गुरुवार, ११ डिसेंबर, २००८

गोत्र

परवाच एका साखरपुड्याच्या समारंभाला जाण्याचा योग आला. तेव्हा लांब बसून
त्रयस्थपणे गुरुजी करवून घेत असलेले विधी पहात व ऐकत होतो. मी अमुक गोत्राचा
तमुक कुलोत्पन्न असा-असा संकल्प सोडतो या अर्थाची संस्कृत वाक्ये गुरुजी
उच्चारत होते. संपूर्ण विधीमध्ये या घोषणे पलिकडे गोत्राला काही स्थान नव्हते.
मग गोत्राशिवाय संकल्प करता येत नाही असे मानयचे का? तसं असेल तर ते कोणत्याही
विवेकी बुद्धीला पटणारे नाही. पण गोत्रामुळे या उपवर मुलाच्या लग्नात आलेल्या
अडचणी मी डोळ्यादेखत पाहिल्या होत्या. हजारो वर्षांपूर्वी आमच्या काही रानटी
ऋषिपूर्वजांचे (इतिहासाचार्य राजवड्यांचा शब्द्प्रयोग) आपापसात पटले नाही
म्हणून त्यांनी रोटी-बेटी व्यवहार टाळले. आणि म्हणूनच काही गोत्रे जुळत नाहीत
अशा समजुती प्रचारात आल्या. आजही खेड्यापाड्यात ज्या घराण्यांत वंशपरंपरागत
भांडणे असतात तिथे, तसेच काही वैमनस्य असणार्‍या काही पंथांमध्ये (उदा. शैव व
वैष्णव) रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत.

पण अजूनही वधूवरसूचक मंडळे वधूवरांच्या माहितीची रजिस्टरं तयार करताना
गोत्राच्या अनावश्यक माहितीची मागणी करतात. गोत्र आणि वंशशुद्धीच्या वेडगळ
कल्पना लोक अजूनही घट्ट्पणे उराशी बाळगतात तेव्हा गोत्र संकल्पनेतील पोकळपणा
सर्वांसमोर आणल्याशिवाय राहवत नाही.
गोत्र संकल्पनेतील काही मला उमगलेल्या त्रुटी अशा आहेत -
० गोत्रे कशी निर्माण झाली याचा अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. वेदांच्या
वेगवेगळ्या शाखांचे अध्ययन करणा‍रे ‍ गोत्रांचे जनक मानले जातात. पण
सूक्ते रचणार्‍या अनेक ऋषींना गोत्रे नाहीत. ते गोत्रांचे जनकही मानले जात
नाहीत.
० गोत्राना कायदेशीर मान्यता पण नाही. विवाह कायदेशीर ठरण्यास गोत्र अनिवार्य
नाही. फारच काय सगोत्र विवाहाला कायदेशीर मान्यता आहे.
० ब्राह्मणांची अनेक गोत्रे त्यांच्या उपशाखांमध्ये समान आहेत. उदा. अत्रि,
कश्यप, गार्ग्य, वत्स इत्यादि. आता जी गोत्रे समान आहेत त्यांचे वंशज एकाच
पिंडसूत्राचे (bloodlineचे) सदस्य मानले तर अत्रि (कर्‍हाडे) किंवा अत्रि
(चित्पावन) यांच्यात भेद कसा मानायचा? दूसर्‍या शब्दात असेही विचारता येईल की
हे अत्रि, कश्यप, गर्ग , वत्स वेगवेगळे ऋषि की एकच?
० याशिवाय बर्‍याच जणांची झोप उडेल अशा दोन मुद्दयांचा विचार मला करायचा आहे.
राजवाड्यांच्या भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या पुस्तकातले १लेच वाक्य वाचा.
राजवाडे म्हणतात, "मित्राला किंवा अतिथीला स्वस्त्री संभोगार्थ देण्याची चाल पुरातन कालापासून
पाणिनीच्या कालापर्यंत भारतीयांत होती.
अशा अतिथीसेवेतून जर संतती निर्माण झाली असेल
तर तिचे गोत्र कोणते? भारतामध्ये नियोगाची प्रथा अनेक वर्षे प्रचलित होती. नियोगात जेव्हा पतिकडून शक्य नसेल तेव्हा स्त्रीला हव्या त्या पुरूषाकडून संतती प्राप्त करून घेता येत असे. परवापरवा पर्यंत म्हणजे स्पर्मबॅंका, टेस्टट्युब बेबीचे तंत्रज्ञान अस्तित्वात येइपर्यत एखाद्या आध्यात्मिक गुरूच्या 'प्रसादाने' संतती प्राप्त झाल्याची उदाहरणे अधूनमधून ऐकू येत असत. ज्यांनी शबाना आझमी आणि श्रीराम लागू
यांचा Immaculate Conception हा चित्रपट बघितला आहे, त्यांना आध्यात्मिक गुरू कसा प्रसाद देत ते सहज लक्षात येईल. अशा प्रसादोद्भव संततीचे गोत्र कोणते? सध्याच्या काळात ज्यांना अपत्य नाही ते अनाथालयातून बालकाला दत्तक घेतात. अशा दत्तक बालकाचे गोत्र कोणते?

तात्पर्य, ज्या गोत्रांना आपण अजून घट्ट्पणे कवटाळले आहे ती संकल्पना किती
पोखरली गेली आहे हे आपल्या लक्षात येईल. असो...

४ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

I think Gotra is a genetical map of a race started by someone first, usually a saint. May be, I could be wrong. But this could be reason for not making a marriage between two whose Gotra is not matching.

Ofcourse, these are all my imaginations and its not necessory to have logical explanation about it ;)

आदिती म्हणाले...

राजीवजी तुमच्या मताशी सहमत.

मला वाटतं वधू-वर सूचक मंडळे जर गोत्राची माहिती मागतात, यात त्यांची काही चूक आहे असं मला वाटत नाही. त्यांना त्यांचा व्यवसाय चालवायचा असतो. मुळात आपल्या समाजातच गोत्राच्या कल्पनेची पाळंमुळं जर घट्ट रूजली असतील, तर वधू-वर सूचक मंडळं तरी काय करतील? ही मंडळं काही समाजप्रबोधन करणार नाहीत.

गोत्र माहित नसल्यास ’भारद्वाज’ हे गोत्र लावावे असाही सल्ला दिला जातो. तिथे तर मला तर वाटतं की स्वत:च्या कुलाविषयी फाजिल अहं बाळगणा-यांनीच गोत्र ही कल्पना समाजात रूजवून दिली असेल.

Bhushan Vishwanath म्हणाले...

Hi Rajeev,

What I find very amazing is the way terms like SaPinda(7 Generations), Samanodak (14 Generations) and SaGotra ( 21 Generations) are defined. Would be an interesting area to explore, and open doors unknown so far, and have leads that can connect some more scientific concepts, the way TriDosh have been connected to HLA typing by Dr Bhushan Patwardhan.

Harshada म्हणाले...

Agadi mazya manatale prashna mandalet tumhi...