रविवार, ३० डिसेंबर, २०१८

भावनिक बद्धकोष्ठ आणि प्राचीन भारतीय मंत्रशास्त्र

भावनिक बद्धकोष्ठ आणि प्राचीन भारतीय मंत्रशास्त्र
=================================

-- राजीव उपाध्ये

कोणत्याही सजीवाच्या या भूतलावरील अवतारात मलनिस्सारणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गात मुक्तपणे संचार करणार्‍या जीवांच्या मलनिस्सारणावर फारसे निर्बंध नसतात, पण सुसंस्कृत (civilized society) समाजात राहणार्‍या मनुष्यप्राण्याच्या मलनिस्सारणावर मात्र अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे कोंडमारा होऊन अनेक व्याधींना आमंत्रण मिळते आणि जगणे असह्य होते, हे सर्वांच्या पुरेसे परिचयाच्या आहे.

मलनिस्सारण म्हटले की सर्वांना फक्त घन-मलाचे म्हणजे पाचित अन्नाच्या मलाचे निस्सारण आठवते. पण मल (मळ) हा केवळ घन स्वरूपात नसतो, तर तो द्रव आणि  वायु स्वरूपात पण असतो आणि तो मूत्र आणि अपानवायुच्या रूपात शरीरातून बाहेर टाकला जातो.  याशिवाय आणखी एका मळाचे अस्तित्व बर्‍याच जणांना ठाऊक नसते. ते म्हणजे भावनिक मळाचे!  भावनिक मळाचा निचरा झाला नाही तर भावनिक बद्धकोष्ठतेचा दूर्धर विकार जडतो आणि त्याचे दूरगामी परिणाम केवळ मानसिक पातळीवर न राहता शारीरिक पातळीवर पण दिसून येतात, हे विज्ञानाने आता पुरेसे सिद्ध केले आहे.

भावनिक बद्धकोष्ठासारखा दूर्लक्षित विकार आधुनिक मानवाच्या आयुष्यात सापडणार नाही. भावनिक बद्धकोष्ठाला कारणीभूत ठरणारे घटक असंख्य आहेत. भावनिक नियंत्रणाच्या अवाजवी उदात्तीकरणातून भावनिक बद्धकोष्ठाची चिकट आणि दूर्धर व्याधी जडते. वेळच्या वेळी शौचाला झाले नाहीतर सुरुवातीला वेळी-अवेळी शौच-विसर्जनाची भावना अनावर होते आणि जवळपास सोय नसल्यास फजितीची वेळ येते.

भावनिक मळाचे पण बरेचसे असेच असते. वेळच्या वेळी त्याचे निस्सारण होणे महत्त्वाचे असते. पण समाजाच्या अवाजवी   निरर्थक कल्पनांमुळे (उदा० रडणे हे बायकी असते आणि ते पुरुषांना शोभत नाही इ०)   तो साठतो. मग काही जण व्यसनाधीन होतात तर काही जण क्षुल्लक कारणांनी प्रक्षुब्ध होतात. काहीवेळा अर्वाच्य शिव्यांच्या रूपात भावनिक मळ उद्रेक होऊन बाहेर पडतो.

या आणि इतर अनेक कारणांनी भावनिक मळाचा निचरा होऊ देणे यासाठी प्रभावी उपाय योजणे श्रेयस्कर ठरते. आम्ही यासाठी 
प्राचीन भारतीय मंत्रशास्त्रात काही उपाय सापडतात का यावर दीर्घकाल संशोधन केले असून, ते लवकरच आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत यथावकाश प्रसिद्ध करू इच्छितो.

प्राचीन भारतीय मंत्रशास्त्र हा खूप गूढ आणि अथांग असा विषय आहे. तो एका लेखाचा विषय नक्कीच नाही. आपल्या मंत्रशास्त्रातील बीजमंत्र ही कल्पना महत्त्वाची असून, बीज मंत्रांच्या प्रभावाची आम्हाला खात्री पटली आहे.

भावनिक बद्धकोष्ठतेला मंत्रशास्त्रात काही उपाय सापडतो का याचा शोध घेताना आम्हाला असे लक्षात आले की ॐ **** फट्‍ स्वाहा।  हा मंत्र भावनिक बद्धकोष्ठतेवर अत्यंत प्रभावी असून यातील "फट्‍" ही बीजाक्षरे "फाट्यावर मारणे" या क्रियेचे गूढ प्रतीक आहेत, असे आम्हाला संशोधनांती लक्षात आले आहे. "मी अमक्याला/अमकीला फाट्यावर मारतो" अशा अर्थाचा हा प्रभावशाली मंत्र असून त्याचा विनियोग करताना यज्ञात आहूती दिली जात असे. अनेक भारतीय शास्त्रे यवनी व्यापार्‍यांबरोबर बाहेर गेली आणि युरोपियन देशात विकास पावली. मंत्रशास्त्राच्या विकासाला हे हितकारकच ठरले. "ॐ **** फट्‍ स्वाहा" हा मंत्र अधिक परिणामकारक स्वरूपात पुढे उपयोगात आला. "फक् यु" या पाश्चात्य मलनिस्सारक मंत्रात पण "फ" हे बीजाक्षर वापरले गेले आहे, हे चाणाक्ष लोकांच्या लक्षात येईलच.

मंत्राच्या परिणामकतेसाठी करण्यासाठी मंत्राची भाषा शुद्ध असणे अतिशय महत्त्वाचे आहे. "ॐ **** फट्‍ स्वाहा" या मंत्राचा जप करताना ज्याला/जिला फाट्यावर मारायचे त्याची/तिची चतुर्थी हे मंत्राच्य़ा विनियोगकर्त्याने लक्षात ठेवणे जरूरीचे आहे (यासाठी शब्दरुपावलीची प्रत विकत घेऊन संग्रही ठेवणे इष्ट ठरेल).

कोणतेही बीजमंत्र अनुष्ठानाने सिद्ध केले जातात. "ॐ **** फट्‍ स्वाहा" या मंत्राच्या सिध्दतेसाठी करायच्या अनुष्ठानाबद्दल लवकरच आम्ही स्वतंत्रपणे लिहू...

(वि०सू० - योग्य श्रेयाशिवाय सदर टिपण पुढे ढकलू नये.)