गुरुवार, १ जून, २०२३

*प्लास्टीक पिशव्या, सामाजिक जबाबदारी आणि कायद्याचा बडगा*


मी गेले अनेक महिने कुत्र्यांच्या मानवीकरणाचा (domestication) निरीक्षणात्मक अभ्यास करत आहे. जगभरच्या पाळीव कुत्र्यांची असंख्य निरीक्षणे केल्यावर काही आश्चर्यकारक गोष्टी लक्षात आल्या. पाळीव कुत्र्यांची अस्तित्वाची लढाई न्यूनतम असते. मालकाने अन्न आणि सुरक्षेची महत्त्वाची गरज भागवल्यामुळे कुत्री मालकाशी जुळवून घेतात. तसेच जेव्हा प्रेत्येक आज्ञापालनाचे काही ना काही बक्षिस मिळते, तेव्हा त्या आज्ञा निमूटपणे स्वीकारल्या जातात (प्रत्येक कुत्र्याचा स्वभाव वेगळा असतो आणि जनुकीय रचना वेगळी असल्याने थोडे इकडेतिकडे होऊ शकते) *पण केवळ योग्य वेळी योग्य बक्षिस दिल्याने, भावनिक आणि इतर गरजा पूर्ण झाल्याने कुत्री मानवी वर्तनाच्या किती जवळ जाऊ शकतात, याचे अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे चिनी पुडल जातीचे श्वान. भविष्यात जनुकीय अभियांत्रिकीमुळे चिनी लोक या कुत्र्यांना माणसाप्रमाणे कदाचित बोलायला पण शिकवतील पण तो भाग वेगळा...
 
हे सांगायचे महत्त्वाचे कारण असे पाळीव कुत्र्यांचा जगण्याचा संघर्ष जसा न्यूनतम पातळीवर आणता येतो, तसा माणसांचा जगण्याचा संघर्ष फार थोड्या व्यक्तींमध्ये न्यूनतम पातळीवर येतो. सहसा समाधानी माणसे थोडीफार जबाबदारीने वागताना दिसतात. विचार करा, *माणसाची पालनकर्ती राज्यव्यवस्था माणसाच्या प्रत्येक योग्य वर्तनाबद्दल कधीही शाबासकी देत नाही*. पण कुत्र्यांना मात्र प्रत्येक योग्य वर्तनाबद्द्ल शाबासकी मिळते. कदाचित असे बक्षिस देणे माणसाला आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. पण ज्या संस्कृतीमध्ये ताबडतोब, याच जन्मात जिथल्या तिथे बक्षिस मिळते तिथे मनुष्याने देदीप्यमान प्रगती केली आहे (उदा० भांडवलशाही देश, युरोपिअन संस्कृती).

भारतीय संस्कृतीचे दूर्दैव असे की असे बक्षिस मेल्यानंतर देण्याचे आश्वासन देते. बहुसंख्य भारतीय समाज जबाबदारीने वागत नाही याची खरी गोची हीच आहे. कुणाला पटो अथवा न पटो.

- राजीव उपाध्ये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: