सोमवार, १६ जानेवारी, २०२३

उर्फी जावेद आणि तिचे अंगप्रदर्शन

उर्फी जावेदच्या (त्या अगोदर दीपिका पदुकोण, रणवीर यांच्या "स्वैराचारा"वर जी धूळ उडवली जात आहे. त्याबद्दल लिहावं की नाही त्याबद्दल मला निश्चित ठरवता येत नव्हतं. 

उर्फी जावेदच्या मागे लागलेल्या चित्रा वाघ यांनी घेतलेले मुख्य आक्षेप असे आहेत (आधार त्यांच्या मुलाखतींचे विविध व्हिडीओ)

० सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणा ही विकृती

० निष्पाप मुली विकृतांच्या शिकार

० फॅशनच्या नावाखाली कमी कपडे इ० इ० 

० शिवाजी महाराजांच्या राज्यात हे काय चालले आहे


आता वरील चार पैकी प्रथम तिन्ही मुद्द्यांचा लसावि काढला तर त्यात उर्फीच्या अर्धनग्नतेला श्रीमती वाघ यांचा आक्षेप आहे असे वाटते. या आक्षेपातले तथ्य निश्चित करण्यासाठी नग्नतेबद्दल काही गोष्टी तपासूया.

 

अलिकडेच काही वर्षांपूर्वी सध्याच्या सरकारने पोर्न वेबसाइटवर एक धडक मोहिम चालवून ते बंद करायचा धाडसी निर्णय घेतला. पण ते बंद झाल्याने पोर्नोग्राफी बंद झाली नाही की या देशातली उपलब्धता कमी झाली नाही. उद्या उर्फी जावेदला तुरूंगात टाकले तरी लैंगिक भावनांना उत्तेजन देणारे असंख्य स्रोत तसेच चालू राहणार आहेत. निर्भयाच्या आरोपींना फाशी देऊन बलात्कारांमध्ये यत्किंचितही फरक पडलेला नाही. 


कोणत्याही वर्तनाच्या योग्यायोग्यतेची चिकीत्सा मर्यादित पटलावर न होता व्यापक पटलावर होणे हे कधीही श्रेयस्कर असते. उदा० एखाद्या औषधाचा परिणाम तपासण्यासाठी अभ्यासलेला समूदाय (नमूना) जर लहान असेल तर निष्कर्ष एकांगी आणि चुकीचे निघतील. पण जर ते मोठा समूदाय  घेऊन तपासले तर निष्कर्ष स्वीकारार्ह असण्याची शक्यता असते. 


अंगप्रदर्शन, नग्नता (वि० सामाजिक नग्नता) हे वर्तन "योग्य किंवा अयोग्य" याचा निर्णय करायचा झाला तर संदर्भपटल व्यापक करण्यासाठी आपल्यापेक्षा प्रगत (आर्थिक, वैचारिक इ० किंवा ज्यांच्या चलनाचे मूल्य रुपयापेक्षा जास्त आहे असे देश) आणि अप्रगत अशा समाजात यासंबंधी कसे बघितले जाते हे तपासणे योग्य ठरेल आणि एक मोठ्ठी गंमत लक्षात येईल...


प्रथम आपल्यापेक्षा जगभरच्या अप्रगत समाजाचा विचार करू या. इथे अप्रगत अवस्थेचे वर सांगितलेले निकष लावले  तर आदिवासी आणि भटके इ० मनुष्य समुदायात नग्नता/अंगप्रदर्शन हे फारसे निषिद्ध नसल्याचे लक्षात येते. भारतात माझ्या लहानपणी एका विशिष्ट कष्टकरी वर्गातल्या स्त्रिया छाती फक्त पदराने झाकत असत. त्यांच्यात पोलकं वापरण्याची पद्धत नव्हती. या अप्रगत समाजातील नग्नतेने त्यातील स्रियांवर कुणी अत्याचार केल्याचे कधीही कानावर आलेले नाही. 


आता आपल्यापेक्षा प्रगत समाजात नग्नता/अंगप्रदर्शन यासाठी थोडे कष्ट घेतले तर लक्षात येईल की असंख्य देशात सामाजिक नग्नता ही अजूनही पूर्णपणे सामान्य मानली जाते. जगात सामाजिक नग्नतेला केंद्रस्थानी ठेऊन अनेक उत्सव साजरे केले जातात. पार जपान पासून (कानामारा मात्सूरी) ते ब्राझिल मधल्या कार्निव्हल पर्यंत उत्सवी नग्नतेला समाजमान्यता आहे. फ्रान्समध्ये कॅप द’आग्द हे गाव नग्नपंढरी म्हणून ओळखले जाते. ब्रिटनमध्ये सामाजिक नग्नतेला पार्लंमेंटने कायदा मंजूर करून मान्यता दिली. स्पेन्सर ट्युनिक नावाचा एक प्रसिद्ध फोटोग्राफर सामुदायिक नग्नतेच्या फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या आयकोनिक फोटोग्राफीत सहभागी होण्यासाठी जगभरचे लोक प्रतिक्षा यादीत ताटकळत असतात.  ऑस्ट्रेलियाने नुकताच त्याच्यासाठी आपला कायदा बदलला असे वाचनात आले. चित्रपटातील पडद्यावरील नग्नता आपल्या परिचयाची आहे, जी आपण अजूनही पचवू शकलेलो नाही. पण युरोपात नाटकीय (थिएट्रीकल) नग्नता सर्रास आणि सामान्य आहे. स्वीडन आणि स्वित्झर्लंड सारख्या देशात भर गर्दीच्या चौकात, ज्यात सर्वजण पूर्ण नग्न आहेत असे नृत्यप्रयोग दिवसाढवळ्या होतात. याची असंख्य उदा० जालावर उपलब्ध आहेत.   आपल्या देशात मात्र धर्मप्रणित नग्नतेला (आणि ती पण पुरुषांच्या) "मान्यता" आहे. खरं तर ही एकप्रकारची लबाडी आहे पण असो.

ही मी कलात्मक नग्नतेशी संबंधित अतिशय मोजकी आणि माफक उदाहरणे इथे अशासाठी दिली याचे कारण असे की अशा व्यापक पार्श्वभूमीवर नग्नता आणि अंगप्रदर्शन यातील योग्यायोग्यता तपासताना आपला भारतीयांचा भोंगळपणा/लबाडी/दूटप्पीपणा आपोआप उघडा पडतो. जगातील एक मोठा वर्ग नग्नतेने उत्तेजित न होता अत्यंत हेल्दी नजरेने जर बघत असेल तर  मग इंचभर उघडे अंग बघून उत्तेजित होणारे आपण भारतीय लोक "विकृत" मानसिकतेचे ठरतो.  या सर्वाच्या मूळाशी स्त्रिने "मापात" राहावे, ही प्रवृत्ती असल्याचे मान्य करावे लागेल.


लेखाचा समारोप करण्यापूर्वी चित्रा वाघांच्या युक्तीवादातील पोकळपणा उघडकीस आणणे आवश्यक आहे - एक म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांना उगाच मधे ओढले आहे असे वाटते. कोणतीही ऐतिहासिक व्यक्ती आज परत जन्मली तर ती व्यापक विचार करून आजच्या जीवनशैलीशी सुसंगत प्रागतिक मूल्ये स्वीकारेल की जुन्या मूल्यांना चिकटून बसेल? दूसरे असे की समजा उर्फी जावेदने आपल्या वर्तनात जर बदल केला आणि स्त्रियांवरील अत्याचार जर चालूच राहीले तर चित्रा वाघ आपली भूमिका बदलणार का? 


अर्थात मला याचे संयमित उत्तर मिळेल याची अपेक्षा नाही कारण *आक्रस्ताळेपणा आणि निरर्थक थयथयाट* हा सध्याच्या भारतीय समाजाचा स्थायीभाव बनला आहे.