मंगळवार, २६ ऑगस्ट, २०१४

रॅपो

अ ला ब चे म्हणणे कळत नाही किंवा पटत नाही.

त्याला/तिला काही सांगितलं तरी कळतच नाही, 
असं म्हणून ’अ’ ला निकालात काढणे किती सोप्पे? 

कितीही तर्कशुद्ध म्हणणे असले तरी 
रॅपो नसेल तर स्वीकारले जाणार नाही. 

Everyone has preferred channels to accept or assimilate. 

रॅपो हा ब नेच निर्माण करायचा असतो!

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४

श्री श्याम मानव यांस,



श्री श्याम मानव यांस,


तुमच्या व्याख्यानाचा सदर व्हीडीओ सकाळी आवर्जुन बघितला. खरं तर बघणार नव्हतो. पण बघितल्यानंतर एक प्रश्न निर्माण झाला आहे आणि तो सतावतो आहे. अंधश्रद्धांमुळे शोषण होते हे सध्या युक्तिवादाकरता मान्य करतो. पण तुम्ही ज्या प्रयत्नवादाचा पुरस्कारकरता तो तरी शोषणविरहित आहे याची खात्री तुम्ही देऊ शकलात तर मी ज्योतिष सोडुन देईन.

म्हणजे असं आहे बघा, वैद्यकीय उपचारांकरता मी विज्ञानोक्त उपचार स्वीकारले तरी वैद्यकीय व्यवस्था माझे शोषण करतेच. हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगायची आवश्यकता नाही. हे शोषण अंधश्रद्धेच्या शोषणापेक्षा पवित्र आणि सुसह्य (बुद्धीनिष्ठ!) आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

शिक्षणक्षेत्राबद्दल असेच म्हणता येईल.

हे उदाहरण पटकन सुचले म्हणून दिले. पण प्रयत्नवादाशी संबंधित कोणते क्षेत्र शोषणमुक्त आहे, हे शोधणे हा एक कदाचित मौजेचा विषय आहे. कारण प्रयत्न करणारी व्यक्ती अडलेली असते, गरजु असते आणी म्हणुनच ती शोषणासाठी एक उत्तम बकरा ठरते.

माणसं आशेवर जगतात. आशेशिवाय तुमचा प्रयत्नवाद्पण पंगु आहे आणि आशा टिकवायला आजुबाजुचे लोक, परिस्थिती असमर्थ ठरते तेव्हा इतर कोणत्याही निरुपद्रवी मार्गाचा अवलंब करणे यात मला गैर वाटत नाही.

असो. मी तुमच्या ज्योतिषांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेतच. त्यात आता ही एक भर...


आपला

राजीव उपाध्ये.

ps://www.youtube.com/watch?v=HuxCfG4iCkM

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४

कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की...



लोकहॊ,


कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की काही मित्रांच्या आग्रहाखातर चालु केलेले माझे फेसबुकवरील फोटॊग्राफीवरील पेज आज १ वर्षाचे झाले. त्याला एकंदर ७६३ लाईक्स मिळाले. मला अनेकांकडुन उत्तेजन सतत मिळाल्याने सतत नवे काहीतरी करत राहण्याची उर्जा मिळत राहीली आणि आपल्या मर्यादांची जाणीव पण जागी राहीली.


या प्रवासात माझं एक व्हाईट लेन्स घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आता पुढे माझी काही फोटो एसे करायची आणि Hasselblad वर काम करायची इच्छा आहे.


कृपया आपला लोभ असाच राहु द्यावा, ही विनंति.


https://www.facebook.com/RajeevUpadhyePhotography

रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

वजननियंत्रणाची ऐशीतैशी



आज सकाळी पेपर उघडला आणि एक लिफलेट हातात पडले. ती एक वजन नियंत्रण कार्यक्रमाची जाहिरात होती. अशा प्रकारच्या जाहिरातीत लोकांच्या मनावर ठसविण्यासाठी काही सक्सेस स्टोरीज म्हणुन काही व्यक्तींचे उपचारपूर्व आणि उपचारोत्तर फोटो दिले होते. अशा प्रकारच्या लिफमेट मध्ये स्थान मिळालेल्या व्यक्तीमध्ये एक पॅटर्न दिसतो. यामध्ये ४० शी ओलांडलेले सहसा कुणीही दिसत नाही. फोटो उपचारोत्तर लगेच काढलेला असतो, त्यामुळे टिकाऊ परिणामाचा दावा किती खरा किती खोटा याचा पत्ता लागत नाही. ज्या लोकांमध्ये पचन आणि उर्जेशी संबंधित संतुलन मूलत: बिघडलेले असते, त्यांच्यात अशा कार्यक्रमाचा किती परिणाम होतो याविषयी कुणी काहीही बोलताना दिसत नाही.

माझे स्वत:चे वजन चाळीशी नंतर एकदम प्रमाणाबाहेर वाढायला लागले. त्यानंतर मी याविषयावरचे ताजे संशोधन तपासायला सुरुवात केली. हे करत असताना वजन वाढण्याची कारणे असंख्य असतात असे लक्षात आले. उदा.

o चयापचय वयोपरत्वे कमी होणे
० थायरॉईडच्या कार्यक्षमेत घट
० जीवनसत्त्वांच्या (विशेषत: ड ) पातळीत घट
० आहारात कॅल्शियम-मॅगनेशियमचा अभाव
० स्वादुपिंडावरील ताण
० चयापचय कमी करणारी औषधे (रक्तदाबावरील, मनोविकारांवरील औषधे)
० स्नायविक दुर्बलता निर्माण करणारी औषधे (मुख्यत: स्टॅटीन)

मी माझ्या वजनवाढीच्या चिकित्सेसाठी जेव्हा व्यवसायिक आहारतज्ञांचा सल्ला घेतला तेव्हा  माझ्या असे लक्षात आले की यच्चयावत आहारतज्ञ हे अत्यंत बिनडोक असतात. त्यांच्याकडे वरील कारणांसाठी काय करायचे याची उत्तरे तर नसतातच पण "उष्मांक-नियंत्रण" आणि व्यायाम या लाडक्या मंत्राचा जप एव्हढया भांडवलावरच त्यांनी दुकान थाटलेले असते. स्नायविक दुर्बलता निर्माण झालेली असेल तरीही हे आहारतज्ञ व्यायाम करत/वाढवत नाही म्हणुन अंगावर खेकसायला कमी करत नाहीत.

नुकतेच "उष्मांक-नियंत्रण" या लाडक्या समजाला छेद देणारे काही संशोधन नुकतेच वाचनात आणि पहाण्यात आले. "उष्मांक-नियंत्रण" करूनही कायमस्वरूपी वेट्लॉसची ग्वाही देता येत नाही, हा मुद्दा अधोरेखित करणारी काही संशोधने देत पुढे देत आहे.

० https://www.ted.com/talks/sandra_aamodt_why_dieting_doesn_t_usually_work  सांद्रा आमोट या न्युरॉलोजिस्ट बाईंचा टेड टॉक
० http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2895000/ - उष्मांक नियंत्रण दीर्घकालीन परिणाम देत नाही, किंबहुना त्याचेही दुष्परिणाम असतातच

आणखी एक दूर्लक्षित मुद्दा -
० http://www.biologicalpsychiatryjournal.com/article/S0006-3223%2814%2900385-0/abstract  - ताणामुळे लठ्ठपणा वाढतो

तात्पर्य, एखाद्या आहारतज्ञाने अमक्या सेलेब्रिटीचे वजन कमी केले म्हणून तो/ती आपले करू शकेल याची खात्री देता येत नाही. वजनवाढीच्या कारणांचा शोध न घेऊ शकणारा  आहारतज्ञ हा बिनडोक समजावा. व्यायाम करायलाच हवा पण व्यायामाची काठीन्यपातळी आपल्याला झेपेल एव्हढीच ठेवावी आणि स्वत:च्या वकुबानुसारच वाढवावी. जिम प्रशिक्षकाच्या दबावाला जास्त किंमत देऊ नये.

शनिवार, २ ऑगस्ट, २०१४

आगामी ग्रहयोग - गुरु-शुक्र आणि शनि-मंगळ युती



येत्या १० ऑगस्ट रोजी सायन सिंह-कुंभ राशीत १८ अंशावर पौर्णिमा होत असुन ही पौर्णिमा गोचर शनीशी केंद्र योग करते. त्याच बरोबर शनिबरोबर मंगळाची युती चालु होते. अंशात्मक शनि-मंगळ  युती दि २६ ऑगस्ट रोजी होते. एकंदर आगामी कालावधी बर्‍याचजणाना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

सायन वृश्चिक, कुंभ, वृषभ, सिंह रास १२ अंश ते २२ अंश,  हे क्षेत्र या ग्रहयोगांनी प्रभावित केले असल्यामुळे या अंशात कुणाचे जन्मरवि, जन्मचंद्र, लग्न किंवा ख-मध्य असतील तर आगामी काळ अडथळे, अपघात, आजारपण इत्यादीनी त्रस्त करायची शक्यता आहे.

वरील क्षेत्रात इतर अन्य ग्रह असल्यासही आगामी काळ काहीना काही प्रमाणात त्रासदाय्क ठरायची शक्यता आहे.

वरील ग्रहयोगांशिवाय येत्या १८ ऑगस्ट रोजी होणारी गुरु-शुक्र युती सायन सिंह राशीत ७ अंश १४ मि. वर होत असुन एक अत्यंत शुभ योग आहे. या युतीने सायन सिंह, तूळ, धनु, कुंभ, मेष, मिथुन
या राशीत जन्मरवि, जन्मचंद्र, जन्मलग्न किंवा जन्मख-मध्य असतील तर आगामी काळात काही ना काही शुभ घटना घडुन प्रगतीचे पाऊल पुढे पडायची शक्यता संभवते.

बराच मोठा जनसमुदाय या योगांमध्ये येत असल्याने जन्मतारखांचे गणित देऊ शकत नाही.