सोमवार, ३० जानेवारी, २०१२

ज्योतिष - गोचर मंगळ-शनी मध्यबिंदुच्या भ्रमणाचा परवाचाच माझा स्वत:चा अनुभव

नुकतीच पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली. एका व्यक्तीने शनी-मंगळाच्या भीतीने स्वत:चे कुटुंब संपवले, अशी बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती. या बातमीवर अनेकांनी अकलेचे तारे तोडले. आयुष्यातील संकटाना धैर्याने सामोरे जा, इत्यादि मते लोक अजूनही व्यक्त करत आहेत. असे फुकटचे बिनबुडाचे सल्ले देणाराना एक गोष्ट लक्षात येत नाही की हे धैर्य या वैफल्यग्रस्त व्यक्तीने नक्की कुठून गोळा करायला हवे होते? अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठेल्यावरून की नारळीकरांच्या आयुकातून? आत्महत्या हा चुकीचा पर्याय आहे, हे नि:संशय पण एखाद्या व्यक्तीच्या सपोर्ट सिस्टीम्स संपल्या तर त्याने येणारे वैफल्य हाताळायला कुणाकडे जायचे? फुकटचे सल्ले देणारांच्याकडॆ?

शनी-मंगळाच्या भ्रमणात नुसते अडथळेच येत नाहीतर तर जिवावर उठणारे प्रसंग उद्भवतात. काही वेळा हे प्रसंग अगोदर कल्पना असेल तर टाळता तरी येतात किंवा ते हाताळण्यासाठी मनाची तयारी ठेवायला ज्योतिषाची मदत होऊ शकते. काही आठवड्यापूर्वी गोचर मंगळ-शनी मध्यबिंदूच्या भ्रमणाचा अभ्यास करत असताना माझ्या असे लक्षात आले की हे भ्रमण लवकरच म्हणजे जानेवारीच्या अखेरीस माझ्या जन्मरवीवरून होणार आहे. या आगाऊ सूचनेमुळे मनात थोडेसे का होईना पण चरकायला झालेच. पण सावधगिरी शक्य तेव्हढी बाळगायची हा निर्धार केला आणि मनातून तो विषय काढून टाकला.
---
परवाच्याच शनिवारची घटना गोष्ट. मी माझ्या कुटुंबा बरोबर नगररोडच्या इन-ऑर्बिट या मॉल मध्ये गेलो होतो. माझा आणि माझ्या मुलीचा तिथे जाऊन पास्ता खायचा बेत होता. माझ्या बायकोला तिथले "मॉड"चे डोनट फार आवडतात. पास्ता फस्त केल्यावर आता काय याचा विचार चालू असताना आमच्या कन्येला तिथे कॅण्डीची टपरी दिसली. तिच्या पिगी बॅंन्केतले पैसे वापरण्याच्या अटीवर मी तिला कॅण्डी घ्यायला परवानगी दिली. कन्येने आम्हा दोघांसाठी आम्हाला आवडतात म्हणून डार्क चॉकलेट घेतले. लेकीच्या औदार्याचे कौतुक करून आम्ही उभयतांनी ते डार्क चॉकलेट खाल्ले आणि मॉलमधल्या सुपर-बझारकडे मोहरा वळवला.

थोड्याच मला छातीत अस्वस्थता वाटायला लागली. छातीत धडधड होऊ लागली. लिजीव घाबरागुबरा झाला. कपाळाला घाम आला. बायकोला मी ताबडतोब खरेदी आटपायला सांगून शौचालय गाठले. तिथुन आल्यावरही धडधड कमी होईना म्हणुन एक बाक शोधला आणि धडधड कमी व्हायची वाट बघत बसलो. एव्हाना ४५ मिनिटे होऊन गेली तरी फार फरक पडला नव्हता तेव्हा मी बायकोला तडक डॉक्टरांकडे निघण्याविषयी सुचवले. गाडी मॉलवरच सोडायची असे ठरवून पटकन रिक्षा पकडली आणि डेक्कन जिमखान्यावरचे प्रयाग हॉस्पिटल गाठले. डॉक्ट रांनी मला इसीजी काढल्यावर लगेच आयसीयु मध्ये दाखल व्हायला सांगितले. डार्क चॉकलेट मधल्या कॅफिनच्या अतिरिक्त (आणि अनियंत्रित) प्रमाणामुळे हा प्रसंग उद्भवला होता. आयसीयुत असताना मला माझी पत्रिका आठवली. योग्य ते उपचार लगेचच केल्याने माझी प्रकृती झपाट्याने सुधारली. दोन तासानी लगेचच आयसीयु मधून बाहेर आलो. दूसर्‍या दिवशी म्हणजे कालच डॉ. प्रयागांच्या राऊंड नंतर मला घरी जायला परवानगी मिळाली.

घरी आल्यावर लॅपटॉप चालू करून माझी पत्रिका उघडून बघितली तर मंगळ-शनी मध्यबिंदू गोचर भ्रमणाने माझ्या जन्मरविवर आला होता. एबर्टिन त्याच्या COSI मध्ये "मंगळ-शनी=रवि" या रचने बद्दल लिहितो - "Weak vitality, the inability to meet all demands or to master all situations,
the necessity to overcome illness.- The illness or the death of members of the male population."

मंगळवार, २७ डिसेंबर, २०११

ज्योतिष - एक आचरट इमेल

कालच मला कुलकर्णी नावाच्या एका व्यक्तीकडून एक आचरट इमेल आले आहे. त्यांची फुकट मार्गदर्शनाची अपेक्षा तर आहेच, पण स्पष्टपणे सांगूनही त्यांनी स्वत:ची जन्मतारीख, वेळ आणि स्थळ ही माहिती कळवलेली नाही. त्यानी पारंपारिक पत्रिका मला अटॅचमेंट म्हणून पाठवली आहे, जिचा मला काहीही उपयोग नाही. पारंपारिक पत्रिका सूक्ष्मच काय पण ढोबळ ज्योतिष बघण्यासाठी पण कुचकामाची असते (कारण ग्रह मांडायच्या पद्धतीमुळे बरीच दिशाभूल होते), हे यापूर्वी मी या ब्लॉगवर लिहीलेले आहे.

साडेसाती विषयी मार्गदर्शन करा अशी या कुलकर्णींची मागणी आहे. एबर्टीन पद्धतीमध्ये साडेसातीचे विश्लेषण करण्यासाठी, जन्मचंद्र आणि त्याच्या मागिल व पुढिल राशीत तयार झालेले ग्रहयोग व मध्यबिंदू तपासावे लागतात. हे ग्रहयोग व मध्यबिंदू प्रत्येक पत्रिके प्रमाणे बदलतात. म्हणून प्रत्येक पत्रिका साडेसातीच्या फलादेशासाठी स्वतंत्रपणे मांडावी लागते हे बिंदू गोचर शनीच्या भ्रमणाने जसे सक्रिय होतात, तसा साडेसातीच्या प्रभावाचा अंदाज बांधता येतो. याचे उदाहरण घेऊन इथे खुलासा करणे खुप किचकट असल्याने मला तसे करता येणार नाही. एव्हढे कष्ट त्यात असल्यामुळे मला हा सल्ला फुकट देता येत नाही.

त्यामुळे वृश्चिक राशीला साडेसाती कशी जाईल, हा प्रश्न आचरट ठरतो. त्याचे उत्तर माझ्याजवळ नाही. जे ज्योतिषी असे उत्तर देतात ते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात ज्योतिषाची अप्रतिष्ठा करण्याची कामगिरी बजावत असतात.

तेव्हा लोकहो, मोफत आणि आचरट प्रश्न विचारण्याचा मोह कृपया टाळा...

रविवार, २५ डिसेंबर, २०११

सन २०१२

माझ्या ब्लॉगच्या वाचकाना सन २०१२ साठी मन:पूर्वक शुभेच्छा!

सन २०१२ मंदीच्या तडाख्यात सापडणार आहे याचे आता वेगळे भाकीत करायची आवश्यकता उरलेली नाही. पण जरी हे मंदीचे वर्ष ठरणार असले तरी काही लोकाना ते नक्कीच तारून नेईल. मंदगती ग्रहांची म्हणजे गुरु, शनी, हर्षल, नेपच्युन व प्लुटो यांची भ्रमणे (*) या वर्षातील भ्रमणे ज्यांच्या पत्रिकेतील रवी, चंद्र, लग्न व ख-मध्य यांच्याशी जर युती अथवा नवपंचम योग करत असतील तर सन २०१२ कोणत्या ना कोणत्या पातळीवर लाभदायक ठरेल .

प्रथम आपण गुरुचे २०१२ भ्रमण पाहू या!

संधी देणारा हा ग्रह सन २०१२ मध्ये आपले भ्रमण सायन वृषभ रास ० अंश २४ मि पासून सुरु करतो आणि दिनांक ४ ऑक्टोबर १२ रोजी सायन मिथुन रास १६ अंश २२ मि वर वक्री होऊन वर्ष अखेरीस सायन मिथुन रास ७ अंश ५२ मि पर्यंत पोहोचतो. थोडक्यात सांगायचे तर सायन वृषभ रास ० अंश २४ मि ते सायन मिथुन रास १६ अंश २२ मि, सायन कन्यारास ० अंश २४ ते सायन तूळ रास १६ अंश २२ मि, सायन मकर रास ० अंश २४ मि ते सायन कुंभ रास १६ अंश २२ मि हे क्षेत्र गुरुच्या भ्रमणाने उजळून निघाले आहे. या क्षेत्रात जर जन्मपत्रिकेतील कोणताही ग्रह (विशेषत: रवी, चंद्र, लग्न व ख-मध्य असतील) आणि त्यांनी एक जरी नवपंचम अथवा लाभ योग केला असेल तर गोचर गुरुचे २०१२ मधील हे भ्रमण नक्की शुभ जाईल.

अमाप यशाचा कारक गुरु-प्लुटो मध्यबिंदू

सन २०१२ मध्ये गोचर गुरु-प्लुटोचा मध्यबिंदू सायन मीन रास ३ अंश ५० मि ते २६ अंश ४२ मि पर्यंत भ्रमण करतो. त्यामुळे जवळ पास संपूर्ण सायन मीन राशीला गोचर गुरु-प्लुटो मध्यबिंदूच्या भ्रमणाचा फायदा होणार आहे.सायन मीन राशीत ३ अंश ५० मि ते २६ अंश ४२ मि या क्षेत्रात जर रवी, चंद्र, लग्न व ख-मध्य असतील तर लाईफ जिंगा ला ला असेच म्हणावे लागेल.

(‍*)वरील नियमा बाबत एक खुलासा

गुरु वगळता गोचर शनी, हर्षल, नेपच्युन व प्लुटो यांचे युतीयोग हे सहसा उलथापालथ दाखवतात पण जन्मपत्रिकेतील इतर ग्रहांशी अंशात्मक किंवा ताकदवान नवपंचम अथवा लाभ योग होत असतील तर ते शुभ फलदायी ठरण्याची शक्यता जास्त असते.

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०११

पोरका

तेजाचा तो पुत्र पोरका
उन्मुक्तीच्या रचतो गाथा
त्या असूयेने असह्य होता
विव्हळते मग जग आता

मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

गुरूपदेश

काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी आयआयटीमध्ये माझ्या प्राध्यापकाना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला आय आय टी परिसराची एक चक्कर पुरेशी असते. त्या खेपेला मी, मला दिलेला शब्द पाळणा-या आणि मी दूखावला गेलो तेव्हा माझी क्षमा मागण्याचा मोठे पणा दाखवणा-या प्रा. अरूणकुमारांना पण भेटलो. त्यांना लेक्चरला जायचे असल्याने आमच्यात संक्षिप्त अंवाद झाला. तो एखाद्या झेन गुरु शिष्यातील संवादासारखा होता. तो असा...

"Rajeev, what are you doing these days? "- प्रा. अरूणकुमार

"Sir, I am working in a private software company as Project Manager." -मी

"What is the team size?" - प्रा. अरूणकुमार

"8-10 developers"-मी

"How long you have been with them?" - प्रा. अरूणकुमार

"Now almost 3 years." -मी

"Who is on your top?" - प्रा. अरूणकुमार

"Vice President and CMD!" -मी

"How many IITians are there in your organization?" - प्रा. अरूणकुमार

"Only two, sir! Me and my boss. " -मी

"Rajeev, you should seriously think of changing your job" - प्रा. अरूणकुमार

मला झेन शिष्याप्रमाणे तत्काळ निर्वाण प्राप्त झाले!

सोमवार, १२ सप्टेंबर, २०११

अभद्र ग्रह रचनेचा एक किस्सा (ज्योतिष)

ज्योतिषावर विश्वास न ठेवणारे अनेक लोक ज्योतिषाच्या प्रभावाखाली येतात तेव्हा ज्योतिषाबद्दल माझी श्रद्धा अधिकाधिक दृढ होत जाते. त्याचे असे झाले, की मी नुकतेच "गोचर मंगळ, शनी आणि नेपच्यून यांची अभद्र रचना" हे टिपण तयार करत असताना माझ्या गणितात या अभद्र रचनेच्या प्रभावाखालील दोन जन्म तारखानी माझे लक्ष वेधले. ५ ऑक्टोबर आणि ११ ऑक्टोबर या त्या दोन जन्मतारखा. पैकी १ली माझ्या नात्यातील एका स्त्रीची आहे आणि दूसरी माझा मित्र मनोज पदकी याची आहे. या दोनही जातकांचा ज्योतिषावर विश्वास अजिबात नाही. साहजिकच या दोघांच्या आयुष्यात "गोचर मंगळ, शनी आणि नेपच्यून यांची अभद्र रचना" काय प्रभाव टाकते याबद्दल मला मोठी उत्सूकता निर्माण झाली होती.

हे ब्लॉग (इंग्रजी मसूदा) टिपण तयार झाले आणि मी सवयीने फेसबुकवर नजर टाकली. विचित्र योगायोग असा की त्याचे पुढील प्रमाणे स्टेटस अपडेट वाचायला मिळाले - My mom's situation is going from bad to worse. She has been moved to a nearby hospital (in Pune, India). I am booking my plane ticket now...

साहजिकच पदक्या एकदोन दिवसात पुण्याला येऊन पोचला. मी त्याचा फोन आल्यावर त्याला (आणि त्याच्या आईला) हॉस्पीटल मध्ये भेटायला गेलो होतो. त्या दिवशी आईची एक सर्जरी होणार होती. मी गेलो त्या दिवशी तो खूप तणावाखाली दिसला. बर्‍याच गोष्टींची जुळवाजुळव करून एक दोन आठवड्यात परत जायची इच्छा त्याला होती. आईचे वय आणि त्यामुळे बदललेला स्वभाव यामुळे निर्माण झालेले गुंते त्याला लपवता येत नव्हते. मला मी लिहीलेल्या ब्लॉग-लेखाची आठवण झाली आणि मी त्याबद्दल त्याला सांगितले तेव्हा त्याला पण आश्चर्य लपवता आले नाही. त्याने मला विचारले की हा त्रासदायक कालावधी किती आहे. मला अचूक गणित करून उत्तर देता येणे शक्य नव्हते. मंदगती ग्रह या रचनेत अंतर्भूत असल्याने दिड-दोन महिने ही फेज टिकायला काहीच हरकत नव्हती. मी त्याला तशी कल्पना दिली. तो म्हणाला, "डॉक्टर तर म्हणतायत की जखम भरली की लगेच घरी सोडतील." मी म्हटले, "बाबा रे, ज्योतिष तर तसे सांगत नाही". काही वेळ हॉस्पीटल मध्ये बसून मी घरी आलो. दूसर्‍या दिवशी त्याचे खालील स्टेटस अपडेट वाचायला मिळाले - "There is a chance she will be out of ICU in a day or two and then to the general ward for a couple more days. I am lining up the rest of the support system once she gets home. It's lovely monsoon season out here, but I am too stressed to enjoy it..."

मला पण हे वाचून बरे वाटले. पण ज्योतिषामुळे तयार झालेली संशयाची पाल मनात चुकचुकत होतीच. दोन-चार दिवस गेले. पदक्याचा मोठा भाऊ चॅट करायला फेसबुक वर आला होता. आईचा विषय निघाला, तेव्हा त्याने धक्कादायक बातमी दिली, की आईला कॅन्सर डिटेक्ट झालाय. मी पण ते ऐकून हादरलो. कारण वरवर सोपी वाटणारी केस आता आणखी गुंतागुतीची बनली होती. त्यातून निर्माण होणारे प्रश्न मला दिसत होते. ज्योतिषाच्या प्रचितीने मी परत एकदा थक्क झालो.

या अनुभवाच्या संदर्भात काही जण शंका काढतील की मित्राच्या पत्रिकेत त्रास असताना आईला त्रास का व्हावा? याचे उत्तर असे आहे की, दोन पत्रिकेतील रवि-चंद्रादि व्यक्तीगत ग्रह आणि काही बिंदू एकमेकांशी connected असतील तर असे अनुभव हमखास येतात. माझ्या मित्राची आणि त्याच्या आईची सविस्तर पत्रिका मांडणे शक्य नाही कारण त्याना त्यांच्या वेळा माहिती नाहीत. पण केवळ जन्म रवीशी होणारे योग किती जोरदार अनुभवाला येतात हे कळण्यासाठी या लेखाचा प्रपंच...

टीप - वर उल्लेख केलेल्या दूसर्‍या जातकाचे याच कालावधीत गुडघ्याच्या प्रत्यारोपणाचे ऑपरेशन झाल्याचे कळले. जास्त तपशील कळलेला नाही.

रविवार, २८ ऑगस्ट, २०११

भाकीताचा पुन्हा पडताळा



मी २९ ऑगस्ट च्या अमावस्येबद्दल (अत्यंत शुभ असल्या बद्दल) जे भाकीत वर्तवले होते ते शब्दश: खरे ठरले. श्री अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला कधीही गालबोट लागू शकत होते, पण ते न लागता ते यशस्वी झाले. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीने सकारात्मक पावले उचलली. गुरु-प्लुटोचे शुभ योग "मास्सिव्ह सक्सेस" दर्शवतात हे आधुनिक ज्योतिषातले तत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

२९ ऑगस्ट ची "शुभ" अमावस्या



दिनांक २९ ऑगस्ट ची अमावस्या अत्यंत शुभ असून त्याविषयी माझ्या नवीन इग्रजी ब्लॉगवर मी नुकतेच लिहीले आहे. माझ्या इंग्रजी ब्लॉगचा पत्ता असा आहे - http://lunations-astrology.blogspot.com/

जगभरच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माझे ज्योतिषविषयक लेखन मी यापुढे इंग्रजीतून करायचे ठरवले आहे.

शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

निर्बुद्ध ज्योतिषनिंदक

मी माझे ज्योतिष विषयक लेखन माझ्या ब्लॉगबरोबरच मिसळपाव या समूहस्थळावर प्रसिद्ध करतो. या समूहस्थळावर अनेक ठिकाणी भेटतात तशी ज्योतिषाची निंदा करणारी मंडळी भेटतात. पण त्याची आता मला सवय झाली आहे. या लोकांपैकी काही जण मला वारंवार यंव आह्वान स्वीकारा आणि त्यंव आह्वान स्वीकारा असे सतत ऐकवत असतात. विज्ञानाची अंधपणे कास धरणे किती निर्बुद्धपणाचे ठरू शकते, याचा मला नुकताच प्रत्यय आला. ज्या विज्ञाननिष्ठानी हा अनुभव मला दिला त्यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो.

मी मिसळपाववर नूकतेच एक निवेदन केले होते. ते जसेच्या तसे पुढे देत आहे -
"एक निवेदन

मला मिसळपाव वर वारंवार आह्वाने देण्यात येतात आणि मी ती स्वीकारत नाही अशी पण तक्रार सारखी ऐकायला मिळते. म्हणून मी आह्वाने स्वीकारायचे ठरवले आहे. परंतु ते काही सुटसुटीत अटींच्या चौकटीत बसत असेल तरच...

- आह्वानकर्त्याना बर्‍याच वेळेस आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण अक्कल नसते असे लक्षात आले आहे. तेव्हा अशी आह्वाने एका स्वतंत्र समितीकडून तपासण्यात यावीत. या समितीत ज्योतिषी आणि ज्योतिषनिंदक यांचा समसमान सहभाग असावा. ही समिती आह्वानांची योग्यता ठरविण्यासाठी काही कसोट्या निश्चित करेल. अशा समितीने आहवान योग्य असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्यावरच ते आह्वान मी माझ्या अभ्यासाच्या कक्षेत येत असेल तर ते मी स्वीकारेन

- मी आह्वान स्वीकारल्यावर मला प्रत्येक जन्मतारखेसाठी रू, ५००/ (रु पाचशे) एवढे आह्वानशुल्क माझ्या बॅंकेत जमा करावेत. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.या शुल्कावर योग्य तो कर भरायची माझी तयारी आहे. समितीच्या सदस्यांच्या मानधनाची व्यवस्था आह्वानकर्त्याने करावी.

- दिलेल्या आह्वानातिल विदा संगणकावर जमा करण्याची व्यवस्था आह्वानकर्त्याने करायची आहे

- आह्वानांतर्गत विश्लेषणासाठी लागणारी सर्व गणनसाधने आह्वानकर्त्याने उपलब्ध करून द्यायची आहेत.

- समितीचे सर्व कामकाज उघड असावे. त्यांची इंटरनेटवरील एखाद्या ब्लॉगवर यथाकाल नोंद व्हावी, जेणे करून कोणती आह्वाने योग्य आहेत कोणती स्वीकारली गेली आहेत ते जनतेला समजेल.

या माझ्या मूलभूत अटी आहेत. गरज पडल्यास यांना पुरवणी-अटी जोड्ण्यात येतील."

------निवेदन समाप्त-------

यातल्या "आह्वानशुल्क" घेण्याबाबत माझी भूमिका अशी होती की कुणी शेंबड्या पोराने आह्वान देण्याचा उद्योग करू नये. दिलेले आह्वान पूर्ण गांभिर्याने दिलेले असावे. पण काही जणाना त्यात माझा पैसे कमवायचे असल्याचा स्वार्थ दिसला. "आह्वानशुल्क" घेण्याबाबत माझी दूसरी भूमिका अशी होती की , आह्वानातील जन्मतारखांची संख्या जर खूप असली ( खर्‍या आह्वानात ती असायला हवी) तर माझे डोकेफोड करण्याचे जे कष्ट होणार ते आह्वानातील जन्मतारखांच्या संख्येच्या प्रमाणात वाढणार. आणि मला त्याचा योग्य मोबदला हवाच. असो.

मिसळपावच्या काही सदस्यांनी मला आह्वान द्यायचे जोरदार प्रयत्न सुरु केले. पण ते हास्यास्पद होते कारण, जेमतेम २०-२५ पत्रिका गोळा होत होत्या. मला अपेक्षित असलेली तटस्थ समिती पण गठीत होईल असे दिसत नव्हते. अशा आह्वानांमधिल पोकळपणा उघड करण्यासाठी याच योग्य वेळेची मी वाट बघत होतो.

अशा आह्वानतून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही किंवा निघत नाही, हे लोकांच्या पुढे आणायचे होते. एक ज्योतिषी जिंकला किंवा हरला हे ज्योतिष(शास्त्रा/विद्ये) बद्दल कोणतीही विधाने करण्यास करण्यास पुरेसे नाही. विज्ञानाची कास धरणार्‍यांना विज्ञानाच्या चौकटीत बसणारे आह्वान तयार करता येत नाही हे यातून अधोरेखित झाले. मी पेनल्टीच्या दडपणा खाली काम करावे अशी अपेक्षा करण्या पर्यंत काही जणांची मजल गेली होती. चाचणी देणार्‍याने दडपणाखाली रहावे हे कोणत्या वैज्ञानिकतेला धरून आहे. आह्वाने देणारे ज्योतिषाच्या मर्यादांमध्ये त्यांचे आह्वान तयार करत नाहीत, हे कशाच द्योतक? प्रत्येक ज्योतिषी जे दावे करतात त्या दाव्याच्या अनुरोधानेच आह्वान देण्यात यायला हवं. हे दावे प्रत्येक ज्योतिषी जे तंत्र वापरतो त्या तंत्रानुसार बदलु शकतात. हाडाची ऑपरेशन्स करणार्‍या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का?

नारळीकर आणि त्यांच्या कंपूने केलेल्या प्रयोगाबाबत असेच म्हणता येईल.

ज्योतिषाचा उपयोग सर्वानाच होतो असं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीना ज्योतिष उपयुकत वाटते त्यांच्याच बाबतीत ज्योतिषांचे दावे तपासायला हवेत. जे ज्योतिषी मतिमंदत्वाबद्द्ल दावे करतात त्यांच्या पुरतीच ज्योतिषाची चाचणी मर्यादित राहणार. आलेले निष्कर्ष त्या दाव्यां पुरतेच मर्यादित राहणार. अशा ज्योतिष-सेन्सेटिव्ह लोकांच्या बाबतीत पत्रिकेच्या आधारे आणि पत्रिकेचा आधार न घेता भाकिते करण्यात यावित आणि येणारे निकाल तपासायला हवेत. आणि समजा अशी सर्वंकष चाचणी घेतली तरी त्यातून जो निष्कर्ष निघेल तो तपासल्या गेलेल्या प्रमेया/गृहितका पुरताच मर्यादित राहील. म्हणजे बहुसंख्य ज्योतिषी मतिमंद्त्वाबद्दल भाकित करण्यात जर फसले, तर एव्ह्ढेच म्हणता येइल की मतिमंदत्वाचे निदान पत्रिकेच्या आधारे करता येणार नाही.

या संदर्भात मिसळपाव वरच एक सदस्य विंग कंमांडर शशीकांत ओक यांनी आह्वानकर्त्यांना दिलेली प्रतिक्रिया (http://misalpav.com/node/18763#comment-329984) अतिशय बोलकी आहे. ते म्हणतात, "समजा, जर आव्हान प्रक्रियेत फक्त ३ कुंडल्या हाताळल्या गेल्या त्यातील कथने बंद पाकिटातून मिळालेल्या माहितीशी शत प्रतिशत अचुक जुळली तर तो डेटा किरकोळ होता आणखी मोठ्या संख्येत कसोटी घ्यावी लागेल, असे म्हणत म्हणत लाखोंच्या संख्येने बंद लिफाफे उघडून त्यातूनही अचुक माहिती उघडकीस आली तरी आणखी मोठा डाटा घेतल्याशिवाय खरी कसोटी होऊ शकत नाही असे म्हटले जाईल व शास्त्राची मान्यता देण्यास नकार दिला जाईल. या विपरीत जर पहित्या प्रथम फेरीतील किरकोळ संख्येच्या लिफाफ्यातील माहितीशी अचुकता साधली गेली नाही तर ज्योतिषाला काडीचा आधार नाही असे सिद्ध झालेले आहे असा निवाडा तात्काळ होईल. बरोबर ना...."

ज्याना ही संपूर्ण चर्चा वाचायची असेले त्यांच्यासाठी पुढे दूवे देत आहे
१. http://misalpav.com/node/18750
२. http://misalpav.com/node/18763
३. http://misalpav.com/node/18775

असो... आता आह्वान चाचणी इ विषय तूर्त मी माझ्यापूरते बाजूला ठेवले आहेत

जाता जाता: पुण्यात काल एका तरूणीने भरधाव गाडी चालवून एका तरूणाला चिरडले. पुण्यात अपघात रोज होत असले तरी असे (भरधाव (मंगळ-हर्षल) वाहनाखाली चिरड्ण्याचे) अपघात रोज होत नाहीत. म्हणून हा अपघात पौर्णिमेच्या अमलाखालीच येतो.