सोमवार, १६ मार्च, २००९

अर्धकेंद्र योग

आमचे विद्वान ज्योतिर्विद मित्र धोण्डोपन्त आपटे यानी त्यांच्या ब्लॉगवर केलेले खालिल विधान आम्हाला अतिशय धक्कादायक वाटले. ते विधान असे, "तसेच अर्धलाभयोग, अर्धकेंद्रयोग वगैरे फलिताच्या दृष्टीने गौण योग सुद्धा आहेत."

अर्धलाभ योगाचा माझा अभ्यास कमी आहे (म्हणून त्याविषयी बोलणे उचित नाही), पण संपूर्ण मध्यबिंदू ज्योतिषाचा डोलारा अर्धकेंद्र योगावर उभा आहे असे म्हटले तरी चालेल. पुढे जाउन सांगायचे झाले तर अर्धार्धकेंद्र योग (२२.५ अंश) पण मध्यबिंदू ज्योतिषात कुशल ज्योतिषी सर्रास वापरतात.

अर्धकेंद्र योगाचा विचार करताना पुढे दिलेल्या गोष्टी प्राधान्याने विचारात घ्याव्या लागतात-

० अर्धकेंद्रयोगात कोणते ग्रह आहेत?

म्हणजे दोन शीघ्रगती ग्रह किंवा दोन अतिमंदगती ग्रह (युरे., नेप., प्लुटो) आपापसात अर्धकेंद्र योग करत असतील तर ते गौण ठरतात. पण एक मंदगती ग्रह आणि एक शीघ्रगती ग्रह असा योग होत असेल तर अर्धकेंद्रयोग केंद्र योगाइतकेच ताकदवान ठरतात. उदा - रवि-शनी, रवि-युरेनस, रवि-नेपच्युन, रवि-प्लुटॊ (गोचरीने प्लुटॊ रवीशी अर्धकेंद्र योग करत असेल तर मानहानी, आयुष्याची दिशा बदलणे इत्यादि घटना घडताना दिसतात). माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव न्यायालयीन प्रकरणात (सेंट किट्स?) गुंतले गेले तेव्हा प्लुटो गोचरीने त्यांच्या जन्मरवीबरोबर अर्धकेंद्र योग करत होता. माझ्या एका परिचिताने याच योगावर आपले MBBS संपल्यावर चांगले मार्क असुनही मेडिसीन सोडून genetics मध्ये जायचा निर्णय घेतला.

बुध-नेप अर्धकेंद्र योगातील व्यक्ती एकतर खॊटे बोलतात किंवा स्वत: स्वत:ची दिशाभूल करण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते.

० अर्धकेंद्र योगासाठी २ अंश अथवा त्याहून कमी दीप्तांश घेतले तर हमखास त्यांचे
प्रत्यंतर येताना दिसते.

अर्धकेंद्र योगाचा एक विलक्षण अनुभव नुकताच आला. माझा एक मित्र माझ्याकडे पत्रिका बघायला आला होता. बोलता बोलता मी सहज त्याच्या काही मित्रांची चौकशी केली. तेव्हा त्याने आपल्या एका मित्राचे वैवाहिक जीवन अत्यंत अस्थिर बनल्याचे सांगितले. मी अधिक चौकशी केल्यावर असे कळले की आमच्या या मित्राची बायको अलिकडे (४-५ वर्षे) हिस्टरीक होते व हिंसक बनते. मला उत्सुकता निर्माण झाली आणि अंदाज केला की पत्रिकेत चंद्र-प्लुटॊचा केंद्र अथवा अर्धकेंद्र योग असला पाहिजे. त्यावर मी माझ्या मित्राला फोनवरून या जोडप्याची जन्मतारीख इ. माहिती मागवायला सांगितले. ती अशी -

बायको नवरा
जन्म- ४ सप्टे १९७५ १८ जुलै १९७३
वेळ - १०-५५ रात्र ११-१५ सकाळी
स्थळ - मुंबई पुणे


या जोडप्यात बायकोच्या पत्रिकेत चंद्र-प्लुटॊ अर्धकेंद्र हा योग असून शनीच्या भ्रमणात म्हणजे साडेसातीत तो तीव्रफलदायी बनला.

पत्रिकामेलन या अंगाने विचार करण्यासाठी वरील जोडप्याचे उदाहरण अतिशय उत्तम आहे. शिवाय शनी-नेपचूनचा मध्यबिंदू जन्मरवीशी अर्धार्धकेंद्र योग करतो जो चिकट आजारपण दाखवतो. पण याचा विचा्र पुढे कधितरी...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: