शनिवार, २५ डिसेंबर, २०१०

नूतन मराठीचा गौरव

- जाने १९७९


निरलस प्रेमे रमवी मज तू तव सन्निध अये नूमवि
भरोनी वाहो घट प्रेमाचे सदासर्वदा हे नूमवि

मन्मातेपरि निज प्रेमाने टाकिसी भारूनी हे नूमवि
यास्तव मज ह्या तव वास्तूचे बहूत प्रलोभन हे नूमवि

मन्बंधूंचे लालनपालन केले हो या नूमवीने
प्रणमुनी गातो गौरव आता या नूमवीचा प्रेमाने

रम्य काल तो बहूमोलाचा आता मी त्या आठवितो
तव प्रेमाचे दवबिंदू हे नयनातून मी साठवितो

गौरव गाता उच्च स्वरांनी गगन मंडले दुमदुमती
ती ही नूमवि अजुनीही रिझवी भासे मजला नवी नवी

अतुल अपूर्व पराक्रमाने जगूनी जगती मानाने
हे नूमवि तुज मिरवू आम्ही गाजवू ही ती दिग्गगने

तव वैभवी जी विभा विमलतम ज्या विभूतीनी पसरविली
त्या तेजासी नमूनी नूमवि आज प्यायलो स्फूर्ती नवी

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०

४ जानेवारी २०११ चे सूर्यग्रहण कुणाला शुभ ठरेल?

दिनांक ४ जानेवारी २०११ रोजी होणारे काही व्यक्तीना भाग्यदायी ठरायची शक्यता आहे. यापैकी ज्यांना ते विशेष भाग्यदायी ठरेल त्यांच्या जन्मतारखा पुढे देत आहे.

खालील दिलेल्या कालवधीत जन्म झालेल्या व्यक्तीना जन्मपत्रिकेतिल गुरुशी ग्रहणाची अमावस्या युती अथवा नवपंचम योग करते, त्यामुळे ती काही ना काही प्रमाणात शुभ ठरण्याची शक्यता आहे. या व्यक्तींचा गुरु जर लग्नाशी किंवा दशमभाव आरंभ बिंदूशी युती तर ’लाईफ जिंगा लाला’ ठरण्याची शक्यता आहे...

२२ जाने ते १० फेब्रु १९३७, १५ जुलै ते ३१ ऑगस्ट १९४०, ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर १९४०
३ मार्च ते २४ मार्च १९४१,
१८ सप्टे ते ७ ऑक्टोबर १९४४
६ जाने ते २४ जाने १९४९
२० जून ते १२ जुलै १९५२, १० नोव्हे ते १६ डिसे १९५२
२५ जाने ते १ मार्च १९५३
२ सप्टे ते २१ सप्टे १९५६
२१ डिसे १९६० ते ७ जाने १९६१
३१ मे ते १९ जून १९६४
१८ ऑगस्ट ते ५ सप्टे १९६८
४ डिसे ते २२ डिसे १९७२
१४ मे ते १ जून १९७६
१ ऑगस्ट ते २० ऑगस्ट १९८०
१६ नोवे ते ६ डिसे १९८४

या शिवाय कोणत्याही वर्षात खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तीना ग्रहणाची अमावस्या शुभ अथवा लाभदायक ठरेल...
२ जाने ते ७ जाने
१ मे ते ७ मे
४ सप्टे ते ८ सप्टे

या शिवाय सायन वृषभ रास १० अंश ते १६ अंश, सायन कन्या रास १० अंश ते १६ अंश यात कोणतेही ग्रह असल्यास त्यांनी जन्मपत्रिकेत केलेल्या योगानुसार ग्रहणाची शुभ फले मिळतील.

टीप - -आपल्या पैकी कुणाला जन्मपत्रिकेचे एबर्टिनप्रणित तंत्राने विष्लेषण करून हवे असेल तर माझ्याशी ई-मेल (upadhye.rajeev@gmail.com)वर संपर्क साधावा. हे विश्लेषण फक्त इंग्लिश मध्ये पुढील काही दिवस माझ्या ब्लॉगच्या वाचकाना नि:शुल्क करून मिळेल. काही विशिष्ट समस्यांसाठी मार्गदर्शन हवे असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल.

ज्यांना हे विश्लेषण कसे असते याचा अंदाज घ्यायचा आहे, त्यांनी या (http://yuyutsu.webs.com/Sample%20Report.pdf) लिंकवर टिचकी मारून नमूना विश्लेषण उतरवून घ्यावे.

सोमवार, २० डिसेंबर, २०१०

दिनांक ४ जाने २०११ रोजीचे सूर्यग्रहण

दिनांक ४ जाने २०११ रोजी सकाळी ९ वाजून ०२ मि सायन मकर राशीत १३ अंशावर ३८ मि अमावस्या होत असून ही अमावस्या सूर्यग्रहणयुक्त असून वर्षारंभीच होत आहे. २०११ मध्ये एकंदर ४ सूर्यग्रहणे आहेत बाकीची या प्रमाणे -

० १ जून २०११ सायन मिथुन रास ११ अंश १ मि
० १ जुलै २०११ सायन कर्क रास ९ अंश १२ मि
० २५ नोव्हे २०११ सायन धनू रास २ अंश ३६ मि

ही सर्व ग्रहणे खण्डग्रास प्रकारची असणार आहेत.

दिनांक ४ जाने २०११ रोजी होणारे ग्रहण गोचर नेपच्यून आणि गोचर शनी यांजबरोबर अनुक्रमे अर्धकेंद्र आणि केंद्र योग करत असल्याने बर्‍याच प्रमाणात अशुभ किंवा त्रासदायक ठरणार आहे.

ज्या जन्म दिनांकाना हे ग्रहण विशेष त्रास ठरेल त्या जन्म तारखांचे गणित करून पुढे दिल्या आहेत. खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत शनी सक्रिय होत असल्याने शनीने केलेल्या योगानुसार ग्रहणयुक्त अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील.

२८ एप्रिल १९३८ ते ६ जून १९३८, २५ सप्टें १९३८ ते २३ नोव्हे १९३८
५ जाने १९३९ ते २६ फेब्रु १९३९
१५ जून १९४५ ते १६ जुलै १९४५
२२ नोव्हे १९५१ ते १ एप्रिल १९५२
१६ ऑगस्ट १९५२ ते २२ सप्टे १९५२
१९ जाने १९६० ते २७ फेब्रु १९६०
३० जून १९६० ते २६ नोव्हे १९६०
२४ जून १९६७ ते २५ ऑगस्ट १९६७
६ मार्च ते सात एप्रिल १९६८
२६ जुलै ते ३१ ऑगस्ट १९७४
४ जाने १९७५ ते १९ मे १९७५

खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत हर्षल सक्रिय होत असल्याने हर्षलने केलेल्या योगानुसार ग्रहणयुक्त अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील.
२५ ऑगस्ट ते १८ डिसे १९५१, १० जून ते १३ जुलै १९५२
१ मार्च ते १३ एप्रिल १९५३
१३ नोव्हे १९७० ते ३० मार्च १९७१, ३० ऑगस्ट ते ४ नोव्हे १९७१
२१ एप्रिल ते १९ ऑगस्ट १९७२

खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत नेपच्युन सक्रिय होत असल्याने नेपच्युनने केलेल्या योगानुसार ग्रहणयुक्त अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील.

४ नोव्हे १९४७ ते १ एप्रिल १९४८
६ सप्टे १९४८ ते २८ ऑक्टो १९४९
१९ एप्रिल १९५० ते ३० एप्रिल १९५०

खालील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत प्लुटो सक्रिय होत असल्याने प्लुटोने केलेल्या योगानुसार ग्रहणयुक्त अमावस्येची त्रासदायक फळे मिळतील.
३० डिसे १९७५ ते २९ जाने १९७६
६ ऑक्टो १९७६ ते २२ मे १९७७
२५ मार्च १९७८ ते १५ सप्टे १९७८

या शिवाय कोणत्याही सनात पुढे दिलेल्या तारखाना जन्मलेल्या व्यक्ती ग्रहणाची त्रासदायक फले अनुभवतील -

२ जाने ते ७ जाने
१ एप्रिल ते ५ एप्रिल
४ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर
४ जुलै ते ९ जुलै


टीप -आपल्या पैकी कुणाला जन्मपत्रिकेचे एबर्टिनप्रणित तंत्राने विष्लेषण करून हवे असेल तर माझ्याशी ई-मेल वर संपर्क साधावा. हे विश्लेषण फक्त इंग्लिश मध्ये पुढील काही दिवस माझ्या ब्लॉगच्या वाचकाना नि:शुल्क करून मिळेल. काही विशिष्ट समस्यांसाठी मार्गदर्शन हवे असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल.

ज्यांना हे विश्लेषण कसे असते याचा अंदाज घ्यायचा आहे, त्यांनी या (http://yuyutsu.webs.com/Sample%20Report.pdf) लिंकवर टिचकी मारून नमूना विश्लेषण उतरवून घ्यावे.

[ज्योतिष] एबर्टीन तंत्राने जन्मपत्रिकेचे मोफत विश्लेषण

माझ्या ब्लॉगच्या वाचकाना त्यांच्या जन्मपत्रिकेचे एबर्टीन तंत्राने मोफत इंग्लिश्मध्ये विश्लेषण पुढील काही दिवस नि:शुल्क करून मिळेल. इच्छुकानी खालिल माहिती मला इमेलने (upadhye.rajeev@gmail.com) कळवावी.

नाव
जन्म तारीख
जन्मस्थळ
जन्मवेळ

एका इच्छुकास एकाच जन्मतारखेचे विश्लेषण करून मिळेल याची कृपया नोंद घ्यावी. अधिक व्यक्तींसाठी हे विष्लेषण हवे असेल किंवा विशिष्ट समस्ये साठी मार्गदर्शन हवे असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल.

ज्यांना हे विश्लेषण कसे असते याचा अंदाज घ्यायचा आहेत्यांनी या (http://yuyutsu.webs.com/Sample%20Report.pdf) लिंकवर टिचकी मारून नमूना विश्लेषण उतरवून घ्यावे.

सोमवार, २१ जून, २०१०

२६ जून चे चंद्र्ग्रहण - भाग २ (बाधित जन्मतारखा)

टिप - तुमची जन्मतारीख खाली दिलेल्या तारखांपैकी असेल तर तुम्हाला तुमच्या जन्मपत्रिकेचे एबेर्टीनतंत्राने विश्लेषण मोफत करून मिळेल. ही सवलत फक्त २६ जून पर्यंत चालू राहील.)


कोणत्याही वर्षी खालिल जन्मतारखाना जन्मलेल्या व्यक्तीना त्यांच्या पत्रिकेतील रवि २६ जूनच्या बृहच्चौकोनात सापडतो
१७ मार्च - २५ मार्च
१८ जून ते २५ जून
१९ सप्टे ते २६ सप्टे
१८ डिसे ते २६ डिसे

वरील जन्मतारखाना कार्यनाश, आरोग्याच्या तक्रारी, मानसिक त्रास, निकटच्या लोकांशी मतभेद, आक्रस्ताळीपणा इत्यादि गोष्टी अनुभवास येण्याची शक्यता जास्त आहे

खालिल जन्मतारखाना जन्मलेल्या व्यक्तीना त्यांच्या पत्रिकेतील मंगळ २६ जूनच्या बृहच्चौकोनात सापडतो.या तारखाना जन्मलेल्या व्यक्तीनी वाहन, धोकादायक यंत्रे चालवणे, कोणतीही नवीन जोखीम स्वीकारणे, भावनिक उद्रेक या पासून काळजी घ्यावी.

१ नोव्हे - ७ नोव्हे १९३५,
२६ फेब्रु - २ मार्च १९३६, ३० जून -६ जूलै १९३६, १९ नोव्हे - २६ नोव्हे १९३६
४ ऑक्टो - १० ऑक्टो १९३७
३ फेब्रु - ८ फेब्रु १९३८, ११ जून - १७ जून १९३८, २९ ऑक्टो - ५ नोव्हे १९३८
२६ मार्च - २ एप्रिल १९३९,
८ जाने - १४ जाने १९४०, २२ मे - २८ मे १९४०, १० ऑक्टो - १६ ऑक्टो १९४०
२२ फेब्रु १९४१ - २७ फेब्रु १९४१, ७ जुलै - १४ जुलै १९४१,
१मे - ७मे १९४२, २१सप्टे - २८ सप्टे १९४२,
३० जाने - ५ फेब्रु १९४३, ३१ मे - ५ जून १९४३
३ एप्रिल - १० एप्रिल १९४४, २ सप्टें १९४४ - ८ सप्टें १९४४
९ जाने - १५ जाने १९४५, १२ सप्टे - १९ सप्टे १९४५
१४ ऑगस्ट - २० ऑगस्ट १९४६, २१ डिसेम्बर - २६ डिसेम्बर १९४६
१५ एप्रिल - २० एप्रिल १९४७, १८ ऑगस्ट -२४ ऑगस्ट १९४७
२२ जुलै - २८ जुलै १९४८, ३० नोव्हे - ६ डिसे १९४८
२५ मार्च - ३० मार्च १९४९, २७ जुलै - २ऑगस्ट १९४९
२ जाने ५० ते १५ जाने १९५०, १० मार्च ते २१ मार्च १९५०
, १९ जून - २८ जून १९५० , १० नोव्हे - १५ नोव्हे १९५०
५ मार्च - १० मार्च १९५१, ८ जुलै - १४ जुलै १९५१, २९ नोव्हे - ६ डिसे १९५१,
१६ ऑक्टो - २१ ऑक्टो १९५२,
११ फेब्रु - १७ फेब्रु १९५३, ६ नोव्हे - १२ नोव्हे १९५३
२० एप्रिल - ६मे १९५४, ९ जून -२४ जून १९५४, १ सप्टे - १० सप्टे १९५४
१९ जाने - २४ जाने १९५५, ३० मे - ५ जून १९५५, १८ ऑक्टो -२४ ऑक्टो १९५५,
४ मार्च - १० मार्च १९५६, १२ डिसे - १९ डिसे १९५६,
९ मे - १५ मे १९५७, २८ सप्टे - ४ ऑक्टो १९५७
७ फेब्र - १३ फेब्रु १९५८, ११ जून - १७ जून १९५८,
१५ एप्रिल - २२ एप्रिल १९५९, १० सप्टे -१६ सप्टे १९५९,
१८ जाने - २३ जाने १९६०, १५ मे -२०मे १९६०, २६ सप्टे - ५ ऑक्टो १९६०
४ जाने -१६ जाने १९६१, २८ फेब्रु - १४ मार्च १९६१, २१ ऑगस्ट - २७ ऑगस्ट १९६१, २८ डिसे १९६१ - २ जाने १९६२
२३ एप्रिल -२८ एप्रिल १९६२, २७ ऑगस्ट - २ सप्टे १९६२,
३१ जुलै - ७ ऑगस्ट १९६३, ९ डिसे -१४ डिसे १९६३
२ एप्रिल - ७ एप्रिल १९६४, ४ ऑगस्ट - १० ऑगस्ट १९६४, ४ जुलै - १२ जुलै १९६५
१८ नोव्हे - २३ नोव्हे १९६५,
१३ मार्च - १८ मार्च १९६६, १५ जुलै ते २१ जुलै १९६६, ९ डिसे - १७ डिसे १९६६
२७ ऑक्टोबर - १ नोव्हे १९६७,
२० फेब्रु - २६ फेब्रु १९६८, २५ जून - १ जुलै १९६८, १४ नोव्हे - २० नोव्हे १९६८
२५ सप्टे - २ ऑक्टो १९६९, २८ जाने - ३ फेब्रु १९७०, ६ जून- १२ जून १९७०, २५ ऑक्टो - ३१ ऑक्टो १९७०
१७ मार्च - २३ मार्च १९७१,
३१ डिसे १९७१ - ६ जाने १९७२,
१७ मे - २३ मे १९७२, ५ ऑक्टो - ११ ऑक्टो १९७२,
१६ फेब्रु - २३ फेब्रु १९७३, २५ जून - १ जूलै १९७३
२५ एप्रिल - १ मे १९७४, १७ सप्टे - २३ सप्टे १९७४
२५ जाने - ३१ जाने १९७५, २६ मे - ३० मे १९७५
२४ मार्च - २ एप्रिल १९७६, २८ ऑगस्ट - ४ सप्टे १९७६
४ जाने - १० जाने १९७७, १ मे - ६ मे १९७७, ५ सप्टे - १२ सप्टे १९७७,
९ ऑगस्ट - १५ ऑगस्ट १९७८, १६ डिसे - २१ डिसे १९७८
१० एप्रिल - १६ एप्रिल १९७९, १२ ऑगस्ट - १९ ऑगस्ट १९७९
१५ जुलै - २२ जुलै १९८०, २५ नोव्हे १ डिसे १९८०,
२० मार्च - २६ मार्च १९८१, २२ जुलै - २८ जुलै १९८१, २२ डिसे - ३१ डिसे १९८१
१० एप्रिल - २२ एप्रिल १९८२, १ जून १९८२ - १५ जून १९८२, ४ नोव्हे - १० नोव्हे १९८२
२८ फेब्रु - ६ मार्च १९८३, ३ जुलै - ९ जुलै १९८३, २३ नोव्हे - ३० नोव्हे १९८३
९ ऑक्टो - १५ ऑक्टो १९८४,
६ फेब्रु - ११ फेब्रु १९८५

रविवार, ३० मे, २०१०

२६ जूनचे चंद्रग्रहण -भाग १

दोन ग्रह एकमेकांशी निरीक्षकसापेक्ष नव्वद अंशाचा कोन जर करत असतील तर त्या रचनेला ज्योतिषात केन्द्रयोग अशी संज्ञा आहे. केंद्रयोग हे सहसा त्रासदायक असतात कारण त्यात ग्रहांची तत्त्वे नकारात्मक किंवा एकमेकांना विरुद्ध होइल असे काम करताना दिसतात.

दोनाच्या जागी जर चार ग्रह एकत्र येऊन जर एकमेकांशी केंद्र योग करत असतील तर नकारात्मक आविष्कार अधिकच वाढतो. यामुळे ज्या रचना आकाशात तयार होतात. त्यापैकी एक म्हणजे ग्रॅण्ड स्क्वेअर किंवा मराठीत बृहच्चौकोन. जन्मपत्रिकेत बृहच्चौकोन ही रचना असेल तर कमालीच्या जीवनसंघर्षला अशा व्यक्तीनी तोंड दिलेले असते. याच्या उलट बृहत्त्रिकोण ही रचना असते. ज्यांच्या पत्रिकेत बृहत्त्रिकोण असतो त्यांचा आयुष्यक्रम हेवा वाटेल इतका सहज असतो. आयुष्यातले प्रश्न सीमित असतात किंवा वेळच्या वेळी सुटत जातात. संघर्ष हा शब्द त्यांच्या शब्द्कोषात नसतो. अशा व्यक्तीना जगातली गुंतागुंत, इतरांचे कष्ट यांच्या विषयी संवेदना पण कमी असते. जन्मपत्रिकेतील रवि,चंद्र, लग्न आणि ख-मध्य हे जर बृहत्त्रिकोण किंवा बृहच्चौकोन तयार करत असतील तर मात्र वर सांगितलेले आविष्कार हमखास बघायला मिळतात.

हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच की २६ जून रोजी होणारे ग्रहण बृहच्चौकोन ही रचना निर्माण करणार आहे. सुदैवाने हा बृहच्चौकोन काही मिनीटेच म्हणजे चंद्र रविच्या प्रतियुतीमध्ये असे पर्यंतच टिकेल. पण तरीही याचा परीणाम मोठा आणि दूरगामी असू शकतो.

अमुक अमुक ग्रहयोगांमुळे जागतिक पातळीवर काय घडामोडी होतील याचा विचार मेदिनीय ज्योतिषात करतात. मेदिनीय ज्योतिष ही ज्योतिषाची शाखा खूप बाल्यावस्थेत आहे. तरी पण बृहच्चौकोना सारख्या रचनांचा मेदिनीय ज्योतिषाच्या अंगाने विचार त्यात असलेल्या रवी-शनी-हर्षल-प्लुटो यासारख्या ग्रहांमुळे करणे इष्ट ठरते.

मेदिनीय ज्योतिषात एक मूलभूत तत्त्व असे आहे की आकाशात ग्रहांची विशिष्ट रचना जेव्हा तयार होते तेव्हा त्या रचनेतील ग्रह ज्या भूभागात आकाशात बरोबर डोक्यावर येतात त्या ठिकाणी (किंवा सभोवतालच्या भागात) ग्रहांच्या तत्त्वांशी संबंधित घटना घडायची शक्यता असते.

२६ जूनच्या बृहच्चौकोनाचा विचार केला तर रवी फ्रान्स जर्मनी आणि आफ्रिकेचा काही भाग येथे ख-मध्यावर येतो. शनी चीन, बांगलादेश, रशियाचा काही भाग येथे ख-मध्यावर येतो. चंद्र-प्लुटॊ रशियाचा अतिपूर्वेकडील काही भाग येथे ख-मध्यावर येतात (नकाशा बघावा). सहसा ज्याबाबतीत हा भूभाग संवेदनशील असतो त्या बाबतीत घटना घडताना दिसते, म्हणजे राजकीय अस्थैर्य असेल तर घातपात, भौगोलिक (नैसर्गिक) अस्थैर्य असेल तर वादळ/भूंकपाची शक्यता इत्यादि...

माझ्या अंदाजानुसार २६ जूनचे ग्रहण हे चिनी अर्थव्यवस्थेची घोडदौड थांबवणार्‍या घटनांची नांदी ठरावे. असो.

लेखाच्या पुढच्या भागात २६ जूनचे ग्रहण वैयक्तिक आयुष्यात कोणत्या जन्मतारखाना महत्त्वाचे आहे याचा विचार करु.

सोमवार, २४ मे, २०१०

दिनांक २७ मे २०१० रोजी सायन धनु राशीत होणारी पौर्णिमा

आगामी काळात होणार्‍या काही खगोलशास्त्रीय घटना पुढील प्रमाणे असून त्यांचा फलज्योतिषाच्या अंगाने विचार भविष्यकाळात डोकावून पहाणार्‍यांसाठी केला आहे.

या घटना अशा -

- दिनांक २७ मे २०१० रोजी सायन धनु राशीत ६अंश३२मि. वर होणारी पौर्णिमा
- दिनांक २६ जुन २०१० रोजी सायन मकर राशीत ४अंश५०मि. वर होणारे चंद्र्ग्रहण
- दिनांक ११ जुलै २०१० रोजी सायन कर्क राशीत १९ अंश २३ मि. वर होणारे सूर्यग्रहण
- दिनांक ३१ जुलै २०१० रोजी सायन तूळ राशीत ०अंश ४९ मि वर होणारी शनि-मंगळ युती

या प्रमुख खगोलशास्त्रीय घटनांनी प्रभावित जन्म्तारखा कोणत्या याचा आपण आता शोध घेऊ...

वरील पौर्णिमा खाली दिलेल्या कालावधीमध्ये ज्यांचे जन्म असतील त्यांच्या जन्मपत्रिकेतील शनीस सक्रिय करते आणि त्यामुळे ती शनीने मूळ पत्रिकेत केलेल्या योगांनुसार त्रासदायक ठरायची शक्यता बरीच आहे.

१३ एप्रिल १९३५ ते ६ मे १९३५, ७ ऑगस्ट १९३५ ते ३ ऑक्टोबर १९३५
१२ डिसेंबर १९३५ ते २७ जानेवारी १९३६, २९ जून १९४२१७ जुलै १९४२
४ नोव्हेंबर १९४८ ते ३० जाने १९४९, २३ जुलै १९४९ ते २५ ऑगस्त १९४९
२१ नोव्हे १९५६ ते २५ डिसेंबर १९५६, ९ जुलै १९५७ ते १४ सप्टेंबर १९५७
२१ मे १९६४ ते १० जुलै १९६४, १ फेब्रु १९६५ ते ६ मार्च १९६५
२ ऑगस्ट १९७१ ते ७ नोव्हेंबर १९७१, १८ एप्रिल १९७२ ते २० मे १९७२
१ सप्टेम्बर १९७८ ते ४ ऑक्टोबर १९७८, २८ मार्च १९७९ ते २० जून १९७९

वरील पौर्णिमा खाली दिलेल्या कालावधीमध्ये ज्यांचे जन्म असतील त्यांच्या जन्मपत्रिकेतील हर्षल सक्रिय करते आणि त्यामुळे ती हर्षलने मूळ पत्रिकेत केलेल्या योगांनुसार त्रासदायक ठरायची शक्यता बरीच आहे.

३१ ऑगस्ट १९४२ ते २० सप्टेंबर १९४२, २५ मे १९४३ ते १९ ऑगस्ट १९४३
१२ ऑक्टोबर १९४३ ते २४ मे १९४४, ३१ ऑक्टोबर १९६२ ते ३१ जाने १९६३
११ ऑगस्ट १९६३ ते १८ ऑक्टोबर १९६३, १५ फेब्रु १९६४ ते ३ ऑगस्ट १९६४

वरील पौर्णिमा खाली दिलेल्या कालावधीमध्ये ज्यांचे जन्म असतील त्यांच्या जन्मपत्रिकेतील नेपच्यून सक्रिय करते आणि त्यामुळे ते नेपच्यूनने मूळ पत्रिकेत केलेल्या योगांनुसार त्रासदायक ठरायची शक्यता बरीच आहे.

१ ऑक्टोबर १९३० ते १९ फेब्रु १९३१, ३ ऑगस्ट १९३१ ते २३ सप्टेंबर १९३२
९मार्च १९३३ ते २५ जुलै १९३३, १६ जाने १९७२ ते २९ एप्रिल १९७२
१५ नोव्हेंबर १९७२ ते ७ जाने १९७४
१९ मे १९७४ ते १० नोव्हेम्बर १९७४

वरील पौर्णिमा खाली दिलेल्या कालावधीमध्ये ज्यांचे जन्म असतील त्यांच्या जन्मपत्रिकेतील प्लुटो सक्रिय करते आणि त्यामुळे ती प्लुटोने मूळ पत्रिकेत केलेल्या योगांनुसार त्रासदायक ठरायची शक्यता बरीच आहे.

१५ सप्टे १९५९ ते ९ मार्च १९६०
१८ जुलै १९६० ते २१ सप्टे १९६१
११ मार्च १९६२ ते २४ जुलै १९६२

वरील कालावधीमध्ये जन्मलेल्या व्यक्तीनी पौर्णिमेच्या पुढे व मागे १ आठवडा आपल्या सर्व व्यवहारात विशेष काळजी घ्यावी.

गुरुवार, २९ एप्रिल, २०१०

कथा प्रवृत्ती निवृत्तीची

पूर्व प्रसिद्धी - रविवार सकाळ, १९.०४. १९९८

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट काही सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या खांद्यावर ऒढून घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने प्रभावित होऊन प्रेतामधला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, "राजा तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटतॆ. तुझे कष्ट थोडेफार हलके व्हावेत म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतॊ."

"फार पूर्वी या पृथ्वीतलावर प्रवृत्तिपाद आणि निवृत्तिपाद या नावाचे दोन फार मोठे राजे होऊन गेले. प्रवृत्तिपादाच्या राज्याचे नाव होते प्रवृत्तिपुर आणि निवृत्तिपादाच्या राज्याचे नाव होते निवृत्तिपुर. एका राज्यातून दूस-या राज्यात जाताना अनेक डोंगरद-या, नद्यानाले, हिंस्र श्वापदांनी भरलेली घोर अरण्ये आणि सात समुद्र पार करावे लागत. दोन्ही राजांच्या प्रजेची राहणी फारच भिन्न होती. दोन्ही राजांच्या नावाप्रमाणे एक राज्य प्रवृत्तीचे उपासक होते तर दूसरे निवृत्तीचे. निवृत्तिपुराची लोकसंख्या प्रवृत्तिपुराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त होती, तर प्रवृत्तिपुराच्या प्रजेची समृद्धी अधिक होती. राजा प्रवृत्तिपाद आपल्या प्रजेला सर्व प्रकारची ऐहिक सुखे उपभोगत यावीत म्हणून झटत असे. त्याने राज्याची भरभराट व्हावी म्हणून व्यापार, उद्योगधंदे, शिक्षण यांना उत्तेजन दिले. प्रवृत्तिपुरातील व्यापारी माती सोन्याच्या भावाने विकत, तर निवृत्तिपुरात सोने मातीच्या भावाने विकले जाई."

"प्रवृत्तिपुरातील विद्यापीठे देशोदेशींच्या विद्वानांनी गजबजून गेली होती. या विद्यापीठांचे जगभरच्या बुद्धिमान विद्यार्थ्यांमध्ये खूप आकर्षण होते. निवृत्तिपुरात मात्र वेगळी परिस्थिती होती. निवृत्तिपुराला हजारो वर्षांचा इतिहास लाभला होता. या इतिहासाचा खराखोटा अभिमान तेथील पौरजन त्यांच्या साध्यासाध्या व्यवहारांमध्ये पण लपवू शकत नसत. निवृत्तिपुरात अनेक उद्योगधंदे चालत. चालणारे चालत, न चालणारे आजारी पडत. आजारी उद्योगांना निवृत्तिपाद मोठमोठी अनुदाने देत असे. निवृत्तिपुरात पण विद्यापीठे होती. काही मोजक्या विद्यापीठातील मोजके विद्यार्थी सोडले, तर एका मोठया ईश्वरी लीलेमुळेच की काय, बाकीचे विद्यार्थी मोठमोठ्या पदव्या प्राप्त करून सुद्धा नोकरीच्या शोधात वणवण भटकत असत."

वेताळ म्हणाला, "हे मित्रा, सांगत काय होतो की जग जिंकण्याच्या ईर्ष्येने प्रवृत्तिपादाने मोठे सैन्य बाळगले होते. सैन्याला लागणारी अद्ययावत आयुधे तयार करणा-या मोठ्मोठ्या यंत्रशाळांची त्याने स्थापना केली होती. देशोदेशींचे कुशल कारागीर तेथे वेगवेगळी यंत्रे आणि आयुधे तयार करण्या साठी अहोरात्र खपत असत. प्रवृत्तीपादाच्या यंत्रशाळामध्ये तयार झालेले रथ मात्र संपूर्ण भूतलावर कीर्ती प्राप्त करून होते. याशिवाय, प्रत्यक्ष आदित्याच्या रथाशीच बरोबरी होऊ शकेल अशा "मरुत्सखा" नावाच्या रथांची निर्मिती तेथील कारागीरांनी केली होती. हे रथ वेगवान असल्यामुळे त्यांच्या जोरावर राजा प्रवृत्तिपाद अनेक युद्धे जिंकला होता. त्याच्या मांडलिकांकडून प्रवृत्तिपुरात निर्माण झालेल्या रथांना मोठी मागणी असे. साहजिकच या रथांची कीर्ती निवृत्तिपुरापर्यंत पोचली होती. अशा रथांची आपल्याला आवश्यकताच नाही या विचाराने प्रत्येकजण आपापल्या दिनचर्येत गुंतला होता."

"प्रवृत्तिपादाला मात्र त्याच्या हूशार प्रधानांनी एकदा सल्ला दिला, की राजा आपण उत्तमोत्तम रथ बनवले तरी ते चालवण्यासाठी लागणारे योग्य सारथी आपल्याकडे नाहीत." यावर राजा प्रवृत्तिपाद चमकला. त्याने प्रधानांना उपाय विचारला. तेव्हा एक प्रधान म्हणाला, "राजा, निवृत्तिपादाची प्रजा खूप मोठी आहे. याशिवाय तेथे विद्वानांची आणि पंडितांची खूप उपासमार होते, असे ऐकले आहे. तेव्हा आपले जुने रथ आपण निवृत्तिपुरात विकायला नेऊ आणि तेथे उत्तमोत्तम सारथी निर्माण करून आपल्या राज्यात आणू." यावर प्रवृत्तिपादाने संमती दर्शवली. पण सर्वाना प्रश्न पडला की निवृत्तिपादाच्या राज्यात रथ विकायचे कसे? यावर सर्व प्रधानांनी एकत्र विचार करून एक नामी शक्कल काढली. निवृत्तिपादाच्या प्रजेचे संस्कृतिप्रेम त्यांना ठाऊक होते. त्यांनी एक वावडी उठवून द्यायचे ठरवले, की मरुत्सखा या रथाची रचना निवृत्तिपुरात होऊन गेलेल्या एका ऋषींच्या ग्रंथात सापडली आहे.

"ही वावडी सात समुद्र, हिंस्र श्वापदांनी भरलेली घोर अरण्ये, डोंगरद-या, आणि नद्यानाले पार करून निवृत्तिपुरात आली तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा एकच धक्का बसला. सगळेजण हे आपल्याला माहित कसे नाही, असे एकमेकांस विचारू लागला. मरूत्सखाचे तंत्रज्ञान आपल्या नगरात विकास पावले, हे ऐकून सगळ्यांचा उर अभिमानाने भरुन आला. बौद्धिक स्वामित्वाची फार मोठी जाणीव निवृत्तिपादाच्या प्रजेला यानिमित्ताने झाली. या घटनेला उपलक्षून निवृत्तिपादाने मोठ्या दक्षिणा देऊन विद्वत्परिषदा आणि पंडितचर्चा घडवून आणल्या. सर्व चर्चा आणि परिषदांतून निवृत्तिपुराच्या प्राचीन संस्कृतीचा अभिमान जोमाने बाहेर पडला. आपल्या राज्यात एखादी कल्पना मांडली जावी आणि ती प्रवृत्तिपादाच्या राज्यात विकास पावावी, हे निवृत्तीपादाला रूचेना. त्याने वाट्टेल ती किंमत मोजून रथांची आयात करायचे ठरविले. आयात केलेले रथ चालविण्यासाठी सारथी तयार करणा-या शाळा काढल्या. या शाळातून बाहेर पडलेले सारथी प्रवृत्तिपादाच्या राज्यात जाऊन उपजीविका करू लागले. पण गमतीची गोष्ट अशी, की प्रवृत्तिपादाने मरूत्सखा सोडून सर्व प्रकारचे रथ निवृत्तीपादास विकले. पण राजा निवृत्तिपाद यामुळे खूप अस्वस्थ झाला.
त्याला चैन पडेना. त्यावर त्याच्या प्रधानांनी सल्ला दिला, "राजन, आपण एका संशोधन मंदिराची स्थापना करून प्रति-मरूत्सखाची निर्मिती करावी." आश्चर्य म्हणजे ही कल्पना राजाला ताबडतोब पटली. त्याने लगेच निधी मंजूर करून प्रति-मरूत्सखा संशोधन मंदिराची स्थापना करण्याच आदेश दिला. रात्रंदिवस खपून एखाद्या मयसभेप्रमाणे वाटणा-या या संशोधन मंदिराची निर्मिती केली गेली. अनेक बुद्धिमान लोकांना निवृत्तिपादाने तेथे नेमले. ही बातमी प्रवृत्तिपुरात जेव्हा पोचली तेव्हा प्रत्येक जण निवृत्तिपुरास परतण्याचे स्वप्न रंगवू लागला."

"प्रति-मरूत्सखा संशोधन मंदिरात अनेक चित्र-विचित्र कौशल्याचे कारागिर अहोरात्र खपू लागले. निवृत्तिपुराच्या इतिहासात लिहिले गेलेले सर्व ग्रंथ, पोथ्या-पुराणे अभ्यासण्यात आले. तसेच, रथाच्या निर्मिती सर्व प्रकारचे सर्व भाग आयात करण्यात आले. एका चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर प्रति-मरूत्सखाची निर्मिती करण्यात आल्याचे निवृत्तिपादाने जाहिर केले. ब्रह्मवृंदाकरवी षोडषोपचारे पूजा करून झाल्यावर प्रति-मरूत्सखा पौरजनांना दर्शनासाठी खुला केला गेला. निवृत्तिपादाच्या राजवाड्यावर प्रति-मरूत्सखा बघण्यासाठी ही मोठी गर्दी लोटली. प्रत्येकाला उत्सुकता होती, की प्रति-मरूत्सखा चालतो कसा? कल्पनेला ताण देऊन प्रत्येकजण आपापसात पैजा मारू लागला. राजाने पण आनंदाच्या भरात एका नव्या रथाच्या निर्मितीची घोषणा केली. अशाच एका चैत्र शुद्ध प्रतिपदेला विधिवत पूजा करून तो सर्वांना बघण्यासाठी खुला केला."

वेताळ पुढे म्हणाला, " ही बातमी दूतांमार्फत प्रवृत्तिपादाच्या राजवाड्यावर पोचली, तेव्हा तो निद्राधीन झाला होता. प्रधानांना कळेना राजाला उठवून सांगावे की नाही. शेवटी एका प्रधानाने धीर करून प्रवृत्तिपादाला उठवून प्रति-मरूत्सखा निर्मितीचे वृत्त सांगितले, पण यावर राजाने मात्र 'ठीक आहे' असे म्हणून कुस बदलली आणि तो पुन्हा घोरू लागला."

येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "मित्रा, प्रवृत्तिपादाला ही बातमी ऐकून काहीच कसे वाटले नाही? या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असून तू दिले नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायाशी लोळू लागतील."

यावर विक्रमादित्याने आपले मौन सोडले आणि हसून तो म्हणाला, " हे बघ, निवृत्तिपादाला जग जिंकायची इच्छा कधीच नव्हती आणि प्रति-मरूत्सखाची निर्मिती फसव्या अभिमानातून झाली, हे लक्षात घे. शिवाय तो चालतॊ कसा हे कुणीच कधी बघितले नव्हते. युद्ध जिंकण्याची गोष्ट दूरच राहू दे."

या उत्तराने वेताळ खूष झाला आणि विक्रमादित्याचा मौनभंग झाल्याने प्रेतासह झाडावर जाऊन लोंबकळू लागला.

बुधवार, २१ एप्रिल, २०१०

"ओ मालक, आमची ब्वाडि पयली घ्या की हो!"

इन्द्रराज पवारांचा (http://misalpav.com/node/12007)पिंडदानाचा अनुभव एक अशीच आठवण जागी करून गेला. त्यांनी पिंडदानाचे दोन वेगवगळे विधी का असा प्रश्न विचारला आहे. मला त्याचे उत्तर असे द्यावेसे वाटते की विधी ज्या समाजाची जशी समूहदृष्टी तसे आकार घेतात.

सतरा अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. माझ्या एका काकांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिव वैकुंठावर घेऊन गेलो तेव्हा त्या दिवशी गर्दी अशी नव्हती पण क्यु मध्ये ४-५ पार्थिवे होती. काकांच्या पार्थिवा अगोदर एका वृद्धम्हातार्‍या मजुराचे पार्थिव होते. तो एका सोसायटीचा वॉचमन म्हणुन काम करत होता. त्याचे क्रियाकर्म करण्यासाठी सोसायटीमधले काही लोक उपस्थित होते. एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन दहनपूर्व विधी करायचे नाही असे काकांच्या आम्ही निकटर्तीयानी ठरवले होते आणि शांतपणे सर्व जण रांग पुढे सरकण्याची वाट बघत होते.

एवढ्यात हळुहळु लोकांची गर्दी वाढायला लागली म्हणता म्हणता १००-१५० मजुर आणि झोपडपट्टीवासीयांचा जमाव जमला. एक शववाहिका भरकन आली आणि एका पोरसवदा मजुराचे पार्थिव बाहेर काढून ठेवण्यात आले. इतका वेळ असलेली शांतता पूर्णपणे भंग पावली होती. जमलेल्या जमावाचा कर्कश्श गोंगाट चालला होता. मरण पावलेला तरूण भाजून मृत्युमुखी पडला होता.

आज दहनासाठी रांग आहे आणि नंबर लागायला वेळ लागेल असे जेव्हा जमावाच्या लक्षात आले तेव्हा त्यांच्या काही जण पुढे येऊन अगोदर वाट पहात असलेल्या लोकांकडे जाउन आम्हाला रांगेत पुढे जाउ द्या म्हणुन आग्रह करु लागले. अगोदर वाट पहात असलेल्या लोकानी शांतपणे जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला तेव्हा जमावाने आवाज वाढवायला सुरुवात केली आणि वैकुंठाचे ऑफिस गाठले. ऑफिसात ते काय करतात याची मला त्या प्रसंगात पण उत्सूकता निर्माण झाली म्हणुन मी पण हळुच मागे गेलो.

"ओ मालक, आमची ब्वाडि पयली घ्या की हो!" जमावातील एकाने अर्ज केला.

ऑफिसातील कर्मचार्‍याने त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला की, एकच दाहिनी चालु असल्यामुळे आज वेळ लागेल याची कल्पना दिली. पण जमाव ऐकायच्या मनस्थितीत नव्ह्ता.

"मालक, तिकडे स्लॅब अर्धवट राहिलीय. तुमचं च्या-पाणी देतो की राव!" गर्दीतून एक आवाज आला. जमाव 'च्या-पाण्या'वर आल्याने वैकुंठातले कर्मचारीपण खजिल आणि हतबल झाले आणि बाहेर येउन रांगेत ताटकळत असलेल्या लोकांची परवानगी मागू लागले.

साहजिकच सुशिक्षितपणाने झुंडशाही पुढे हार खाल्ली. तोवर मृत्युबद्द्लच्या सर्व जाणीवा बोथट होऊन गेल्या होत्या. मी ज्या समाजात जन्माला आलो आणि वाढलो त्याने दिलेला सुसंकृतपणा हा कुचकामाचा असून तो कमकुवतपणा असल्याची खात्री झाली.

अजूनही वैकुंठावर कुणासाठी जायची वेळ आली त्या दिवशीचा कोलाहल आठवतो, आणि कानात घुमत राहतात ते शब्द - "ओ मालक, आमची ब्वाडि पयली घ्या की हो!"

मंगळवार, २० एप्रिल, २०१०

कोडे प्राणायमाचे

काही काही कोडी सुटायला अनेक वर्षे जावी लागतात.

मला एक खोड आहे ती अशी की एखादा उपचार किंवा एखादे औषध कसे काम करते हे जोपर्यंत कळत नाही तो पर्यंत मी बेचैन असतो. त्यामुळे न बोलणार्‍या किंवा कमी बोलणार्‍या डॉक्टरांबरोबर माझे जुळत नाही. प्राणायमाच्या उपयुक्ततेबद्द्ल पण माझे असेच काहीसे झाले होते.

प्राणायमाची महती लहानपणापासून अनेक वर्षे कानावर ऐकू येत आहे. अनेक योगी आणि देशी विदेशी डॉक्टर प्राणायमाचे महत्त्व गाताना ऐकले आहेत. हृद्रोग निवारणासाठी प्रसिद्ध असलेला अमेरीकन डॉक्टर डीन ऑर्निश देखिल प्राणायमाचा पुरस्कार करताना आढळतो. तरी पण प्राणायमाचा उपयोग हृदयविकारामध्ये का आणि कसा होतो याचे समाधानकारक उत्तर काही केल्या मिळत नव्हते. दरम्यान वैद्यकाचे शिक्षण घेत असलेल्या माझ्या मामेभावाने मला त्यांच्या एका प्राध्यापकानी प्राणायमातील संभाव्य कारणपरंपरेबद्द्ल सांगितले आणि माझी उत्सुकता आणखी वाढली. त्याने सांगितले ते असे की योगाच्या विशिष्ट अवस्थांमध्ये मन वेगवेगळ्या पेशीं बरोबर संवाद साधते. हा संवाद नेमका कसा साधला जातो आणि त्यामुळे बरे होण्याची प्रक्रिया जलद गतीने का घडून येते हे कळायला पुढे ४-५ वर्षे जावी लागली. कॅण्डेस पर्ट या बाईंनी केलेल्या न्युरोट्रान्समीटर वरील संशोधनानंतर या कोड्याचा उलगडा झाला.

प्राणायमाच्या कोड्यामध्ये प्राणवायुचा पुरवठा वाढतो हे एकच पालुपद सर्व तज्ज्ञ गाताना दिसतात. पण प्राणायमात असे काय होते की हृदयविकारात अर्धमेल्या स्नायुना प्राणवायुचा पुरवठा नवीन समांतर रक्तवाहिन्यांद्वारे होऊ लागतो? आणि हृदयविकाराचा झटका टाळता येतो. या कोड्याचे उत्तर मात्र मला नुकतेच मिळाले आहे.

युट्युब वर डॉ. प्रकाश मालशे यांच्या सादरीकरणाची एक क्लीप मला नुकतीच पहायला मिळाली. या क्लिप मध्ये त्यांनी प्राणायमातील कुंभकाने हायपोऑक्ज़िया कसा निर्माण होतो हे दाखवले आहे. या कृत्रिम हायपोऑक्ज़ियामुळे मानवी किडनीतील एरिथ्रोपॉयेटीन नावाच्या संप्रेरकाने अस्थिमज्जेला चेतना मिळून रक्तातील तांबड्यापेशींचे प्रमाण वाढते आणि पर्यायाने रक्ताची प्राणवायुधारणक्षमता वाढते, असे स्पष्टीकरण डॉ. प्रकाश मालशे यांच्या युट्युबवरील क्लिप खाली दिले आहे. याला नेट्वर अन्य ठिकाणी दूजोरा दिला आहे. याचा आणखी एक परीणाम म्हणून हृदयाच्या अर्धमेल्या स्नायुमध्ये रक्तवाहिन्यांची वाढ होऊ लागते आणि समांतर पुरवठा चालू झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका टाळायला मदत होते.

सोमवार, ५ एप्रिल, २०१०

श्रीकृष्णाची चूक - कर्मयोगाची ऐशीतैशी

लोकहो

'श्रीकृष्णाची चूक' या माझ्या लेखावर धोंडोपतांची प्रतिक्रिया वाचली. जवळपास अशाच प्रतिक्रिया 'मिसळपाव'वर या लेखावर झालेल्या चर्चेत (http://misalpav.com/node/11675) व्यक्त झाल्या होत्या. काही जणांच्या प्रतिक्रिया मधून "देव चूकेलच कसा" असा सूर डोकावत होता. लोक दैवतांचे मानवीकरण पट्कन करतात. पण मानवीकरण झालेले देव मानवासारखेच चूकू शकतात हे स्वीकारायला ते तयार नसतात.

मला भगवद्गीता ज्यांनी शिकविली त्या टिमविमधल्या देसाईबाईनी गीतेविषयी एकदा एक महत्त्वाचे विधान केले होते. ते असे, गीतेमध्ये प्रश्नांची उत्तरे शोधणार्‍या प्रत्येकाला काही ना काही तरी मिळते. कारण गीतेतील विधाने अर्थनिष्पत्तीच्या दृष्टीने अतिशय लवचिक आहेत. हे तुम्हाला ठाउक असेलच. तेव्हा या लवचिकतेमुळे मी केलेल्या विधानांसंदर्भात गोंधळ होऊ नये म्हणून एक सर्वमान्य संदर्भ स्वीकारणे आवश्यक वाटते. मी हा संदर्भ म्हणून लोकमान्य टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ सुचवू इच्छितो.


"योग: कर्मसु कौशलम्" या दुसर्‍या अध्यायातील ५० व्या श्लोकाचा (ऍनी बेझण्ट आवृत्ती) संदर्भ काही जणांनी दिला. या वाक्याचा अर्थ आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचा विचार करुया. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यात पान क्र. ३५ वर "योग म्हणजे कर्मे करण्याची काही विशेष प्रकारची कुशलता, युक्ती, चतुराई अगर शैली" अशी व्याख्या गीतेनेच केली असल्याचे म्हटले आहे. ही विशेष प्रकारची कुशलता नक्की कोणती हे जाणून घेण्यासाठी त्याच अध्यायातील ४८ व्या श्लोकाचा दुसरा चरण - "सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते" - बघावा लागेल.

'सिद्धी असिद्धी यांचे ठायी समत्व बुद्धि' असाही योग शब्दाचा अर्थ दिल्याचे टिळक म्हणतात. तेव्हा "योगस्थ: कुरु कर्माणि" असा सल्ला देताना समत्व बुद्धीची कुशलता, युक्ती, चतुराई अगर शैली कर्मे करताना वापर असे श्रीकृष्णाला म्हणायचे आहे, यावर कुणाचे दुमत असू नये असे वाटते. यात एफिशियन्सीचा संबन्ध दूरान्वयाने नाही किंवा समत्व बुद्धीने एफिशियन्सी वाढते असेही सिद्ध होत नाही.

इथे मला निर्माण झालेली समस्या अशी की समत्व बुद्धीची "कुशलता, युक्ती, चतुराई अगर शैली" या फलसिद्धीसाठी/यशासाठी "आवश्यक आणि पुरेशा (नेसेसरी आणि सफिशियण्ट)" अटी आहेत का? मला याचे उत्तर नाही असे द्यावेसे वाटते. कारण पुढे १८ व्या अध्यायात "अधिष्टानं तथा कर्ता.." या श्लोकात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या पाच अटी श्रीकृष्णाने सांगितल्या आहेत. तेव्हा योगी होऊन कर्म करणे यशासाठी आवश्यक असेल पण तेव्हढे पुरेसे नक्की नाही.

याशिवाय मला गीतेविषयी आणखी एक विचार सतावत असतो. सश्रद्ध लोकांना त्यामुळे कदाचित धक्का बसेल. मला पडलेला प्रश्न असा - "कर्मण्येवाधिकारस्ते..." इ. गीतावचने किती गांभिर्याने घ्यायची? या वचनांचे उपयोजित क्षेत्र किती?

समजा एखाद्या विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेला बसायाचे आहे. त्यासाठी दोन ढोबळ कर्मे त्या व्यक्तीला करावी लागतील. १ले कर्म म्हणून परीक्षेची पूर्वतयारी करावी लागेल. २ रे कर्म म्हणून प्रत्यक्ष परीक्षा देणे हे होय. योगाची वर दिलेली व्याख्या -
'सिद्धी असिद्धी यांचे ठायी समत्व बुद्धि' - ही आपण जर स्वीकारली, तर परीक्षेसाठी लागणारी पूर्वतयारी पूर्ण होऊ शकेल का? निष्काम कर्माचे तत्व बारावीच्या परीक्षेच्या पूर्वतयारीला लागू पडेल का? माझ्यामते जोपर्यंत फलसिद्धी हे पूर्ण लक्ष्य बनत नाही तोपर्यंत परीक्षेची पूर्वतयारी होणारच नाही. "सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा..." हे तत्त्व बारावीच्या कोणत्याही विद्यार्थ्याला परवडणारे नाही.

आता वर जे २रे प्रत्यक्ष परीक्षा देण्याविषयी चे कर्म सांगितले, त्याचा विचार करू. समजा एखाद्या मुलाने वर्षभर नियमित, उत्तम अभ्यास आणि सराव केला आणि ऐन परीक्षेच्यावेळी जर त्याचे अवसान गळले तर त्याची तुलना अर्जुनाच्या भयगंडाशी करता येईल. तरीही "हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं..." या श्लोकातील विन-विन सिचुएशनचा लाभ पण बारावीच्या परीक्षार्थीना नसतो. कारण परीक्षेत यशस्वी झाला नाही तर तो स्वर्गात न जाता नरकात जाण्याची शक्यता जास्त असते. सांगायची गोष्ट अशी की निष्काम कर्मयोगाचे तत्त्व सर्व कर्माना सारखे लावता येईल असे नाही.

मला तरी निष्काम कर्माचा पुरस्कार हा निरर्थक वाटतो. श्रीकृष्णाने मॅच फिक्सींग अगोदरच केले होते. मी यांना अगोदरच मारले आहे, तू फक्त निमित्त हो (मया एव एते निहता: पूर्वमेव निमित्तमात्र भव सव्यसाचिन् भ. गी. ११.३३) असे म्हटल्यावर, योगी व्हा, फळाची आशा करू नका इत्यादि गप्पा ठीक आहेत.

सोमवार, २९ मार्च, २०१०

श्रीकृष्णाची चूक
काल आणि परवा पुण्यात एका गिर्यारोहण संस्थेने पानिपतच्या रणसंग्रामावर श्री. निनाद बेडेकरांची दोन दिवस व्याख्याने आयोजित केली होती.

दोन्ही दिवस मी माझ्या कन्येला घेउन या भाषणांना उपस्थित राहिलो होतो. माझी मुलगी सीबीएसई बोर्डाच्या शाळेत जाते. त्यांना जो इतिहास शिकवतात तो नि:सत्त्व इतिहास शिकवतात. त्यांना नेमलेल्या पुस्तकांवरून नजर टाकल्यावर माझे हे ठाम मत बनले आहे. इतिहासाच्या शिक्षणात तरी माझी मुलगी माझ्या इतकी नशीबवान ती नाही कारण चित्रकलेच्या तासाला मुलाना इतिहासातील गोष्टी सांगणारे पुरंदरेसर त्यांच्या नशीबी नाहीत. मी शाळेत असताना वेगवेगळ्या निमित्ताने होणारी व्याख्याने आणि त्यातून होणारे संस्कार पण या मुलांच्या वाट्याला नाहीत. अशा उदात्तीकृत आणि म्हणून एकतर्फी इतिहासाने माझे थोडेफार पोषण नक्कीच केले आहे.

इतिहासाच्या शिक्षणातून काय साधायला हवं? मला वाटतं याची उत्तरे अशी देता येतील - इतिहासातून गतकालाचा परिचय व्हावा
हे काम शालेय शिक्षणातून अत्यंत रटाळपणे केले जाते.
- ऐतिहासिक घटनांनी निर्माण केलेली उर्जा अखंड स्रवून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळावी
मी शाळेत असताना आमच्या पुरंदरेसरानी सांगितलेल्या गोष्टी आणि सध्या निनाद बेडेकरांसारख्या व्रतस्थ इतिहासप्रेमींच्या व्याख्यानातून हे नक्कीच साध्य होत आहे असं मला वाटतं. व्याख्यानाचा १ला दिवस झाल्यावर मी माझ्या मुलीला विचारलं की "तुला काय काय समजलं?" तेव्हा तिने मला प्रामाणिकपणे सांगितले, की तीला काहीही समजलं नाही. पण तरीही दुसर्‍या दिवशीचं व्याख्यान तिला ऐकायला जायची इच्छा होती. (आणि आम्ही गेलोही!) यावरून मला एक गोष्ट जाणवली ती अशी की माझ्या मुलीला व्याख्यानातलं काही समजलं नाही हे तिच्या शाळेतल्या इतिहास शिक्षणाचं अपयश आणि तरीही तिला दुसर्‍या दिवशी जावसं वाटलं हे बेडेकरांच्या तपश्चर्येचं यश!

मी पण बेडेकरांनी बारीकसारीक तपशीलासकट, हातात कागदाचा एकही चिटोरा न घेता पानिपताचा इतिहास उभा केला त्यामुळे थक्क झालो होतो. माझ्या आठवणीत फार थोड्या व्याख्यानांनी कायमचे घर केले आहे. मुंबईत टिआयएफार मध्ये झालेले प्रो. चंद्र्शेखरांचे कृष्णविवरांवरचे व्याख्यान, प्राध्यापक मे. पुं. रेग्यानी पुण्यात स्नेहसदन मध्ये दिलेली बुद्धावरची व्याख्याने आणि जनरल के व्ही कृष्णरावांनी बालगंधर्वमध्ये दिलेले काश्मिरप्रश्नावरचे व्याख्यान, ही ती व्याख्याने. त्यात आता एक नवी भर पडली ती बेडेकरांची. असो.

तरी पण एका गोष्टीची मला रुखरुख लागून राहिली. माझ्या मते इतिहासाचं शिक्षण तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण इतिहास जसा आहे तसा स्वीकारायला शिकतो. जसा आहे तसा इतिहास स्वीकारणं हे अतिशय अवघड आहे. त्याला भावनिक पदर बरेच आहेत. पण समाजाचे पाउल पुढे पडायला हवे असेल तर त्याच त्याच होणार्‍या चूका टाळायला हव्यात. त्या चूका टाळायच्या असतील तर इतिहासातील काळी बाजू पांढर्‍याबाजूच्या बरोबरीने स्वीकारता यायला हवी. कारण काळी बाजू पुढे आली नाही तर चूकांची दूरुस्ती करायचा सल समाजमनात निर्माण होणार नाही.

बेडेकरांच्या व्याख्यानात मराठ्यांच्या इतिहासातील काही चूका अशाच बाजूला सारल्या गेल्या. मराठ्यांच्या पराक्रमाचे पोवाडे फक्त महाराष्ट्रातच गायले जातात... पण महाराष्ट्राबाहेर मराठ्यांची प्रतिमा ही लुटारु अशी आहे (याचा उल्लेख बेडेकरांनी केला पण अतिशय पुसट असा. श्रोत्यांपैकी कितीजणांना या प्रतिमेचं गांभीर्य कळलं हा प्रश्नच आहे). पानिपतापूर्वी आणि पानिपतानंतर मराठ्यांनी प्रचंड पराक्रम करून सत्ता मिळवली पण जिंकलेल्या प्रदेशात आपलेपणाची भावना निर्माण केली नाही. हे मत माझे नाही तर इतिहासाचार्य राजवाड्यांचे आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत.

जाता जाता प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या हातून य़ुद्धाच्या गडबडीत (कदाचित अनवधानाने) केलेल्या चूकीचा उल्लेख करावासा वाटतो. ती चूक श्रीकृष्णाच्या हातून झाली नसती तर आज आपला देश कदाचित वेगळा घडला असता. फळाची आशा न करता श्रीकृष्णाने निष्काम कर्म करायला सांगितले म्हणजे ते रिवॉर्ड आणि पनिशमेंटच्या नैसर्गिक सत्याविरुद्ध करायला सांगितले. फळाच्या आशेने मनुष्य कर्म करतो तेव्हा तो ते एफिशियण्ट्ली करायचा प्रयत्न करतो. भारतीयांनी आजवर आपापली कर्मे जर एफिशियण्ट्ली केली असती तर आपला देश कदाचित निराळा घडला असता. श्रीकृष्ण 'कर्म एफिशियण्ट्ली करा' असे सांगायला विसरला...

बुधवार, १० मार्च, २०१०

दिनांक १६ मार्च २०१० रोजीची अमावस्या

दि. १६ मार्च २०१० रोजी पहाटे ३:२८ मिनिटानी सायन मीन राशीत २५ अंश १२ मि. वर अमावस्या होत असून ती गोचर युरेनसच्या युतीत होत असल्याने बर्‍याच जणाना तीव्र शुभ अथवा तीव्र अशुभ फलदायी (+/- ५ दिवस) ठरेल.

ज्या व्यक्तींच्या जन्मपत्रिकेत अमावस्या शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो यांच्याशी युती, प्रतियुती, केंद्र इ. योग करते त्याना ती विशेष फलदायी ठरेल. खाली अशा प्रभावित व्यक्तींच्या जन्मतारखा खाली दिल्या असून ही अमावस्या, जन्मपत्रिकेतील शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांचे रवी, चंद्र, लग्न, ख-मध्य यांच्याशी योग होत असल्यास जोरदार फलदायी ठरेल.

इंग्रजी मध्ये reform म्हणतात येईल अशा, किंवा तडकाफडकी घडणार्‍या अनपेक्षित शुभ अथवा अशुभ घटना युरेनस सक्रिय असताना घडतात. या घटना आयुष्यात मोठे बदल, उलथापालथ घडवतात. राज्यसभेत मांडले गेलेले स्त्री-आरक्षण विषयक विधेयक हि अशीच reform स्वरूपाची घटना आहे.

जन्म पत्रिकेतील शनी प्रभावित असलेल्या तारखा

२४ ऑगस्ट १९४३ ते २९ नोव्हे १९४३
७ मे १९४४ ते २९ मे १९४४
ऑक्टोबर १९४९ (सम्पूर्ण महिना)
१ एप्रिल ते २१ जुलै १९५०
मार्च - एप्रिल १९५८
१७ अप्रिल १९६६ ते १६ मे १९६६
४ सप्टेम्बर १९६६ ते २२ ऑक्टोबर १९६६
जानेवारी १९६७
१५ जुन १९७३ ते १३ जुलै १९७३
१३ नोव्हेम्बर १९७९ ते ५ मार्च १९८०


जन्म पत्रिकेतील युरेनस प्रभावित असलेल्या तारखा
५ ऑगस्ट १९४७ ते २९ नोव्हेम्बर १९४७
१७ मे १९४८ ते १ जुलै १९४८
४ फेब्रुवारी ते २१ मार्च १९४९
१२ सप्टेंबर १९६७ ते १२ ऑक्टोबर १९६७
२० मार्च १९६८ ते १५ ऑगस्ट १९६८

जन्म पत्रिकेतील नेपच्यून प्रभावित असलेल्या तारखा
सप्टेम्बर १९४०
एप्रिल ते ऑगस्ट १९४१

जन्म पत्रिकेतील प्लुटो प्रभावित असलेल्या तारखा
१ डिसेंबर १९६८ ते ३१ जाने १९६९
१४ सप्टेंबर १९६९ ते ३० सप्टेंबर १९७०
२० एप्रिल १९७१ ते १ ऑगस्ट १९७१

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

मोफत मोफत मोफत

दिनांक ८.२.२०१० ते १५.२.२०१० या कालावधीमध्ये माझ्या ब्लॉगच्या वाचकाना त्यांच्या जन्मपत्रिकेचे एबर्टीन तंत्राने मोफत इंग्लिश्मध्ये विश्लेषण करून मिळेल. इच्छुकानी खालिल माहिती मला इमेलने (upadhye.rajeev@gmail.com) कळवावी.

नाव
जन्म तारीख
जन्मस्थळ
जन्मवेळ

एका इच्छुकास एकाच जन्मतारखेचे विश्लेषण करून मिळेल याची कृपया नोंद घ्यावी.