रविवार, २७ जानेवारी, २०१३

शिक्षेची जरब



केवळ मराठी वृत्तपत्रात आलेल्या बातम्यावरून  जर जागतिक परिस्थितीचा अंदाज बांधायचा झाला तर भारत सोडून जगात सर्वत्र आलबेल आहे असे वाटायला लागते. पण खरोखर जागतिक परिस्थितीचा अंदाज बांधायचा असेल तर CNN, BBC अशा कुबड्या घ्याव्या लागतात. जागतिक बातम्यांसाठी मी रोज DW हा चॅनेल बघतो. मध्यपूर्वेतल्या अनेक देशातली अस्वस्थतता जर्मन चष्म्यातून मला बघायला आवडते.

सांगायचा मुद्दा असा की, हे जागतिक वृत्त बघितल्यावर मला हळुहळु आपण भारतात तुलनेने सुखी आहोत ही भावना सुखावायला लागते. म्हणजे इतरांचे दु:ख आणि आक्रोश पाहिल्याशिवाय आपले सुख आपल्याला कळत नाही (आणी त्याच न्यायाने इतरांचे सुख बघितल्याशिवाय आपले दु:ख आपल्याला जाणवत नाही.)

नुकतेच दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या घटनेने देश ढवळून निघाला. ही घटना आपल्या पर्यंत माध्यमांमुळे पोचली तेव्हा आपण अस्वस्थ झालो. पण एक लक्षात घ्या की अधिकृत आकडेवारीनुसार भारतात दर तासाला ~३ बलात्कार होत असतात. हा हिशेब सन २०१० सालच्या पोलिसांकडे नोंदल्या गेलेल्या आकडेवारीवर आधारीत आहे.(संदर्भ - http://www.thehindu.com/multimedia/archive/00948/India_s_rape_crisis_948146a.pdf)

म्हणजे बलात्काराच्या एका वृत्तापुरत्या आपल्या संवेदना जाग्या झाल्या होत्या. दर तासाला होणार्‍या ~३ बलात्कारांचे कुणाला सोयरसुतक नव्हते... आणि नसेल.

बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली गेली. ती मागणी मान्य झाली असती तर ४९८-अ प्रमाणे खोट्या तक्रारींचे प्रमाण नक्कीच वाढले असते. खोट्या तक्रारी आणि खोट्या पुराव्यांनी कितीजण फासावर चढले असते माहित नाही, पण खोट्या कोर्ट्केसेसनी अनेक पुरुष उध्वस्त झाले असते हे मात्र नक्की.

पण मुद्दा तो नाही...

मुद्दा फाशीच्या जरबेचा आहे.  फाशीची शिक्षा आज अस्तित्वात असून दुर्मिळातले दुर्मिळ गुन्हे घडत आहेतच. कसाबच्या फाशीने दहशतवाद कुठे थांबणार आहे. कारण कसाबच्या शिक्षेची वेदना दहशतवाद्यांपर्यंत कधी पोचणारच नाही.

कुणी असं म्हणतात की जन्मठेपेची शिक्षा जास्त वेदनादायक असते. पण लोक म्हणतात "चांगल्या वर्तणुकीच्या" सबबीवर गुन्हेगार लवकर सुटू शकतो. म्हणजे इथेही जन्मठेपेच्या कैद्याने काय "भोगले" हे लोकांपर्यंत ( आणि भावी गुन्हेगारांपर्यंत) पोहोचत नाही. परिणामी नवे गुन्हेगार निर्माण होण्याच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही.

तात्पर्य एव्हढेच की शिक्षेची जरब बसायला शिक्षेतील वेदना जोपर्यंत मेंदूत नोंदवली जात नाही तोपर्यंत शिक्षेची जरब निर्माण होत नाही. 



1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

माझ्यामते जोपर्यंत सतत शिक्षा होत नाहीत आणि शिक्षा होएइल ह्याची खात्री लोकांना होत नाही तोपर्यंत कितीही कडक शिक्षा दिली तरी काहीही फरक पडणार नाही. बर नुसते खालच्या वा सर्सामान्यांना शिक्षा होवून उपयोग नाही. जो कोणी चूक करेल मग तो कितीहि मोठा असो त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत फार काही फरक पडेल असे वाटत नाही.

--सलील