काल आणि परवा पुण्यात एका गिर्यारोहण संस्थेने पानिपतच्या रणसंग्रामावर श्री. निनाद बेडेकरांची दोन दिवस व्याख्याने आयोजित केली होती.
दोन्ही दिवस मी माझ्या कन्येला घेउन या भाषणांना उपस्थित राहिलो होतो. माझी मुलगी सीबीएसई बोर्डाच्या शाळेत जाते. त्यांना जो इतिहास शिकवतात तो नि:सत्त्व इतिहास शिकवतात. त्यांना नेमलेल्या पुस्तकांवरून नजर टाकल्यावर माझे हे ठाम मत बनले आहे. इतिहासाच्या शिक्षणात तरी माझी मुलगी माझ्या इतकी नशीबवान ती नाही कारण चित्रकलेच्या तासाला मुलाना इतिहासातील गोष्टी सांगणारे पुरंदरेसर त्यांच्या नशीबी नाहीत. मी शाळेत असताना वेगवेगळ्या निमित्ताने होणारी व्याख्याने आणि त्यातून होणारे संस्कार पण या मुलांच्या वाट्याला नाहीत. अशा उदात्तीकृत आणि म्हणून एकतर्फी इतिहासाने माझे थोडेफार पोषण नक्कीच केले आहे.
इतिहासाच्या शिक्षणातून काय साधायला हवं? मला वाटतं याची उत्तरे अशी देता येतील - इतिहासातून गतकालाचा परिचय व्हावा
हे काम शालेय शिक्षणातून अत्यंत रटाळपणे केले जाते.
- ऐतिहासिक घटनांनी निर्माण केलेली उर्जा अखंड स्रवून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळावी
मी शाळेत असताना आमच्या पुरंदरेसरानी सांगितलेल्या गोष्टी आणि सध्या निनाद बेडेकरांसारख्या व्रतस्थ इतिहासप्रेमींच्या व्याख्यानातून हे नक्कीच साध्य होत आहे असं मला वाटतं. व्याख्यानाचा १ला दिवस झाल्यावर मी माझ्या मुलीला विचारलं की "तुला काय काय समजलं?" तेव्हा तिने मला प्रामाणिकपणे सांगितले, की तीला काहीही समजलं नाही. पण तरीही दुसर्या दिवशीचं व्याख्यान तिला ऐकायला जायची इच्छा होती. (आणि आम्ही गेलोही!) यावरून मला एक गोष्ट जाणवली ती अशी की माझ्या मुलीला व्याख्यानातलं काही समजलं नाही हे तिच्या शाळेतल्या इतिहास शिक्षणाचं अपयश आणि तरीही तिला दुसर्या दिवशी जावसं वाटलं हे बेडेकरांच्या तपश्चर्येचं यश!
मी पण बेडेकरांनी बारीकसारीक तपशीलासकट, हातात कागदाचा एकही चिटोरा न घेता पानिपताचा इतिहास उभा केला त्यामुळे थक्क झालो होतो. माझ्या आठवणीत फार थोड्या व्याख्यानांनी कायमचे घर केले आहे. मुंबईत टिआयएफार मध्ये झालेले प्रो. चंद्र्शेखरांचे कृष्णविवरांवरचे व्याख्यान, प्राध्यापक मे. पुं. रेग्यानी पुण्यात स्नेहसदन मध्ये दिलेली बुद्धावरची व्याख्याने आणि जनरल के व्ही कृष्णरावांनी बालगंधर्वमध्ये दिलेले काश्मिरप्रश्नावरचे व्याख्यान, ही ती व्याख्याने. त्यात आता एक नवी भर पडली ती बेडेकरांची. असो.
तरी पण एका गोष्टीची मला रुखरुख लागून राहिली. माझ्या मते इतिहासाचं शिक्षण तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण इतिहास जसा आहे तसा स्वीकारायला शिकतो. जसा आहे तसा इतिहास स्वीकारणं हे अतिशय अवघड आहे. त्याला भावनिक पदर बरेच आहेत. पण समाजाचे पाउल पुढे पडायला हवे असेल तर त्याच त्याच होणार्या चूका टाळायला हव्यात. त्या चूका टाळायच्या असतील तर इतिहासातील काळी बाजू पांढर्याबाजूच्या बरोबरीने स्वीकारता यायला हवी. कारण काळी बाजू पुढे आली नाही तर चूकांची दूरुस्ती करायचा सल समाजमनात निर्माण होणार नाही.
बेडेकरांच्या व्याख्यानात मराठ्यांच्या इतिहासातील काही चूका अशाच बाजूला सारल्या गेल्या. मराठ्यांच्या पराक्रमाचे पोवाडे फक्त महाराष्ट्रातच गायले जातात... पण महाराष्ट्राबाहेर मराठ्यांची प्रतिमा ही लुटारु अशी आहे (याचा उल्लेख बेडेकरांनी केला पण अतिशय पुसट असा. श्रोत्यांपैकी कितीजणांना या प्रतिमेचं गांभीर्य कळलं हा प्रश्नच आहे). पानिपतापूर्वी आणि पानिपतानंतर मराठ्यांनी प्रचंड पराक्रम करून सत्ता मिळवली पण जिंकलेल्या प्रदेशात आपलेपणाची भावना निर्माण केली नाही. हे मत माझे नाही तर इतिहासाचार्य राजवाड्यांचे आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत.
जाता जाता प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या हातून य़ुद्धाच्या गडबडीत (कदाचित अनवधानाने) केलेल्या चूकीचा उल्लेख करावासा वाटतो. ती चूक श्रीकृष्णाच्या हातून झाली नसती तर आज आपला देश कदाचित वेगळा घडला असता. फळाची आशा न करता श्रीकृष्णाने निष्काम कर्म करायला सांगितले म्हणजे ते रिवॉर्ड आणि पनिशमेंटच्या नैसर्गिक सत्याविरुद्ध करायला सांगितले. फळाच्या आशेने मनुष्य कर्म करतो तेव्हा तो ते एफिशियण्ट्ली करायचा प्रयत्न करतो. भारतीयांनी आजवर आपापली कर्मे जर एफिशियण्ट्ली केली असती तर आपला देश कदाचित निराळा घडला असता. श्रीकृष्ण 'कर्म एफिशियण्ट्ली करा' असे सांगायला विसरला...