शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २००८

ऐशी तैशी - स्त्रीमुक्तीची आणि मातृत्वाची

माझ्या परिचयाच्या एका वकीलीण बाईंशी एकदा सहज गप्पा मारता मारता ऐकायला
मिळालेली एका मुक्त आणि कर्तबगार मुलीची ही रंजक कथा...

ही मुक्त स्त्री अतिशय हूषार आणि त्यामुळे उच्चविद्याविभूषित होती. साहजिकच या
सर्वाला साजेल अशी गलेलठ्ठ पगाराची नोकरी पण तीला होती. याच नोकरीत यथावकाश
तिच्याच एका सहका‌र्‍याशी झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन त्यांचे लग्न
ठरले आणि थाटामाटात पार पडले.

त्या दोघांचा झक्क असा राजाराणीचा संसार सुरू झाला. रोज सकाळी दोघे एकत्र बाहेर
पडत, सकाळचे जेवण दोघे ‍ऑफिसातच घेत. संध्याकाळी कामाच्या रगाड्यानुसार वेळी
अवेळी फ्लॅटवर केवळ झोपण्यासाठी परत येत.

यात मोठा चमत्काराचा भाग असा की थोड्याच दिवसानी या राजाराणीला बाळाच्या
आगमनाची चाहूल लागली आणि बाळाचे आगमन झाले तेव्हा मात्र आपल्या मुक्त आणि
कर्तबगार नायिकेच्या घोड्दौडीला अचानक लगाम बसला. बाळ थोडे मोठे झाले तसे
त्याच्या आईला मात्र स्वस्थ बसवेना. Customer Satisfaction चा घोष आणि
डेडलाईनला लोंबकळणारी बढतीची गाजरं राजाराणीला खुणावू लागली. जीवाची घालमेल
जेव्हा फारच वाढली तेव्हा मात्र त्या मातापित्यानी आपल्या सहा महिन्याच्या
बाळाला पाळणा घरात ठेवायचा नि‍र्णय घेतला. खुप आटापिटा करून एक मनासारखे पण
घरापासून थोडे दूर पाळणाघर त्यांना मिळाले. सकाळी पाच-साडेपाच वाजता बाहेर पडून
बाळाला पाळणाघरात सोडायचे, मग जिम करून ऑफिसात जायचे आणि येताना नउ वाजता
बाळाला घ्यायला जायचे असा नेम चालू झाला.

पण हे चक्र फार दिवस टिकणार नव्हते... बाळ थोडे मोठे झाले आणी एक विचित्र
समस्या निर्माण झाली.

दिवसभर पाळणाघरात राहिल्यामुळे फक्त रात्री आपल्याला घेऊन जाणारे राजाराणी आपले
कॊण हे काही त्याला कळेना. ते आपल्याला घरी नेतात आणि मग एसी लावून लगेच झोपून
का जातात हे त्याला कळेना. बाळ थोडे आणखी मोठे झाले तेव्हा मात्र त्याने
थयथयाट करून या प्रकाराचा निषेध नोंदवायला सुरूवात केली. आता मात्र राजाराणीला
कळले की कुठेतरी काहीतरी चुकतय. मात्र प्रश्न गंभीर होऊ लागल्यावर छातीवर दगड
ठेवून त्या कर्तबगार माउलीने नोकरीचा राजीनामा दिला.

Customer satisfaction ची दमदार आह्वाने झेलणारी ही मुक्त आणि कर्तबगार
स्त्री पॊटच्या गोळ्याचे संगोपन करतांना ठेचकाळू लागली, चिडचिडू लागली. सहन
होईना तेव्हा बाळाचा आणि मातृत्वाचा तिरस्कार करू लागली... आणि मग ... ही गोष्ट इथेच संपली.

रविवार, ३ फेब्रुवारी, २००८

<<< एक कोडे >>>

एक कोडे

आधुनिक मानवाच्या काही श्रद्धा मला नेहेमी कोड्यात टाकतात. याचे मला कधी हसू
येते तर कधी त्यांची कीव करावीशी वाटते. उदाहरणच सांगायचे झाले तर मानवाची इतर
प्राणी जगतापासून स्वत:ला वेगळे ठेवण्याची धडपड... आधुनिक मनुष्यप्राणी स्वत:ला
इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ समजतो. या श्रेष्ठत्वाचे तो अनेक त‍र्हांनी समर्थन
करतो. हे श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी अनेक भल्याबु‍र्‍या मार्गांचा अवलंब आजवर
त्याने केला आहे. माणसाचा 'विकास' पावलेला मेंदू हा या समर्थनाचा मुख्य आधार
आहे.

या विकास पावलेल्या मेंदूने प्रश्न सोडवले किती आणि निर्माण केले किती? असा जर
शोध घ्यायचा प्रयत्न केला तर प्रामाणिकपणे उत्तरे देणे अनेकांना कठीण जाईल.
उदाहरण जर घ्यायचे झाले तर धार्मिक तेढीचे घेता येईल. माणसाचा विकास पावलेला
मेंदू युद्ध, दहशतवाद, मूलतत्त्ववाद हे प्रश्न अजिबात हाताळू शकत नाही. आज
कुणालाही दुर्धर आजारांनी ग्रासलेले असले तर आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध
आहेत. पण ते वेळेवर मिळतील कि नाही याची खात्री देता येत नाही. आणि जर ते
मिळालेच तर ते उपचारच जीवावर उठतील का हे पण सांगता येणार नाही. मुंबईच्या
लोकल्सना बॉंब स्फ़ोटापासून कुणीही वाचवू शकत नाही किंवा एखाद्या विमानाचे अपहरण
होईल का हे पण कुणाला सांगता येणार नाही.

थोड्क्यात सांगायचे झाले तर आजवर सतावणा‍र्‍या प्रश्नांची जुजबी आणि तात्पुरती
उत्तरे सापडली की माणसाचा विकास पावलेला मेंदू सुखावतो. हे प्रश्न ज्यांना कधिच
सतावणार नाहीत अशा अलिप्तपणे जगणार्‍या मनुष्येतर प्राण्यांना मात्र तॊ हीन
लेखतो. कारण मला वाटत की माणसाचं मनुष्यत्त्व प्रश्न निर्माण करण्यात अडकलं
आहे. आता हेच बघा ना, मनुष्येतर प्राण्यांचे मूळ प्रश्न - आहार निद्रा मैथुन -
हे त्यांच्या मेंदूचा विकास न पावल्याने सीमित राहिले आहेत.


आता मला हे सांगा आपल्या अस्तित्वाचे प्रश्न सीमित असणं हे लक्षण श्रेष्ठपणाचे
की भ्रष्टपणाचे? विकासाचे की अधोगतीचे? या प्रश्नाचे उत्तर ठाउक असून दिले
नाहीत तर तुमच्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुमच्याच पायाशी लोळू लागतील...

राजीव उपाध्ये
-------------------------
http://rajeev-upadhye.blogspot.com/
www.yuyutsu.biz
-------------------------

शनिवार, २ फेब्रुवारी, २००८

<< श्री. अच्युत गोडबोले यांस>>

श्री. अच्युत गोडबोले यांस,
स. न. वि. वि.

आपले दि. २३ डिसेंबर २००७ च्या लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेले 'वेगळे एन आर आय'
या शीर्षकाखालील लिखाण वाचले
(http://www.loksatta.com/daily/20071223/lr01.htm). तुमच्या (आणि
तुमच्याविषयीच्या) बर्‍याच लिखाणातून तुम्ही वारंवार, एसेस्सी बोर्डापासून ते
युनिव्हर्सिटी आणि आयायटी पर्यंत अनेक रॅन्क्स आणि पदकं मिळवून अमेरीकेत
स्थायिक न झाल्याचा उल्लेख येतो. याशिवाय आपण कितीवेळा परदेश प्रवास केलात याचा
पण उल्लेख बर्‍याच वेळा येतो. ९४-९५ च्या सुमारास वाचलेल्या एका लेखात आपला
परिचय '५२ वेळा परदेशप्रवास केलेले' असा होता. २३ डिसेंबर २००७ च्या लेखात
तुमचा परदेशप्रवास १००-१५० वेळा झाला असल्याचा उल्लेख आहे.

या गोष्टीचा मुद्दाम निर्देश करण्याचे कारण असे अमुक अमुक इतक्या वेळा
परदेशप्रवास करणारे, एसेस्सी बोर्डापासून ते युनिव्हर्सिटी आणि आयायटी पर्यंत
अनेक रॅन्क्स आणि पदकं मिळवून अमेरीकेत स्थायिक न होणारे श्री. अच्युत गोडबोले
असा उल्लेख मनात फक्त आता किळस निर्माण करतो. वास्तविक आयायटी मध्येच असे
असंख्य ईश्वराचे लाडके पुत्र दरवर्षी निर्माण होतात. पण कुणीही आपण केलेल्या
परदेशवार्‍यांची अशी स्वत:च जाहिरात
केल्याचे ठाऊक नाही. मी ज्यांच्याकडे ध्रुपद गायकीची ओळख करून घेतली त्या
श्री. उदय भवाळकरांनी परदेशात अनेकवेळा सवाइगंधर्वमहोत्सवापेक्षा झगमटात
अनेकपट मोठ्या आणि आळंदीला मानवीविष्ठेच्या घमघमाटात वारकर्‍यांसारख्या
अडाणी, अशा दोन टोकांच्या श्रोतृवर्गापुढे, तितक्याच तल्लिन्तेने गायन केले
आहे. पण ते कधिही याचा बडेजाव मिरवताना पाहिले नाही.

अशी अनेक उदाहरणे या ठिकाणी देता येतील. या गोष्टीची आपण गंभीर दखल घ्यावी ही
विनंति...

आपला

राजीव उपाध्ये

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २००८

सूर्य ग्रहण - दिनांक ७ फेब्रुवारी २००८


सूर्य ग्रहण - दिनांक ७ फेब्रुवारी २००८

दिनांक ७ फेब्रुवारी रोजी २००८ या वर्षातील १ले सूर्य ग्रहण असून ते सायन कुंभ राशिमध्ये होत असून ते १७-४० अंशावर होत आहे. निरयन राशिचक्राप्रमाणे ते २२-५० अंशावर मकर राशिमध्ये पडत आहे. हे ग्रहण फक्त दक्षिण गोलार्धात दिसणार असून सोबतच्या आकृतीमध्ये ग्रहणाचा मार्ग दाखविला आहे.

भारतीय समाजात अमावस्या आणि पौर्णिमा या खगोलशास्त्रीय घटनांना असाधारण मह्त्त्व आहे। अमावस्या ही काळोखी असल्यामुळे अशुभ आणि पौर्णिमा ही शुभ्र चंद्रप्रकाशामुळे शुभ अशी एक भाबडी समजुत आपल्या सर्वांच्या मनात घर करून असते। पण शुभ आणि अशुभाच्या कल्पना संस्कृतीजन्य असतात। वास्तविक अमावस्येला चंद्र भ्रमणाचे एक आवर्तन संपून दूसरे चालू होते। पौर्णिमेला या आवर्तनाचा परमोच्च बिन्दु येतो - कारण चंद्र,पृथ्वी आणि रवि एकमेकांशी १८० अंशाचा कोन म्हणजेच प्रतियुती करतात. म्हणजेच अमावस्या एक नवी सुरुवात असते. केवळ निशाचरांना प्रिय म्हणून अमावस्या वाईट मानणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे की रात्रीच्या काळोखात सृष्टीतील बहुसंख्य जीवांचे सर्जनाचे, श्रमपरिहाराचे कार्य चालते. त्याकडे दूर्लक्ष करून केवळ प्रकाशाला मानवी मनात अतिशय मह्त्त्व असल्याने प्रतिपदा हा आरंभबिंदू आणि म्हणुन ती शुभ मानणे माझ्यामते हा शुद्ध मूर्खपणा आहे.

हे सर्व लिहिण्याचे कारण असे की आधुनिक ज्योतिषात सर्व अमावस्या अशुभ नसतात आणि सर्व पौर्णिमा शुभ नसतात. असो.

या ग्रहणाची कुंडली मांडली असता हे ग्रहण गोचर नेपच्युनशी जोरदार युती करत आहे. याशिवाय हे ग्रहण गोचर मंगळाशी नवपंचम योग करत असून मंगळाचे प्लुटॊ आणि हर्षल या दोन ग्रहांबरोबर प्रतियुति आणि केन्द्र योग करत आहे. हे सर्व योग फलिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असून सर्वसाधारणपणे आयुष्यात मोठी स्थित्यंतरे दाखवतात. सायन कुंभ, सिंह, वृषभ या राशीमध्ये ज्यांच्या पत्रिकेत १५ ते १८ अंशात लग्न, दशमभाव आरंभबिंदू, चंद्र व रवि आणि या ग्रहांचे शनी, हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांशी अंशात्मक युती, प्रतियुती, केंद्र, अर्धकेंद्र योग होत असतील अशा व्यक्तीना या ग्रहणाची त्रासदायक फळे अनुभवास येउ शकतात. लग्न, दशमभाव आरंभबिंदू, चंद्र व रवि यांनी केलेल्या योगांच्या प्रतीनुसार हे अनुभव कमी जास्त प्रमाणात येतात.

या ग्रहणात ठळकपणे गुंफले गेलेले मंगळ, हर्षल आणि प्लुटॊ हे ग्रह उर्जेच्या विविध रुपांचे प्रतिक आहेत. तर नेपच्यून हा ग्रह कमकुवतपणा आणणारा आणि वास्तवाचे भान सोडायला लावणारा ग्रह आहे. या गोचर ग्रहांचे कुंडलीतील ग्रहांशी होणारे योग - विशेषत: युती, प्रतियुती आणि केंद्र, नवपंचम - फलिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात.

पण ही अमावस्या पूर्णपणे अशुभ आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे ज्यांच्या पत्रिकेमध्ये १५ ते १८ अंशात लग्न, दशमभाव आरंभबिंदू, चंद्र, रवि, बुध, शुक्र, गुरु हे ग्रह सायन कुंभ, मिथुन आणि तूळ राशीत असून नवपंचम अथवा लाभयोग करत असतील तर हे ग्रहण शुभ ठरण्याची शक्यता आहे.