शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

कै० अरविंद इनामदार





मी संगणक संगीतावर काम करत होतो, तेव्हा माझा प्रकल्प एक "पर्यटकांचे आकर्षण" ठरला होता. आमच्या संस्थेला भेट देणा-यांना जे प्रकल्प हमखास दाखवले जायचे त्यात माझे संगणकीय संगीताचे काम नक्की दाखवले जायचे. आज काही श्रेयलंपट बराच गैरप्रचार करतात (आणि उघडे पडतात) पण तो भाग वेगळा...

त्या सुमारास कै० अरविंद इनामदार पुण्यात (राज्याचे?) गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून बदलून आले होते. माझे तेव्हाचे वरीष्ठ इनामदारांचे महाविद्यालयीन मित्र असल्याने त्यांनी इनामदारांना संस्थेत आणलेच.
गुप्तचर संचालक असल्याने तेव्हा कै० अरविंद इनामदार सगळीकडे मोठा जामानिमा घेऊन फिरत असत. माझा प्रकल्प बघायला आले तेव्हा जवळजवळ १०-१५ पोलिस अधिका-यांचा थवा कै० इनामदार यांच्या बरोबर होता.

प्रकल्पाचे सादरीकरण सुरु करायच्या आधी मी एक खुर्ची कै० इनामदारांसाठी आणली आणि त्यांना बसायची विनंति केली. माझ्या टेबलजवळ फार गर्दी झाली की सर्वांना संगणक नीट दिसत नसे. बाकीच्यांना नीट दिसावे म्हणून मी पण माझ्या साठी एक खुर्ची ओढली आणि बसून सादरीकरण सुरु केले.

एक पोरगेलासा संशोधक सर्व मातब्बर अधिका-यांसमोर बसून सादरीकरण करतो, हे पोलिस यंत्रणेत उभी हयात घालवलेल्या त्या अधिका-यांना पचवणे कठीण गेले आणि घसे खाकरून, नेत्रपल्लवी करून मला तसे सुचवले गेले. पण उभे राहून सादरीकरण तेव्हा शहाणपणाचे नसल्याने मी तसेच बसून पुढे चालु ठेवले.

मी कै० अरविंद इनामदारांना "संगणकाला उमजलेला" जौनपुरी दाखवत असताना त्यांनी एक आक्षेप घेतला. जौनपुरीचे चलन असे नसते म्हणून त्यांनी एक सुरावट घेऊन दाखवली. मी थंडगार पडलो. पण दुस-या क्षणी मी त्यांना प्रतिप्रश्न केला की "आपण १० गवयांना जौनपुरीचे चलन विचारुया. ते एकच चलन सांगतील याची खात्री काय?" माझा प्रतिप्रश्न कै० अरविंद इनामदारांना आणि त्यांच्या बरोबर आलेल्या थव्याला अनपेक्षित धक्का होता. यातले तात्पर्य असे की एखादी गोष्ट चूक ठरवायच्या अगोदर बरोबर काय हे निश्चित पणे सांगता आले पाहिजे. माझा मुद्दा कै० अरविंद इनामदारांना पटला असावा. पण त्यानंतर आमची प्रश्नोत्तरे रंगली आणि मला शुभेच्छा देऊन ते गेले.

नंतर कै० अरविंद इनामदारांची आणि माझी विद्यापीठाच्या आवारात अर्धा-डझनवेळा तरी गाठ पडली असेल. ते मला हसत सॅल्युट करायचे. त्यामुळे मला किंचित ओशाळायला पण व्हायचे.

पुढे ते राज्याचे पोलिस महासंचालक झाले आणि त्यांच्या विद्यापीठातल्या फे-या थांबल्या. मी त्यांची भेट विसरून गेलो.

पुढे अनेक दिवसांनी मी मुंबईला दख्खनच्या राणीने जात होतो. धारागृहाला भेट द्यायला मी जात असताना खिडकीत बसलेल्या एका व्यक्तीने मला जागेवरूनच हसून सॅल्युट केला. क्षणभर गोंधळलो. मी फक्त जुजबी हसून प्रतिसाद दिला.
मग व्हि० टी० स्टेशन आले. उतरल्यावर सशस्त्र पोलिसांच्या गराड्यात एक व्यक्ती गेटच्या दिशेने जाउ लागली. मी किंचित उत्सुकतेने पुढे जाऊन पाहिले तेव्हा डब्यामध्ये मला सॅल्युट करणारे ते कै० अरविंद इनामदार असल्याचे लक्षात आले आणि अंगावर शहारे आले. कुणाचा विश्वास बसो अथवा न बसो, त्यांची नजर बाजुला वळली आणि आमची परत नजरभेट झाली, आणि परत त्यांनी मान किंचित वाकवून माझ्याकडे बघत स्मित केले. यावेळेला मात्र मी तात्काळ झुकुन आणि हात जोडून त्यांना नमस्कार केला.
एक मोठा आणि साधा माणूस!

गुरुवार, १८ जुलै, २०१९

अनुलोम-विलोमविषयी थोडसे...



अनुलोम-विलोमविषयी थोडसे...
===============
-- राजीव उपाध्ये

डॉ० दीक्षितांबरोबर प्राणायामावरील लेखमाला लिहून झाली त्याला आता वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. आमच्या लेखमालेत प्राणायामातील टरफले (गूढता) काढून टाकल्याने हा सगळा उद्योग अनेकांना रुचला नाही किंवा डोक्यावरून तरी गेला (त्यामुळे लोकांना शहाणे करायचा माझा उत्साह पण संपला). पण या विषयाचे माझे कुतूहल पूर्वी इतकेच जागे असून स्वत:चे प्रयोग आणि ताज्या संशोधनाचा वेध घेणे माझ्या कुवतीनुसार चालुच आहे. या सगळ्या उपद्व्यापाचा महत्त्वाचा निष्कर्ष असा की प्राणायाम होण्यासाठी श्वसन जाणीवपूर्वक, एकाग्र आणि संथपणे होणेपणे आवश्यक आहे. यात "जाणीवपूर्वक" हे शब्द उपाग्रखण्ड (Prefrontal lobe) आणि "संथपणे" हे शब्द परानुकम्पी नाडीसंस्थेशी (para sympathetic nervous system) निगडीत आहेत. ज्यांना शरीरातील या दोन घटकांचे कार्य समजणार नाही त्यांना प्राणायाम कशी जादू करतो, हे कधीही कळणार नाही आणि प्राणायामाचा फायदा पण मिळवता येणार नाही. (अशा व्यक्ती प्राणायामाची कुचेष्टा करण्यात सहसा पुढे असतात. त्यांनी प्राणायामाच्या वाटेला जाऊ नये, अशी माझी स्पष्ट सूचना आहे.)
वरील लेखमाला लिहीताना मी केवळ स्वत:पाशी माझ्यापुरते काही अंदाज बांधले होते - त्यातला एक महत्त्वाचा असा, की एकच प्राणायाम पद्धत सर्वांना सारखीच उपयोगी पडेल असे नाही. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीला योग्य अशी जास्तीत उपयोगी पडणारी पद्धत शोधता येणे आवश्यक आहे. त्यात पुन्हा ही पद्धत वस्तुनिष्ठपणे निवडता आली पाहीजे. मी बांधलेले अंदाज तपासण्यासाठी जे आवश्यक संशोधन करायला हवे ते अनेक कारणांनी मला सध्या शक्य नाही, या जाणीवेने अस्वस्थ असताना काही महत्त्वाचे दूवे हाती लागले आणि माझे अंदाज बरोबर ठरल्याचा आनंद झाला.
मी प्राणायामाच्या तंत्रात अनेक प्रयोग केले आणि काही पारंपरिक तंत्रे पण तपासली. या सर्व वेगवेगळ्या तंत्राची परिणामकारकता सारखी नाही. तसेच त्यात वेगवेगळे धोकेही आहेत. तरीही मला डॉ. दीक्षितांचे तंत्र आणि पारंपरिक अनुलोम-विलोम जास्त लाभदायक ठरत असल्याचे लक्षात आले. डॉ. दीक्षितांच्या तंत्राने मला रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो आणि हुकुमी झोप मिळवता येते ( मी घेत असलेल्या एका औषधाचा डोस (melatonin) आता शून्यावर आला आहे, तसेच सध्या कित्येक महिने रक्तदाबा्च्या औषधाचा डोस नगण्य आहे.)
अलिकडे मी पारंपरिक अनुलोम-विलोमची परिणामकारकता कशात असावी याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. योगतज्ञ यावर प्रकाश टाकताना काही वादग्रस्त कल्पनांचा आधार घेतात - चंद्र नाडी, सूर्य नाडी, वेगवेगळी चक्रे इ०
पण मला वर केलेल्या व्याख्येच्या चौकटीतच हे उत्तर सापडले. ते असे - दोन्ही नाकपुड्या मोकळ्या असताना फुप्फुसातील हवा बाहेर पट्‍कन टाकली जाते. त्यामुळे दोन्ही नाकपुड्यांनी संथपणे श्वसन थोडे अवघड बनते. एका नाकपुडीने श्वसन करताना हवा आत घेण्यास किंवा बाहेर टाकण्यास साहजिकच जास्त वेळ लागतो आणि ते आपोआप दीर्घ आणि संथ बनते. नाकपुड्या बदलण्याने कोणतेही चंद्र-सूर्य उगवत नसून, त्या क्रियेवर एकाग्रता झाल्याने उपाग्रखण्डाचे अधिपत्य श्वसनावर निर्माण होते. श्वसनाची गती संथ झाल्याने परानुकम्पी नाडीसंस्थेची हितकारक कार्ये चालु होतात.
यात आणखी महत्त्वाचा भाग असा की श्वसनाची गती नेमकी किती असावी याचे उत्तरही आधुनिक विज्ञानच आता देते. ही गती खुप कमी झाली तर परानुकम्पी नाडीसंस्था अति-उत्तेजित होऊन भ्रम, वेड किंवा मृत्यु उद्भभवू शकतो.
मी अलिकडेच https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5575449/ या दुव्या वरील ताजे संशोधन वाचले. यात resonance breathing frequency ची कल्पना मांडली आहे. त्यात मिनिटाला सहा श्वास ही सरासरी resonance breathing frequency असल्याचे म्हटले आहे. व्यक्तीच्या शरीररचनेनुसार ही frequency बदलु शकते. एका मिनिटाला सहा वेळा श्वास घेतल्याने हृदतगतीची लवचिकता (heart rate variability) प्राप्त होऊन परानुकम्पी नाडीसंस्थेला योग्य तेव्हढीच चालना मिळते. मी अनुलोम-विलोम करतो तेव्हा अंत:श्वसन-अंतर्कुंभक (२-३ सेकंद) - बहिर्श्वसन हे एक चक्र १० सेकंदात पूर्ण होते म्ह० आपोआपच मिनिटाला सहा श्वास ही गती निर्माण होते. मला अनुलोम-विलोम लाभदायक का ठरतो याचे उत्तर अखेर सापडले.
लोक हो, कुचेष्टा थांबवा, आणि प्राणायामाकडे डोळसपणे बघा...

सोमवार, १५ जुलै, २०१९

परंपरेशी ऐशीतैशी



समाजाच्या ब-याचशा धारणा अतार्किक असतात. अशा अतार्किक धारणांचे ओझे मानवी समूह कशासाठी निर्माण करतात, का बाळगतात?

विशिष्ट चिन्हांशी एकनिष्ठतेची अपेक्षा ही अशीच एक अपेक्षा...

समजा अ आणि ब हे दोन भिन्न समूह आहेत. त्यांच्या भिन्न परंपरा आहेत. अ हा समूह उभे गंध लावतो आणि ब हा समूह आडवे गंध लावतो. आणखी वेगळे उदा० घ्यायचे झाले तर एक घराणे पंचमात तानपुरा लावते तर दूसरे घराणे निषादात तानपुरा लावते.

दोन्ही समूहांची आपापल्या परंपरांवर ठाम निष्ठा आहे कारण ज्या अर्थी परंपरा टिकलेली आहे त्या अर्थी त्यात निश्चितच "काहीतरी अर्थ असला पाहिजे" ही धारणा त्यामागे आहे.

मग कधीतरी अ या समूहातल्या व्यक्तीची ब या समूहाची गाठ पडते.  उभ्या गंधवाल्यावर आडव्या गंधवाल्याची छाप पडते. मग ती व्यक्ती आडवे गंध लावायचे धाडस करते आणि परंपरा मोडल्याबद्दल टीकेचा धनी बनते (आजच्या जमान्यात ट्रोलींग). 

वास्तविक उभे गंध आणि आडवे गंध या दोन्ही परंपरा आहेत आणि त्या पूर्णपणे नॉर्मल असल्याने एकाने दूस-याचे अनुकरण करणे हे असाधारण कसे ठरते?  कदाचित उभे किंवा आडवे गंध न लावता तिरके गंध लावले किंवा अजिबातच लावले नाही तर ते एकवेळ परंपरा मोडण्याचे निमित्त होऊ शकेल.

पण तरीही व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर न करणारा समूह कितपत पुढारलेला मानायचा? हा प्रश्न उरतोच...

बुधवार, १२ जून, २०१९

"फार काय"



"फार काय"
=======

कुत्र्यांसाठी कपडे आले.
फार काय,
बो, टाय, टीशर्ट घालुन
बड्डे पार्टीसाठी श्वान सजले.


कुत्र्यांसाठी न्हावी आले,
तसेच ॲण्ड्रोईड गेम्स आले.
फार काय,
"जुजबी" प्रियराधनासाठी
पेट्स-पार्क्स आले.

कुत्री कोडी सोडवु लागली
बेरजा वजाबाक्या करू लागली
मालकाला खूश करण्यासाठी
I love you सुद्धा म्हणु लागली.
फार काय,
सुंदर मालकीणीशी संभोगाचा
आनंद पण लुटु लागली!

एव्हढे सगळे होऊनही
खांब आल्यावर तंगडी
वर होणे थांबले नाही.
फार काय,
कुत्र्याचा माणुस
इतक्यात काही होणे नाही!

-राजीव उपाध्ये

रविवार, २१ एप्रिल, २०१९

सल्ला







कालच्या म्हणजे शनिवारच्या म०टा० मध्ये एका वकीलीण बाईंचे सदर असते. त्या वेगवेगळ्या समस्यांवर "मार्गदर्शन" करीत असतात.


काल एका केस मध्ये मुलीने फक्त १२ दिवस संसार केला आणि नंतर मुलीकडच्यांनी जो त्रास दिला त्याचा पाढा आहे. मुलाला घटस्फोट हवा आहे अन तो पण पोटगीशिवाय. माझ्यामते जरी एकच बाजू पुढे असली तरी मुलाची अपेक्षा स्वाभाविक आहे.


पण वकीलीण बाईंचा सल्ला वाचून धक्का बसला. त्यांचा सल्ला असा आहे की पोटगी टाळण्यापेक्षा "कायदेशीर" मार्गाने त्यातून बाहेर पडावे...


वास्तविक अशा केस मध्ये बायकांनी पोटगीची भिक मागू नये अशी वकीलीणबाईंची भूमिका असायला हवी. पण वकील हे सर्वात नीच आणि हलकट असतात कारण अशीलांना झुंजवल्याशिवाय त्यांची पोटे भरत नाहीत.


या केसमधला या बाईंचा सल्ला वाचून दू:ख झाले...

मंगळवार, ९ एप्रिल, २०१९

घटना आणि अर्थ



व्यक्तीगत आयुष्यातील असो अथवा सार्वजनिक आयुष्यातील असो, एखादी घटना घडते तेव्हा तिला एक कारणपरंपरा असते. अनेक घटकांनी त्यात आपापली भर घातलेली असते. घटना घडून गेल्यावर जसाजसा काळ लोटायला लागतो तेव्हा त्या घटनेची कारणपरंपरा विरळ अथवा धूसर बनत जाते. या सर्व कारणपरंपरेतील सर्व टप्पे कधीच नोंदले जात नाहीत (भावनिक संदर्भ तर कधीच नाही) आणि मग ते वस्तुनिष्ठतेचे कातडे पांघरलेल्या (सहसा संवेदनाशून्य) चिकित्सकांच्या पथ्यावर पडते. असे चिकित्सक मग उपलब्ध पुरावे त्यांच्या मर्जीप्रमाणे जोडतात आणि हाच खरा इतिहास म्हणुन आपल्या घशात कोंबतात. मग स्वातंत्र्यासाठी जिवावर उदार झालेला एखादा देशभक्त नक्षलवादी ठरतो, तर एखाद्याला माफीवीर म्हणून त्याच्यावर बोळा फिरवला जातो...


घटना घडुन गेल्यावर जसा अधिकाधिक काळ लोटत जातो तसे त्या घटनेचे हवे ते अर्थ लावणे सोईचे जाते. तात्कालीन मूल्यांचा/धारणांचा या अर्थ लावण्यावर कळत नकळत परिणाम झालेला असतोच.

आधुनिक इतिहासकारांचे इतिहास ’अन्वयन’ (interpretation) आणि लेखन किती गांभीर्याने घ्यायचे हा माझ्यापुढे कायम न सुटलेला प्रश्न आहे.

रविवार, ३१ मार्च, २०१९

ओळख



रोज संध्याकाळी
नगरप्रदक्षिणेला निघतो
तेव्हा अनेक
आजोबा भेटतात.

काहींच्या मूकओळखी होतात.
काही आजोबा परत दिसले की हसतात
काही खिन्नपणे तर
काही निर्विकारपणे निघून जातात.
तरी पण ती ओळख असतेच...

बरेच महिने एक आजोबा दिसले नाहीत.
त्यांची आठवण झाली की
मन कावरे-बावरे व्हायचे
तसे ते माझ्याशी एकदाच बोलले...
तेव्हा त्यांनी मी सायकल चालवणे
का बंद केले म्हणून जाब विचारला
त्यांची मला खूप गंमत वाटली होती...
नंतर कित्येक महिने दिसले नाहीत
म्हणून बेचैन झालो.

आज ते अचानक दिसले
इतकंच नाही तर
त्यांनी लांबुन हसून हात केला ...

किती बरे वाटले म्हणुन सांगू! 

मंगळवार, १२ मार्च, २०१९

प्राण्यांचे मानवीकरण



मी गेले काही दिवस fbवर पाळीव प्राण्यांविषय़ीचे व्हिडीओज नियमित बघतोय. हे व्हिडीओ घरात पाळलेल्या वाघसिंहापासुन ते अजगर आणि वेगवेगळ्या पक्ष्यांपर्यंत आहेत. कुत्रा या पूर्ण रेंजचा मध्यबिंदू आहे.


हे व्हिडीओज बघताना प्राण्यांचे मानवीकरण किती वेगाने होते आहे, हे बघून मन अचंबित होते. घरातल्या लहान बाळांची काळजी घेणारी, त्यांचे पांघरूण सारखे करणारी, आजारी माणसांची काळजी घेणारी कुत्री, सोप्या बेरजा वजाबाक्या करणारी, नृत्य करणारी, इतकंच नव्हे तर गाणारी कुत्री बघून अचंबित व्हायला होते.


पाळीव प्राण्यांमध्ये वाढत असलेली ही मानव-सदृश वर्तन आणि बुद्धीमत्ता बघुन काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात आणि पटतात


- आपली बुद्धीमत्ता जनुकांमध्ये असते. जनुकांचे व्यक्त होणे आजुबाजुच्या वातावरणावर अवलंबून असते. (नुकत्याच एका हायकोर्टाच्या निकालात या वास्तवाची दखल घेतली आहे).

- सुरक्षा, पोषण आणि चैतन्य (stimulation) ज्या वातावरणात मिळते तिथे बौद्धिक विकास झपाट्याने होतो आणि तिथेच निष्ठा, आपलेपणा निर्माण होतात

शुक्रवार, १ मार्च, २०१९

यमक



मधुमेही
मेंदूतून
झिरपलेली,
यमके
हुकल्यावर,


हुंगतात
उकीरडे
फेसबुकवर

मुग्धवांझोटी!


-- -राजीव उपाध्ये