सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

वकील

 वकील

====




काल ज्ञानेश महाराव नावाच्या एका महाभागाचे व्याख्यान युट्युबवर ऐकत होतो. हे व्याख्यान अतिरेकी ब्राह्मणद्वेषाने भरून ओसंडून वहात होते. या गृहस्थांनी या व्याख्यानात जाता-जाता वकीलांकडून आलेल्या वाईट अनुभवांमुळे त्यांना पण यथेच्छ शिव्या घातल्या. त्यामुळे काही माझ्या पण काही आठवणी जाग्या झाल्या...



ते दिवस खुप कठीण होते. माझ्या वडिलांना दोन हार्ट अटॅक अगोदरच येऊन गेले होते. गेलेला प्रत्येक दिवस आपला, उद्याचं माहित नाही, अशा मानसिक अवस्थेमुळे गुंतागुंत वाढली होती. त्यांना जपण्यासाठी आई आणि मी काय करत होतो, हे आमचे आम्हालाच ठाऊक!  त्यातच माझ्या वडिलांना एका राहत्या जागेसंदर्भातील वादासंबंधी वकीलाची नोटीस आली. ही नोटीस मुंबईला कोर्टात हजर राहण्यासाठी होती. माझ्या वडिलांना त्या जागेत कसलाही रस नसल्याने आणि तब्येतीच्या तक्रारीमुळे नाही म्हटले तरी धक्का बसलाच. कारण त्यांना एकट्याने प्रवास करु द्यायचा नाही असे बंधन डॉक्टरांनी घातले होते. त्यामुळे कोर्टात हजर कसे राहायचे हा प्रश्न होताच. शेवटी "चांगला" वकील शोधून त्याच्याकरवी कोर्टात डॉ०ची वैद्यकीय शिफारस आणि अर्ज दाखल करून त्या केस मधून सुटका करून घ्यायची असे ठरले. 


माझ्या वडिलांनी बर्‍याच चौकशा करून एक वकील शोधला. त्याने मी तुम्हाला लवकरात लवकर मोकळे करतो, असे आश्वासन दिले. त्याने त्यासाठी तेव्हा ८०० रूपये फी मागितली जी आमच्यासाठी तेव्हा खूप मोठी रक्कम होती. पण तब्येतीसाठी कोणतीही किंमत मोजायची माझ्या आईवडिलांची तयारी असल्याने ते ती फी द्यायला तयार झाले. सुरुवातीच्या एक-दोन सुनावणीच्यावेळी अर्ज मंजूर होऊन त्यावर ऑर्डर होईल असे वकीलाने सांगितले होते. पण प्रत्यक्षात घडले वेगळेच. ८-९ महिने उलटून गेले तरी माझ्या वडिलांच्या अर्जावर निकाल होईना आणि वकीलाने आणखी पैशाची मागणी केली.  तारीख पडली की वडिल बेचैन आणि सैरभैर व्हायचे आणि त्यामुळे आमचे टेन्शन वाढायचे. "आपल्याला त्या जागेशी आणि कुणाशीही काहीही देणंघेणं नाही, त्यामुळे तुमच्यावर कसलीही जबाबदारी नाही. तेव्हा उगीच काळजी करू नका" असा आई पण धीर द्यायची. पण त्याचा फारसा उपयोग होत नसे. शेवटी एक दिवस आई वडिलांच्या बरोबर त्या वकीलाला भेटायला गेली आणि त्याला पैसे घेऊनही काही न केल्याबद्दल घाल-घाल शिव्या घातल्या. त्याचा योग्य परिणाम झाला आणि त्या केसमधून माझ्या वडिलांची सुटका झाली. 


दूस‍र्‍या एका वकीलाची हकीकत ऐकून हादरायला होईल. हा वकील काही कारणाने परिचयाचा होता. त्याच्याबद्दल एका कॉमन मित्राकडून कळले की त्याने आपल्या अशीलांना "केस जिंकल्याचे" खोटे निकालपत्र मिळवून दिले. ते खोटे आहे हे कळल्यावर त्या अशीलाच्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यात तो आजारी पडून शेवटी अकाली दगावला. 


आणखी एका माहितीमधल्या व्यक्तीला एका कौटुंबिक समस्येमध्ये कायदेशीर बाजूबद्दल सल्ला हवा होता. त्या व्यक्तीला वकीलाने आपल्या वृद्ध आणि आजारी आईवर खोटी केस ठोकायचा सल्ला दिला. वर सांगितले की केस फक्त लांबवत राहायचे, मग त्यात आई खचून मरून जाईल आणि सगळे प्रश्न सुटतील...


अलिकडे युट्युबमुळे न्यायप्रक्रियेचे जवळून दर्शन घडते.  न्याय मिळणे हा हक्क असण्यापेक्षा "भीक मागण्याची" गोष्ट आहे असे काही दावे बघून वाटू लागले आहे. 


प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयात सर्व संकेत धुळीला मिळवणारे वकील, विशेषत: सरन्यायाधीशांच्यावर गुरकावणारे वकील (Mathews Nedumpara) बघितले की विकृत, भावनाशून्य, विधीनिषेधशून्य असणे यशस्वी वकील बनण्याची पूर्व-अट असावी असे वाटू लागले आहे.


आजकाल एखादा वकील काही कारणाने तडफडतांना दिसला तर मला खूप आनंद होतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: