"तुझं माझं ब्रेक-अप" मधली केतकी चितळे सुरुवातीला माझ्या जाम डोक्यात गेली होती. पण ती एपिलेप्सीची बळी (victim) आहे असं तिच्याच तूनळी वरील एका क्लिपमधून कळले. मग माझं मत १८० अंशात बदलले आणि तिच्याबद्दल आदर वाटायला लागला.
लोक तिच्या विकाराला कसं असंवेदनशीलपणे घेतात आणि ते ती कसं हाताळते, हे बरेच शिकवून गेले. ही बया कदाचित माझ्या निम्म्या वयाची असेल. पण तिचे एक वाक्य माझ्या ऐकल्या पासून डॊक्यात रूंजी घालते आहे. ते साधारण असे आहे - "जर लोकांनी एखाद्या गोष्टीची वेदना अनुभवली नसेल तर त्यांच्याकडून संवेदनशीलतेची भलती अपेक्षा करणे व्यर्थ आहे".
असाच दूसरा अनुभव नुकत्याच पाहिलेल्या डि० एस० कुलकर्णींच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ बघताना आला. डिएस्केंची माझ्या मनातली प्रतिमा म्हणजे स्वत:भोवती स्वत:च आरत्या ओवाळणारा एक नार्सिसिस्ट अशी होती. पण एका समाजवादी विचारसरणीच्या व्यक्तीने एव्हढे मोठे साम्राज्य निर्माण केले याचे आता अप्रूप वाटते. शिवाय त्या पत्रकार परिषदेतला या माणसाचा संयम अजोड होता.
काही वर्षांपूर्वी माझा एक वयाने मोठा आणि विक्षिप्त पण प्रचंड बुध्दीमान सहकारी माझ्याशी येता जाता खूप भांडायचा. त्या भांडणाला स्थळकाळाचे बंधन नसायचे. आजुबाजुच्या सहकार्याना हे बघायला खूप मौज वाटायची.
मग कानावर आले की त्याचा नुकताच घटस्फोट झाला होता. त्याच्या वागण्याचा त्रास मला व्हायला लागल्यावर माझी घरात चिडचिड सुरु झाली. तेव्हा आई म्हणाली, "घटस्फोट झालेल्या पुरुषाची वेदना तुला या वयात कळणार नाही. त्याच्याकडे दूर्लक्ष कर". आईच्या त्या म्हणण्याचा अर्थ कळायला पुढे बरीच वर्षे जावी लागली.
एम्पथी ही खुप मौल्यवान चीज आहे याची आता खात्री पटली आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा