रविवार, ३० नोव्हेंबर, २००८

सुसंस्कृत भारतीय

मला कधि कधि स्वत:ला भारतीय म्हणवून घ्यायची लाज वाटते. तुम्हाला नक्कीच
प्रश्न पडेल की हा असा का बोलतो आहे.

मी पुण्यात जीथे राहतो तिथे जवळच ३-४ मंगल कार्यालये आहेत. मी हा मजकूर लिहीत
असताना रस्त्यावर एका लग्नाची एक वरात वाजत गाजत चालली आहे. अधूनमधून
फटाक्यांचे मोठे सर लावले जात आहेत. कुण्या धनदांडग्याच्या घरचा हा विवाह सोहळा
असावा. जणू काही घडलेच नाही असा माहोल आहे. शहाण्या लोकांना मला काय म्हणायचे
ते आता कळले असावे.

देशावर एवढे मोठे संकट कोसळले. प्राणहानी, वित्तहानी झाली त्याचे यत्किंचितही
दू:ख या मिरवणूकीतल्या लोकांना नाही. कदाचित दहशतवादी मारले गेले याचा आनंद या
वर्‍हाडीना झालेला असावा. पण या निर्बुद्ध लोकाना हे कळत नाही की दहशतवादी
मारले म्हणजे दहशतवाद मारला गेला असे नाही.

लग्नसमारंभ स्थगित करणे शक्य नाही हे समजू शकते पण तो साधेपणाने साजरा करण्याची
बुद्धी या लोकांना हिदूंच्या तेहतीस कोटी देवांपैकी एकाही देवाने दिली नाही हे
दूर्दैव.

काही वर्षापूर्वी दिवाळीत कोकणात गेलो होतो. मी ज्या कुटुम्बात उतरलो होतो त्या
कुटुम्बात दिवाळीची कोणतीही धामधूम नव्हती म्हणून मी आडून चवकशी केली. तेव्हा
असे कळले की नुकतेच शेजारच्या घरातल्या कर्त्या व्यक्तीचे अचानक निधन झालेले
होते. खेड्यातल्या अडाणी लोकांकडे जी संवेदनशीलता दिसली ती सुसंस्कृत
म्हणवणार्‍या भारतीय समाजात नक्कीच नाही. तसं असतं तर निदान १३ दिवस तरी
रस्त्यावर लग्नाच्या वाजतगाजत मिरवणूका या देशात निघणार नाहीत.

बुधवार, २६ नोव्हेंबर, २००८

जुनी दारू आणि नवी बाटली...

ज्योतिष शास्त्र आहे की नाही यावर वाद घालून धूळ उड्वत बसण्यापेक्षा ज्योतिष
उपयुक्त आहे की नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. उपयुक्ततता सिद्ध होण्यास
शास्त्रीयत्वाच्या कसोटीची गरज नाही, फक्त अनुभव पुरेसा आहे. मागे एकदा आय आय
टी मधल्या प्राध्यापक जोगांनी लोकसत्तेमधल्या एका लेखाचा संदर्भ दिला होता.
लेखकाचे नाव आठवत नाही, पण त्यातील शेवटचे वाक्य माझ्या लक्षात राहिले आहे. ते
असे, "विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही". ज्यांना या विधानातील विदारक
सत्य पटेल, त्यांनाच ज्योतिषाची उपयुक्ततता पटेल. विज्ञानाने भले कितीही
प्रगती केलेली असो माझ्या जीवनातील अनिश्चितता झेलण्यास ते जितके उपयोगी पडेल,
तितकेच माझ्या जीवनात विज्ञानाचे महत्त्व असेल. माझ्या देशाने पूर्वी महासंगणक
तयार केला आणि आता चंद्र काबीज केला, पण त्याचा माझ्या घराच्या जवळ बसणारा
चांभार, चहाची टपरीवाला यांच्या रोजच्या जीवनक्रमात कसलाही बदल घडला नाही आणि
नजिकच्या भविष्यकाळात तसा बदल घडेल असेही नाही. म्हणून ज्या प्रगतीचा
एखाद्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काही उपयोग नाही, ती त्याला असून नसल्या
सारखीच...किं तया क्रियते धेन्वा या न सूते न दूग्धदा (जी गाय प्रसवत नाही आणि
दूधपण देत नाही त्या गायीचा उपयोग काय)?

तात्पर्य, ज्या विज्ञाननिष्ठेचा, बुद्धिवादाचा फारसा उपयोग नाही त्याची कास
सरसकट धरण्याचा आग्रह धरणे म्हणजे एक प्रकारचा आततायीपणा आहे असे मला वाटते.

आपल्याकडे ज्योतिषाकडे अनेक दृष्टीकोनांतून पाहिले जाते. ज्योतिषाकडे बघायचा
आणखी एक दृष्टीकोन मला अमेरीकेतील एका प्रसिद्ध ज्योतिषीबाईनी (त्या आता हयात
नाही) मला दिला. त्यांचे नाव श्रीमती मॅरी डाउनिंग. त्यांच्या मते ज्योतिष हे
मानवी जीवनातील चक्रीय वास्तवाची प्रतिकृती आहे (Astrology is model of
circular reality in human life). हे चक्रीय वास्तव सुख आणि दू:ख,
अपेक्षापूर्ती आणि अपेक्षाभंग, प्रवृत्ती आणि निवृत्ती, अशा ध्रुवांमध्ये
आंदोलित होत असते.

माझ्या दृष्टीने मॅरी डाउनिंगच्या व्याख्येतील प्रतिकृती हा शब्द मला अतिशय
महत्त्वाचा वाटतो. कोणत्याही रचनेचे रूप आणि कार्य समजावून घेण्यासाठी
प्रतिकृती उपयोगी पडतात. आपण प्रतिकृती अथवा प्रतिक (प्रतिकृती अमूर्त होत जाते
तेव्हा त्याचे प्रतिक बनते) याचे सोपे उदाहरण म्हणून आपण वास्तूविशारदाने
बनवलेल्या घराच्या प्रतिकृतीचे घेऊ. या प्रतिकृतीमुळे आपल्याला वास्तूची कल्पना
करण्यास मदत होते. या प्रतिकृतीमध्ये वास्तूरचनेची सर्व तत्त्वे अमलात आणली जात
नाहीत. म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, वास्तूची प्रतिकृती बनवताना आपण खर्‍या
दगड विटांचा आणी इतर बांधकाम सामानाचा उपयोग करीत नाही. संगणकावर बनवलेल्या
प्रतिकृती मध्ये तर ० आणी १ एवढाच कच्चा माल वापरला जातो. आणि म्हणून ती
प्रतिकृती बनवण्याचा आणी वापरण्याचा उद्योग अशास्त्रीय ठरत नाही किंवा तयार
झालेली प्रतिकृती अंधश्रद्धा होत नाही.

प्रतिकृतीला, ती ज्या उद्देशाने बनवली गेली आहे त्यानुसार, मर्यादा येतात.
पुठ्ठ्याचा वापर करून तयार केलेल्या वास्तूच्या प्रतिकृतीमध्ये प्रकाश किती
खेळेल किंवा याचा अंदाज बाधणे कठीण असते. शिवाय अशी प्रतिकृती बर्‍याचदा
वास्तूच्या बाह्य रुपाचाच अंदाज येण्यास उपयोगी ठरते. अंतर्भागाची तसेच हालचाल,
चलनवलन यांची कल्पना करण्यासाठी, संगणकीय प्रतिकृती उपयोगी पडतात.

हे सर्व सांगायचा खटाटोप एवढयाचसाठी की ज्योतिषाच्या मर्यादा आपण जर समजावून
घेतल्या तर ज्योतिषाचा योग्य उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. माझे आयुष्य
एखाद्या सूत्रात बांधले गेले आहे का?, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास प्रत्येक
व्यक्ती पूर्णपणे स्वतंत्र आहे. एखादे सूत्र ही त्यातील विशिष्ट घटकांच्या
परस्पर संबंधांची प्रतिकृती असते. जन्म आणि मृत्युच्या या अंतिम अवस्थांनी
बद्ध असलेल्या मनुष्याची पत्रिका ही म्हणूनच त्याच्या जीवनात येउ शकणार्‍या
वेगवेगळ्या अवस्थांची एक प्रतिकृती मानली तर त्यात वावगे काय?

ज्यांच्या जीवनाला स्थैर्य लाभले आहे ते ज्योतिषाकडे अनुदार किंवा साशंक
वृत्तीने बघतात. त्यांच्या जीवनातील अनिश्वितता एक तर कर्मधर्मसंयोगाने
मर्यादित असते, किंवा ती मर्यादित ठेवण्यात अशा व्यक्तीना यश मिळालेले असते.
त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या जीवनाला, कशामुळे का असेना, निश्चितता आहे
त्यांना ज्योतिषाबद्दल आकस, अनास्था वाटणे स्वाभाविक आहे.

याच मुद्द्याच्या अनुषंगाने मला एक महत्त्वाचे मत येथे मांडावेसे वाटते. आधुनिक
ज्योतिषी ग्रहांचे परिणाम अजिबात मानत नाहीत. ते ग्रहांच्या भ्रमणांचे किंवा
आकाशात तयार होणार्‍या विशिष्ट भौमितिक रचनांची मानवी जीवनातील अवस्थांशी सांगड
घालायचा प्रयत्न करतात. अशी सांगड घालण्याचा उद्योग अतिसुरक्षित आयुष्य
जगणार्‍या व्यक्तीच्या बाबत बर्‍याचवेळा फसतो. कारण त्यांच्या आयुष्यात नवे
काही घडायची शक्यता फारच थोडी असते. भरभराटीचे योग असणार्‍या सर्वच व्यक्तींची
भरभराट होताना दिसत नाही याचे कारण या स्पष्टीकरणात सापडेल. म्हणूनच ज्योतिष
अनिश्चितता असेल तेव्हाच पहावे.

ज्योतिषाचे निंदक विकृत बुद्धिवादाची इस्त्री सर्वसामान्य माणसाच्या मनावरून
फिरवून परिटघडीचा समाज बनवू इच्छितात काय़? बरं, हा बुद्धिवाद शाश्वत समाधानाची
हमी प्रत्येक प्रयत्नवादी व्यक्तीला देइल याची खात्री कोणीच देत नाही. तसे
असल्यास दूसरा एक प्रश्न उपस्थित होतो. निसर्गाने अशा बुद्धिवादाने मिळणारे
'समाधान' पचविण्याचे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीला दिले आहे काय? तशा चाचण्या
किंवा संशोधन झाले असल्यास मी त्याविषयी अधिक जाणून घेण्यास उत्सूक आहे.

Regards

Rajeev Upadhye
---------------------------
www.yuyutsu.biz
http://rajeev-upadhye.blogspot.com/
--------------------------

सोमवार, २४ नोव्हेंबर, २००८

शनि-हर्षल प्रतियुतीच्या छायेतील त्रासदायक ग्रहयोग


शनि
-हर्षल प्रतियुतीच्या छायेतील त्रासदायक ग्रहयोग

आगामी काळात म्हणजे १२ डिसेंबर ०८ व २६ जाने २००९ रोजी अनुक्रमे पौर्णिमा आणि अमावस्या हे दोन जोरदार चांद्रयोग होत आहेत. हे दोन्ही योग शनि-हर्षल प्रतियुतीच्या छायेत होत असल्याने तीव्र फलदायी ठरतील असे भाकीत वर्तवणे योग्य ठरेल. यापैकी ही पौर्णिमा अशुभ (त्यामुळे कोणत्याही नव्या सुरुवातीस ती वर्ज्य
आहे) असून, अमावस्येला सूर्यग्रहण होत आहे. ग्रहणाची अमावस्या मिश्र फलदायी ठरेल (त्याविषयी सविस्तर नंतर लिहीन).

प्रथम आपण १२ डिसेंबर ०८ रोजी असलेल्या पौर्णिमेचा विचार करू. ही पौर्णिमा सायन मिथुन-धनु रास २१ अंश या अक्षावर होत आहे. या पौर्णिमेची कुंडली मांडली असता खालिल ग्रहयोग दिसून येतात.

रवि केन्द्र शनी
रवि लाभ नेपचून
रवि युति मंगळ
रवि केन्द्र हर्षल

हे सर्व योग अंशात्मक आहेत. याशिवाय रवीच्या युतिमध्ये प्रभावी झालेला मंगळ गोचरीने शनि व हर्षल या प्रतियोगातील ग्रहांबरोबर केंद्र योग करतो.

याचे तात्पर्य असे की शनि व हर्षल प्रतियोगामुळे चालू झालेल्या उलथापालथीचा एक मोठा दणका कोणत्या ना कोणत्या अरिष्टाच्या स्वरूपात (मोठा भूकंप, रेल्वे अथवा विमान अपघात, घातपाती कारवाया) १२ डिसेंबर ०८ च्या मागेपुढे एक आठवडा या कालावधीत मिळू शकतॊ.

आता आपण या पौर्णिमेच्या प्रभावाखाली कोणत्या व्यक्ती सापडल्या आहेत त्यांचा विचार करू... ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत सायन २० ते २२ अंश मिथुन-कन्या-धनु-मीन या क्षेत्रात कोणतेही ग्रह असतील तर त्यांना या पौर्णिमेची
जोरदार अशुभ फले अनुभवाला येतील. या फलांची तीव्रता मूळ पत्रिकेतील ग्रह योगांप्रमाणे असेल.

पुढे दिलेल्या तारखाना रवि कोणत्याही वर्षी २० ते २२ अंश सायन मिथुन-कन्या-धनु-मीन या क्षेत्रात असतो, म्हणून या तारखांना ज्यांचे जन्म झाले आहेत त्याच्या जन्मरवीशी पौर्णिमेतील मंगळ, शनी, हर्षल हे युति, प्रतियुति, केन्द्र हे योग करतात.

या तारखा अशा -
११ ते १४ मार्च ११ ते १४ जून १२ ते १५ सप्टेंबर १२ ते १५ डिसेम्बर

शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने हे योग अतिशय हानीकारक आहेत. शक्य असल्यास कोणतेही धाडस न करणे तसेच सौम्य धोरण स्वीकारून कलह टाळणे हे या काळात शहाणपणाचे ठरेल.

ज्यांना निरयन राशीचक्राप्रमाणे पौर्णिमेचा आपल्या पत्रिकेतील प्रभाव जाणून घ्यावयाचा असेल त्यांनी २५-२६-२७ अंश वृषभ-सिंह-वृश्चिक-कुंभ या क्षेत्रात आपल्या पत्रिकेत कोणते ग्रह आहेत ते तपासावेत.