रविवार, २९ एप्रिल, २०१२

भाकीते करण्याचे ’ग्राफीकल एफिमेरीस’ (आलेखी-पंचांग) तंत्र



एबर्टिनने मध्यबिंदू तंत्राबरोबर ज्योतिषात आणखी एक मोलाची भर घातली. याला पाश्चात्य ज्योतिषात ’ग्राफीकल एफिमेरीस’ असे संबोधले जाते. मराठीत आलेखी-पंचांग ही संज्ञा या तंत्रासाठी योग्य ठरेल. या तंत्राचा उपयोग विशिष्ट कालावधीतील ग्रहांची भ्रमणे एखाद्या पत्रिकेशी कशी interact करतात याची एकत्रित कल्पना यावी यासाठी केला जातो. पारंपरिक पंचागात ग्रहांच्या स्थितीची कोष्टके दिली असतात. पण पारंपरिक पंचागातील ही मांडणी  एखाद्या पत्रिकेत गोचर भ्रमणांचे होणारे योग एकत्रित पणे तपासण्यास उपयोगी नसते. भाकीतात अचूकता आणण्यासाठी गोचर भ्रमणांचे होणारे योग एकत्रित पणे तपासणे आवश्यक ठरते. तसेच समकक्ष (equivalent) योगांचा एकत्रित अभ्यास ’ग्राफीकल एफिमेरीस’ मध्ये चटकन करता येतो.

आलेखी-पंचागात इष्ट कालावधी साठी उभ्या अक्षावर ० ते ३६०, ० ते १८०, ० ते १२० किंवा ० ते ९० अंश दर्शवले जातात. आणि आडव्या अक्षावर काल दर्शवला जातो. इष्ट कालावधी एक वर्षाचा असेल तर आडव्या अक्षाचे १२ महिन्यांसाठी १२ भाग केले जातात. सोयीचे एकक घेउन दररोज  किंवा विशिष्ट अंतराने ग्रहांचे बदलते अंश बिंदू स्थापून दाखवले जातात. आपल्याला हव्या त्या ग्रहांसाठी ही प्रक्रिया पार पडली की जो आलेख तयार होतो, तो आलेख  विशिष्ट कालावधीचे ’ग्राफीकल एफिमेरीस’ असते.

खाली उदाहरण म्हणून मंगळ आणि गुरुचे भ्रमण सन २०१२ करता कसे दिसेल ते दिले आहे. याशिवाय अमावस्या-पौर्णिमां पण या आलेखात दर्शविलेल्या आहेत.



या आलेखावर नजर टाकली असता असे लक्षात येईल की -

  • मार्च २०१२ मध्ये मंगळ-पौर्णिमेची
  • मे २०१२ मध्ये गुरु -सूर्यग्रहणाची अमावस्या  यांची युति होते .  ही अमावस्या मोठ्या आपत्तीला (भूकंप वगैरे) आमंत्रण देणारी ठरावी. प्रभाव काल +/-५ दिवस.

  • नोव्हेम्बर २०१२ मध्ये गुरु- चंद्र्ग्रहणाची पौर्णिमा यांची युति होते. (  ही  पौर्णिमा मोठ्या आपत्तीला (भूकंप वगैरे) आमंत्रण देणारी ठरावी. प्रभाव काल +/-५ दिवस )



हे सर्व फलिताच्या दृष्टीने जबरदस्त योग आहेत. पारंपरिक पंचागात अशी एकत्रित माहिती न मिळाल्याने आगामी काळाचा विचार करून अंदाज बांधण्यात चूका होण्यास भरपूर वाव असतो.


आता अशी आरेखित केलेली भ्रमणे जातकाच्य़ा पत्रिकेशी कशी interact करतात हे तपासण्यासाठी काय करतात हे पाहूया. यासाठी आलेखी-पंचागात उजवीकडे जातकाच्या पत्रिकेतील ग्रह त्यांच्या अंशांप्रमाणे उभे मांडतात. असा ग्रह मांडल्यानंतर कालाच्या अक्षाला समांतर अशी एक रेषा काढतात. पत्रिकेतल्या जेव्हढ्या ग्रहांचा विचार इष्ट कालावधीसाठी करायचा तेव्हढ्या ग्रहांची भ्रमणे अशा स्वरूपात मांडली की आलेखी-पंचांग खाली दिल्या प्रमाणे दिसते.


उदाहरण म्हणून मी गुरु, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लुटो आदि ग्रहांची सन २०१२ मधिल भ्रमणे घेतली आहेत. शिवाय या कालावधीतील ग्रहणे आणि अमावस्या-पौर्णिमां पण यात मांडल्या आहेत. उजवी कडे मांडलेले ग्रह श्री अमिताभ बच्चन यांच्या पत्रिकेतील आहेत. ते सायन राशी चक्रानुसार आहेत. या आलेखावर नजर टाकली तर असे लक्षात येते की सन २०१२ मधिल दोन ग्रहणे (मे आणि नोव्हेम्बर) श्री अमिताभ बच्चन यांच्या हर्षल आणि शनिला सक्रिय करतात. शिवाय त्यांची जन्मवेळ जर बरोबर असेल तर जन्मचंद्र शनीच्या भ्रमणाखाली येतो. माझ्या अंदाजानुसार मेपासून पुढचा काळ श्री  बच्चन यांना जास्त त्रासदायक ठरू शकतो.


पूर्वी आलेखी-पंचांग हाताने तयार करत असत आता संगणकामुळे हव्या त्या कालावधीसाठी असे पंचांग  चुटकीसरशी तयार करता येते. (माझ्या कडे असलेल्या Janus 4.3 या सॉफ्टवेअरमध्ये या सर्व सोयी आहेत).  ग्रहयोगांच्या एकत्रित आणि समग्र अभ्यासास फार मोठी मदत या तंत्रामुळे होते.




शनिवार, २१ एप्रिल, २०१२

इकडचं तिकडचं...


आजच माझ्याकडे आलेल्या जातकांनी मला एका  तान्ह्या मुलीची पत्रिका कराल का? अशी पृच्छा केली. अधूनमधून हा प्रश्न मला केला जातो आणि अशा विनंतीला मी नम्रपणे नकार देतो. खरं तर यात माझेच आर्थिक नुकसान आहे. पण काही तत्त्वे पाळायचीच हा निर्धार असल्याने, मला असे नुकसान झालेले चालते.

तान्ह्या मुलांची पत्रिका करू नका असे सांगण्यामागे माझी निश्चित अशी कारणे आहेत. केवळ तान्ह्याच नाही तर २० वर्षांपर्यंत आणि सत्तरीनंतर (काही अपवाद वगळता) पत्रिका बघू नये असे माझे  स्पष्ट मत आहे. याची कारणे अशी-

विशीपर्यंत व्यक्तीची स्वयंनिर्णयाची क्षमता पूर्णपणे विकास पावलेली नसते. सहसा आईवडिलांवर मुले अवलंबून असतात. सत्तरीनंतर तब्येत ठणठणीत नसेल तर हळुहळु परावलंबित्व यायला सुरुवात होते. अनेक इच्छाना मुरड घालावी लागते. मनमुरादपणे वानप्रस्थाश्रमाचा काल व्यतीत करणे सर्वच ज्येष्ठाना शक्य असते नाही. थोडक्यात या परावलंबीत्वामुळे  एकंदरच संधी आणि निर्णय यावर मर्यादा असतात/यायला लागतात.

सांगायचे तात्पर्य असे की २० ते ७० या मधल्या काळात, सर्वसाधारणपणे स्वयंनिर्णयाचा हक्क बजावू शकणारी व्यक्तीच वेगवेगळ्या शक्यता/संधीना विवेकाने प्रतिसाद देऊ शकते. हे परावलंबी व्यक्तींच्या बाबतीत होऊ शकत नाही. पत्रिका ही केवळ शक्यता दाखवत असल्याने बंदिस्त आयुष्य जगणार्‍या व्यक्तींच्या आयुष्यात या शक्यता प्रत्यक्षात  येऊ शकत नाहीत.

दूसरा मुद्दा असा की पत्रिकेवरून काही ज्योतिषी अशी भाकीते करतात की मुले किंवा ज्येष्ठ यांच्या जीवनावर अशा भाकीतांची दाट छाया पडते. याचा अत्यंत मनस्तापदायक अनुभव भारतीय ज्योतिषांकडून मला स्वत:ला आलेला आहे. (मला वाहनापासून धोका सांगितल्यामुळे मला वयाच्या २३व्या वर्षापर्यंत सायकल चालवायला घरातून परवानगी मिळाली नाही. कल्पना येण्यासाठी मी माझा फक्त एकच अनुभव इथं सांगितला).

तेव्हा घरात नवीन पाहूणा आला तर ज्योतिषाकडे धावत सुटू नका...

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

अमिताभ बच्चन : भाकीताचा पडताळा

मी २० फेब्रुवारीच्या खालील पोस्ट मध्ये एप्रिल २०१२ मध्ये श्री अमिताभ बच्चन यांचा पोटाचा विकार एप्रिल २०१२ मध्ये बळावेल असे भाकीत केले होते.
http://rajeev-upadhye.blogspot.in/2012/02/blog-post_7074.html

वृत्तपत्रातील ताज्या बातम्यावरून हे भाकीत खरे ठरले आहे असे दिसते.
http://www.hindustantimes.com/Entertainment/Tabloid/Big-B-blogs-about-pain-gets-taken-aback-by-media-attention/Article1-838381.aspx

माझ्या ब्लॉगचे एक वाचक आणि माझे कॉलेज मित्र श्री मंदार कुलकर्णी यांनी ते माझ्या निदर्शनास आणुन दिल्याबद्दल त्यांचे आभार!

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

दशा पद्धतीबद्दल माझे काही आक्षेप

भारतीय ज्योतिषात जातकाच्या पत्रिकेतल्या एखाद्या घटनेचा कालनिर्णय करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या दशा आणि महादशा मला खटकतात. मी माझ्या प्रॅक्टीसमध्ये त्या वापरत नाही. "ऋषीमुनीना जास्त अक्कल होती" या गृहीतकावर ठाम श्रद्धा असणारी मंडळी मला शिव्या देतील आणि त्या झेलायची माझी आनंदाने तयारी आहे.

या दशा पद्धतीचा शोध घेत असताना मला अशी माहिती कळली की ४० पेक्षा अधिक दशापद्धती अस्तित्वात आहेत. पण विंशोत्तरी दशा ज्योतिषी अधिक वापरतात. म्हणजे वेदनाशामक ओषधे अनेक उपलब्ध आहेत पण ब्रुफेन जास्त वापरले जाते. पण ब्रुफेन परिणामकारक ठरत नाही तेव्हा डॉक्टर इतर पर्यायांचा विचार करतात. तसा (भारतीय) ज्योतिषी इतर पर्यायांचा विचार करताना दिसत नाहीत.

पण मला जो मुद्दा मांडायचा आहे तो वेगळाच आहे. दशा पद्धतीमध्ये ज्या क्रमाने दशा येतात तो क्रम कसा व का अस्तित्वात आला आणि दशांच्या आवर्तनाचा कालावधी कसा निश्चित केला गेला आहे, याबद्दल कोणीच कुठे बोलताना दिसत नाही. म्हणजे आहे हे असे आहे, पटलं तर बघा. अशातला प्रकार. ज्योतिषाला शास्त्र म्हणून प्रतिष्ठा मिळायला ज्या अडचणी येतात, त्यापैकी ही एक.

दूसरा मुद्दा असा की जास्त अक्कल असणारे हे शास्त्रकार आज जर पुनर्जन्म घेऊन परत जन्माला आले तर या दशा पद्धती आहेत तशा स्वीकारतील की त्यात सुधारणा करतील? या सुधारणा करताना ते तर्काचा आणि आधुनिक साधनांचा आधार घेतील की आपापल्या लहरीपणे करतील? हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण म्हणजे हर्षल, नेप्च्यून आणि प्लुटो या अलिकडे सापडलेल्या ग्रहांचा दशा पद्धतीत अंतर्भाव करायचा कोणताही प्रयत्न किंवा विचार झाल्याचे मला तरी ठाउक नाही. ज्या हवामान खात्याचे अंदाज आपण चेष्टेवारी नेतो ते हवामान खाते सुद्धा त्यांच्या वापरातील मॉडेलमध्ये कालानुरुप बदल करत असते. डॉक्टर सुद्धा ब्रुफेनचा उपयोग होत नसेल तर वेगळे पर्याय शोधतात. "तुम्ही आणि तुमची डोकेदुखी" म्हणून सोडून देत नाहीत. कोणतही उपयुक्त मॉडेल अथवा डिझाइन हे विस्तारक्षम असायलाच हवं...

सांगायचा मुद्दा एव्हढाच की दशापद्धत ही कल्पनाविलासावर आधारीत असून त्यात सुधारणेला वाव नाही कारण तिचा विस्तार कालानुरुप होऊ शकत नाही. आज अस्तित्वात असलेल्या ४०हून अधिक दशापद्धती अशा विस्तारक्षम मॉडेल मधून विकास पावल्या आहेत का, याचे उत्तर आत्ता तरी नाही असेच द्यावे लागेल.

मात्र गोचर पद्धतीवर आधारीत कालनिर्णय करताना त्यात कालानुरुप मूळ गृहितकांशी सुसंगत असा विस्तार झालेला आहे कारण हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांच्या भ्रमणांचा अंतर्भाव त्यात झालेला आहे. गोचर भ्रमणांवर आधारीत कालनिर्णय हा कल्पनाविलासावर आधारित कालनिर्णय नाही.

तेव्हा "ऋषीमुनीना जास्त अक्कल होती" असा युक्तीवाद कोणी करायला लागला तर त्यात किती तथ्य आहे हे कळणे तुम्हाला फारसे अवघड वाटायला नको.