मी पूर्वी सप्तपदी विधीच्या आधुनिक काळातील अव्यवहार्यतेबद्दल पुरुषांची बाजु घेऊन लिहीले होते. त्याला बराच काळ लोटला आहे आणि तेव्हा उडालेली धूळ आता खाली बसली आहे. तरीही मी दरम्यानच्या काळात माझी भूमिका परत-परत तपासत होतो. ही भूमिका तपासत असताना काही गोष्टी नव्याने लक्षात आल्या...
स्त्री बद्ध असताना, स्त्री हे परक्याचे धन अशी समजुत समाजात प्रचलित असताना पुरुषाला जबाबदारीची जाण यावी म्हणून ’नातिचरामि’चा उच्चार करणे ही अपेक्षा स्वाभाविक ठरते. पुरुषवंशाची वृद्धी आणि स्थैर्य यासाठी समर्पण करून स्त्रीने माहेरचे पाश तोडणे हे समाजाला अपेक्षित होते. त्यामुळे विवाह विधींच्या तपशीलात डॊकावले तर समाजाची गरज ठळकपणे दिसते.
पण मी माझ्या मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे आजची स्त्री मुक्त आहे किंवा मुक्त होऊ पहात आहे. पूर्वी डझन-अर्धा डझन मुलं होणे हे ’नॉर्मल’ असताना ’स्त्री परक्याचे धन’ ही कल्पना समाज स्वीकारू शकत होता. आज हे शक्य आहे का? मला वाटते नाही...
एकेकटी मुले असणारी कुटुंबे हे आज सर्वत्र दिसणारे चित्र आहे. अशा वेळेस जर एकुलती एक मुलगी असेल, त्यात ती शिकलेली आणि कमावती असेल तर ती मुक्त किंवा मुक्त होऊ पहाणारी स्त्री "परक्याचे धन" मानायला कितीजणी (किंवा त्यांचे आईबाप) तयार होतील?
अशा परिस्थितीमध्ये ’माहेरचे पाश’ स्त्रीने तोडायची अपेक्षा ठेवणे हे पण अव्यवहार्यच ठरते. असो...
आता आपण ’नाते’ ही संकल्पना तपासुन पाहु. सुरुवातीला नात्याची व्याख्या करणे योग्य ठरेल - दोन व्यक्तीमधला व्यवहार (अथवा संबंध) त्या कोणत्याही एका किंवा दोन्ही व्यक्तींची तात्कालिक अथवा दीर्घकालीन कोणतीही गरज भागवत असेल तर त्या दोन व्यक्तीमध्ये तात्कालिक अथवा दीर्घकालीन नाते असते. यातील काही नात्याना मित्र, मालक-नोकर, आईबाप, नवरा-बायको अशी नावे मिळालेली आहेत तर कदाचित काही नात्याना अशी नावे नसतील.
दीर्घकालीन नात्याना स्थैर्य लाभावे म्हणुन जबाबदारीचे भान यावे यासाठी आकारीक/कायदेशीर करार, शपथा या अपरिहार्य ठरतात. शपथांचे/करारांचे गांभीर्य टिकावे म्हणुन त्या मोडणे दंडनीय ठरते.
या सर्व पार्श्वभूमीवर नवरा-बायकोचे नाते दीर्घकाळ टिकावे किंवा त्या नात्यात प्रवेश करताना जबाबदारीची जाणीव परस्पराना अधिक थेटपणे व्हावी याठी सुस्पष्ट "शपथ" घेतली जावी असे मला वाटते.
मला सध्याच्या बदलत्या संदर्भात "मी अमुक-तमुक चा पति-पत्नी म्हणुन स्वीकार करतो. मी पति-पत्नी म्हणुन अमुक-तमुकच्या शारिरीक, मानसिक, भावनिक, बौद्धिक गरजा भागविण्याची जबाबदारी घेतो/घेते."अशी शपथ घेणे जास्त योग्य ठरेल.
मला असं वाटतं अशा प्रकारच्या शपथेने "लग्न" समाजात जास्त गांभीर्याने घेतले जाईल. कृपया हे अभिप्रेत असतच असा प्रतिवाद करु नये. देशाच्या घटनेवर विश्वास आहे हे गृहित धरणं आणि तसे ऍसर्ट करणे यात बराच गुणात्मक फरक आहे.