शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

कै० अरविंद इनामदार

मी संगणक संगीतावर काम करत होतो, तेव्हा माझा प्रकल्प एक "पर्यटकांचे आकर्षण" ठरला होता. आमच्या संस्थेला भेट देणा-यांना जे प्रकल्प हमखास दाखवले जायचे त्यात माझे संगणकीय संगीताचे काम नक्की दाखवले जायचे. आज काही श्रेयलंपट बराच गैरप्रचार करतात (आणि उघडे पडतात) पण तो भाग वेगळा...

त्या सुमारास कै० अरविंद इनामदार पुण्यात (राज्याचे?) गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून बदलून आले होते. माझे तेव्हाचे वरीष्ठ इनामदारांचे महाविद्यालयीन मित्र असल्याने त्यांनी इनामदारांना संस्थेत आणलेच.
गुप्तचर संचालक असल्याने तेव्हा कै० अरविंद इनामदार सगळीकडे मोठा जामानिमा घेऊन फिरत असत. माझा प्रकल्प बघायला आले तेव्हा जवळजवळ १०-१५ पोलिस अधिका-यांचा थवा कै० इनामदार यांच्या बरोबर होता.

प्रकल्पाचे सादरीकरण सुरु करायच्या आधी मी एक खुर्ची कै० इनामदारांसाठी आणली आणि त्यांना बसायची विनंति केली. माझ्या टेबलजवळ फार गर्दी झाली की सर्वांना संगणक नीट दिसत नसे. बाकीच्यांना नीट दिसावे म्हणून मी पण माझ्या साठी एक खुर्ची ओढली आणि बसून सादरीकरण सुरु केले.

एक पोरगेलासा संशोधक सर्व मातब्बर अधिका-यांसमोर बसून सादरीकरण करतो, हे पोलिस यंत्रणेत उभी हयात घालवलेल्या त्या अधिका-यांना पचवणे कठीण गेले आणि घसे खाकरून, नेत्रपल्लवी करून मला तसे सुचवले गेले. पण उभे राहून सादरीकरण तेव्हा शहाणपणाचे नसल्याने मी तसेच बसून पुढे चालु ठेवले.

मी कै० अरविंद इनामदारांना "संगणकाला उमजलेला" जौनपुरी दाखवत असताना त्यांनी एक आक्षेप घेतला. जौनपुरीचे चलन असे नसते म्हणून त्यांनी एक सुरावट घेऊन दाखवली. मी थंडगार पडलो. पण दुस-या क्षणी मी त्यांना प्रतिप्रश्न केला की "आपण १० गवयांना जौनपुरीचे चलन विचारुया. ते एकच चलन सांगतील याची खात्री काय?" माझा प्रतिप्रश्न कै० अरविंद इनामदारांना आणि त्यांच्या बरोबर आलेल्या थव्याला अनपेक्षित धक्का होता. यातले तात्पर्य असे की एखादी गोष्ट चूक ठरवायच्या अगोदर बरोबर काय हे निश्चित पणे सांगता आले पाहिजे. माझा मुद्दा कै० अरविंद इनामदारांना पटला असावा. पण त्यानंतर आमची प्रश्नोत्तरे रंगली आणि मला शुभेच्छा देऊन ते गेले.

नंतर कै० अरविंद इनामदारांची आणि माझी विद्यापीठाच्या आवारात अर्धा-डझनवेळा तरी गाठ पडली असेल. ते मला हसत सॅल्युट करायचे. त्यामुळे मला किंचित ओशाळायला पण व्हायचे.

पुढे ते राज्याचे पोलिस महासंचालक झाले आणि त्यांच्या विद्यापीठातल्या फे-या थांबल्या. मी त्यांची भेट विसरून गेलो.

पुढे अनेक दिवसांनी मी मुंबईला दख्खनच्या राणीने जात होतो. धारागृहाला भेट द्यायला मी जात असताना खिडकीत बसलेल्या एका व्यक्तीने मला जागेवरूनच हसून सॅल्युट केला. क्षणभर गोंधळलो. मी फक्त जुजबी हसून प्रतिसाद दिला.
मग व्हि० टी० स्टेशन आले. उतरल्यावर सशस्त्र पोलिसांच्या गराड्यात एक व्यक्ती गेटच्या दिशेने जाउ लागली. मी किंचित उत्सुकतेने पुढे जाऊन पाहिले तेव्हा डब्यामध्ये मला सॅल्युट करणारे ते कै० अरविंद इनामदार असल्याचे लक्षात आले आणि अंगावर शहारे आले. कुणाचा विश्वास बसो अथवा न बसो, त्यांची नजर बाजुला वळली आणि आमची परत नजरभेट झाली, आणि परत त्यांनी मान किंचित वाकवून माझ्याकडे बघत स्मित केले. यावेळेला मात्र मी तात्काळ झुकुन आणि हात जोडून त्यांना नमस्कार केला.
एक मोठा आणि साधा माणूस!