मंगळवार, १ मार्च, २०१६

एक घरवापसी


आत्ता १५-२० मि. पूर्वीचा प्रसंग...

मारूतीमंदिरपाशी आलो आणि लाल सिग्नल पडला आणि अडकलो. सिग्नल हिरवा होईपर्यंत डोळ्यासमोर घडलेला प्रसंग.

माझ्या उजव्या बाजुला  सिग्नलपोलपाशी एक १६-१७ वर्षाचा गुलाबफुल विक्रेता आणि एक किचेन आणि तत्सम खेळणी विक्रेता यांच्याबरोबर एका पंचेचाळीशीच्या मनुष्याचा काहीतरी संवाद चालु होता. पंचेचाळीशीचा मनुष्य जोरजोरात बोलत असल्याने लक्ष वेधले गेले.

"अरे हे गळ्यात काय घातलंय माहिती आहे का तुला?" पंचेचाळीशीचा मनुष्य बहुधा कार्यकर्ता असावा. त्याने गुलाबफुल विक्रेत्याच्या गळ्यातल्या लॉकेटला उद्देशुन प्रश्न विचारला होता.

गुलाबफुल विक्रेता हसत हसत काहीतरी पुटपुटला. मला ते रस्त्यावरच्या गाड्यांच्या आवाजात ऐकु आले नाही.

"अरे, हा मेलेला मनुष्य आहे. मेलेल्या माणसाला असा कुणी गळ्यात घालतात का? आपण माणुस मेल्यावर त्याला घरात ठेवतो का?

ते दोघे काळेकभिन्न विक्रेते काहीही कळत नसल्याने हसत-हसत काहीतरी पुटपुटत होते. पण काय ते मात्र कळत नव्हते. त्यामुळे माझी उत्सुकता मात्र वाढत चालली होती.

"अरे या मेलेल्या माणसाला गळ्यात घालण्यापेक्षा मी तुम्हाला चांगला ॐ उद्या आणुन देतो. तो गळयात घाला" सिग्नलला गर्दी वाढल्यामुळे कार्यकर्त्याला आता चेव चढला आणि त्याचा आवाज आणखी वाढला.

नंतरचा संवाद मात्र गाड्यांच्या कलकलाटामुळे ऐकु आला नाही पण बघबघेपर्यंत त्या कार्यकर्त्याने तो गळयातला "मेलेला माणुस" खेचुन काढला. तेव्हढ्यात सिग्नल हिरवा झाला आणि मला तिथुन निघावे लागले.

रात्रीच्या अंधारात भरगर्दीत  चाललेल्या या घरवापसीने मनात बरीच प्रश्नचिन्हे चमकायला लागली होती...

बुधवार, २७ जानेवारी, २०१६

देऊळ


आमच्या सोसायटीच्या समोर २ मोठे टॉवर आणि एक मंगल कार्यालय झाले आणि आमच्या समोरच्या रस्त्याची गल्ली झाली. यथाकाल गल्लीच्या तोंडाचा काही रिक्षावाल्यानी ताबा घेतला आणि तिथे आपला स्टॅण्ड सुरु केला. काही दिवसांनी रिक्षास्टॅण्डला स्थैर्य प्राप्त झाले आणि एका रिक्षासंघटनेचा बोर्डपण लागला. पुढे काय होणार याचा मी अंदाज बांधला आणि माझा अंदाज खरा ठरला...

रिक्षावाल्यानी दत्ताचे देऊळ बांधायचा संकल्प सोडला. बहुधा आमच्या सोसायटीने हरकत घेतली म्हणून रिक्षावाल्यानी पलिकडच्या बाजुला छोटे दत्तमंदिर बांधायला घेतले. रिक्षावाल्याना दत्त का प्रिय आहे हे मला न उलगडलेले कोडे आहे. नुकतीच दत्तजयंती झाली तेव्हा रिक्षावाले माझ्याकडे आले, तेव्हा मी त्यांना मला शक्य होती तेव्हढी वर्गणी पण दिली.

परवाच मी रुपालीत जाण्यासाठी रिक्षा घेतली, तेव्हा एका रिक्षावाल्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.

मी विचारले, "काय हो, सगळ्या रिक्षास्टॅण्डवर दत्त जास्त करून दिसतो. ते का?"

"काय माहित नाही साहेब?"

"पण मग गावात एव्हढी देवळे अगोदरच असताना आणखी ही देवळे कशासाठी?"

"काय आहे साहेब, कामावर निघताना कुठेतरी डॊकं टेकवले की मन प्रसन्न राहतं साहेब".

मग मी त्याला विचारले,

"अहो पण डोकं टेकवायला आपल्या घरात देव असतोच की... घरातला देव काय मन प्रसन्न ठेवायला कमी पॉवरफुल असतो का?"

रिक्षावाला आता एकदम गडबडुन गेला आणि मग स्वत:ला सावरून मोठ्याने हसला आणि म्हणाला,

"देवळाच्या निमित्ताने आमच्या व्यवसायातली चार लोकं एकत्र येतात आणि बांधलेली राहतात"

मग रिक्षावाल्याने मला वेगवेगळ्या रिक्षास्टॅण्डवरचे रिक्षावाले कायकाय उपक्रम चालवतात, ते त्याने मला सांगितले. त्यावर घरातला देव नाक्यावरच्या चार लोकांना एकत्र आणण्यास असमर्थ आहे एव्हढाच मी त्यातुन निष्कर्ष काढला आणि मग मला त्याला अधिक प्रश्न विचारण्यात मला पण, का कुणास ठाऊक, रस उरला नाही.

तोपर्यंत रुपाली आली होती... रिक्षातला वेताळ मग रुपालीत जाउन लोंबकळु लागला.

मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

अजब

 मध्यंतरी माझ्या परिचयाच्या एका आजींना त्यांच्या आप्तांनी आमच्या घराजवळच्या वृद्धाश्रमात ठेवले होते. मी मला शक्य होते म्हणुन आणि वृद्धांशी माझे जुळते म्हणून या आजींना नियमित भेटायला जात असे. यामुळे तिथल्या इतर वृद्धांशी सहजच गप्पा होत. मी प्रामुख्याने श्रोता ही भूमिका त्यांच्यात निभावायचो आणि या लोकांसाठी तेव्हढेही खुप होते...

पुढे काही दिवसांनी माझ्या परिचयाच्या आजीना त्यांच्या आप्तानी अमेरिकेला न्यायचे ठरवले. वृद्धाश्रमातील लोकांनी एक छोटा निरोप समारंभ पण केला. तेव्हा एक आजी माझ्याकडे येऊन म्हणाल्या, "या आता इथुन जाणार असल्यातरी तुम्ही आमच्यासाठी येत चला हं. आपली ओळख आता चांगली झालीच आहे." मला त्यात वावगे वाटले नाही म्हणुन मी पट्‍कन ’हो’ म्हणुन टाकले.

नंतर काय वाटले कुणास ठाउक, माझं मन मला म्हणाले की माझ्या परिचयाच्या आजींच्या नंतर त्या वृद्धाश्रमात जाण्यासाठी आपण संचालकांची रितसर परवानगी काढावी. तो वृद्धाश्रम पेशाने मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या एक बाई चालवत असत.

मी त्या वृद्धाश्रमाच्या संचालिकेला फोन करुन सर्व सांगितले आणि रितसर परवानगी मागितली. त्यावर संचालिकेने मला सांगितले
"तुम्ही त्या आजीना भेटायला अजिबात येऊ नका. त्यांची केस जरा विचित्र आहे. तुम्हाला भेटायचे असेल तर इतरांना भेटा."

ज्या आजीनी मला "येत जा" म्हणुन सांगितले त्यांना टाळुन इतरांना भेटणे अशक्य असल्याने मी माझा वृद्धसेवेचा प्लॅन मग गुंडाळुन ठेवला.

विचित्र केस म्हणजे काय तर त्यांच्या आप्तांनी आजीना ’वेडं’ ठरवुन वृद्धाश्रमात आणुन टाकले होते असे उडत उडत कानावर आले होते. आजी मात्र एकदम खणखणीत गप्पीष्ट होत्या. ज्या काय गप्पा झाल्या त्यात कुठेही ’वेडे’पणा किंवा तर्‍हेवाईकपणाचा मागमूस नव्हता. पण त्याना समाजापासून असे तोडुन काय साधणार होते हे त्या वृद्धाश्रमाची संचालिकाच जाणे...

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

"टवाळी"


नारळीकरांच्या टवाळीवरून एक आठवण जागी झाली ...

१९९३-९४ च्या भटकरांनी माझे रखडवलेले प्रमोशन करायचेच असा विडा एका सहकारी-हितचिंतकाने उचलला.

हा माझा सहकारी अत्यंत बुद्धीमान आणि तितकाच विक्षिप्त. अत्यंत गुंतागुतीची differential equations, tensor calculus तास-न-तास हाताने फक्त कागद आणी पेन घेऊन करत बसायची अचाट क्षमता त्याच्यात होती.

त्याने प्रचंड प्रयत्न करून भटकरांना माझ्या प्रमोशनइंटरव्ह्युसाठी राजी केले. प्रमोशन इंटरव्ह्युसाठी मी अशा माणसाला (expert) आणेन की भटकरच काय  त्यांचा बाप पण तोंड उघडु शकणार नाही, हे त्याने मला दिलेले आश्वासन होते.

त्याचा तो अभिनिवेश बघुन मी त्याला विचारले,
"who is in your mind for my interview"

विनाविलंब विचार करता त्याने सांगितले,
"Prof. Govind Swaroop"

प्रा. गोविंद स्वरुप तेव्हा पुणे टिआयएफआर चे संचालक होते.

माझ्या मित्राने एक दिवस त्यांच्या घरी मला त्यांच्याकडे नेले. त्या दिवशी प्रा. गोविंद स्वरुपांच्या घरी विकांत पार्टी होती. मी काहीसा भांबावुन गेलो  होतो. माझ्या प्रमोशनसाठी प्रयत्न करणार्‍या माझ्या मित्राचे मला खुप कौतुक वाटत होते.  पण सावधपणे पार्टीत जमेल तेव्हढा (दारू सोडुन) सहभाग घेत होतो.

त्या दिवशी  त्या पार्टीत मला नारळीकरांची जी ’टवाळी’ बघायला मिळाली त्यानंतर नारळीकरांची माझ्या मनातली प्रतिमा खाड्‍कन उतरली. एक नमूद करणे आवश्यक आहे, ते असे की प्रा. गोविंद स्वरूप त्या टवाळीपासुन अलिप्त होते. त्या टवाळीचे कारण अलिकडे लक्षात आले - त्या सुमारास नारळीकरांच्या steady state theory चे जागतिकपातळीवर थडगे बांधले गेले होते ( अथवा सुरुवात झाली होती).

असो ...

नंतर भटकरांनी गोविंद स्वरूपांसारख्या व्यक्तीला माझ्या बढतीसाठी बोलावण्याची आवश्यकता नाही, असे सांगुन घूमजाव केले. माझी बढती झाली पण ती होउ नये म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होत होते.

मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

जे झाडांचे तेच माणसांचं


जमीन, हवा, पाणी दिले म्हणुन
कोणतेही झाड
कुठेही रुजत नाहीत.

जे झाडांचे तेच माणसांचं


सगळी झाडे
एका जागेवरून उपटुन
दूसरीकडे लावता येत नाहीत.

जे झाडांचे तेच माणसांचं

काही झाडे रुजतात आणि
झपाझप वाढतात
काही झाडे जागा झाली की
मग वाढतात

जे झाडांचे तेच माणसांचं

काही झाडे फार वाढणार नाहीत
याची काळजी घ्यावी लागते
कारण ’हवी ती झाडे’ मग
नीट वाढत नाहीत

जे झाडांचे तेच माणसांचं

- राजीव उपाध्ये

शनिवार, १० ऑक्टोबर, २०१५

सिनेस्थेशियाच्या निमित्ताने...



सध्या नुकतेच एक पुस्तक झपाटुन वाचत आहे. या पुस्तकाचे परीक्षण ’सायंटीफिक अमेरीकन’च्या जालावृत्तीत (http://www.scientificamerican.com/article/scientific-american-mind-reviews-the-superhuman-mind/) वाचल्यावर कमालीची उत्सुकता निर्माण झाली. लगेच अमेझॉनवर खरेदी पण करुन टाकले. पुस्तकाचे नाव आहे - "The Superhuman Mind - Free the genius within".    नाव थोडे सवंग वाटले तरी ’सिनेस्थेशिया’ या एका जैविक वास्तवाचा आधुनिक विज्ञानाच्या मदतीने डॉ. बेरीट ब्रोगार्ड या मायामी विद्यापिठातील संशोधिकेने पुस्तकात प्रदीर्घ शोध घेतला आहे.

अलिकडे मानवी आयुष्यातील ’य़श’ आणि ’बुद्धीमत्ता’ या विषयावर अनेक पुस्तके गाजली. माल्कम ग्लॅडवेलच्या ’आउटलायर’ पासुन र्‍होण्डा ब्रायन च्या ’द सिक्रेट’ आणि ’मॅजिक’ पर्यंत जवळजवळ सगळीच मी वाचुन काढली. यातल्या कोणाच्याच थिअरिज मी आता नाकारत नाही. पण न्यूरोसायन्सचा आधार घेऊन ’बुद्धीमत्तेच्या  दैवी देणगीचा’ घेतलेला शोध मला अवकाश मोहिमेपेक्षा जास्त थ्रिलींग वाटतो ( याचे कारण सोप्पे आहे - माझ्या आयुष्याला अर्थ माझ्या प्रतिभेच्या विकासाने निर्माण होणार आहे. त्यासाठी मदत मला न्यूरोसायन्सची मिळणार आहे, अवकाशमोहिमेच्या यशाचा मला त्यासाठी प्रत्यक्ष उपयोग काहीही नाही).

प्रत्येकामध्ये काही ना काही प्रतिभा असते हे मत आधुनिक विज्ञानामुळे वारंवार कानावर पडते. ही प्रतिभा स्मरणशक्ती, कला, साहित्य, एखाद्या आह्वानाचा ध्यास (मग ते शिखर गाठायचे असो किंवा एखादी समस्या विज्ञानाच्या मदतीने सोडवायचे प्रयत्न असोत) अनेक तर्‍हांनी साकारता येऊ शकते, ही आशा डॉ. ब्रोगार्ड परत एकदा अधोरेखित करते. ’सिनेस्थेशिया’ ला मराठीत मला योग्य शब्द सापडला नाही. पण सोप्या शब्दात ’सिनेस्थेशिया’ म्हणजे रंग, स्पर्श, चव, ध्वनी इत्यादी संवेदनांच्या अनुभवात कमीअधिक तीव्रतेची गुंतागुंत. सहसा आपल्याला एखाद्या संवेदनेचा अनुभव त्या संवेदने पुरताच मर्यादित असतो. पण एखाद्या रंगाच्या अनुभवाने स्पर्शाचा अनुभव किंवा नादाची अनुभूती जागी होणे याला ’सिनेस्थेशिया’ असे म्हणतात. "हा निळा रंग किती गोड आहे" असे एखाद्या व्यक्तीने म्हटले तर तो चेष्टेचा विषय होईल कारण निळ्या रंगात गोड काय हा सामान्यत: निर्माण होणारा प्रश्न. पण ’सिनेस्थेशिया’ असलेली व्यक्ती खरोखरच निळा रंग बघताना गोड ही चव अनुभवते.

’सिनेस्थेशिया’  अनेक प्रतिभावंतांध्ये जन्मजात असतो किंवा डोक्याला झालेल्या अपघातामुळे किंवा आजारामुळे ’सिनेस्थेशिया’  निर्माण होऊ शकतो. डॉ. ब्रोगार्डच्या दाव्यानुसार सिनेस्थेशिया विकसित करता येतो.

हे पुस्तक वाचताना मला आणखी एका वास्तवाची परत एकदा प्रकर्षाने जाणीव झाली. एखाद्या विषयाचे ऑब्सेशन किंवा नाद प्रतिभेचे महत्त्वाचे लक्षण असु शकते. त्याकडे सकारात्मक नजरेने पाहिले जाणे प्रतिभाविकासासाठी आवश्यक असते. जगण्याचा संघर्ष, तर्क, चिकित्सक दृष्टी नादीष्टपणाला आणि प्रतिभाविकासाला मारक ठरतो.

हे पुस्तक अजुन वाचुन पूर्ण झालेले नाही. पण एक प्रश्न मात्र सतावायला लागला आहेत. तो म्हणजे एकंदर civilized rational माणसांचा उद्धटपणा (आदिम जमातीत सापडणार्‍या आणि निसर्गाच्या सान्निध्यात विकास पावणार्‍या अनेक प्रतिभा नाकारायची प्रवृत्ती, ’आध्यात्मिक’ अनुभवांची कुचेष्टा, आपण  तेव्हढे शहाणे आणि बरोबर इ) किती गंभीरपणे घ्यायचा हा आहे...

 



मंगळवार, ११ ऑगस्ट, २०१५

मी एक दलित आहे



श्रीमंत मला श्रीमंत म्हणत नाहीत
अन् गरीब मला गरीब म्हणत नाहीत
...म्हणुनच मी एक दलित आहे

मुंबईकर मला पुणेकर म्हणतात
अन् पुणेकर त्यांच्यात घेत नाहीत
...म्हणुनच मी एक दलित आहे

हुशार लोक मला मठ्ठ समजतात
अन् मठ्ठ मला हुशार समजतात
...म्हणुनच मी एक दलित आहे

सश्रद्ध मला  त्यांच्यात घेत नाहीत
अन् बुद्धीवादी मला झटकुन टाकतात
...म्हणुनच मी एक दलित आहे

स्त्रीवाद्याना माझा विटाळ होतो
परंपरावादी माझा तिरस्कार करतात
...म्हणुनच मी एक दलित आहे

तर लाईफची गोची अशी आहे की
कोणतेही सरकारी फायदे नसलेला
मी खराखुरा दलित आहे.

- राजीव उपाध्ये

मंगळवार, ३० जून, २०१५

सल्ला



आज मला तिसर्‍यांदा ’मेडिकल लिटरेचर’ वाचु नको असा सल्ला मिळाला. हा सल्ला देणारे तिघेही डॉ आहेत आणि त्या तिघांबद्दल मला अतिशय आदर आहे.

पण मला याबाबत थोडे लाऊड थिंकींग करावेसे वाटते.  -

० माझा मूळ स्वभाव - माझा मूळ स्वभाव अतिशय चौकस असल्याने का, केव्हा, कशाला अशा प्रश्नांची **पटतील अशी उत्तरे मिळणे** माझ्या एकंदर स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्त्वाचे आहे. ही जित्याची खोड मी जिवंत आहे तोपर्यंत तशीच राहणार आहे.

० मी जे ’मेडिकल लिटरेचर’ वाचतो त्याचा मी कोणताही गैरवापर करत नाही. उदा. इतरांना परस्पर सल्ले देणे, स्वत:ला किती कळते हे याचे प्रदर्शन करणे इत्यादि. पण मला कळलेली माहिती मला योग्य वाटल्यास सावधगिरीचा इशारा देउन प्रसृत करणे मला गैर वाटत नाही. तिचा उपयोग कुणी किती करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

० मी स्वत: अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहे. मला स्वत:ला माझे शरीर जे सांगत असते ते सर्व डॉक्टरांना समजते का या विषयी मला शंका आहे.

० डॉक्टरांना त्यांचा त्यांचा जीवनसंघर्ष असतो याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडुन मला पूर्ण क्षमतेने सल्ला/सेवा मिळेल अशी अपेक्षा ठेऊ शकत नाही. शिवाय त्यांना व्यवसायाने घालुन दिलेल्या मर्यादा पण असतात. मग माझ्या प्रश्नांची उत्तरे त्यामर्यांदाच्या बाहेर असल्यास मी हातावर घडी घालुन स्वस्थ बसायचे की माझ्या निसर्गदत्त कुवतीनुसार त्या प्रश्नांची उत्तरे शोधायची? ( आजवरच्या इतिहासानुसार मी शोधलेली ही उत्तरे आजवर तरी ’बरोबर’च निघाली आहेत.)

० मेडिसिन हे क्षेत्र किती खोल आणि व्यापक आहे याची अनुभूती ही मला आजवरच्या वाचनानेच आली आहे. माझ्या आकलन शक्तीच्या मर्यांदांची मला पूर्ण जाणीव आहे. (उदा - मला संख्याशास्त्र कळत नाही हे कबुल करायला मला लाज वाटत नाही. ) माझी ही धडपड डॉक्टरांची  फी टाळण्यासाठी पण नक्कीच नाही.

जाता जाता दोन व्याख्यानांचे किस्से नमूद करावेसे वाटतात- त्यातले एक प्रा. श्रीराम अभ्यंकरांचे आणि दूसरे व्याख्यान डॉ. चंद्रशेखर यांचे.  मला सारखे आठवते (विषय आता विसरलो आहे). त्यांनी सुरुवात शालेय बीजगणितापासुन केली आणि व्याख्यान अत्यंत गुंतागुतीच्या Algebraic Geometry तील तात्कालीन संशोधनापर्यंत नेऊन संपवले. त्या व्याख्यानात एक वाक्य ते पुन:पुन: उच्चारत राहिले - "This is all high school algebra". डॉक्टर चंद्रशेखरांनी त्यांचे व्याख्यान कृष्णविवरांवरील ताज्या संशोधनावरच दिले आणि साठाव्या मिनिटाला खिशातुन घड्याळ काढले आणि म्हणाले "Black holes are the most simple objects in our universe". 

रविवार, २५ जानेवारी, २०१५

अनिसची (बोगस) आह्वाने







सहजच लक्षात आलं,


अनिस मंत्राने आजार बरे करणार्‍यांवर चवताळते आणि

मग त्यांना आह्वान देते की आम्ही अमक्य-तमक्या आजाराचे

इतके-तितके रुग्ण आणुन देतो. त्यांना बरे करून दाखवा.


आता बघा...


एखाद्याने मंत्राने (किंवा तत्सम उपायांनी) आजार

खरोखरच बरे केले असतील तर

ते ’प्लासिबो-इफेक्ट’ मुळे हे नक्की.


’प्लासिबो-इफेक्ट’मध्ये उपचारांवर आणि ते करणार्‍यावर

गाढ श्रद्धा असावी लागते.


आह्वानातील सॅंपलमध्ये असलेल्या रुग्णांमध्ये पूर्वअट असलेली

ही ’गाढ श्रद्धा’ अनिस कुठुन आणि कशी आणणार?

त्याचे प्रशस्तिपत्रक अनिस कशाच्या आधारावर देणार?


म्हणजे अनिसचे हे पण आह्वान बोगस हे नक्की...


दूसरं असं...


आपला आजार प्लासिबो-इफेक्ट्ने बरा व्हावा असं एखाद्याला

वाटत असेल तर त्यात ढवळाढवळ करायचा अधिकार

अनिस सारख्या त्रयस्थ घटकाला आहे का?

शकुन

काल मकरंद दामलेने विचारलेल्या अनपेक्षित (Superstitious OR Optimistic ?) प्रश्नाने भंबेरी उडाली. पण मी शकुनावर विश्वास ठेवतो का याचे प्रामाणिक उत्तर "हो" आणि "नाही" असेच आहे. ’नाही’ अशासाठी की मीठ सांडल किंवा मांजर आडवं गेलं तर मी अपशकुन नक्कीच मानत नाही. पण ज्या बाह्य घटनांनी माझी मानसिक अवस्था बदलते त्या मला शकुनासारख्याच वाटतात. उदा. काही माणसांना माझ्यात सगळं वाईटच दिसत आलेलं असतं, त्यांना फकत माझ्या अपयशाची चर्चा आणि चिकित्सा करण्यात रस असतो. अशी माणसं मी नक्की अपशकुनी मानतो. कारण अशी माणसे भेटले की फक्त चोची मारायचेच काम करतात किंवा कडवट स्मृतीना जागं करायचा प्रयत्न करत बसतात. बर्‍याचवेळा असे लोक समोरून आल्यास मी फुटपाथ बदलतो किंवा आजकाल चक्क अपमान करून हाकलुन देतो. पण अचानक एखादी मनाला प्रसन्न करणारी घटना घडली किंवा व्यक्ती भेटली तर आशा निर्माण व्हायला किंवा टिकुन राहायला मदत होते. विशिष्ट घटना विशिष्ट मानसिक अवस्था निर्माण करतात.


तुमचं मला माहित नाही, पण मला तरी माझी मानसिक अवस्था at will अजुनही बदलता येत नाही, हे कबुल करायला मला लाज कमीपणा वाटत नाही.


मग भारद्वजाचा शकुन का बरं?


७८ साली कोथरूडला राहायला आलो तेव्हा आम्ही अगोदर जिथे राहात होतो तिथे बरीच परिस्थिती विचित्र होती. घर बांधायचा निर्णय आईवडिलांनी मनाचा हिय्या करून घेतला होता. घर बांधुन झाले आणि सगळी पुंजी त्यात संपली. तोपर्यंत जी माफक मौजमजा आमच्या तिघांच्या आयुष्यात होती ती पण संपली. त्या परिस्थितीत अनेक बाबतीत झालेली दडपणुक उफाळुन यायची. मार्क असुनही, धाकट्या भावाला शिकायला मिळाले पाहिजे, म्हणुन आईला मेडिकलला जाता आले नव्हते. पुढे रिझर्व्ह बॅंकेत आईला नोकरी लागली तेव्हा आईच्या हॉकीला तिथे भरपूर वाव मिळाला आणि आर्थिक स्वातंत्र्य (आईचा पगार होता महिना र १८० आणि आजोबांचा रु१४०!) आणि स्थैर्य पण मिळाले. त्यामुळे आई तिथे मनोमन रमली होती. पण लग्न झाल्यावर नोकरी करण्यावर सासर्‍याने नुसती गदा आणली नाही तर मी काही महिन्यांचा तान्हा असताना आईला अनाथाश्रमाचा रस्ता दाखवला होता (आईची ६३ सालची ८पानी विस्तृत सुसाईड नोट मला २०००साली आई गेल्यावर सापडली तेव्हा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मला मिळाली). या मानसिक आघातांनी ती खचली ती कायमचीच...प्रचंड उर्जा असलेल्या व्यक्तीचे सातत्त्याने खच्चीकरण झाले की काय होऊ शकते याचे अत्यंत नमुनेदार उदाहरण म्हणजे माझी आई.


नव्या घरात राहायला आल्यावर मात्र आर्थिक चणचणीमुळे काही प्रश्न नव्याने निर्माण झाले. त्यात जमेची बाजु एव्हढीच की वडिलांना कसलेही व्यसन नव्हते आणि कोणतेही आतबट्ट्याचे व्यवहार त्यांनी कधी केले नाहीत. नेमके त्याच वेळेस आईच्या वडिलांनी आईला सांगितले की, "अगं तुमच्या घराभोवती इतके भारद्वाज आहेत म्हणजे ही तुमची वास्तू तुम्हाला लाभणार बरं का?" आजोबांनी दिलेल्या धीरामुळे काही वेळ का होईना भारद्वाजाचे दर्शन झाले की आईचे मन उभारी धरायचे.


मला आजही भारद्वाज दिसला की आईचा तो उजळलेला चेहेरा आठवतो आणि म्हणुनच तो एक शुभ शकुन वाटतो...