सोमवार, ५ एप्रिल, २०१०

श्रीकृष्णाची चूक - कर्मयोगाची ऐशीतैशी

लोकहो

'श्रीकृष्णाची चूक' या माझ्या लेखावर धोंडोपतांची प्रतिक्रिया वाचली. जवळपास अशाच प्रतिक्रिया 'मिसळपाव'वर या लेखावर झालेल्या चर्चेत (http://misalpav.com/node/11675) व्यक्त झाल्या होत्या. काही जणांच्या प्रतिक्रिया मधून "देव चूकेलच कसा" असा सूर डोकावत होता. लोक दैवतांचे मानवीकरण पट्कन करतात. पण मानवीकरण झालेले देव मानवासारखेच चूकू शकतात हे स्वीकारायला ते तयार नसतात.

मला भगवद्गीता ज्यांनी शिकविली त्या टिमविमधल्या देसाईबाईनी गीतेविषयी एकदा एक महत्त्वाचे विधान केले होते. ते असे, गीतेमध्ये प्रश्नांची उत्तरे शोधणार्‍या प्रत्येकाला काही ना काही तरी मिळते. कारण गीतेतील विधाने अर्थनिष्पत्तीच्या दृष्टीने अतिशय लवचिक आहेत. हे तुम्हाला ठाउक असेलच. तेव्हा या लवचिकतेमुळे मी केलेल्या विधानांसंदर्भात गोंधळ होऊ नये म्हणून एक सर्वमान्य संदर्भ स्वीकारणे आवश्यक वाटते. मी हा संदर्भ म्हणून लोकमान्य टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ सुचवू इच्छितो.


"योग: कर्मसु कौशलम्" या दुसर्‍या अध्यायातील ५० व्या श्लोकाचा (ऍनी बेझण्ट आवृत्ती) संदर्भ काही जणांनी दिला. या वाक्याचा अर्थ आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचा विचार करुया. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यात पान क्र. ३५ वर "योग म्हणजे कर्मे करण्याची काही विशेष प्रकारची कुशलता, युक्ती, चतुराई अगर शैली" अशी व्याख्या गीतेनेच केली असल्याचे म्हटले आहे. ही विशेष प्रकारची कुशलता नक्की कोणती हे जाणून घेण्यासाठी त्याच अध्यायातील ४८ व्या श्लोकाचा दुसरा चरण - "सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते" - बघावा लागेल.

'सिद्धी असिद्धी यांचे ठायी समत्व बुद्धि' असाही योग शब्दाचा अर्थ दिल्याचे टिळक म्हणतात. तेव्हा "योगस्थ: कुरु कर्माणि" असा सल्ला देताना समत्व बुद्धीची कुशलता, युक्ती, चतुराई अगर शैली कर्मे करताना वापर असे श्रीकृष्णाला म्हणायचे आहे, यावर कुणाचे दुमत असू नये असे वाटते. यात एफिशियन्सीचा संबन्ध दूरान्वयाने नाही किंवा समत्व बुद्धीने एफिशियन्सी वाढते असेही सिद्ध होत नाही.

इथे मला निर्माण झालेली समस्या अशी की समत्व बुद्धीची "कुशलता, युक्ती, चतुराई अगर शैली" या फलसिद्धीसाठी/यशासाठी "आवश्यक आणि पुरेशा (नेसेसरी आणि सफिशियण्ट)" अटी आहेत का? मला याचे उत्तर नाही असे द्यावेसे वाटते. कारण पुढे १८ व्या अध्यायात "अधिष्टानं तथा कर्ता.." या श्लोकात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या पाच अटी श्रीकृष्णाने सांगितल्या आहेत. तेव्हा योगी होऊन कर्म करणे यशासाठी आवश्यक असेल पण तेव्हढे पुरेसे नक्की नाही.

याशिवाय मला गीतेविषयी आणखी एक विचार सतावत असतो. सश्रद्ध लोकांना त्यामुळे कदाचित धक्का बसेल. मला पडलेला प्रश्न असा - "कर्मण्येवाधिकारस्ते..." इ. गीतावचने किती गांभिर्याने घ्यायची? या वचनांचे उपयोजित क्षेत्र किती?

समजा एखाद्या विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेला बसायाचे आहे. त्यासाठी दोन ढोबळ कर्मे त्या व्यक्तीला करावी लागतील. १ले कर्म म्हणून परीक्षेची पूर्वतयारी करावी लागेल. २ रे कर्म म्हणून प्रत्यक्ष परीक्षा देणे हे होय. योगाची वर दिलेली व्याख्या -
'सिद्धी असिद्धी यांचे ठायी समत्व बुद्धि' - ही आपण जर स्वीकारली, तर परीक्षेसाठी लागणारी पूर्वतयारी पूर्ण होऊ शकेल का? निष्काम कर्माचे तत्व बारावीच्या परीक्षेच्या पूर्वतयारीला लागू पडेल का? माझ्यामते जोपर्यंत फलसिद्धी हे पूर्ण लक्ष्य बनत नाही तोपर्यंत परीक्षेची पूर्वतयारी होणारच नाही. "सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा..." हे तत्त्व बारावीच्या कोणत्याही विद्यार्थ्याला परवडणारे नाही.

आता वर जे २रे प्रत्यक्ष परीक्षा देण्याविषयी चे कर्म सांगितले, त्याचा विचार करू. समजा एखाद्या मुलाने वर्षभर नियमित, उत्तम अभ्यास आणि सराव केला आणि ऐन परीक्षेच्यावेळी जर त्याचे अवसान गळले तर त्याची तुलना अर्जुनाच्या भयगंडाशी करता येईल. तरीही "हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं..." या श्लोकातील विन-विन सिचुएशनचा लाभ पण बारावीच्या परीक्षार्थीना नसतो. कारण परीक्षेत यशस्वी झाला नाही तर तो स्वर्गात न जाता नरकात जाण्याची शक्यता जास्त असते. सांगायची गोष्ट अशी की निष्काम कर्मयोगाचे तत्त्व सर्व कर्माना सारखे लावता येईल असे नाही.

मला तरी निष्काम कर्माचा पुरस्कार हा निरर्थक वाटतो. श्रीकृष्णाने मॅच फिक्सींग अगोदरच केले होते. मी यांना अगोदरच मारले आहे, तू फक्त निमित्त हो (मया एव एते निहता: पूर्वमेव निमित्तमात्र भव सव्यसाचिन् भ. गी. ११.३३) असे म्हटल्यावर, योगी व्हा, फळाची आशा करू नका इत्यादि गप्पा ठीक आहेत.

१२ टिप्पण्या:

Padmanabh म्हणाले...

"सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते" हा श्लोक त्या लोकांसाठी आहे जे, ते कार्य सिद्ध होणार नाही ह्या भीतीने कार्यारंभ करत नाहीत. त्यामुळे तो श्लोक मला अभ्यास करूनही गुण मिळत नाहीत म्हणून अभ्यास न करणार्यांसाठी अगदी व्यवस्थित लागू होतो असे वाटते.जे लोक कर्मादरिद्री आहेत त्यांच्यासाठी म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
निष्काम कर्मा हे व्यापक कर्माच्या ठिकाणी अगदी सहज लागू होते असे वाटते.

शिरीष म्हणाले...

हा विषय गहन चर्चेचा आहे... आपण आपली मते मांडली ती मी वाचली आणि एवढेच सांगावेसे वाटले मित्रत्वाच्या भावनेने...

जेव्हा आपण एवढा मोठा निष्कर्ष काढू इच्छितो त्यावेळी प्रथम काही काळ मी स्वतः अधिक जाणत नाही ह्या समर्पणाच्या भावनेने त्यावर स्थिर राहिलात की स्वतः परमेश्वरच आपल्याला मार्गदर्शन करेल असा दृढ विश्वास बाळगा आणि पहा काय होते ते... प्रत्यक्ष अनुभूती घेतल्या शिवाय पुढे जाऊच नका. तुम्ही खूप अभ्यास केला असेल पण अखादी तरी ओवी अनुभवावी ह्या उक्तीप्रमाणे...

सर्व पडताळून मगच लिहीतोय... ही विनंती.

शिरीष म्हणाले...

बुद्धी निपुत्रिक आहे पण श्रद्धा पुत्रवती आहे हे पांडुरंग शास्त्रींचे विधानही जमल्यास चिंतनावे... हीच सदिच्छा

Atul Kumthekar म्हणाले...

just play the game. unask the questions. ultimately everyone has a geodesic to travel. no one can be true observor ! thats the fun part of all this game...

Atul Kumthekar म्हणाले...

also, nishkaam karma hae 'Ihik jeevanavishayi' naahi ase mala waatTe. Jevha aapan kholaat jaaun kaahi shikaycha prayatna karto - kharya vaignyanika-saarkha, tevha hae sarva niyam (mind nature interaction) laagu padtaat ase mala vaatTe. basically money agnostic world.

Atul Kumthekar म्हणाले...

but i must agree, u are much better than this mr Tambe.

Arun Joshi म्हणाले...

कृष्णाचे हे विधान शम्भर प्रकारे दुर्लक्षित केले जावू शकते. १. तो देव नव्हता अणि ज्याला दुर्लक्षित करता येइल असा साधा माणूस होता. २. फळावर "कधिही" अधिकार नसतो असे तो म्हणतो. एकतर नैतिक अधिकार मान्य करायला काही हरकत नाही. प्रत्यक्ष प्राप्तीची श्यक्यता १००% नाही म्हणणे ठिक आहे.कारण फळ मिळण्या अगोदर काहिही हो उन ते निसटू शकते. ३. हाच नियम कर्मण्ये वाधिकारस्ते ला पण लागू आहे. आपल्याला कर्म करायचा पण नीट अधिकार नाही.कारण कर्म करत असताना काहीही घडू शकते आणि ते करण्याची पण १००% खात्री देता येत नाही. ४. म्हणून ही विधाने अतिशय विसन्गत आहेत. त्यान्चा सामान्य्तह अर्थ काढू नये.

अनामित म्हणाले...

गीता हा अर्ज़ुन या वेदविद्येच्या ज़ाणकाराला दुसर्या वेदविद्येच्या ज़ाणकाराने केलेला उपदेश आहे. तेव्हा गीता वेदाना अनुसरूनच समज़ून घ्यावयास हवी. कर्तव्ये व कर्मात कोणत्याही सबबीवर कोणतीही कसूर करणे वेदाना मान्य नाही.

Unknown म्हणाले...

http://merc-chaosengine.blogspot.com/2010/10/asylum-journal-entry-5.html

Sachin म्हणाले...

Ya sandarbhat Dr. Anand Nadkarni yanche "Vishadyog" he pustak upayogi tharel.

Sachin म्हणाले...

फळाची अपेक्षा व फळाचा हट्ट या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. गीता फळाचा हट्ट सोडावयास सांगते फलहेतू नहि. फळाचा हट्ट आपल्याला result oriented बनवतो व मला हे फळ मिळालेच पाहिजे या विचाराने चिंता राग वाढतात. जर आपण तो हत्त सोडला तर आपण process oriented होतो व कामातील मजा घेऊ लागतो. परिणामी काम अधिक चांगले होते.
लोकमान्यांना आपल्या समाजाला कृतीप्रवण करण्यासाठी गीता महत्वाची वाटली यातच सगळे आले. तसेच त्यांचे सर्व जीवन हे गीतेच्या उपदेशाने प्रभावित होते. त्यांनी आपले काम उत्कृष्ठ केले. याचा अर्थ “कार्मान्येवाधीकारास्ये” या उपदेशात निश्चित अर्थ आहे.

कौसल्या सुप्रजा.... वगैरे वगैरे... म्हणाले...

योगछ कर्मसु कौशलम् ह्याचा आमच्या लेखी अर्थ कर्म करणाऱ्याला योग लाभतो किंवा योग म्हणजे गोष्टी जुळून येणे घडते...

बाकी श्रीकृष्णच अधिक - उणे करेल असा एक नैमित्तिक अंदाज...