सोमवार, २५ जानेवारी, २०२१

कृष्णाला माफ करा...

कृष्णाला माफ करा...

==============

आत्ताच तूनळीवर एक "प्रेरणादायी व्हिडीओ" बघितला. स्वप्ने बघून ती सत्यात उतरवण्यासाठी केलेल्या ढोर मेहनतीची ती एक कहाणी होती. स्वप्ने सत्यात आणायला कष्ट महत्त्वाचे आहेत, असा काहीसा संदेश या व्हिडीओमधून दिला गेला. कष्ट उपसले तर यश तुमचेच आहे, असे काहीसे तत्त्वज्ञान अशा त-हेच्या प्रेरणादायी कथनातून सतत दिले जाते.  पण यशामध्ये कष्टांशिवाय काही  महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. हे घटक भ० गी० मध्ये शेवटच्या अध्यायात एका श्लोकात आहेत. माझ्यामते आणि आधुनिक जनुकशास्त्राच्या संदर्भात हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. तो असा -

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्। विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।।१८.१४॥ 

अर्थ - योग्य जागा (पोषक वातावरण), प्रयत्न करणारा स्वत:, विविध साधने (रिसोर्सेस),  कष्ट आणि सर्वात शेवटी दैव किंवा नशीब हे यशासाठी आवश्यक घटक आहेत. 

आधुनिक जनुकशास्त्र तुमच्या क्षमता विकसित होण्यासाठी पोषक वातावरणाची, ताणमुक्त वातावरणाची गरज अधोरेखित करते. दूर्दैवाने भारतीय समाजाने, तसेच गीतेला डोक्यावर घेणा-या धर्मगुरूंनी या सर्वात महत्त्वाच्या श्लोकाला "फाट्यावर मारले" आहे.

अलिकडेच माझा आणि जनुकशास्त्राचा ब-यापैकी परिचय झाला. मला अजुनही खगोलशास्त्राऐवजी जनुकशास्त्र लोकाभिमुख झाले तर मानवाचे जास्त कल्याण होईल याची मला खात्री आहे. या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर मी यशाचे वरील लोकप्रिय तत्त्वज्ञान तपासले तेव्हा "कष्ट उपसले तर यश तुमचेच आहे"  हे धादांत खोटे आहे, असे लक्षात येते. 

कारण साधे आहे, 

अपार कष्ट = अपार ताण 

अपार ताण = वाढलेली कॉर्टीसॉल पातळी

वाढलेली कॉर्टीसॉल पातळी = जनुकीय आणि पेशीय बदल व त्यातून शारीरिक आणि मानसिक प्रकृतीची हानी   

शारीरिक आणि मानसिक प्रकृतीची हानी = अनारोग्य, वैफल्य इ० इ०

याला एक किंचित अपवाद आहे - तो म्हणजे अपार कष्टातून तुम्हाला जर आनंद मिळत असेल किंवा मेहनतीचा कैफ चढत असेल तर तुमचा संघर्ष थोडाफार सुलभ होतो.

अपार कष्ट करून धनुर्विद्या मिळवलेल्या एकलव्याला अंगठा गमवावा लागला, हे लक्षात ठेवा. हजार सूर्यांच्या तेजाची बरोबरी करणा-या कृष्णाचे जीवशास्त्राचे/जनुकशास्त्राचे ज्ञान शून्यच होतं! तेव्हा फळाची अपेक्षा ठेऊ नको म्हणून सांगणा-या कृष्णाला माफ करा...

शनिवार, १६ जानेवारी, २०२१

विश्वास


© राजीव उपाध्ये, 9 जाने० २०२१
...पण तरीही राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. त्याने ते प्रेत ओढून आपल्या खांद्यावर टाकले आणि स्मशानाचा रस्ता चालू लागला. तेव्हा प्रेतामधला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, "राजा तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतूक वाटते. तुझे श्रम हलके व्हावे म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो,
"फार पूर्वी दक्षिणेत महिलारोप्य नावाचे नगर होते. या नगरात अग्रसेन नावाचा एक धनाढ्य व्यापारी एका टोलेजंग हवेलीमध्ये राहात असे. अग्रसेनाचा व्यापार मोठा असल्याने घरात नोकरचाकरांचा राबता मोठ्या प्रमाणावर होता. लक्ष्मी प्रसन्न असली तरी अग्रसेनाच्या वागण्याबोलण्यात एकप्रकारची घमेंड आणि तुच्छता होती. यामुळे अनेकदा लोक दूखावले जायचे, पण त्याच्या वैभवामुळे त्याला कुणाची बोलायची हिम्मत होत नसे. अग्रसेनाला अनेक शौक होते. त्याने उत्तमोत्तम जातींचे श्वान पाळले होते. या श्वानांना तो वेगवेगळ्या करामती शिकवत असे. हा त्याचा आवडता छंदच बनला होता. अग्रसेनाचे श्वान त्याच्यावर जेव्हढे प्रेम करत असत, तितके त्याचे नोकर मात्र प्रेम करत नसत."
"अग्रसेनाच्या हवेलीबाहेर एक चिंचेचे झाड होते. त्या झाडावर अनेक पिशाच्चे वास्तव्याला होती. पिशाच्चे असूनही त्यांच्यात भांडणे होत नसत (कारण त्यांच्यात जातपात, धर्म, आदर्श नव्हते). त्यात तीक्ष्णदंत आणि लंबकर्ण नावाच्या दोन पिशाच्चांची घनिष्ट मैत्री होती. या दोन्ही पिशाच्चांचे अग्रसेनाच्या हवेलीत चालणा-या घडामोडींचे निरीक्षण करण्याचा परिपाठ असे.
असेच एकदा तीक्ष्णदंत आणि लंबकर्ण ही पिशाच्चे अग्रसेनाच्या हवेलीचे निरीक्षण करीत बसली होती. तेव्हा अग्रसेन आपल्या नोकरांबरोबर श्वानक्रीडेमध्ये रममाण झाला असताना, एका नोकराकडून श्वानाला अंघोळ घालताना काहीतरी क्षुल्लक चूक झाली आणि अग्रसेनाच्या आवडत्या श्वानाला इजा झाली. अग्रसेनाला कोप अनावर झाला आणि त्याने नोकराला ताबडतोब कामावरून काढून टाकले. रागावलेल्या नोकराने मग एक दिवस सूड घेण्यासाठी अग्रसेनाच्या श्वानशाळेला आग लावली आणि त्यात अग्रसेनाने वाढवलेले अनेक लाडके श्वान जळून मेले."
"या घटनांनी तीक्ष्णदंत आणि लंबकर्ण गोंधळून गेले. तीक्ष्णदंत म्हणाला, "मला मनुष्यप्राण्याच्या स्वभावाचे कायम कोडे पडले आहे. हा अग्रसेन कुत्र्यांनी करामत करून दाखवली की त्यांना दरवेळी बक्षिस देतो. त्यांना आंजारतो गोंजारतो, पण नोकरांना मात्र प्रत्येक चुकीला शिक्षा करतो. माणसे माणसांच्या चुकांना जेव्हढ्या शिक्षा करतात, तितक्या प्रमाणात शाबासकी देताना दिसत नाहीत".
लंबकर्णाकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. शेवटी बराच वेळ झाला तेव्हा दोन्ही पिशाच्चे आपापल्या फांद्यावर झोपण्यासाठी गेली."
येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "विक्रमादित्या तू पराक्रमी आणि लोकप्रिय राजा आहेस. तुझ्याकडे पण नोकरचाकर खूप आहेत. तू तुझ्या नोकराला अशा चुकीबद्दल कामावरून काढले असतेस का? या प्रश्नाचे ठाऊक असून दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील."
यावर विक्रमादित्याने आपले मौन सोडले आणि तो म्हणाला, "सृष्टीच्या निर्मात्याकडून मनुष्यप्राणी घडवताना अनेक विसंगती निर्माण केल्या गेल्या. मनुष्येतर प्राणी गरजा पूर्ण झाल्या की शांत होतात आणि जीवाला धोका असेल तरच अंगावर येतात. एरव्ही त्यांच्या सारखा निष्ठावंत सापडणे कठीण. अग्रसेनाने कुत्र्यांना त्यांच्या प्रत्येक करामतीला बक्षिस देऊन आणि गरजा पूर्ण करून त्यांचा विश्वास संपादन केला होता. पण नोकरांना मात्र हिडीसफिडीस करायचा. एकमेकांचा विश्वास संपादण्याचे महत्त्व जेव्हा माणसाला कळेल तेव्हा मनुष्यप्राणी ख-या अर्थाने सुखी होईल. कुणाचा विश्वास संकट काळात मदत केल्याने निर्माण होतो, तर कुणाचा विश्वास व्यवहारातल्या पारदर्शकतेने निर्माण होतो. कुणाला कशाचे महत्त्व वाटते, हे ओळखणे फार महत्त्वाचे...
विक्रमादित्याच्या या उत्तराने वेताळ खूश झाला पण त्याचा मौनभंग झाल्याने पुन्हा झाडावर जाऊन प्रेतासह लोंबकळू लागला.