कालचाच प्रसंग.
माझ्यातल्या माकडाने उत्क्रांतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.
सकाळी ११ च्या सुमारास बॅंकेत जाण्याच्या उद्देशाने मी घराबाहेर पडलो तेव्हा आमच्या घराच्या गेट समोर एका मंद्बुद्धी चालकाने भली मोठी बोलेरो वाट अडवून उभी केली होती. गाडीने पूर्ण रस्ता अडवला होता. ड्रायव्हर आसपास कुठेही दिसत नव्हता. मला माझी गाडी बाहेर काढायची असती तर कपाळाला हात मारून घेण्याशिवाय दूसरा कोणताही पर्याय नव्हता.
डोक्यात संतापाची तिडीक गेली. मी गाडीचे चाक पंक्चर करायचे ठरवले. प्रथम घरात जाऊन कॅमेरा आणला आणि गाडीचा एक फोटो काढला. पुरावा म्हणून. नंतर पंक्चर करायला हत्याराची शोधाशोध केली तेव्हा एक हॅण्ड्ड्रील हाताला लागले.
ते घेऊन मी चाकाला भोक पाडायला योग्य जागा शोधायला लागलो आणि नेमका ड्रायव्हर टपकला. मी चाकाला ड्रील लावले न लावले तोच तो भानावर य़ेऊन मला म्हणाला,
"काय करताय राव हे साहेब?"
"गाढवा, तू काय केलं आहेस ते तुला कळतय का?"
"गाढव, कुणाला म्हणता साहेब?"
यावर मी मात्र मी खवळलो. त्याच्या तोंडासमोर ड्रील रोखून धरले अन म्हणालो,
"एक अक्षर बोललास तर याच ड्रीलने तुझे डोळे फोडीन"
माझा त्वेष बघून त्या ड्रायव्हरने आपला मूर्खपणा आवरता घ्यायचे ठरवले असावे. एक अक्षर अधिक न बोलता त्याने गाडी तिथून काढायची कार्यवाही सुरू केली.
त्याने माघार घेतलेली पाहून मी पण तत्क्षणी सुखावलो. आणि आजपर्यंत ४८ वर्षांच्या आयुष्यात जे करायला धजलो नाही ते केले.
शुद्ध मराठीत त्याची "आयमाय" उद्धरली. ड्रायव्हरने काही प्रतिक्रिया दिली नाही.
माझ्या तोंडातून जे शब्द निघाले त्यांची जाणीव झाल्यावर मीच थरथरायला लागलो होतो.
एव्ह्ढे होई पर्यंत स्वत:ला सावरायचा प्रयत्न सुरु केला आणि बॅंकेच्या दिशेने जायला निघालो. जाताना माझ्यातला बुद्ध जागा झाला आणि मानवी वाणीने माझ्याशी बोलू लागला,
"अरे तू त्याच्या गाडीचा नंबर बघितलास ना? तो रात्रभर प्रवास करुन दमून भागून आला असेल. आणि त्याला संडास-बाथरूमची घाई झाली असेल आणि त्यामुळे पटकन जागा दिसली म्हणून त्याने त्याने गेट समोर लावली असेल. काय चूकलं त्याचं, सांग बरं! या प्रश्नाचं उत्तर ठाऊक असून दिले नाहीस तर तुला कधिच निर्वाण प्राप्त होणार नाही..."
मी या निर्वाणीच्या भाषेने दचकलो...
आता मला गप्प बसणे शक्यच नव्हते. मी म्हटले,
"अरे, आत्ता माझ्या घरात आणीबाणीचा प्रसंग असता आणि रूग्ण्वाहिका बोलवावी लागली असती तर त्या ड्रायव्हरचे मलमूत्र उरकेपर्यंत वाट बघत बसायचे का?"
या माझ्या उत्तराने बुद्ध ओशाळला आणि डोळे मिटून त्याने परत मौन धारण केले...