मुहूर्ताच्या या प्राचीन कल्पना तपासल्या तर त्यात बराच गोंधळ दिसतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला मुहूर्त काढून हवा आहे त्या जातकाच्या मूळपत्रिकेचा फारच उथळ विचार या जुन्या मुहूर्ताच्या कल्पनांमध्ये दिसतो. उदाहरणार्थ, जन्मराशीपासून चवथा, आठवा आणि बारावा चंद्र सर्व कार्यासाठी वर्ज्य समजावा. जन्मराशीपासून पांचवा चंद्र नवपंचम योग करतो पण तो कार्यनाशक आहे (बोंबला!) पण तो शुक्लपक्षातील असेल तर मात्र शुभ आहे.
एखाद्या दिवशी परस्परविरुद्ध योग आले तर काय करायचे याचे सुटसुटीत दिग्दर्शन मला आजतागायत माझ्या अभ्यासात सापडलेले नाही. याचे उदाहरण म्हणून अमृतसिद्धी योगाचे घेऊ. अमुक वारी अमुक नक्षत्र आले तर अमृतसिद्धी योग होतो. जसे रविवारी हस्त, सोमवारी मृग, मंगळवारी अश्विनी इत्यादि. पण आता अमृतसिद्धी योग असून चंद्रबळ नसेल तर कार्य करायचे की नाही याचे उत्तर शास्त्रकार देत नाहीत.
थोडक्यात मुद्दा असा की नियमांची सुट्सुटीत उतरंड (heirarchy) उपलब्ध नाही.
सन १९११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मोघ्यांच्याच ज्योतिर्मयूख या ग्रंथातील उदाहरण घ्यायचे झाले तर पृ ४० व ४१ वर काही योग सांगितले आहेत. ते वाचून भरपूर करमणूक होते. "गुरुवारी पुष्यनक्षत्राच्या योगाने झालेला अमृतसिद्धि योग विवाहास वर्ज्य करावा. शनिवारी रोहिणी नक्षत्रामुळे होणारा अमृतसिद्धि योग प्रयाणास वर्ज्य करावा आणि मंगळवारी अश्विनीनक्षत्र आल्याने जो अमृतसिद्धि योग होतो तो गृहप्रवेशास वर्ज्य मानावा. कारण हे योग अत्यंत निंद्य मानिलेले आहेत". म्हणजे आता बघा की, एखाद्या दिवशी चंद्रबल आहे पण निंद्य अमृतसिद्धि असेल तर काय करायचे याचा खुलासा शास्त्रकारांनी केलेला नाही.
भारतीय ज्योतिषातील नियम आणि अपवाद हे मारूतीच्या शेपटाप्रमाणे अंतरहित आहेत. मला तर कधी कधी पुरोहितांचे फाजिल स्तोम वाढविण्याकरता ते निर्माण करण्यात आले असावेत अशीही शंका येते. जेवढी गुंतागुंत जास्त तेव्हढया जातकाच्या भाबडेपणाचा फायदा घेण्याच्या संधी जास्त (ज्याप्रमाणे कायद्यातील गुंतागुंत वकीलांची पोटे भरते त्यातलाच प्रकार)...असो.
या लेखाच्या पुढच्या भागात आधुनिक मुहूर्त कल्पनेचा परिचय मी सोदाहरण करून देईन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा