गुरुवार, ३० जुलै, २००९

आजच्या पुरुषांसाठी सप्तपदी धोकादायक का आहे?

हिंदू विवाह कायद्यात लग्न कायदेशीर ठरण्यासाठी आवश्यक मानला गेलेला सप्तपदी हा विधी आवश्यक आहे का? हा प्रश्न मला अनेक वर्षे सतावत आहे. आणि सध्या तरी माझे असे मत आहे की हा विधी व त्याच्या अभिप्रेत अर्थाकडे गंभीरतेने बघितले तर नक्कीच धोकादायक आहे. विशेषत: पुरुषांसाठी तो जास्त धोकादायक आहे.

सप्तपदी या विधीचा उगम झाला तेव्हाची सामाजिक परिस्थिती (लग्नसंस्था) आणी काळाच्या ओघात या विधीचे अस्तित्व टिकून राहणं हे मला खूप विसंगत वाटतं...फ्रिट्स स्टाल या लेखकाचे "रिच्युअल्स अँड मंत्राज- रूल्स विदाउट मीनिंग" नावाचे एक पुस्तक मोतीलाल बनारसीदास या प्रकाशकानी प्रसिद्ध केले आहे. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतले "रिच्युअल इज़ ट्रान्समिटेड नॉट ओन्ली विदाउट मीनिंग, बट ऑफन विदाउट लँग्वेज" हे वाक्य लक्षात घेतले तर सप्तपदी हा लग्नाला कायदेशीर 'पूर्णत्व' आणि 'अर्थ' देणारा विधी आजच्या काळात टाकाऊ का आहे ते समजायला मदत होईल.

पुरातन काळापासून ते अगदी परवा-परवा पर्यंत म्हणजे चॅनेल संस्कृती आपल्यावर येउन आदळे पर्यंत "स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर:" ही साक्षात्‌ अर्जुनाला पडलेली चिंता तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनात घट्टपणे रुतून बसली होती. यातील सर्वात गमतीचा भाग म्हणजे भगवंतानी "मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम्‌" असे पुढे एके ठिकाणी म्हणून (पर्यायाने वर्णसंकर पण आपल्याच अध्यक्षतेखाली चालतो) अशी स्वत:च कबुली दिली आहे. सांगायचे तात्पर्य असे की, वर्णसंकराची आणि अनौरस प्रजेच्या जबाबदारीची भीति यामुळे सप्तपदीच्या वेळी घेतली जाणारी नातिचरामिची शपथ अस्तित्वात आली असावी असा सर्वसाधारण तर्काला पटणारा कयास आपल्याला बांधता येतो.

मुळात लग्न म्हणजे काय? तर भारतापुरते बोलायचे झाले, तर असे सांगता येईल दोन भिन्न लिंगी व्यक्तीनी एकत्र राहण्याचा निर्णय घेणे आणि कामजीवन उपभोगून समाजाला मान्य अशा पद्धतीने प्रजोत्पादन करणे. मनुष्यप्राण्याखेरीज अन्य कोणत्याही समाजप्रिय प्राण्यात अशी कामजीवन सुरू करण्यासाठी सामाजिक मान्यता घेतली जात नाही. मनुष्यप्राण्याच्या बाळाना दीर्घकाळ संगोपनाची गरज असते. ही गरज योग्य तर्‍हेने पूर्ण व्हावी यासाठी संगोपनासाठी आवश्यक असलेल्या श्रमांची विभागणी नैसर्गिक रितीने म्हणजे 'गुणकर्म विभागश:' अशी झाली. अन्न गोळा करणे, शिकार करणे, शत्रुच्या हल्ल्यापासून आपल्या टोळीचे रक्षण करणे ही कामे पुरूषांच्याकडे आणि प्रजेचे संगोपन स्त्रीया करू लागल्या. शारिरीक ताकदीमध्ये पुरुषांच्या तुलनेत निसर्गत: कमी पडल्यामुळे चूल आणि मूल यांच्याशी 'बांधली गेलेली' कालची स्त्री पोषण-रक्षण करण्याची वस्तू बनली. हे बहूतेक सर्वांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे सर्वांना ठाउक असते. पण 'आजची स्त्री पुरुष-प्रधान व्यवस्थेचा बळी आहे' या घोषणाबाजीमध्ये वास्तव बर्‍याचवेळा दूर सारले जाते.

असो. आजची स्त्री मात्र पूर्ण वेगळी आहे. ती एक तर मुक्त आहे किंवा मुक्त होण्यासाठी धडपडत आहे, मग ती समाजाच्या कोणत्याही थरातील असो. या धडपडीचे मी जेव्हा त्र्ययस्थपणे निरीक्षण करतो तेव्हा मात्र ही धडपड, आटापिटा नैसर्गिक श्रमविभागणीच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी आहे का असा प्रश्न पडतो. बरं, स्त्री आज जेव्हा नैसर्गिक जबाबदार्‍याना लाथ मारून, झिडकारून काही मिळवायचा प्रयत्न करते तेव्हा तीच्या मुक्तीचा उदो-उदो होतो. पुरूषाने त्याची नैसर्गिक जबाबदारी झटकली किंवा ती पुरी करण्यात तो कमी पडला तर तो मात्र समाजाच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या छी-थूला आणि प्रसंगी शिक्षेला पात्र ठरतो.

नुकताच घडलेला एक प्रसंग. पुण्यात डॉक्टर मंडळीनी विवाहसंस्थेच्या भवितव्याविषयी आयोजित केलेल्या एका चर्चासत्राला उपस्थित राहिलो होतो. मंचावर काही वकील आणि काही डॉक्टर उपस्थित होते. त्यात एका वकीलीण बाईनी त्यांच्याकडच्या एका घटस्फोटासाठी आलेल्या (कोकणस्थ ब्राह्मण) मुलीची गोष्ट सांगितली. ही मुलगी घटस्फोटासाठी आपला अपत्यावरचा हक्क सोडायला तयार झाली होती. वकीलीण बाईना या मुलीचे मोठ्ठे कौतुक वाटले होते, कारण तिने मातृत्वाच्या हक्कावर पाणी सोडण्याचे औदार्य/धाडस(!) दाखवले (पण मातृत्वाची जबाबदारी तीने झटकली यात मात्र वकीलीण बाईना काहीही गैर वाटत नव्हते). ही़च बाजू उलटी असती म्हणजे एखाद्या पुरुषाने आपल्या अपत्यावरचा हक्क सोडायचा ठरवला तर मात्र संपूर्ण कायदे-यंत्रणा त्या पुरुषाला ओरबाडण्यासाठी, झोडपण्यासाठी खडबडून जागी झाली असती.

थोडक्यात सांगायचे झाले तर पुरुषाच्या प्रत्येक चूकीला समाज कठोरपणे शिक्षा करतो पण मुक्त स्त्रीच्या चुकीला (खुनासारखे अपवाद वगळता) कोणतीही शिक्षा नाही. मुक्त स्त्री कशालाही बांधिल नाही.

ज्या विधीना सद्यस्थितीमध्ये फारसा अर्थ नाही अशा विधीद्वारे विवाहाचे बंधन एखादा पुरुष जेव्हा स्वीकारतो, तेव्हा तो 'सप्तपदी' सारख्या विधीमुळे तो कोणते धोके स्वत:वर ओढवून घेतो याचा तटस्थपणे विचार प्रत्येक विवाहेच्छु पुरुषाकडून व्हावा असे मला वाटते.

१. पुनर्जन्म या कल्पनेला वैज्ञानिक आधार काही नाही. मनुष्यप्राणी निसर्गत: एकनिष्ठ राहण्यासाठी निर्माण झाला नाही. एकनिष्ठता ही समाजाने स्वीकारलेली कल्पना आहे. केवळ धार्मिक कल्पना म्हणून सातजन्म एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे कितपत योग्य आहे?

२. पुरूष जेव्हा त्याच्या भावनिक, शारिरीक गरजा पूर्ण न झाल्याने कुटुंबाची सीमारेषा ओलांडतो तेव्हा तो 'बाहेरख्याली' ठरतो. पण याच कारणांसाठी स्त्री जेव्हा कुटुंबाची सीमारेषा ओलांडते तेव्हा मात्र ती 'शोषित' असते. अशा स्त्री पासून वेगळे व्हायचे असले तरी तीच्या नवर्‍याला तीची पूर्ण व्यवस्था करून मगच वेगळे होता येते.

३. एखादी व्यक्ती एखाद्या समूहाचे सदस्यत्व जेव्हा स्वीकारते तेव्हा त्या समूहाचे नियम नवीन सद्स्यावर बंधनकारक असतात. पण आधुनिक मुक्त स्त्री मात्र याला अपवाद आहे. संपूर्ण कुटुम्बाने, शक्य असो वा नसो, तिच्या कलाने घेतले नाही तर 'छ्ळ झाला, छ्ळ झाला' म्हणून ऊर बडविण्यास मुक्त स्त्री मोकळी असते. इतकेच नव्हे तर कायदा पण तिच्या मदतीला पूर्ण ताकदीनीशी उभा राहतो. मुक्त स्त्री कपटी, ढोंगी, क्रूर असू शकते हे मात्र कायदा मानत नाही. तसं असते, 'मॅन इज गिल्टी अण्टील प्रुव्हन इनोसंट' हे तत्त्व मार्गदर्शक तत्त्व म्हणून कायद्याने स्वीकारले नसते.

४. एखादे लग्न परिचयोत्तर होत असेल तर ते पूर्ण विचारांती होत आहे असे मानून एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे तर्क-सुसंगत ठरते पण जेव्हा 'स्थळे बघून' विवाह जुळवले जातात तेव्हा आपण ज्या मुलीबरोबर सात जन्म एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणार आहोत ती मुलगी, विशेषत: कायदे एकतर्फी असताना, आपल्या जबाबदार्‍या पूर्ण पाडेल याची कोणतीही खात्री नसताना, पुरुषाने अशी शपथ घेणे हे आत्मघातकीपणाचे निदर्शक आहे, असेच माझे स्पष्ट मत आहे.

हिंदुविवाह कायद्यानुसार म्हणजे धार्मिक रितीरीवाजानुसार होणारे लग्न जेव्हा मोडते तेव्हा, कुणाला पटो अथवा न पटो पुरुषांचे लचके, कायद्याच्या मदतीने जास्त तोडले जातात. त्यासाठी सतराशेसाठ कायदेशीर मार्ग उपलब्ध असतात. कारण कायद्याच्या दृष्टीने तुम्ही अग्नी, देव, ब्राह्मण यांना साक्षी थेवून घेतलेली शपथ मोडत असता. याला एक महत्त्वाचा पर्याय आहे तो म्हणजे लग्न, स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली म्हणजे सह्या ठोकून करणे. यात तुम्ही जोडीदाराचा कायदेशीर पती अथवा पत्नी म्हणून स्वीकार केलेला असतो. कोणतीही शपथ यात नवरा-नवरीने घेतलेली नसते. खरं तर 'स्थळे बघून' होणार्‍या लग्नांसाठी हाच सर्वोत्तम पर्याय सद्यस्थितीमध्ये उपलब्ध आहे. पण समाजाच्या आणि कुटुंबाच्या दडपणामुळे हा पर्याय अजुनही तितकासा रूळलेला नाही.

थोडक्यात स्त्री खरोखर 'बद्ध' होती तेव्हा सप्तपदी या विधीला अर्थ होता, आजच्या संदर्भात हा विधी पुरुषांसाठी नक्कीच धोकादायक आहे.

मंगळवार, २१ जुलै, २००९

एक किस्सा - पोथीनिष्ठेच्या पराभवाचा

ही घटना एकदम खरीखुरी आहे...

झालं काय, काही महिन्यांपूर्वी MSEBच्या कृपेने चालू असलेल्या वीजेच्या चढ उतारामुले माझ्या ब्रॅन्डेड पीसीने मान टाकली. मी कंपनीला फोन केला आणि तक्रार नोंदविली. माझ्या तक्रारीची त्वरीत दखल घेउन कंपनीने त्यांच्या हार्ड-वेअर इंजिनिअरला माझ्याकडे पाठवले.

त्या इंजिनिअरने मशिनची पहाणी करून मला त्याचे निदान सांगितले. पीसीच्या मदर-बोर्ड वरील एक चिप बहूधा जळाली असावी. सर्विस सेंटरला मदर-बोर्ड नेउन खरे कारण तपासता येईल व खर्चाचा अंदाज देता येईल, असे त्याने मला सांगितले.

मला होकार देण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

दोन दिवसांनी कबुल केल्या प्रमाणे इंजिनिअरने दूरुस्त केलेला मदर-बोर्ड आणला. बिलाची रक्कम फार नसल्याने मी पण खुशीत होतो. दोन दिवस जगाशी संपर्क तुटल्यामुळे सैरभैर झाल्यासारखे झाले होते.

प्रथम मला त्या इंजिनिअरने मदर-बोर्ड वर कोणता भाग बदलला ते दाखवले. मदर-बोर्डला मेमरी चिप बसवल्या आणि एक एक करत इतर उपकरणे- म्हणजे हार्ड डिस्क, सीडी रायटर इ. बसवायला सुरुवात केली.

सर्व जोडणी झाल्यावर त्याने स्वीच ऑन केला. पण पीसीने डॊळे काही उघडले नाही. मला थोडा धीर धरणे भागच होते. करणार काय?

इंजिनिअरने पुन्हा मेन सप्लाय बंद करून सर्व केबल्स व्यवस्थित बसल्या आहेत याची खात्री केली आणि पुन्हा बटन ऑन केले.

पण पीसीने डॊळे काही उघडले नाहीत...

आता इंजिनिअरने बाह्या सरसावल्या. यावेळेला त्याने कोणती तरी केबल बदलायचे ठरवले. ती बदलून परत सर्व उपकरणांची जोडणी केली आणि बटन ऑन केले.

पण पीसीने डॊळे काही उघडले नाही...

मी एकंदर प्रकाराचा अंदाज घेउन त्या दिवशी योजलेले सर्व कौटुम्बिक कार्यक्रम रद्द करायचे ठरवले.

इंजिनिअरने आता पूर्ण एकाग्रतेने लढायचा निर्धार केला असावा. मी पण त्याला टेन्शन नको म्हणून हलक्या फुलक्या गप्पा मारायला सुरुवात केली. मधेच तो आशेने स्वीच ऑन करी.

पण काही केल्या पीसी डॊळे काही उघडेना...

होता होता रात्रीचे नउ वाजले. घरातले सर्व जण बाहेर जायचा कार्यक्रम रद्द झाल्याने नाराज होते. माझी मनस्थिती पण चमत्कारिक झाली होती. मी इंजिनिअरला दूसर्‍या दिवशी येण्याविषयी सुचवले.

त्याला हो म्हणण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

त्याने बहूधा मला बरे वाटावे म्हणून पुन्हा मदर-बोर्ड तपासून आणतो असे सांगितले. या पर्यायाला माझी काहीच हरकत नव्हती.

दूसरा दिवस शनिवार होता. नव्या हूरुपाने इंजिनिअरने कामाला सुरुवात केली. आज त्याने नव्या केबल्स आणल्या होत्या. peripheralsच्या काही कॉम्बिनेशन्स्ची नवी यादी कागदावर लिहून आणली होती. एकेक पर्याय पायरीपायरीने एलिमिनेट करायचा आणि पीसीला जिवंत करायचेच असे त्याने ठरवले होते. त्याच्याकडची ती पर्यायांची यादी (check list) बघून मी पण हादरलो. कारण सुट्टी वाया जायची शक्यता होती. पण पीसी जिवंत होणे आता आवश्यक होते. मी सदस्य असलेल्या एका याहू ग्रुपवर लावलेली (वैचारिक) आग माझ्या अनुपस्थितीत विझून जायची शक्यता होती. रणछॊडदास म्हणून माझी संभावना झाली असती तर ती मला खपली नसती.

तरी पण त्या इंजिनिअरने नियोजनबद्धरितीने चालू ठेवलेले प्रयत्न पाहून मला उतावीळ होऊन चालणार नव्हते. पण आज त्या इंजिनिअरचे तारे शुभ स्थानातून आणि शुभ दृष्टीने चमकत होते. एक हार्ड डिस्क आणि ५०० mb मेमरी या रचनेला पीसीने डोळे किलकिले केले. पीसी बूट होऊ लागला. इंजिनिअरला हायसे वाटले. त्याने मला हाक मारून हा चमत्कार दाखवला. मी पण थोडा सुखावलो.

पण घोडा मैदान अजून बरेच दूर होते. कारण अजून बरीच peripherals जोडायची शिल्लक होती. कारण पीसीने मान टाकायच्या अगोदर ती सर्व गुण्यागोविंदाने काम करत होती. मी नम्रपणे इंजिनिअरच्या ते लक्षात आणून दिले. इंजिनीअर मानेनेच हॊ म्हणून परत पीसीला भिडला...

त्याच वेळेस माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला. पण तो त्या इंजिनीअरला सांगायचे धारिष्ट्य माझ्यात नव्हते. ज्या विषयातले आपल्याला कळत नाही त्यातल्या समस्येला उपाय सूचवणे याला quackery म्हणतात असे मी अलिकडेच कुठे तरी वाचले होते. शिवाय आजवरच्या विज्ञानाचा इतिहास बघितला तर पोथिनिष्ठेला प्रतिभेने किंवा क्लृप्तीने जेव्हा जेव्हा टक्कर दिली आहे तेव्हा तेव्हा टक्कर देणार्‍या लोकांनी जबरदस्त किंमत मोजली आहे असेच दिसते. शिवाय मला हार्डवेअर मधले काही कळत नाही. म्हणून मी गप्प बसणे पसंत केले.

एव्हाना जवळ जवळ चार तास उलटले होते. मी आम्हा दोघांसाठी चहा केला. चहा पिताना इंजिनिअरच्या कपाळावर घामाचे थेंब जमून चमकताना दिसत होते. मी त्याला बोलते करण्यासाठी परत इकड्च्या गप्पा मारायला सुरुवात केली.

बोलता बोलता मी विचारले,

"ही सर्व कॉम्बिनेशन्स तपासून झाली का?"

"हो"

" मग आत काय करायचं?"

इंजिनिअरअने मला आता एक नवा पर्याय सुचवला. सर्वच्या सर्व कंप्युटर service centre मध्ये न्यायचा आणि तिथे सगळ्या गोष्टी परत तपासायच्या.

हा पर्याय मला तितकासा पटला नाही. कारण माझी हार्ड डिस्क तो घेउन जाणार म्हणजे बोंबला!

मी शेवटी त्याने केलेल्य प्रयत्नांचे भान ठेउन त्याला माझ्या डॊक्यात चमकून गेलेला विचार सांगायचे ठरवले.


" हे बघा! तुम्ही तुमच्याकडून तुमचे प्रयत्न करत आहात ते मी बघतोच आहे. पण माझ्यासाठी
म्हणून मला सुचलेला एक पर्याय तुम्ही ट्राय करावा असे मला वाटते. मला हा पर्याय का करावासा वाटतो याचे तुम्हाला पटेल असे कोणतेच स्पष्टीकरण माझ्याकडे नाही कारण मला हार्डवेअर मधले काही कळत नाही. पण तुमचा आणि माझा दोन दिवस बराच वेळ यात गेला आहे."

माझ्याकडे हताशपणे नजर टाकून 'हा काय आता सांगणार आहे' अशा आविर्भावात इंजिनिअरने एका बाजूला मान कलती करून होकारार्थी खांदे उडवले.

मी त्याला म्हटले,

" हे पहा हा पीसी मी बराच अपग्रेड केला आहे आणि तो टप्प्याटप्प्याने अपग्रेड केला आहे. असे करत असताना प्रत्येक टप्प्यावर तो व्यवस्थित काम करत होता."

इंजिनिअरने मानेनेच होकार दर्शवला.

"तेव्हा आपण त्याच क्रमाने तो असेंबल करत जाऊ आणि एक एक peripheral ऍड करत जाऊ."

इंजिनिअरला आता "हो" म्हणण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पण त्याच्या समृद्ध अनुभवविश्वाच्या पलिकडचा आणि तो पण हार्डवेअर मधले ओ की ठो न कळणार्‍या customer ने सुचवलेल्या पर्यायाबद्दलची नाखुषी त्याच्या चेहर्‍यावर मला स्पष्ट दिसत होती. पण तो हा प्रयत्न करायला तयार झाला होता.

मी त्याला ज्या क्रमाने पीसीचे अपग्रेडेशन झाले होते तो क्रम सांगितला. त्याने त्या क्रमाने एक एक peripheral जोडत असताना पीसी बूट होतो का ते बघितले आणि गम्मत म्हणजे तसे घडत गेले. माझा पीसी पूर्ण जिवंत झाला. या नव्या अनुभवाने इंजिनिअरच्या पोथीनिष्ठेला आणि आजवरच्या अनुभवाला एक धक्का बसला होता. थोडेसे ओशाळून का होईना त्याला ते स्वीकारणे भाग होते.

माझ्या अंत:प्रेरणा शाबूत असल्याचा अनुभव आल्याने मी पण सुखावला गेलो होतो.

मंगळवार, १४ जुलै, २००९

२२ जुलै २०००९ रोजी होणारे सूर्यग्रहण कुणाला त्रासदायक?

दिनांक २२ जुलै २०००९ रोजी होणारे सूर्यग्रहण खालील कालावधिमध्ये जन्मलेल्या व्यक्तीना कोणत्या ना कोणत्या स्वरुपात त्रासदायक ठरायची शक्यता आहे. मुळ पत्रिकेतील रविचंद्रादि ग्रह व त्यांनी केलेले योग यावर ग्रहणाच्या फळांची तीव्रता अवलंबून राहिल. तरी या व्यक्तीनी ग्रहणाच्या अलिकडे आणि पलीकडे कमीतकमी १५ दिवस कोणतेही धोका, धाडस शक्यतो करू नये आणि केल्यास आवश्यक ती काळजी घेउन मगच पावले टाकावीत.

जुलै १९४६
अप्रिल १९४७
ऑक्टोबर १९५३

ऑक्टोबर १९५४
फेब्रुअरी १९५५
जानेवारी- ऑक्टोबर १९५६
जुलै १९५७

मे १९६१
जन १९६२

एप्रिल १९६९
फेब्रुअरी १९७४
नोव्हे १९७४
मे- सप्टे १९७५
मे १९७६

फेब्रुअरी १९८३
नोव्हे १९८२
ऑगस्ट १९८३
ऑक्टोबर १९८३

शनिवार, ४ जुलै, २००९

परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची

परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची
(काही सत्य घटनांवर आधारीत)

शेवटी एकदाचा मॉन्सुन येऊन ठेपला आणि मला विद्यापीठात चालायला जायची हूक्की
आली. गाडी काढली आणि विद्यापीठ गाठले. छत्रपतींच्या पुतळ्याजवळ गाडी पार्क करून
बाहेर पडलो आणि बारीक तुषार अंगावर येण्यास सुरुवात झाली होती.

तोंडाने मल्हारच्या सुरांचे नोम-तोम आळवत चालायला सुरुवात केली. पुणे
विद्यापीठाविषयी मला तसे काही फारसे प्रेम किंवा अभिमान नाही, पण शुद्धहवेची
हमी देणार्‍या ज्या काही थोड्याफार पुण्यात जागा आहेत त्यातली एक जागा एवढेच
माझ्यादृष्टीने त्या परिसराचे महत्त्व.


चालता चालता मुख्य-इमारतीपाशी येऊन पोचलो आणि पुढे आयुका पर्यंत जावे आणि
आकाशगंगेतले तारे मोजून परत फिरावे असा विचार केला. मल्हार गुणगुणत चालता
चालता काही वर्षापूर्वी म्हणजे १९९१ साली घडलेला एक किस्सा आठवला. तोंडाने चालू
असलेला मल्हार बंद पडला आणि एकदम हसू फुटले.

असेच पावसाचे दिवस होते. मी तेव्हा संगणकशास्त्र विभागात नोकरी करत होतो.
दुपारी जेवायला एमबीए कॅन्टीन किंवा ओल्ड कॅन्टीनला जायचे असा नेम होता.
तेवढ्यात समोरून एक मोठा ट्रक बांधकामाचे साहित्य घेउन हळूहळू चालला होता.
विद्यापीठातील विद्येच्या उजेडाने त्या बिचार्‍या ट्रकवाल्याचे डोळे दिपले
असावेत आणि त्यामुळे तो रस्ता चुकला असावा.

मी विरुद्ध दिशेने येत असल्याचे बघून तो ट्रक माझ्यापाशी येऊन थांबला आणि
जागेवरूनच ड्रायव्हरने विचारले,

"साब, यहाँ होटल किदर है?"

"होटल? कौनसा होटल? यहाँ तो कोई होटल नही हैं". मी उत्तरलो.

त्यावर त्याने खिशातून एक कागद काढला आणि हात बाहेर काढून माझ्यासमोर धरला.
त्या कागदावर लिहिलेला पत्ता वाचून मी खोखो हसायला लागलो. तो पत्ता असा होता-

होटल आयुका
पुना युनिव्हर्सिटी कॅंपस
मेन बिल्डींग के आगे
पिन ४११००७

मी का हसत होतो ते त्या ट्र्कवाल्याला काही कळणे शक्य नव्हते. आकाशगंगेतल्या
समस्त ता‍र्‍याना मात्र ते कळले असावे कारण ते काही क्षण चमकायचे थांबले असा
मला भास झाला. मी त्याला हॉटेल आयुकाची दिशा सांगितली आणि पोटपुजेसाठी भरभर
पावले उचलायला सुरुवात केली.

हळु हळु दिवस जात होते. 'होटल आयुका' धीम्या गतीने उभे राहत होते. मी वरील
प्रसंग विसरून गेलो होतो. एक दिवस माझ्या आयायटीतल्या एका मित्राचा मला अचानक
फोन आला. आम्ही दोघे एकाच होस्टेल आणि डिपार्टमेंट्चे. फक्त मी त्याला बराच
सीनियर होतो. मित्राने मला सांगितले की तो कसल्याशा सिम्पोझियमसाठी तो 'आयुका'त
आला होता. त्याला थोडा वेळ होता म्हणून त्याने मला फोन करून बोलावले होते. मी
हातातलं काम टाकून
आयुकाच्या दिशेने निघालो.

बर्‍याच वर्षानी भेटत असल्यामुळे सुरुवातीच्या गप्पाटप्पा होस्टेलच्या
आठवणीभोवती रंगल्या. मी हळुच त्याला प्रश्न विचारला.

"तू, या सिम्पोझियममध्ये काय करतोय"

"काही नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वचवच ऐकायची"

"आणि मग?" - मी

"Some lucky souls find here their scientific husbands and scientific wives"

"what next?"

"here you 'mate'(!) with your scientific
husbands or scientific wives and have fun... "

"इथेच?" - मी चक्रावून विचारले

"हो तर. देन वी प्रोड्युस न्यु थिअरीज"

मला 'होटल आयुका' शोधणार्‍या ट्रक ड्रायव्हरची आठवण झाली. मी तो किस्सा
मित्राला सांगितला तेव्हा तो पण खळखळून हसला. यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला
आणि निघालो.

पावसाची रिपरिप वाढली तशी माझी पावले भरभर पडायला सुरुवात झाली. आयुकाच्या
अभेद्य तटबंदीजवळ मी येउन पोचलो होतो. तिथे आडोशाला दोन कुत्री उभी होती. पाउस
कमी झाल्यावर पुढे चालावे असा विचार करून मीपण चंद्र्शेखर ऑडिटोरियमजवळ आसरा
शोधला आणि पाउस कमी व्हायची वाट बघत उभा राहीलो.

आजुबाजुला फारसे कोणी नव्हते. तेवढ्यात ती दोन कुत्री माझ्या दिशेने आली आणि
जोरजोरात भूंकू लागली. सुरुवातीला मी दूर्लक्ष केले, पण त्यांचे भूंकणे काही
थांबेना म्हणून जवळ पडलेला दगड मी त्यांना मारण्यासाठी भिरकावणार एवढ्यात
लांबून एक वॉचमन ओरडला -

"साब! उनको पत्थर मत मारो!"

"क्यूं. काटेंगे तो आपके साब दवा पानी करेंगे क्या?" मी चिडून विचारले.

एकाच वेळेला वॉचमन आणि ती कुत्री भूंकत माझ्याकडे यायला सुरुवात झाली. वॉचमन
जवळ आला आणि माझ्या कपाळावरच्या आठ्या बघून मला म्हणाला,

"साहेब, रागवू नका पण एक विचारू का?

मी मानेनेच हो म्हटले.

"तुम्ही ज्योतिषी आहात का?"

कुत्री अचानक भूंकायची थांबली.

"हो! का?"

"काही नाही. इथली कुत्री ज्योतिषांवर खूप खवळतात."

"का? काय झालं"

"मागे इथल्या काही साहेब लोकांनी ज्योतिषाची टेस्ट घेतली आणि त्यात ज्योतिषी
फेल झाल्याच त्यांनी एकतर्फी जाहिर केलं तेव्हापासून इथल्या कुत्र्यांना
ज्योतिषांचा जरा देखिल वास लागला तरी ती खवळतात."

ते ऐकून मी पण चिडलो.

"ज्योतिषांची टेस्ट घ्यायला तुमचे साहेब कोण लागून गेले" - मी पण आता खवळलो
होतो.

कुत्री जोरजोरात भूंकायला लागली.

"आंतरराष्ट्रीयकीर्तीचे शास्त्रज्ञ". वॉचमनने भाषांतर केले...

"मग मी पण सांगेन ती टेस्ट करणार का"

कुत्र्यांनी प्रश्नार्थक शेपूट हलवली.

"तुमच्याच लायब्ररीमधली गेल्या दहा वर्षात प्रसिद्ध झालेली कोणतीही १०० पुस्तके
डोळे मिटून उचला आणि किती पुस्तकात तुमच्या साहेबांचे नाव सापडते ते नीट मोजून
सांगा"


आता वॉचमन प्रश्नार्थक नजरेने कुत्र्यांकडे बघू लागला. कुत्र्यांना माझा प्रयोग
पटला की नाही ते माहित नाही पण शेपूट पायात घालून त्या सारमेयांनी घूमजाव केले.

पाउस थांबला होता. मी पण घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली...

बुधवार, १ जुलै, २००९

The Anatomy of Hope

सध्या मी जेरी ग्रुपमान या डॉक्टरने लिहिलेले The Anatomy of Hope हे पुस्तक
वाचत आहे. वाचत आहे अशासाठी म्हटले कारण पुस्तक अजुन वाचून संपवता आले नाही.
सुरुवातीची प्रकरणे वाचताना आधुनिक वैद्यकाबद्दल काही प्रश्न निर्माण झाले आणि
त्यामुळे कमालीची अस्वस्थता निर्माण झाली म्हणुन मी त्यातील The biology of
hope या प्रकरणावर उडी मारली.

या प्रकरणात मानवी आशेची चिरफाड करताना डॉ. ग्रुपमानने 'विश्वास आणि अपेक्षा'
(belief and expectations) हे दोन घटक आशेमागे लपलेले असतात असे म्हटले आहे.
आशावादी माणसाचा मेंदू काही विशिष्ट रसायने (Neurotransmitters) तयार करतो आणि
त्यामुळे बरे होण्याची प्रक्रिया लवकर घडून येते, असे काहीसे स्पष्टीकरण त्याने
दिले आहे.

या इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो असा की विश्वास आणि अपेक्षा
मेंदूला बरे होण्याच्या प्रक्रियेसाठी जर उद्युक्त करत असतील तर बुद्धीवादी आणि
अंधश्रद्धावाल्यांचा थयथयाट कशासाठी चालू द्यायचा. आपल्या श्रद्धेच्या
चौकटीबाहेरचे कोणते उपाय स्वीकारायचे अथवा नाकारायचे हा ज्या त्या व्यक्तीचा
प्रश्न आहे. हे स्वातंत्र्य अंधश्रद्धानिर्मूलनवाले नाकारणार असतील तर
त्यांच्यात आणि तालिबान यांत फरक तो कोणता?


राजीव उपाध्ये