सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

श्रेष्ठ कोण?



एकदा एक टिवटिवाचार्य आणि फेस्बुकाचार्य एकमेकांना नगरप्रदक्षिणेस निघाले असताना भेटले. मग त्यांच्यात वाद सुरु झाला - राहुल गांधी श्रेष्ठ की नरेन्द्र मोदी श्रेष्ठ.

हा वाद इतका पेटला की रस्त्यात बघ्यांची अलोट गर्दी झाली. वाहतूक खोळंबली. महसूल बुडाला. रस्त्यात अडकून पडलेल्या रुग्णवाहिकांमधले रुग्ण दगावले. पण वाद संपायची काही लक्षणे दिसेनात.

कुणी म्हणाले यांचे अकाऊंट ब्लॉक करा. कुणी म्हणाले, "त्याने मूळ प्रश्न सुटणार कसा?"

त्याच वेळेस नारदमुनी तेथून आकाशमार्गाने जात होते. गर्दी बघून त्यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. अचानक प्रत्यक्ष नारदमुनी अवतीर्ण झाल्याचे बघून रस्त्यावरचा गलका थांबला.

नारदमुनीनी टिवटिवाचार्य आणि फेस्बुकाचार्यांचे  म्हणणे ऐकून घेतले. मग त्यांनी तोडगा सूचवला.

"तुम्हाला दोघांना मी भगवान शंकराकडे घेऊन जातो. ते आत्ताच समाधीतून बाहेर आले आहेत. पार्वतीने डोके खायला सुरुवात करायच्या अगोदर त्यांचे चित्त शांत असताना ते आपल्याला या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ शकतील."

साक्षात शंकराला भेटायची संधी मिळाल्यामुळे टिवटिवाचार्य आणि फेस्बुकाचार्य मनोमन खुष झाले. त्यांनी नारदाबरोबर लगेच हिमालयाकडे प्रस्थान ठेवले.

कैलासावर पोचल्यावर नारदाने सर्व वृत्तांत कथन केला आणि समस्येविषयी मार्गदर्शन करण्याची हात जोडून विनंति केली.

भगवान शंकराने काही वेळ डोळे मिटले आणि निवाडा केला की राहुल गांधी श्रेष्ठ!

"राहुल गांधीच्या तपस्येने मला प्रभावित केले आहे."

पण या उत्तराने टिवटिवाचार्य आणि फेस्बुकाचार्य या दोघांचेही समाधान झाले नाही. कारण कुणीही टॉम-डिक-हॅरी येतो आणि शंकराला प्रसन्न करतो. मग त्यांच्या वादाने कैलास पर्वत पेटला. मग नद्यांना पूर आले. जनजीवन पुन्हा धोक्यात आले.

मग नारदाने परत शक्कल लढवली. त्याने सुचवले आपण भगवान विष्णुला साकडे घालु या. समस्येचे उत्तर विचारू या!
टिवटिवाचार्य आणि फेस्बुकाचार्य यांना पर्याय पसंत पडला.

तिकडे भार्या-पद-मर्दित-शेषशायी-भगवान विष्णुंना अंतर्ज्ञानाने सर्व समजले. हे तिघेजण तिकडे पोचले तेव्हा त्यांचे उत्तर तयारच होते.   त्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि बसायची आज्ञा केली. मग ते म्हणाले,
"भारतवर्षाचा आता लोकसंख्येने इतका चुथडा झाला आहे की कोणताही विवेकी मनुष्य हा देश समर्थपणे चालवू शकणार नाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला पण आता तिथले प्रश्न आता सोडवता येण्याच्या पलिकडे गेले आहेत. बहुसंख्य प्रजानन भाबडे असतात, विवेकी नसतात. अशा लोकांना विवेकी कृतीपेक्षा धाडसी कृती जास्त प्रभावित करते. राहुल गांधींकडे धाडसही नाही आणि विवेकही नाही. त्यामुळे मोदीच श्रेष्ठ ठरतात..."

साक्षात् विष्णूने दिलेल्या उत्तराने टिवटिवाचार्य आणि फेस्बुकाचार्यांचे समाधान झाले आणि ते पृथ्वीतलाकडे निघाले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: