शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

विघ्नकर्ता


काल रात्री दहा वाजता लेकीला आणायला विमानतळावर गेलो.


एक्झिट गेटमधून बाहेर पडताना भयानक ट्रॅफिक जॅम होता. वाहतूक नियंत्रण करायला पोलिस पण नव्हते आणि एअरफोर्सचे पण कुणी नव्हते. ट्रॅफिक पुढे सरकत नव्हता म्हणून डीझेल वाचविण्यासाठी इंजिन बंद केले. आणि मग नको होते ते झाले.

गाडी बंद पडली चालू होईना.

बराच वेळ प्रयत्न करूनही चालु होईना तेव्हा गाडी तिथेच सोडायचा निर्णय घेतला. जवळच्या पार्किंग लॉट पर्यंत गाडी ढकलत नेणे गर्दीत अशक्य होते.

गाडी जवळच आडोशाला उभी करायचे ठरवले. पण मदतीला कुणी आले नाही. शेवटी मी आणि चार्वीने कशीबशी ढकलत एक्झिट गेटच्या भिंतीजवळ आणली.

मनातल्यामनात हवालदिल झालो. एक मन म्हणाले,
"गणपतीला शिव्या घालतोस ना. चांगली अद्दल घडली".

गाडी लॉक केली. ओला आणि उबर बुकींग घेत नव्हते म्हणून प्रीपेड टॅक्सी केली. प्रीपेड टॅक्सीवाल्याने पण मनस्ताप दिला म्हणून रागाचा पारा चढला होता. त्यात तो परधर्मीय. त्यामुळे डोक्यात अनेक विचित्र भावना आणि विचारांची वादळे चालू झाली. शेवटी डेक्कन जिमखाना जवळ आल्यावर प्रीपेड टॅक्सी सोडून रिक्षाने घरी यायचे ठरवले.

प्रीपेड टॅक्सीवाला, डेक्कनला उतरल्यावर म्हणाला "साब रिसिट लेके जाओ". मग आणखी एक धक्का बसला, टॅक्सीवाल्याने खिशातून पाकीट काढले आणि म्हणाला, "डेक्कन का चार्ज ५५० ही है. १०० रु वापस ले लो"
माझी अपेक्षा नव्हती, पण मी ते मुकाट घेतले आणि रिक्षा पकडून घरी आलो. 

घरी आल्यावर मूड पूर्णपणे बिघडलेला होता. लेकीशी थोड्या गप्पा मारल्या आणि रात्री १२.३० ला झोपायला गेलो. झोप लागली नाही. मन सारखे हिणवत होते, 
"गणपतीला शिव्या घालतोस ना. चांगली अद्दल घडली".

रात्रभर डोक्यात असंख्य विचार... आता गणेशचतुर्थीला मेकॅनिक कसा शोधायचा, पोलिसांनी गाडी ओढून नेली असली तर ती कशी मिळवायची. एअरफोर्सच्या लोकांनी नेली असली तर त्यांना काय उत्तरे द्यायची. कुणाला किती पैसे चारायचे इ. इ.

सकाळी बायकोने आणि लेकीने सांगितले म्हणून मेकॅनिकच्या ऐवजी  टाटाच्या 24x7 road assistance service ला फोन केला आणि तक्रार नोंदवली. पाकीटात भरपूर पैसे बरोबर घेतले.
लेकीने धीर दिला,
"बाबा, काळजी करू नका. काहीही होणार नाही!"
जाताना एक मन मला डिवचत होते तर दूसरे मन नेहेमीप्रमाणे गणपतीला शिव्या घालत होते,
"विघ्नकर्त्या, बरोब्बर चतुर्थीला नावाला जागलास!"

त्यात पाउस चालु झाला आणि मी छत्रीत न्यायला विसरलो. मग टेंशन मध्ये आणखी भर...
शेवटी एकदाचा विमानतळावर पोचलो आणि आश्चर्याचा धक्काच बसला,

गाडी जागेवरच होती आणि गाडीला जॅमरपण नव्हता.
दोन पोलिस येऊन फक्त चवकशीकरून गेले आणि गाडी लवकर हलवा एव्हढंच म्हणाले. मग काही वेळाने टाटाचा मेकॅनिक आला आणि त्याने गाडी स्टार्ट करून दिली (बॅटरी संपली होती.)

आश्चर्याचा एक आणखी एक धक्का, टाटाने ठरवले होते तितकेच म्हणजे फकत साडेसहाशे घेतले. मीच मग त्याला शंभराची एक नोट काढून दिली (माझे जगण्याचे नियम फार सोप्पे आहेत. त्यातला एक - वाईट अनुभव देणार्‍याना मी शिक्षा करू शकत नाही पण चांगले अनुभव देणार्‍यांना शाबासकी नक्कीच देऊ शकतो). आज पाकीट हलके होणारच यासाठी मनाची तयारी केली होती त्या पार्श्वभूमीवर सगळंच अनपेक्षित घडत होते.

शेवटी स्वत:ला तिन-चार चिमटे काढले आणि गाडी स्टार्ट करून घराकडे निघालो. येताना सगळीकडचे गणपती माझ्याकडे बघून हसताहेत असा सारखा भास होता...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: