिली. त्यावर जजसाहेबांच्या पट्टेवाल्याने संजयच्या कानात सांगितले, "साहेब, काळजी करू नका. तुमचं काम होऊन जाईल".

सुरुवातीची खेळी फसली आणि अचानक जज्जची बदली झाली. फासे नमिताच्या बाजुने पडल्याचे चित्र निर्माण झाले. नवीन जज्ज म्हणजे नवा गडी नवा राज. अगोदरच्या जज्जची मतं बनली असली तर नव्या जज्जसमोर ती नव्याने निर्माण करता येतात.

जवळजवळ सहाएक महीन्यांनी नवीन जज्ज आल्यावर त्यांनी केस परत मांडायचा प्रयत्न केला...पण संजय नमत नव्हता.  त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना कुणाकडे उत्तरे नव्हती. संजयची केस मेरीट्वर लढण्यासाठी केवळ तेव्हढ्यामुळे पात्र ठरली होती.

संजयने एकटेपण स्वीकारले. मन वेगवेगळ्या गोष्टीमध्ये रमवणे चालु होते. केसचा तणाव कमी करण्यासाठी त्याला कुणीतरी ध्यानाचा मार्ग सुचविला.  समस्या मनाने अंतरावर ठेवायला ध्यान उपयोगी पडते असे त्याने कुठे तरी वाचले होते. ध्यानाचा आणखी एक फायदा असतो. instincts तीक्ष्ण होण्यासाठी, मनातील कचरा कमी करण्यासाठी ध्यान मदत करते.

दरम्यान नवीन जज्ज येऊनही केस ठप्प झाली. तीन महीने होऊनही काहीही हालचाल होत नव्हती. हांडेबाईना केस चालविण्यात रस नाही असे संजयच्या वकीलाने सांगितले. आपण घटस्फोटाचा अर्ज करायचा नाही, निर्णय नमिताने घ्यायचा हे पण वकीलाने संजयला पटवले होते.

इकडे संजयच्या आजुबाजुच्या चोंबड्या काळुंद्र्यांनी संजयच्या कामवाल्या बाईला गाठुन प्रश्न विचारून भंडावुन सोडले होते. कामवाली वैतागुन संजयला मग केसबद्दल विचारायची.

"साहेब, या काळुंद्रयांना तुमचा एव्हढा पुळका आहे तर डायरेक्ट तुमच्याकडे का चवकशी करत नाही हो तुमच्या केसची?" कामवालीने संजयला विचारले.

"अहो, त्यांनी आणलेली स्थळं मी नाकारली होती. त्यामुळे त्यांना मज्जा येणारच!" - संजयने त्यांना खरे कारण सांगितले.

एक दिवस असाच संजय ध्यानस्थ असताना त्याच्या मनात एक कल्पना चमकुन गेली. त्याने कामवालीला विश्वासात घ्यायचे ठरवले.

"अहो यमुनाबाई, आता आपण एक गंमत करु या! तुम्ही मला मदत केली तरच ते शक्य आहे. कारण या बायका माझ्याशी बोलत नाहीत"

"सांगा ना साहेब, तुमचे हाल बघवत नाहीत हो" यमुनाबाईनी मदतीचा हात पुढे केला.

"तुम्हाला आता या बायका परत भेटल्या तर त्यांना सांगा की संजयने दुसरे लग्न केले आहे आणि दुसर्‍या बायकोला सहा महीन्यातच तो घेऊन  येणार आहे"

"काय साहेब, काही पण काय बोलता राव?" - यमुनाबाईंना धक्का लपवता आला नाही.

"माझं ऐका. हे काम तुम्ही केलंत तर मी तुम्हाला पाचशे रु बक्षिस देईन" असं बोलुन संजयने पाचशेची नोट पुढे केली.

ते पैसे नाकारत यमुनाबाई म्हणाल्या, "बघा हं! तुम्हाला कल्पना आहे याचे काय परिणाम होतील याची? तुम्ही वकीलाशी बोलला आहात का?"

"मला पूर्ण कल्पना आहे आणि मी परिणामांची जबाबदारी घ्यायची ठरविली आहे. प्रत्येक गोष्ट वकीलाला विचारुन करत बसलो तर माझं आयुष्य या केस मध्ये सडेल."

एकदोन आठवड्यांनी सोसायटीतल्या काळुंद्र्यानी परत यमुनाबाईना गाठले आणि केसची चवकशी केली तेव्हा धीर गोळा करून यमुनाबाईंनी संजय ने नेमून दिलेले काम पार पडले.

संजयचा हा नेम बरोब्बर बसला... संजयच्या "दूसर्‍या लग्ना"ची बातमी वार्‍यासारखी पसरली आणि जिथे पोचायला हवी तिथे पोचली. आता मात्र केस पुढे चालविण्याशिवाय हांडेबाईना पर्याय नव्हता...


क्रमश:..

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०१४

प्रकल्प


बर्नार्ड बेल बरोबरच्या माझ्या प्रकल्पाला डॉ. भटकरानी आपटवलं याची पॉसिबल वाटणारी काही कारणं खूप उशीरा लक्षात आली. मला मिळणार्‍या प्रसिद्धीत त्यांना वाटा मिळत नव्हता हे आहेच, पण या प्रकल्पाच्या चर्चा चालु असताना एका बैठकीत बर्नार्ड बेल समोर एक गाजर भटकरांनी टाकलं होतं. बर्नार्डच्या बायकोच्या बॅलेला रु १५००० सीडॅक मदत करेल असं ते गाजर होतं. आम्हाला दोघानाही त्याचा अर्थ तेव्हा लक्षात आला नाही. आमच्या प्रकल्पातुन भटकराना काहीच ’फायदा’ दिसत नव्हता. फायदा म्हणजे - संयुक्त परिषदांमध्ये अध्यक्षीय भाषण करण्यासाठी आमंत्रणं, फ्रान्सच्या वार्‍या किंवा एखादा पुरस्कार...

हो ... संस्थाचालकाना एखादा पुरस्कार मिळवुन देण्यासाठी मी प्रयत्न करावेत असं आमच्या संस्थेतील एका गृहस्थांनी मला सुचविलं होतं. मी तसे प्रयत्न पण माझ्या वर्तूळात केले होते. पण पाण्याची खोली किती असते हे माझ्या सर्कलमध्ये अनेकांना कळत असल्याने मला त्या प्रयत्नाना फारसे यश मिळाले नाही.

त्याशिवाय आणखी एक कारण होते. ज्या भावसारांना भटकरांनी अगोदर सर्वांच्या डोक्यावर बसविण्याचे आणि मग वाचविण्याचे प्रयत्न जिवापाड केले त्या भावसारांना मी त्यांच्या हाताखाली पीएचडी करावी अशी एक crazy म्हणता येईल अशी प्रबळ इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. पण भावसारांच्या हाताखाली पीएचडी म्हणजे  आत्महत्या हे मला अनेक हितचिंतकांनी सांगितलं होते. त्यामुळे भावसाराना मी प्रोजेक्ट्मध्ये लुड्बुड करू देणार नाही हे उघड होतं. ज्यांना सरकारी संस्थातुन आपले भविष्य घडवायचे आहे त्यांना हे सगळे छ्क्केपंजे ठाउक असायलाच हवेत.

या प्रोजेक्टचा मसुदा करण्यासाठी मी बर्नार्डच्या घरी राहीलो तेव्हा मी अनेक गोष्टी शिकलोच पण त्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे माझे इंग्लिश चमत्कार वाटावा इतके सुधारले. एका फ्रेंच विद्वानाने घडवुन आणलेला तो शक्तीपातच होता...

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

दोषी



झाडावर लोंबकळणारं प्रेत विक्रमादित्याने परत खांद्यावर टेकुन
स्मशानाचा रस्ता पकडला तेव्हा
प्रेतामधल्या वेताळाने विक्रमादित्याला
संतोष मानेची गोष्ट सांगितली.
सॅम हरीस आणि रिचर्ड रेस्टॅक सारख्या न्युरॉलाजिस्टनी
उधृत केलेले मेंदुवरील ताज्या संशोधनाचे दाखले
दिले...

आणि मग त्याने प्रश्न केला,

"आता मला सांग, संतोष माने दोषी की त्याला निर्माण करणारी यंत्रणा दोषी?"

डॊक्याची शकलं विक्रमादित्याला नको होती.
तो म्हणाला, "जो समाज संतोष माने निर्माण करतो ती यंत्रणा दोषी
आणि ही जबाबदारी न स्वीकारणारा समाज
स्वत:ची प्रगती कधिच करणार नाही."

विक्रमादित्याच्या उत्तराने वेताळ खूष झाला
आणि झाडावर जाऊन लोंबकळु लागला...

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

॥ श्री परमस्तुति॥

मला एकदा सहज कुणितरी ’परम’ नामक संगणकावर संस्कृत रचना करण्याचे आह्वान दिले होते. तेव्हा रचलेली ही "श्री परमस्तुति" आज अचानक सापडली.

॥ श्री परमस्तुति॥

अस्मितायास्तु संभवं तथैव राष्ट्रवैभवम्।
तंत्रपुष्पं विनिर्मितं परमं कीर्तिदायकम्॥

तंत्रसामर्थ्यश्रेष्ठानां भयविस्मयकारक:।
महागतिर्महाबाहु: महाशक्तिस्समांतर:॥

सर्वेष्वपि च यंत्रेषु संगणकस्तु महत्तम:।
गणककुलश्रेष्ठाय ’परमाय’ नमो नम:॥

गूढत्वेन समावृतं ज्ञातुं सत्यं गुणान्वितम्।
उत्थानक्षम स्वप्नानां स्वागतं तु परं भवेत्॥

२०.०९.९३

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०१४

लफडं




आज सकाळची साडेआठची गोष्ट...

अचानक घराबाहेर गलका आणि बायकी आवाजातील किंचाळ्या ऐकु आल्या म्हणून घराबाहेर पडलो तर सोसायटीच्या रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. एक वीस-बावीशीची मुलगी जोरजोरात ओरडत होती.

काही दिवसांपूर्वी एक विचित्र प्रसंग बायकोने आमच्याच गल्लीच्या तोंडाशी बघितलेला सांगितला. आता हे काय म्हणून आणखी पुढे जाऊन बघितले तर चेहरा रक्तबंबाळ  झालेला एक त्या मुलीच्या वयाचा तरूण स्वत:ची मोबाईक चालु करायची धडपड करत होता. एक पंचेचाळिशीचा मनुष्य काही तरी जोरजोराने दम देत होता (कुणाला ते कळले नाही). गोळा झालेल्या जमावाने त्याला कसे बसे पिटाळले.

काही लोक त्या मुलीला आणि मुलाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जायला सांगत होते. एका रिक्षावाल्याने त्यांना नेण्यासाठी पुढाकार घेतला.

कुणीतरी म्हणाले ’तो’ त्या मुलीचा बाप होता. आणखी एकाने सांगितले की त्याने त्या मुलीच्या (बहुधा) बॉयफ्रेण्ड्च्या डोक्यात मोठा दगड घातला!

जमावाने कसेबसे दोघाना हॉस्पीटलमध्ये पाठवले...

गर्दीतले एकजण आता गर्दी पांगवायला लागले.

मी त्यांना विचारले, "काय झाले"?

ते म्हणाले,

"हल्लीच्या पोरींची लफडी...."

मी नि:शब्द होऊन घरी आलो...

शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०१४

चुकीचा संदेश

प्रिय चार्वी

फेसबुकावर एक भिरभिरणारा एक व्हीडीओ नुकताच पाहीला आणि मला धक्का बसला. स्त्री-सक्षमीकरणाचा संदेश चुकीच्या रितीने त्यात दिला आहेच पण त्याचे परिणाम समाजमनावर किती विचित्र परिणाम होऊ शकतात याचा विचार त्या क्लिपच्या (बिनडोक) निर्मात्याने अजिबात केलेला दिसत नाही.

तू अशा परिस्थितीत सापडलीस आणि अशीच वागलीस तर बाप म्हणुन मला ते अजिबात आवडणार नाही. विचार कर गर्दीमध्ये जर हे घडलं तर तर तिथला जमाव नाहक एका निरपराध तरूणाला मरेपर्यंत मारू शकतो. विचार न करता प्रत्युत्तर म्हणजे सक्षमीकरण नाही.

मग काय करायचे?

शक्यतो दुर्लक्ष करायचे, किंवा न चिडता समज द्यायची (याला आपला समाज दूर्दैवाने कमकुवतपणा मानतो.) तरी पण परत कुणी त्रास देत असेल तर बाजुला व्हायचे. त्रास देणारी व्यक्ती मग मागे आलीच तर अवश्य चप्पल उगारावी. यामुळे त्रास कोण देत आहे हे ठरवायला/कळायला मदत होईल.

बिनडोक लोकांच्या हातात एखादे ताकदवान माध्यम गेले की अशा कलाकृती निर्माण होतात.

-- डॅड

संदर्भ - http://www.scoopwhoop.com/inothernews/girl-slaps-guy/