दोनाच्या जागी जर चार ग्रह एकत्र येऊन जर एकमेकांशी केंद्र योग करत असतील तर नकारात्मक आविष्कार अधिकच वाढतो. यामुळे ज्या रचना आकाशात तयार होतात. त्यापैकी एक म्हणजे ग्रॅण्ड स्क्वेअर किंवा मराठीत बृहच्चौकोन. जन्मपत्रिकेत बृहच्चौकोन ही रचना असेल तर कमालीच्या जीवनसंघर्षला अशा व्यक्तीनी तोंड दिलेले असते. याच्या उलट बृहत्त्रिकोण ही रचना असते. ज्यांच्या पत्रिकेत बृहत्त्रिकोण असतो त्यांचा आयुष्यक्रम हेवा वाटेल इतका सहज असतो. आयुष्यातले प्रश्न सीमित असतात किंवा वेळच्या वेळी सुटत जातात. संघर्ष हा शब्द त्यांच्या शब्द्कोषात नसतो. अशा व्यक्तीना जगातली गुंतागुंत, इतरांचे कष्ट यांच्या विषयी संवेदना पण कमी असते. जन्मपत्रिकेतील रवि,चंद्र, लग्न आणि ख-मध्य हे जर बृहत्त्रिकोण किंवा बृहच्चौकोन तयार करत असतील तर मात्र वर सांगितलेले आविष्कार हमखास बघायला मिळतात.
हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच की २६ जून रोजी होणारे ग्रहण बृहच्चौकोन ही रचना निर्माण करणार आहे. सुदैवाने हा बृहच्चौकोन काही मिनीटेच म्हणजे चंद्र रविच्या प्रतियुतीमध्ये असे पर्यंतच टिकेल. पण तरीही याचा परीणाम मोठा आणि दूरगामी असू शकतो.
अमुक अमुक ग्रहयोगांमुळे जागतिक पातळीवर काय घडामोडी होतील याचा विचार मेदिनीय ज्योतिषात करतात. मेदिनीय ज्योतिष ही ज्योतिषाची शाखा खूप बाल्यावस्थेत आहे. तरी पण बृहच्चौकोना सारख्या रचनांचा मेदिनीय ज्योतिषाच्या अंगाने विचार त्यात असलेल्या रवी-शनी-हर्षल-प्लुटो यासारख्या ग्रहांमुळे करणे इष्ट ठरते.

मेदिनीय ज्योतिषात एक मूलभूत तत्त्व असे आहे की आकाशात ग्रहांची विशिष्ट रचना जेव्हा तयार होते तेव्हा त्या रचनेतील ग्रह ज्या भूभागात आकाशात बरोबर डोक्यावर येतात त्या ठिकाणी (किंवा सभोवतालच्या भागात) ग्रहांच्या तत्त्वांशी संबंधित घटना घडायची शक्यता असते.
२६ जूनच्या बृहच्चौकोनाचा विचार केला तर रवी फ्रान्स जर्मनी आणि आफ्रिकेचा काही भाग येथे ख-मध्यावर येतो. शनी चीन, बांगलादेश, रशियाचा काही भाग येथे ख-मध्यावर येतो. चंद्र-प्लुटॊ रशियाचा अतिपूर्वेकडील काही भाग येथे ख-मध्यावर येतात (नकाशा बघावा). सहसा ज्याबाबतीत हा भूभाग संवेदनशील असतो त्या बाबतीत घटना घडताना दिसते, म्हणजे राजकीय अस्थैर्य असेल तर घातपात, भौगोलिक (नैसर्गिक) अस्थैर्य असेल तर वादळ/भूंकपाची शक्यता इत्यादि...
माझ्या अंदाजानुसार २६ जूनचे ग्रहण हे चिनी अर्थव्यवस्थेची घोडदौड थांबवणार्या घटनांची नांदी ठरावे. असो.
लेखाच्या पुढच्या भागात २६ जूनचे ग्रहण वैयक्तिक आयुष्यात कोणत्या जन्मतारखाना महत्त्वाचे आहे याचा विचार करु.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा