गुरुवार, ३० मे, २०१३

वैदिक धर्माचे शास्त्रीय अधिष्ठान किंवा वेदांत विज्ञान कसे आले : एक शोध



जे जे वैदिक आहे ते पूर्णपणे शास्त्रीय आहे आणि म्हणुनच वैदिकधर्म हा एकच धर्म असा आहे की ज्याला पूर्णपणे शास्त्रीय अधिष्ठान आहे. हा महत्त्वाचा साक्षात्कार आत्ताच आम्हाला झाला. केवळ "शहाणे करून सोडावे सकळ जन" हे आमचे ब्रीद असल्यानेच हा स्टेटस-पोस्ट-प्रपञ्च...

संस्कृत मध्ये असलेला विद्‍ हा धातु वेद या शब्दाच्या मुळाशी आहे, हे सर्वाना ठाऊक आहे. पण विद्‍ आणि वेद यांना जोडणारी महत्त्वाची आर्ष संकल्पना म्हणजे विदा (डेटा) होय. वैदिक हा शब्द विदा पासून निर्माण होतो, जसे निसर्ग-नैसर्गिक. सांगायचे तात्पर्य असे की निसर्ग अगोदर असल्याशिवाय नैसर्गिक ही कल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही त्याप्रमाणेच विदा अस्तित्वात असल्याशिवाय वैदिक, वेदादि संकल्पना निर्माण होऊ शकत नाहीत. विदा म्हणजे आमच्या रानटी ऋषीपूर्वजांनी केलेल्या इंद्रियगम्य निरीक्षणातून जी माहिती गोळा केली ती. विदा अस्तित्वात असल्याशिवाय वेद रचणे आणि वेदांत विज्ञान मांडणे केवळ अशक्य आहे असे आमचे आग्रहाचे मत आहे. विदा साठविण्याची कोणतीही आधुनिक साधने उपलब्ध नसल्याने हे विदाजन्य म्हणजेच वैदिक ज्ञान आमच्या ऋषीपूर्वजांनी मौखिकपद्धतीने जतन आणि संक्रमण करण्याचा उद्योग आरंभिला. कोणत्याही विद्यातून एखादा आलेख, त्यात लपलेले गणिती सूत्र जेव्हा विद्वान/शास्त्रज्ञ बाहेर काढतात (आणि शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध करतात) तेव्हा विद्याचे महत्त्व तसे संपुष्टातच येते. तद्वतच आमच्या ऋषीपूर्वजांनी गोळा केलेल्या विद्यातून जे ज्ञानकण वेचले, ते सूक्तांच्या रूपाने ग्रथित केल्यावर आमचे ऋषीपूर्वज विदा नष्ट करते झाले. त्यांनी शोधलेल्या जटा-घनपाठादि कल्पना वापरून जर विदा जर जतन केला गेला असता, तर हजारो वर्षे टिकून राहिलेल्या वैदिक परंपरेने दक्षिणेच्या रुपाने केव्हढा मोठा आर्थिक भार मधल्या काळातल्या आश्रयदात्या राजवटींवर टाकला गेला असता, याची कल्पनाच केलेली बरी. मुख्य म्हणजे ऋक्सामयजुर्वेदादि शाखांचे अध्ययन/पठण करणार्‍या ब्राह्मणांप्रमाणे कदाचित विदापठण करणारी ब्राह्मणांची एक (किंवा अधिक) शाखा निर्माण झाली असती.

आज विदापठण अस्तित्वात नसले तरी वेदकाळात विदापठण अस्तित्वात असावे आणि अग्निचयना सारखा विदाचयन असा एखादा विधी वेदकालात अस्तित्वात असावा (जो पुढे वर दिलेल्या कारणांमुळे नाहिसा झाला) असे आमचे आणि आमच्यासारख्या अनेक इंडॉलॉजिस्टांचे मत आहे. विदाचयनाच्या वेळी सूक्त करते ऋषि होमात आज्याची आहुती देत आणि विद्यातील संगती शोधायचा प्रयत्न करत. ही संगती सापडल्यावर त्यांनी जी सूक्ते रचली ती म्हणजे आजचे वेद आणि वेदांतील विज्ञान होय.

असो. सनातन प्रभात सारख्या संस्था, प. वि. वर्तकांसारखे पुण्यश्लोक द्रष्टे हे वेदांतले अमूल्य विज्ञान लोकांना सांगायचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची जी निंदा-नालस्ती केली जाते ते बघुन आम्ही व्यथित होतो. पण भविष्यात या भारतवर्षात एक दिवस असा नक्की उगवेल की घराघरात वैदिक-आज्याचा(*) ज्ञानदीप घराघरात पेटेल आणि "विदा दाखवा" अशा सारख्या आरोळ्या ठोकणार्‍या श्री. घासकडवी आणि इतर जालकंटकांची तोंडे कायमची बंद होतील अशी आशा करुयात...

* विदारुपी तुपाचा

रविवार, २६ मे, २०१३

मोकळेपणा...



काल माझ्या मुलीने तिच्या क्लासला दांडी मारली आणि माझ्या देखत तिच्या बाईंना फोनकरून सांगितले. बाईनी तिला कारण विचारले तेव्हा ती अत्यंत सहज म्हणाली, "अहो मॅडम, माझे पिरीयडस् आले आहेत आणी पोट खुप दुखतंय." मला त्या संवादातल्या सहजतेची आणि मोकळेपणाची ( किंचित हेवा आणि) खूप गंमत वाटली. तिचे पिरीयडस् चालु झाले तेव्हा १ल्यांदा तिने अगदी आनंदात मलाच सांगितले होते.

पुरुषांच्या लैंगिक जीवनाबद्दल असा मोकळेपणा मला आजतागायत दिसला नाही. कधी मित्रांनी wetdreams किंवा हस्तमैथुनाबद्दल बोललेले आठवत नाही. पुरुषांची लैंगिक अभिव्यक्ती कायम vulgar स्वरूपातच का बाहेर पडते?

आयायटीत असतानाचा एक प्रसंग. सुटी असल्यामुळे हॉस्टेल बरेच शांत होते. मी व्हरांड्यात फेर्‍या मारताना माझ्या एका मित्राच्या खोलीतून खडखड आवाज ऐकू आला. मला आश्चर्य वाटले म्हणून तिथे रेंगाळलो. पण खडखडाट तसाच चालु राहिला. मग माझं कुतुहल चाळवलं म्हणुन मित्राच्या रुमच्या खिडकीला लावलेल्या फाटलेल्या कागदाच्या छिद्रातुन आजुबाजुला कोणी नाही हे बघुन आत काय चाललंय हे बघितले, तर अनपेक्षितपणे सर्दच झालो. पूर्णपणे नग्नावस्थेत असलेला माझा मित्र एका हातात प्लेबॉय घेऊन दुसर्‍या हाताने आत्मानंदाच्या उपासनेत तल्लीन झाला होता. अनपेक्षित दृष्याने अंगावर शहारे आल्याने मी तिथुन बाजुला झालो.

संध्याकाळी ४ च्या सुमारास हाच मित्र माझ्या रुमवर आला आणि म्हणाला, "चल मी "स्टाफ-सी"ला (कॅण्टीन) चहा प्यायला जातोय, येतोस का?" मी हो म्हटलं आणि त्याच्या बरोबर गेलो. त्याने दोघांसाठी चहा आणला, आणि आम्ही थोड्या इकडच्यातिकडच्या गप्पा मारल्यावर, माझ्यावर नजर रोखून त्याने मला विचारले,

"Can I ask you a question?"

मी होकारार्थी उत्तर दिले.

"राजीव, डु यु मास्टरबेट?" मित्राने मला विचारले.

या अचानक आलेल्या प्रश्नाने मी कावराबावरा झालो आणि इकडेतिकडे बघायला लागलो. तेव्हा आमच्या शेजारच्या टेबलावर बसुन आमचा संवाद ऐकणारे एक प्राध्यापक महाशय उठले आणि आपला चहाचा कप घेऊन दुसर्‍या टेबलावर जाऊन बसले...

शुक्रवार, १० मे, २०१३

[श्रद्धांजली] गायला लावणारा अवलिया



आयुष्याला पूर्णत्व कशामुळे येत असावं...सर्वसाधारणपणे ९९ टक्के लोक उत्तर देतील की ध्येयपूर्तीमुळे, स्वप्नपूर्तीमुळे. मला मात्र माझ्या आयुष्याचे पूर्णत्व अनेकदा घेतलेल्या दिव्यत्वाच्या अनुभूतीमध्ये आहे असे वाटते. ही दिव्यत्वाची अनूभुती मला अनेकांकडुन मिळाली. त्यातली एक महत्वाची व्यक्ती म्हणजे उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर म्हणजे आमचे छोटे उस्ताद.

संगीतामध्ये माझ्या अशा ज्या आवडी आहेत त्या मला कुणामुळे लागलेल्या नाहीत. समीक्षकांनी, देवपित्यांनी उधळलेल्या स्तुतीसुमनानी प्रभावित होऊन माझी आवड विकास पावली नाही. मी माझ्या आवडीचे श्रेय कुणालाही देऊ इच्छित नाही. माझी आवड अत्य़ंत बेसावध क्षणी, केवळ योगायोगाने आलेल्या दिव्यत्वाच्या अनुभवाने निर्माण झाली आणि विकास पावली. दिव्यत्वाच्या अनुभूतीचे एक खास वैशिष्ट्य असतं. हा अनुभव तुमच्यात कायमस्वरूपी अंतर्बाह्य उलथापालथ घडवून आणतो. एक वानगीदाखल उदा देतो. रविशंकरांची सतार रेडीओमुळे सतत कानावर आदळून आवडायला लागली होती (आवडायलाच हवी, नाही आवडली तर लोक तुच्छपणे बघतात). पण १९८४ मध्ये आमच्या घरी टिव्ही आला, तेव्हा प्रथम उस्ताद झिया मोईदुद्दीन डागर यांचे रूद्रवीणावादन ऐकले आणि सतार मनातून उतरली ती कायमची.

मल्लिकार्जून मन्सूर, केसरबाई, एमणी शंकरशास्त्री, झिया मोईदुद्दीन डागर आणि त्यांचे धाकटे बंधु उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर हे असेच मला अत्यंत बेसावध क्षणी भेटलेले दिव्यात्मे. त्यांनी नंतर मला कधीच सोडले नाही.

उस्ताद झिया फरिदुद्दीन डागरांच्या बाबतीत पण असेच काहीसे झाले. १९९० मध्ये स्पीकमॅकेने आमच्या आयायटीत एक मोठा संगीत महोत्सव आयोजित केला होता. मला केवळ गाणं ऐकायला प्रा. सहस्रबुद्ध्यांनी रजा मंजूर केली होती. सकाळच्या सत्रामध्ये झिया फरिदुद्दीन डागर आणि साथीला गुंदेचा बंधू गायला बसले होते. त्यांनी जवळजवळ दीड्तास जौनपुरी आणि मग हिंडोल गायला. त्या गायनाने आमच्या बॅडमिंटन हॉलचे छ्प्पर फाडून अंतराळाला गवसणी घातली होती. त्यानंतर माझ्या मनाचा एका मोठा भाग उस्तादांच्या बुलंद (हा शब्द फारच तोकडा आहे) गायकीने व्यापून टाकला होता. हे गाणं परत परत कसं ऐकायला मिळणार या भावनेने अस्वस्थ व्हायला व्हायचे. पुढे या दिव्य गायकाशी आपला बादरायण का होईना, पण संबंध निर्माण होईल, ही कल्पना पण मनाला शिवली नव्हती. हळुहळु गुंदेचा बंधुंच्या कॅसेट प्रकाशित व्हायला लागल्या. आणि काही प्रमाणात माझी डागर गायकीची तहान काही प्रमाणात भागली गेली. या काळात मला कंठसंगीत शिकायची अनिवार ओढ निर्माण झाली होती. शिकायची तर ज्या गायकांच्या माझ्यावर प्रभाव पडला होता त्यांचीच गायकी असं मी मनाशी ठरवले होते.

पुढे अनेक वर्षे गेली. सुमारे २००१ च्या सुमारास पुण्यात वीणा फौंडेशन नावाच्या एका संस्थेने एक मैफल आयोजित केली होती. उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि त्यांचे शिष्य उदय भवाळकर एकत्र गाणार होते. भवाळकरांचे नाव वाचनात आले होते, पण गाणं ऐकले नव्हते. मी या मैफलीला जायचे मनोमनोमन पक्के केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उदय भवाळकरानी आपल्या गुरुजींची ओळख करून दिली. त्यात त्यांनी म्हटले, "उस्ताद आमच्या चुकांबद्दल आम्हाला कधीच रागवले नाहीत". हे वाक्य ऐकल्यावर कुठेतरी मला "इथे आपले जुळु शकते" ही भावना जागी झाली. नंतर त्याच कार्यक्रमात एक मजेशीर प्रसंग घडला. गायनासाठी मंचावर झिया फरिदुद्दीन डागर आणि उदय भवाळकर स्थानापन्न झाल्यावर उस्तादांनी प्रमुख पाहुण्यांकडे गाणे सुरु करण्यासाठी अनुमती मागितली आणि विचारले,

"काय गाऊ?"

"चंद्रकंस" प्रमुख पाहुण्यांनी फर्माईश केली.

"कौनसा चंद्रकंस, तिन तरहसे चंद्रकौस गा सकता हूं" - उस्ताद उत्तरले

"बिना षड्ज का" पाहूण्यानी बहूधा खवचटपणा केला असावा.

"देखो, जिंदगीभर षड्ज नही लगाऊंगा" - उस्तादांनी प्रत्युत्तर दिले आणि उपस्थित हास्यकल्लोळात बुडुन गेले.

आयुष्यभर ’सा’ न लावायचे आह्वान घेणं म्हणजे काय असतं हे फक्त जे गाणं शिकले आहेत त्यांनाच कळले तर कळेल.

हा कार्यक्रम संपला. मग मी घरी येताना उदय भवाळकरांना गाणं शिकवाल का असं विचारायचं मनोमन ठरवलं. माझं नशीब इतकं बलवत्तर की भवाळकरांनी मला होकार दिला. आणि आमची तालीम सुरु झाली. पहाटे पांच ते नऊ-साडेनऊ कधी दहा. उदयजींच्याकडचं संगीताचं शिक्षण मी आजवर घेतलेल्या संगीतशिक्षणापेक्षा पूर्ण वेगळं ठरलं. उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर उदयजींच्या तालमीतून हळुहळु उलगडत गेले आणि ते आमचे आजे-गुरुजी बनले!

"बेशरम हो के गाना" हा आमच्या गुरुजींनी दिलेला १ला मंत्र. आपल्या परंपरेचा कोणताही दुरभिमान, इतर कलाकारांना तुच्छ लेखणे, या सगळ्या गोष्टी भवाळकरांच्याकडे नव्हत्या आणि मला ते प्रकर्षाने जाणवले. मी कधीकधी गुरुजी म्युझिकरुम मध्ये नसताना धृपद परंपरेत गायले न जाणारे राग धृपदशैलीत आणता येतात का हे बघायचा प्रयत्न करायचो. पण त्याबद्दल उदयजींनी कधीही डॊळे वटारले नाहीत. "डोक्यात गाणे असते ते चूक का बरोबर याचा विचार न करता अगोदर बाहेर काढायचे आणी मग स्वरतालाच्या दुरुस्त्या करायच्या" हा दुसरा गुरुमंत्र मला उदयजींकडे मिळाला. विद्यार्थ्याच्या पूर्णपणे कलाने शिकवणारे उदयजी अत्यंत नम्रपणे छोट्या उस्तादांनी (झिया फरिदुद्दीन डागर) आम्हाला पण असंच शिकवलं, असं ते नम्रपणे कबूल करतात.

माझ्या मूळ प्रवृत्तीला हे भावल्यामुळे धृपदात एव्हढा ओढला गेलो की मला ख्याल खूपच उथळ आणि पचपचीत वाटायला लागला. मी अधिकाधिक धृपद ऐकायला लागलो. छोट्या उस्तादांचे धृपद ऐकताना एक महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे त्यांचे गाणं ऐकताना मी हळुहळु गाता व्हायला लागलो. उस्ताद एखादी स्वरकल्पना मांडत तेव्हा तिचा विस्तार मनात स्फुरायला लागला. रात्री बेरात्री दोन-तीन वाजता गाणे डोक्यात रूंजी घालायला लागायचे आणि मी तानपुरा काढुन गायला बसायचो. भारतीय योगशास्त्रात जी शक्तिपात ही कल्पना आहे तिचाच मी हा एकप्रकारे अनुभव घेत होतो.

उदयजींच्याकडे छोट्या उस्तादांचे येणेजाणे असे. ते आले की आम्हाला ज्योतीताईंचा फोन यायचा. मग हातातले काम टाकून उस्तादांचे गाणे ऐकायला मिळेल या आशेने आम्ही तिकडे धाव घ्यायचो. वेगवेगळ्या विषयांवर उस्ताद गप्पा मारत असत. आपल्या शिष्याबरोबर चेष्टामस्करी त्यांना वर्ज्य नव्हती. एकदा आमच्यापैकी एकाने त्यांना विचारले, "उस्ताद तुम्ही किती रियाझ करायचा?" त्यावर ते म्हणाले, "तुम्हाला खरं सांगू की खोटं सांगू?"

"खरं आणि खोटं, दोन्ही सांगा" आमच्यापैकी कुणीतरी म्हणाले.

"खोटं उत्तर आहे, १८-१८ तास! आणि खरं उत्तर आहे ३ ते ४ तास!" हा प्रांजलपणा मला संगीतशिक्षणाला गूढत्वाने क्लीष्ट बनविणार्‍या प्रवृत्तीना छेद देणारा तर वाटतोच पण इतर कोणत्याही कलाकारात मला तो दिसलेला नाही.

असाच एक प्रसंग.

ज्योतीताईंचा फोन आला की "उस्ताद गायला बसले आहेत. शक्य असेल तर लगेच या". मी हातातले काम टाकून गुरुजींच्या घराकडे धाव घेतली. छोटे उस्ताद आणि आमचे गुरुजी एकत्र गात होते. १२ अंगांनी धृपद कसे गायले जाते याचे खुलासेवार स्पष्टीकरण आणि गाणे असे दोन्ही रंगत चालले होते. आमच्या भाग्यवान गुरुजींचे संगीतशिक्षण कसे झाले असेल याचा तो सोहळा एकप्रकारे आमच्या समोर उलगडला गेला होता... आणि एका अत्यंत अनपेक्षित उत्कट क्षणी उस्तादांनी गाणे थांबवले आणि उदयजींच्या हातातल्या तंबोर्‍याला वाकून नमस्कार केलाच, पण पुढच्या क्षणी उदयजींच्या पायांना पण स्पर्श केला...

आता मला सांगा शिष्याचे पाय धरणारा गुरु तुम्ही कधी बघितला आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की या प्रसंगाचा मी साक्षीदार होतो...

गुरुवार, २ मे, २०१३

श्री. श्याम मानवांचे (आचरट) प्रश्न




(http://shyammanav.blogspot.in/2012/12/blog-post_7.html)

1) फलज्योतिष हे शास्त्र आहे का? 
तुम्हाला शास्त्र म्हणायचे नसेल तर नका म्हणू. पण ज्योतिष एक विद्या मात्र नक्की आहे.

2) पूर्वी फलज्योतिष आणि खगोलशास्त्र एकत्र होते. ग्रीकांपासून, आर्यभट्टापासून ते गॅलिलिओ- कोपर्निकसपर्यंत अनेक सुप्रसिद्ध खगोलशास्त्री ज्योतिषीही होते, पण एकोणिसाव्या शतकात खगोलशास्त्र व फलज्योतिष वेगळे झाले, ते का? 
असंख्य कारणे असू शकतात . शाखा, उपशाखा निर्माण होणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. संगणकशास्त्रापासून अनेक नव्या शाखा जन्माला आल्या - संगणक अभियांत्रिकी, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, कृत्रिम मेधा, मानव-यंत्र संवाद इत्यादि.

3) खगोलशास्त्र ही विज्ञानाची व वैज्ञानिक अभ्यासाची महत्त्वाची शाखा झाली. त्याचा अभ्यास जगभराच्या सगळय़ा विद्यापीठांमधून होता; परंतु फलज्योतिष मात्र चोथा समजून विज्ञानाने फेकून दिले. असे का? 

विज्ञान फक्त फलज्योतिषाला चोथा म्हणुन फेकून देत नाही तर मुख्य प्रवाहात नसलेल्या अनेक गोष्टीना चोथा मानते. मुख्यप्रवाहातील अस्तित्व अनेक बाबींवर अवलंबून असते - fashion, politics, funding etc.  कृत्रिम मेधा (Artifitial Intelligence) या शाखेला अनेक जण अजूनही चोथा मानतात (ही शाखा निर्माण झाली तेव्हाही मानत होते). तरीही अनेकजण अनेक विद्यापीठातून या विषयाचा अभ्यास करतात. ज्योतिषाच्या नावाने बोंबाबोंब करणार्‍या एका जागतिक कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाची  थिअरी पण "चोथा" झाल्याचे ऐकून आहे. MD करताना सायकियाट्रीला जाणारे "मेडीसन सोडणारे" (म्हणजे अप्रत्यक्षपणे चोथा) म्हणून हिणवले जातात.  आयायटीत आमच्या वेळेला theoryचे लोक experimentalistना "चोथा" म्हणून हिणवत असत. आय़टिच्या विश्वात coding करणारे testing/debugging करणार्‍याना "चोथा"च समजतात.

तात्पर्य "चोथा होणे" ही भावना सापेक्ष आहे.

4) जगभराच्या 186 वैज्ञानिकांनी, ज्यात 19 नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत, 'फलज्योतिष हे शास्त्र नाही. तो केवळ काही लोकांचा पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये,' असे पत्रक काढले व ते जगभर प्रसिद्ध केले. त्याबद्दल 'ज्योतिष अधिवेशनाचे' काय मत आहे? 

मी 'ज्योतिष अधिवेशनाचे' प्रतिनिधीत्व करत नसल्याने या प्रश्नाचे उत्तर देऊ इच्छित नाही.

5) आजचे फलज्योतिषी 9 (किंवा 12) ग्रह मानतात. त्यात राहू, केतू नावाचे ग्रहही मानतात. प्रत्यक्षात राहू-केतू अस्तित्वातच नाहीत. ते ग्रहही नाहीत. तरी ज्योतिषी मात्र आजही जनतेच्या कुंडल्यांमध्ये (होरोस्कोप) राहू-केतू फिरवतच असतात. ते का? कसे? अस्तित्वात नसलेल्या राहू-केतूंना स्थान देणार्‍या कुंडल्या किती विश्वसनीय असू शकतात? व त्या आधारावर उभ्या असणार्‍या फलज्योतिषात कितपत अर्थ असू शकतो?

श्याम मानव आणि ते ज्या गटाचे प्रतिनिधीत्व करतात त्यांच्या अडाणीपणाचा निदर्शक असा हा प्रश्न आहे. "ग्रह" ही तांत्रिक संज्ञा आहे. ज्याप्रमाणे "धातु", "मल", "अग्नि" या आयुर्वेदातील तांत्रिक संज्ञा आहेत. पाणिनीच्या व्याकरणात युस्त्र्याख्यौ नदी (1.4.3) असे एक सूत्र आहे. तेथे ईकारान्त आणि ऊकारान्त स्त्रीलिंगी शब्दाना "नदी" अशी तांत्रिक संज्ञा आहे.

तसेच ज्या बिंदुंचे भ्रमणकाल आणि कक्षा निश्चित झाले आहेत ते सर्व ग्रह मानावेत असा ज्योतिषात संकेत आहे. राहु-केतु, चंद्र-सूर्य या संकेतानुसार ग्रहच ठरतात.

6) चंद्र-सूर्याला ग्रह म्हणून आजही स्थान दिले जाते. चंद्र हा उपग्रह आहे, हे खगोलशास्त्राच्या ज्ञानामुळे पाचव्या वर्गातल्या मुलालाही ज्ञात असते. तरी सुशिक्षित विद्वान ज्योतिषीही चंद्राला ग्रह म्हणूनच कुंडलीत स्थान देतात. अशा अवस्थेत विद्वान ज्योतिष्यांपेक्षा पाचव्या वर्गातल्या मुलांनाही अधिक ज्ञान असते, असे का मानू नये? 

वर दिलेल्या प्र.क्र. ५च्या उत्तरात याचा खुलासा व्हावा अशी अपेक्षा करतो.

7) सूर्य हाही ग्रह म्हणूनच कुंडलीत मांडला जातो व आजही ज्योतिषी पृथ्वीभोवतीच (कुंडलीत) सूर्याला फिरवत असतात. सूर्य हा तारा आहे. तो ग्रह नाही व पृथ्वी इतर ग्रहांसोबत सूर्याभोवती फिरते हे शाळकरी मुलांना जसे शिकवले जाते तसेच ज्योतिष्यांना शिकवावे, प्रसंगी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढाव्यात, अशी विनंती आम्ही सरकारला करावी काय? 

कुणी सरकारला कसली विनंती करावी हा ज्याच्या त्याच्या विवेकाचा, उपलब्ध वेळाचा आणि रिसोर्सेसचा प्रश्न आहे. पण याच न्यायाने आयुर्वेदातील संज्ञा, व्याकरणातील संज्ञा पण बदलण्याचा आग्रह धरावा. फक्त ज्योतिषाला बडवणे हे आकसाचे आहे.

8) पृथ्वी हा ग्रह आहे. त्याचा पत्रिकेत ग्रह म्हणून का समावेश नाही? 

Heliocentric astrology या नावाने एक ज्योतिषाची शाखा आहे. त्यानुसार ज्या पत्रिका तयार होतात त्यात पृथ्वी हा ग्रह दाखवला जातो. यात पत्रिकेतील निरीक्षक सूर्यस्थित असतो. ही शाखा मूलत: जागतिक पातळीवर घडणार्‍या मोठ्या घटनांशी संबंधित ग्रहयोगांचा अभ्यास करते.

9) ग्रहाचा मानवी जीवन प्रवाहावर परिणाम होतो असे फलज्योतिषी सांगतात व त्यावरच त्यांचे शास्त्र अवलंबून आहे. याला वैज्ञानिक आधार काय? एकाच स्थळी व एकाच ठिकाणी राहणार्‍या माणसांवर एकाच ग्रहाचे, ते केवळ वेगवेगळ्या वेळी जन्मले म्हणून वेगवेगळे परिणाम कसे होतील? 

मानवी भाषा व्यवहार हा जटिल प्रक्रियेतून निर्माण होतो. निरीक्षण, अनुभव, श्रद्धा आणि त्यांचे वर्णन करायला वापरली जाणारी  भाषा एकमेकांवर सतत प्रभाव पाडतात. मला कोकणात एके ठिकाणी उंच हा शब्द खोल या अर्थाने वापरला जात असल्याचे आढळले. "भयंकर सुंदर" हा अलिकडचा एक प्रयोग. अशी अनेक उदा देता येईल.

आधुनिक ज्योतिषी ग्रहांचे मानवी जीवनावर परिणाम अजिबात मानत नाहीत तर ते ग्रहांनी तयार केलेल्या भौमितिक रचनांची मानवी जीवनातल्या अवस्थांशी सांगड घालून अनिश्चितते आणि अपरिहार्यते विषयी मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतात.

10) सगळे ग्रह व सूर्य यांची भ्रमणकक्षा व काळ निश्चित आहे. पुढील पाच हजार वा पाच लाख वर्षानंतर तो निश्चित ठरावीकच असणार आहे. याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचे भविष्य तो जन्मत:च ठरलेले असते. असे असतानाही अनेक ज्योतिषी ग्रहदशा बदलण्याचे व ग्रहांचे अरिष्ट टाळण्यासाठी अनेक पूजा, ताईत, खडे वगैरे उपाय सांगतात व ठरलेले आयुष्य बदलवता येते असेही सांगतात. ते कसे? ग्रहांची दिशा, स्थान व भ्रमण निश्चित असूनही या उपायांनी माणसांचे भविष्य बदलतेच कसे? हे सगळे उपाय म्हणजे सामान्य लोकांना लुबाडण्याची ज्योतिष्यांची एक क्लृप्ती नव्हे काय? मुळात माणसांचं आयुष्य ठरलेलं असतं हे सांगणंच लबाडी नव्हे काय? 

आपल्यामध्ये असलेले जनुक जसे आजुबाजुच्या परिस्थितीनुसार सक्रिय किंवा निष्क्रिय होतात. त्याप्रमाणेच आजुबाजुच्या परिस्थितीनुसार ग्रहयोगांनी सूचविलेल्या शक्यता व्यक्त होतात किंवा अव्यक्त राहतात. उपायांनी समस्येपासून काही काळ लांब राहता येते. आशा टिकून राहायला मदत होते. काही लोक लुबाडण्यासाठी हे वापरतात म्हणून उपाय करणे चूक ठरत नाही. कोणताही शहाणा ज्योतिषी "आयुष्य ठरलेलं असतं " असे सांगणार नाही. आयुष्यातील अनिश्चितता आणि अपरिहार्यता आपण कशी हाताळतो यावर ते अवलंबून असते.

11) माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय? पण जर जन्म ठरलाच असेल तर मनुष्य स्वत: निर्णय घेऊन आजच्या काळात भारतीय कायद्याच्या परवानगीने कृत्रिम गर्भपात करतो व जन्माला येणार्‍या नव्या मनुष्याचे अख्खे आयुष्यच थांबवतो, हे कसे? ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का? 


माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? 

जन्म होणं हा योगायोगाचा भाग आहे. पण प्रत्येक जीवित व्यक्ती कधी ना कधी मरणार हे मात्र नक्की आहे.

ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय? 

जीवन चालू झाल्यावर फलज्योतिषाला आधार निर्माण होतो (माझी भूमिका याच प्रश्नोत्तरात इतरत्र स्पष्ट केलेली आहे). कारण अनिश्चितता आणि अपरिहार्यता हाताळायची क्षमता प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने समान बहाल केली आहे, असे दिसत नाही.

ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का? 

हा प्रश्न मला खोडसाळ  आणि आचरट वाटतो.

12) मृत्यू ठरलेला असतो का? 

सध्या तरी  प्रत्येक जीवाचा मृत्यू ठरलेला आहे पण मृत्युची तिथी मात्र ठरलेली नाही.

अ) तो जर ठरलेला असेल तर, 1930 साली भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य केवळ 18 वर्षे होते. आता ते 68 वर्षापेक्षा अधिक झाले आहे. हे अधिकचे सरासरी आयुष्य भारतीयांच्या वाटय़ाला कुठून आले? याचे उत्तर फलज्योतिष्यांना पत्रिकांमध्ये दाखवता येईल का? 

पत्रिकांमध्ये कशाकशाची उत्तरे ज्योतिषानी शोधावित अशी श्री मानव यांची अपेक्षा आहे. मूळात पत्रिका ही एक मानवी जीवनातील  सूचित अवस्थांची एक प्रतिकृती आहे. प्रत्येक प्रतिकृती सर्व प्रश्नांचे उत्तर देते का? घराची पुठ्ठ्याची प्रतिकृती घराचे आयुष्य किती या प्रश्नाचे उत्तर देईल का?

आ) मृत्यू ठरलेला असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का? 

- ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? 

मृत्यु ही शक्यता पत्रिका दाखवत असेल तरीही जीवन स्वीकारायचे की मृत्यु हा पण प्रत्येक शुद्धीवर असलेल्या व्यक्तीचा प्रश्न आहे. आणि बेशुद्ध व्यक्तीच्या पत्रिकेत मृत्यु ही शक्यता असेल तर जगवायचे की मरू द्यायचे हा आप्तांचा (आणि कदाचित उपचार करणार्‍या डॉक्टरांचा प्रश्न). पुढे रस्ता बंद आहे असा कुणी सल्ला दिला तर तो न मानता तसंच पुढे जायच की मागे फिरून दुसरा रस्ता पकडायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सल्ला मिळाला म्हणून तो मानलाच पाहिजे असं कुठे लिहीले आहे?

इ) एकाच अपघातात ज्यावेळी शेकडो लोक मरतात त्या वेळी त्या सगळ्यांचा मृत्युयोग असतो काय? नागासाकी-हिरोशिमा अणुस्फोट व सगळ्याच मोठय़ा अपघातांबद्दल काय? तसा पुरावा पत्रिका तपासून देता येईल काय? 

या प्रश्नांची उत्तरे मी सध्या तरी देऊ शकणार नाही कारण मी त्यासाठी आवश्यक असणारा अभ्यास मी केलेला नाही. मात्र लग्नाच्या वर्‍हाडांना होणारे अपघात आणि त्यात मरण पावणार्‍या व्यक्तींच्या पत्रिका तपासून काही अंदाज निश्चित बांधता येतील. आपली संघटना अशा अभ्यास-प्रकल्पाला मदत मिळवून देईल का?

13) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या पंचवीस वर्षापासून ज्योतिष्यांना सारखी आव्हाने देत आहे, तरी ज्योतिषी ती आव्हाने स्वीकारून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तोंड एकदाचे बंद का करीत नाही? 

उत्तर - अशा आह्वानतून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही किंवा निघत नाही. एक ज्योतिषी जिंकला किंवा हरला हे ज्योतिष(शास्त्रा/विद्ये) बद्दल कोणतीही विधाने करण्यास करण्यास पुरेसे नाही. आह्वाने देणारे ज्योतिषाच्या मर्यादांमध्ये त्यांचे आह्वान तयार करत नाहीत, हे कशाच द्योतक? प्रत्येक ज्योतिषी जे दावे करतात त्या दाव्याच्या अनुरोधानेच आह्वान देण्यात यायला हवं. हे दावे प्रत्येक ज्योतिषी जे तंत्र वापरतो त्या तंत्रानुसार बदलु शकतात. हाडाची ऑपरेशन्स करणार्‍या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का?

ज्योतिष टाकून द्यायचे असेल तर वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधनकरून मग ते टाकून द्यायला हवे. त्यासाठी विज्ञानात जसे aggressively संशोधन होते तसे संशोधन ज्योतिषात व्हायला हवे. त्यासाठी मुळात ज्योतिषातील नियम जास्त चिकित्सक पद्धतीने तयार केले जायला  हवेत. असे सुसंशोधित नियम वापरून मगच आह्वाने स्वीकारायचा विचार करता येईल. मुळात ज्योतिषातील नियम हे व्याकरणाच्या/भाषेच्या नियमांप्रमाणे प्रवाही असतात. नियम बनविण्यासाठी कोणतीही साधने हाताशी नसलेले ज्योतिषी जुने ग्रंथ,  प्रसिद्ध ज्योतिषांची निरीक्षणे/मते आधार म्हणून वापरतात. काही ज्योतिषी स्वत:ची निरीक्षणे नियम बनविण्यासाठी वापरतात. यामुळे अचूक भविष्य वर्तविण्याला आपसूकच मर्यादा पडतात.

14) दोनदा 20-20 पत्रिकांच्या आधारे, माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा. दोन्ही वेळेस उत्तरे 90 टक्क्यांपेक्षा अधिक 95 टक्के अचूक निघायला हवीत. तर 15 लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल किंवा मानवी जीवनातील, तपासून शहानिशा करता येतील अशा कोणत्याही पाच घटना (लग्न, मूल, नोकरी, शिक्षण, अपघात, बढती वगैरे) वीस पत्रिकांच्या आधारे सांगाव्यात. त्या 90 टक्के खर्‍या ठराव्यात. दोनदा वीस-वीस पत्रिकांची भाकिते 90 टक्के अचूक निघावीत. 15 लाख मिळतील; पण 70 टक्के जरी खरी निघाली (दोनदा 20-20) तरी ते शास्त्र असू शकते असे आम्ही मानू, अशी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन नागपूर समितीने पुणे, धुळे, अमरावती या चारही अ. भा. ज्योतिष अधिवेशनात जाहीर आव्हाने दिली होती. ती आव्हाने स्वीकारून आपली बाजू सत्य असल्याचे ज्योतिष महामंडळ का सिद्ध करू शकले नाही? याचा अर्थ, फलज्योतिषशास्त्र नाही असाच घ्यायचा का? 15) कोणताही महत्त्वाचा ज्योतिषी वा ज्योतिष महामंडळ, या आव्हानानंतर पुढे आले नाही; पण श्री. एम. कटककर नावाचे ज्योतिषी मात्र आव्हान स्वीकारण्याची एक बालिश भाषा घेऊन पुढे आले होते. ते म्हणाले होते, मी माणसांची स्वभाववैशिष्टय़े सांगतो. त्या वेळी अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे आव्हान एका अटीवर स्वीकारण्याचे मान्य केले. कटककरांसोबत पाचव्या वर्गातील, फलज्योतिषाचे कुठलेही ज्ञान नसलेली कुठलीही 10 मुले बसवू. त्या दहा मुलांना पत्रिका न पाहताच अंदाजे स्वभाववैशिष्टय़े सांगावीत व श्री. कटककर महाशयांनी पत्रिका पाहून स्वभाववैशिष्टय़े सांगावीत. एका जरी शाळकरी मुलाने कटककरांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले, तर मात्र कटककरांनी त्या मुलाची व जनतेची जाहीर माफी मागावी व धंदा बंद करावा. त्या वेळी या प्रतिआव्हानातून एम. कटककरांनी चक्क पळ काढला. तरी असा पळपुटा ज्योतिषी, ज्योतिष महामंडळाच्याच नव्हे, तर अधिवेशनाच्या स्टेजवरही दिमाखाने मिरवतो आहे, हे ज्योतिष्यांना व अधिवेशनाला कितपत भूषणावह आहे? या प्रश्नांची उत्तरं ज्योतिष्यांनी जाहीररीत्या द्यावीत. पण ज्योतिषी या प्रश्नांची उत्तरं न देता ज्योतिष्यावरची टीका म्हणजे हिंदू धर्मावरचा हल्ला अशी ओरड करतात. मग स्वातंर्त्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद हिंदू नव्हते का?

पत्रिका कुणी आणि कधी बघावी याबद्दल माझी भूमिका अशी आहे - २० वर्षांपर्यंत आणि सत्तरीनंतर (काही अपवाद वगळता) पत्रिका बघू नये असे माझे  स्पष्ट मत आहे. याची कारणे अशी-

विशीपर्यंत व्यक्तीची स्वयंनिर्णयाची क्षमता पूर्णपणे विकास पावलेली नसते. सहसा आईवडिलांवर मुले अवलंबून असतात. सत्तरीनंतर तब्येत ठणठणीत नसेल तर हळुहळु परावलंबित्व यायला सुरुवात होते. अनेक इच्छाना मुरड घालावी लागते. मनमुरादपणे वानप्रस्थाश्रमाचा काल व्यतीत करणे सर्वच ज्येष्ठाना शक्य असते नाही. थोडक्यात या परावलंबीत्वामुळे  एकंदरच संधी आणि निर्णय यावर मर्यादा असतात/यायला लागतात.

सांगायचे तात्पर्य असे की २० ते ७० या मधल्या काळात, सर्वसाधारणपणे स्वयंनिर्णयाचा हक्क बजावू शकणारी व्यक्तीच वेगवेगळ्या शक्यता/संधीना विवेकाने प्रतिसाद देऊ शकते. हे परावलंबी व्यक्तींच्या बाबतीत होऊ शकत नाही. पत्रिका ही केवळ शक्यता दाखवत असल्याने बंदिस्त आयुष्य जगणार्‍या व्यक्तींच्या आयुष्यात या शक्यता प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत.

बाकी पत्रिकेतील प्रत्येक ग्रहयोग/रचना एक घटना कधिच दाखवत नाहीत. प्रत्येक ग्रहयोग/रचना, ज्या core issue कडे निर्देश असतो त्या core issue चा घटनापट (event spectrum), सूचित करते. त्यामुळे पत्रिकेने निर्देशीत केलेला core issue संदर्भाशिवाय उलगडता येत नाही. त्यामुळे "माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा" इ. प्रश्न/आह्वाने मुदलातच आचरट ठरतात.

तरी असा पळपुटा ज्योतिषी, ज्योतिष महामंडळाच्याच नव्हे, तर अधिवेशनाच्या स्टेजवरही दिमाखाने मिरवतो आहे, हे ज्योतिष्यांना व अधिवेशनाला कितपत भूषणावह आहे? 

ज्योतिषाच्या नावाने बोंबाबोंब करणार्‍या एका जागतिक कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाची  थिअरी पण "चोथा" झाल्याचे ऐकून आहे. त्यांच्या थिअरीचा गाजावाजा झाल्यामुळे मिळालेले सन्मान ते त्यांची theory चोथा झाली म्हणुन परत करतील का?.