शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०१४

डॉ एन राजम

काल मी साक्षात् सरस्वतीची छबी माझ्या कॅमेर्‍यात टिपली.

सरस्वती नेहमी वीणावादन करते. पण तिला वीणा वाजवायचा कंटाळा येतो तेव्हा ती व्हायोलिनपण वाजवते. ही व्हायोलिनधारक सरस्वती म्हणजेच पद्मभूषण डॉ एन राजम.

विम व्हॅन देर मिर नावाचा एक संगीत अभ्यासक (musicologist) एकदा पंडित उदय भवाळकरांकडे भेटला होता. त्याने बोलताना प्रश्न स्वत:च एक प्रश्न उपस्थित केला आणि स्वत:च त्याचे उत्तर देऊन टाकले. तो म्हणाला, "खरा श्रेष्ठ म्युझिशिअन कोण?" "जो दोन सुरांमधले अवकाश दाखवु शकतो तो". त्याची ही व्याख्या मला एकदम मनोमन पटली. पण काल श्रीमती एन राजम यांचे व्हायोलीन ऐकताना ही व्याख्या थोडी आणखी सुधारावी असे वाटले -



"खरा श्रेष्ठ म्युझिशिअन कोण?"

"जो दोन सुरांमधला आणि दोन मात्रांमधले अवकाश दाखवु शकतो तो"

एन राजम ओंकारनाथ ठाकुरांकडे शिकल्या. पण मला स्वत:ला, का कुणास ठाउक, ओंकारनाथ ठाकुर एव्हढे भावले नाहीत, पण राजम बाईंच्या व्हायोलिनमधुन जे दिसले ते एक प्रकारचे ठाकुरांचे स्वरानी रंगवलेले भन्नाट चित्रच म्हणावे लागेल. मला ते जास्त भावले. मूळ विषयापेक्षा कधीकधी आपल्याला प्रतिमा, प्रतिबिंब जास्त आवडते, तसे काहीसे हे म्हणता येईल.



तांत्रिक कारणामुळे तासभर उशीरा सुरु झालेल्या कार्यक्रमात पंडित सुरेश तळवळकरांचा, योगाचार्य व्यवहारे आणि पं. शेवलीकर यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा बोलताना तळवळकरांनी रियाझ आणि साधना यातला फरक सांगितला. तो असा, "रियाझ उणे अहम् म्हणजे साधना".

ही पण व्याख्या बरेच काही सांगुन जाते.

तुंडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात राजम बाईनी तासभर यमन मग एक नाट्यपद आणि शेवटी भैरवी वाजवली. तबल्यावर रामदास पळसुले आणि व्हायोलिन साथ राजम यांची नात रागिणी शंकर हिने केली. रागिणी आपल्या आजीचा दिव्य वारसा पुढे चालवणार यात शंकाच नाही.

मी व्हायोलीनबरोबर काहीकाळ झटापट केलेली आहे. त्यामुळे "व्हायोलिन कशाशी खातात" हे मला पुरेपुर ठाउक आहे. गुंतागुंतीच्या स्वरकृतीनी नटलेले हे वादन अचंबित करणारे होतेच पण तरीही प्रासादिकतेला कुठेही धक्का पोचला नव्हता. पण एक मात्र खरे दोन शैलींचा संकर जेव्हा राजम यांच्या सारखा समर्थ कलाकर घडवतो, तेव्हा तो जे नवे निर्माण होते, ते कलेचा प्रवाह खळाळत पुढेच नेते.

काल मी डॉ एन राजमना मैफलीत प्रथमच ऐकले पण मला त्यांचे फोटो पण काढता आले. "हर्षेण जाता मम काप्यवस्था न तामहं वर्णयितुं समर्थ:..."

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०१४

मी खरा कोण?

मी खरा कोण?
=========

मला माझ्या वडिलांच्याबद्दल प्रेम आणि आदर दोन्ही आहे
पण त्यांच्या आईवडिलांबद्दल यत्किंचितही प्रेम नाही.
आदर तर त्याहून नाही...

आज वडिलांचे वडिल हयात असते तर
मी त्यांना कदाचित चपलेने मारायला कमी केले नसते.

मला उपाध्ये कुळाकडुन उपाध्ये या आडनावाशिवाय काही मिळाले नाही.
जे काही मिळाले ते मातृकुळाकडुन मिळाले आणि ते खूप मिळाले.
संस्कार, जीवनदृष्टी आणि बरेच काही.
त्याला तोड नाही, असेच म्हणेन.

पण बर्‍याच लोकाना
माझे हे विचार आवडत नाहीत.
(माझे आईवडिल त्यात येत नाहीत)

नुकताच मी गुणसूत्रांच्या पातळीवर विचार केला ...

मी पुरुष म्हणजे माझ्यातील गुणसूत्रे "क्ष-य".
विज्ञान म्हणतं,
क्ष गुणसूत्रामध्ये २००० जनुके (genes)असतात
तर य गुणसूत्रामध्ये फक्त ७८ (genes) जनुके असतात.

म्हणजे २००० वाला क्ष आणि ७८ वाला य
यात खरा सामर्थ्यवान कोण
असा आता प्रश्न मला पडला आहे.
"य" मुळे मला फक्त पुरुषत्वाची "कार्ये" मिळाली
बाकी सगळं "क्ष" कडुन मिळालं.

मग मी खरा कोण?
"क्ष" की "य"?

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०१४

रहस्य



वयाच्या पन्नासाव्या वर्षी यश आणि प्रगती यांचे मला सापडलेले रहस्य असे आहे -

१. केवळ स्वत:च्या क्षमतेवर ठराविक मर्यादेपर्यंतच पल्ला गाठता येतो. आपली क्षमता विकास पावण्यात
   आजुबाजुची परिस्थिती निर्णायक ठरते.

२. त्यापुढचा पल्ला तुमची संपर्कक्षमता, तुम्ही कुणाचे कोण यावर ठरतो.

३. लोकाना मोठं केल्याशिवाय आपल्याला मोठं होता येत नाही. मोठं अशांनाच करायचे असते की आपल्या प्रगतीचे त्यांना दु:ख होणार नाही!

(ज्यांना तुमच्या प्रगतीत वाटेकरी होता येत नाही ते तुमच्या प्रगतीत काटे पसरवु शकतात!)

हे सर्व टप्पे एकमेकात मिसळेले असतात...किंबहुना मिसळेलेले असतील तर प्रत्येक टप्प्यावरचा संघर्ष थोडासा तरी सुसह्य होतो!