मंगळवार, ३ मार्च, २००९

एबर्टिनचे मध्यबिंदू ज्योतिष-१

भारतीय ज्योतिषांच्या भविष्यकथनाच्या काही खोडी आहेत. त्यापैकी एक खोड म्हणजे ज्या गोष्टीला 'भारतीय' असे लेबल डकवता येईल अशा सर्व गोष्टींविषयी कमालीचा दूरभिमान. भारतीय ज्योतिषापलिकडे ज्योतिषाची अनेक प्रभावी तंत्रे आहेत याचे आपल्या ९९% ज्योतिषांना भानच नसते. त्यामुळे त्यांचा वापर तर दूरच... असो.

आजपासून मी अशाच एका ज्योतिषातील तंत्राविषयी लिहीणार आहे. हे तंत्र पश्चिमेत ज्योतिष अभ्यासकांत अतिशय प्रसिद्ध आहे. भारतीय ज्योतिषांनी मात्र त्याची दखल घेतलेली नाही. या तंत्राच्या अनुषंगाने कोणताही अभ्यास, चर्चा होताना इथे दिसत नाही. फार काय या लोकप्रिय ज्योतिष-तंत्रासंबंधीची पुस्तके भारतात अजून मला बघायला पण मिळालेली नाहीत.

पारंपरिक ज्योतिषांतील अनेक वादग्रस्त कल्पनांना बाजूला करून ज्योतिषातील 'ग्रहांच्या भौमितिक रचना' या मध्यवर्ती कल्पनेचा विस्तार करणारे "मध्यबिंदू ज्योतिष" हे आल्फ्रेड विटे आणि राईनहोल्ड एबर्टिन या दोघा जर्मन ज्योतिषांनी विकसित केले.

१८७८ साली जन्माला आलेला आल्फ्रेड विटे व्यवसायाने सर्व्हेअर आणि हौशी आकाश-निरीक्षक होता. त्याने १ल्या महायुद्धात भाग घेतला होता. लढाईच्या धुमश्चक्रीत तो सैन्याच्या हालचालींची भाकीते वर्तवत असे. त्याची बरीचशी भाकीते चुकू लागल्यामुळे त्याने ज्योतिषातील प्रचलित कल्पना तपासायला सुरुवात केली. ज्योतिषात प्रचलित असलेली 'योग' ही कल्पना संकुचित असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने 'मध्यबिंदू' आणि काही काल्पनिक ग्रहांची कल्पना मांडली. त्यापैकी मध्यबिंदू ही संकल्पना अनेकजणानी सखॊल अभ्यास केल्यामुळे जास्त प्रसार पावली. याला मोठा हातभार डॉ राईनहोल्ड एबर्टिनने लावला.
डॉ राईनहोल्ड एबर्टिन

डॉ राईनहोल्ड एबर्टिन हा स्वत: एक (माणसांचा) डॉक्टर होता. माणसाच्या आयुष्यात दिसून येणार्‍या अनेक चक्रीय घटनांनी त्याला आकाशस्थ ग्रहांच्या भ्रमणांशी सांगड घालण्यास प्रवृत्त केले. पारंपरिक ज्योतिषात वापरल्या जाणार्‍या अनेक कल्पना - उदा. भाव, राशी या भ्रांत (किंवा अ-वास्तव!) कल्पना आहेत असे त्याचे मत होते. कारण, सायन आणि निरयन ही दोन राशीचक्रे प्रचलित ज्योतिषात वापरली जातात. एकंदर भाव पद्धतींची संख्या १५ पेक्षा जास्त आहे. असे असताना कोणती भाव पद्धत वापरायची? बरे जी फलादेश करण्यास उपयोगी पडते ती वापरायची असे जरी मानले तरी ज्योतिषाकडे येणार्‍या प्रत्येक जातकासाठी प्रत्येकवेळेस सर्व भावपद्धती तपासणे व्यवहार्य नसते. कालनिर्णयाबाबत वापरण्यात येणार्‍या 'दशा' पद्धती बद्दल असेच सांगता येइल. दशा पद्धतीला कोणताही वास्तव आधार नाही. केवळ अनुभव येतो या भाबड्या समजुतीमुळे 'दशा' वापरल्या जातात. आमच्या ऋषीना जास्त अक्कल होती ही अशीच एक भारतीयांची भाबडी समजूत 'दशा' जीवंत राहण्यास कारणीभूत ठरली आहे. परिणामत: लहान मुले जशी बर्‍याचवेळा चुकीची पद्धत वापरून गणितांची बरोब्बर उत्तरे काढतात, त्याप्रमाणेच दशा पद्धतीच्या अचूक भाकीतांबद्दल सांगता येईल. ज्योतिषातील अ-व्यवहार्य कल्पना टाकून दिल्यावर, संकल्पनांची पुनर्बांधणी करून ज्योतिषाची उपयुक्तता वाढवता येईल का याचा विचार राईनहोल्ड एबर्टिनने केला.
कित्येक हजार पत्रिकांचा अभ्यास केल्यावर त्याच्या असे लक्षात आले की


० केवळ युति, केंद्रादि योग मानवी जीवनातील घटनांचा मेळ घालण्यास पुरेसे पडत नाहीत.
० भाव, राशी या कल्पनाना तार्किक आधार नाही
० ग्रहांच्या विशिष्ट रचनानी पत्रिकेत अन्यत्र संवेदनशील बिंदू (sensitive points) तयार होतात. हे बिंदू ग्रहांच्या गोचर भ्रमणांनी सक्रिय होतात तेव्हा तदानुषंगिक ग्रहांच्या तत्त्वानुसार घटना घडायची शक्यता असते.

एखाद्या भौमितिक रचनेत अंतर्भूत होणार्‍या ग्रहांच्या समूहाचा एकत्रित विचार हे एबर्टीनच्या तंत्राचे मोठ्ठे बलस्थान! एखाद्या लज्जतदार पाककृतीची चव जशी त्यामध्ये वापरलेल्या मसाल्यातील घटकांवर अवलंबून असते त्याप्रमाणे आयुष्यात घडणार्‍या घटनेत वेगवेगळी बीजतत्त्वे (key principles) प्रकट होतात. या तत्त्वांचा एकत्रित विचार ग्रहांच्या बीज-तत्त्वाना एकत्र मांडून करता येतो आणि संभाव्य घटनेच्या स्वरुपाची रचना करता येते.

कोणतेही तंत्र योग्य साधनांशिवाय पूर्णपणे उपयोगात आणता येत नाही. ग्रहांच्या समूहाचा एकत्रित विचार अचूक पणे करण्यासाठी "९० अंश- तबकडी" (90 degree dial) आणि एखाद्या कालावधीतील ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करण्यासाठी "४५ अंश आलेखीय पंचांग" (45 degree graphical ephemeris) या दोन साधनांची पण एबर्टीनने निर्मिती केली. आज संगणकाच्या उपलब्धतेमुळे ही दोन्ही साधने जास्त परीणामकारकपणे वापरता येतात.

आपल्या तंत्राचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी एबर्टीनने अनेक पुस्तके लिहिली. त्यातील The Combination of Stellar Influences हे पुस्तक "कोझी" या नावाने पश्चिमेतील ज्योतिर्विदांमध्ये प्रसिद्ध आहे. मध्यबिंदू ज्योतिष नव्याने अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्याला या पुस्तकामुळे लीलया आत्मसात करता येते.

कोणत्याही गूढ गोष्टीना (अंतर्ज्ञान, साधना, गुरुकृपा) थारा नसल्यामुळे एबर्टिनचे मध्यबिंदू ज्योतिष झपाट्याने लोकप्रिय झाले. आजही भारतात याचे अभ्यासक तर जेमतेम मूठभरच असतील. ज्योतिषाचे मराठी अभ्यासक या तंत्राच्या अभ्यासाला प्रवृत्त झाले तर एकंदरच ज्योतिषाची कुचेष्टा कमी होण्यास मदत होईल अशी आशा वाटते.

राजीव उपाध्ये
ईमेल - upadhye.rajeev@gmail.com

1 टिप्पणी:

Astro and Vastu Counsellor म्हणाले...

श्री. राजीवजी यास
धन्यवाद, लेख आवडला,
संजीव