४-५ वर्षापूर्वीची गोष्ट... एका पुरोगामी प्रतिष्ठितास मी एका प्रकल्पाची कल्पना सांगितली. त्यांनी हा प्रकल्प करता येईल असे उत्साहाने सांगितले . पण मग हळुच मला एक थेट प्रश्न टाकला त्याने मात्र मी पार उडालो.
या गृहस्थानी विचारले, "या प्रकल्पाचे श्रेय कुणी घ्यायचे?"
मी नंतर त्या प्रकल्पाचा विचार डोक्यातुन काढुन टाकला...
याउलट दुसरा एक अनुभव. मी संगणक संगीतात काम करत होतो तेव्हा डॉ. किरण रेगे प्रा. सहस्रबुद्ध्यांच्या बरोबरीने माझ्या कामावर देखरेख ठेवायचे. मी त्यांच्याबरोबर बरोबर माझ्या प्रकल्पासंबधित अनेक तांत्रिक बाबींवर चर्चा करत असे. मी माझा १ला संशोधन निबंध लिहीला तेव्हा प्रा. सहस्रबुद्ध्यांनी मला डॉ. रेग्याना त्यांचे नाव सहलेखक म्ह्णुन लावायचे का? असे विचारायला सांगितले. मी डॉ. रेग्यांना तसे विचारले तेव्हा त्यांनी नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले, "तुला हवंच असेल, तर एक तळटीप देउन ’ऋणनिर्देश’ कर"! माझ्या याच निबंधाला त्याच संस्थेतल्या दुसर्या एका हलकट व्यक्तीने त्याचे नाव लावले नाही म्हणुन कायमचा डुख धरला.
माझ्या सदसद्विवेक-बुद्धीनुसार सामुहिक यशापयशात प्रत्येक घटकाची योग्य ती दखल घ्यायलाच हवी. पण ती त्या त्या व्यक्तीच्या योगदानाच्या प्रमाणात असावी. या संबधीची मार्गदर्शक तत्त्वे मला लिखित स्वरूपात कधी सापडली नाहीत.
आणखी एक मजेशीर अनुभव ... राज्य मराठी विकास संस्थेने एक सेमिनार आयोजित केला होता. त्यात निंबध पाठविण्यासाठी मला सेमिनारच्या निमंत्रकबाईंचा फोन आला ( या बाई ज्ञानपीठ पुरस्कार समितीवर पण होत्या). त्यांनी मला काही कसलाही आगापिछा न ठेवता सांगितले, "तुम्ही तुमचा निबंध अमुकतमुक व्यक्ती बरोबर लिहा आणि पाठवा". ते ऐकुन माझे डोके फिरले. ज्या व्यक्तीबरोबर मला निबंध लिहायला सांगण्यात आला होता ती व्यक्ती आमच्या संस्थेच्या ग्रंथालयात पुस्तकांवरची धूळ झाडायचं काम करायची. याच सेमिनारमध्ये निबंध वाचनाचे आमंत्रण मला मिळाल्याची बातमी ऐकल्यावर पुण्यातल्या एका प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञांनी मला बोलवुन सांगितले, "तू स्वतंत्र पेपर लिहू नकोस. मी तुला मुद्दे देतो". मला तात्पर्य समजले. मी प्रा. मे. पु. रेग्यांकडे माझी नाराजी याबद्दल व्यक्त केली. नंतर मला आयोजकबाईनी फोन करून स्वतंत्रपणे लिहीण्यास ’परवनागी’ दिली. माझा निबंध सादर केल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी म्हणजे प्रा. रमेश तेडुलकरांनी धावत येऊन माझे कोतुक केलेच पण दुसर्या दिवशीच्या मटामध्ये सेमिनारच्या वार्तांकनात मला बर्यापैकी जागा मिळाली.
माझे संगणकीय-संगीताचे काम मला निधी पुरविण्यास अनेक संस्था उत्सुक असुन बंद पाडण्यास भाग पाडण्यात आले. पदोन्नती रोखणे हा खच्चीकरणासाठी सर्वोत्तम मार्ग असतो.
आज मी मागे वळुन, भावना बाजुला ठेवुन, त्रयस्थपणे सगळ्या घटनाक्रमांकडे बघतो तेव्हा एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते. माझ्या कामामुळे मला जो लाईमलाईट मिळाला त्यात प्रा. सहस्रबुद्ध्यांशिवाय कुणी खर्या अर्थाने वाटेकरी होऊ शकत नव्हते (आणि अनेकजणांचे खरे दु:ख तेच आहे). संबंधित संस्थाचालकांना प्रा. सहस्रबुद्धे किती सलत होते, संगणक-विभागाची जागा बळकावण्यासाठी त्यांना किती भयानक अपमानास्पद वागणुक देण्यात आली याचे असंख्य साक्षीदार आहेत. असो...
’श्रेय’ या विषयावरून ज्या आठवणी जाग्या झाल्या त्यात आणखी एक किस्सा सांगितल्याशिवाय राहवत नाही.
१९९४ मध्ये दिल्ली-दूरदर्शनला माझी मुलाखत राष्ट्रीय प्रसारणातील बातम्यासाठी घ्यायची होती आणि त्यांचे पथक पुण्याला येऊन थडकले. पण त्यामुळे माझ्यासमोर एक नैतिक अडचण निर्माण झाली. मी पदोन्नतीसाठी तडजोड करून माझे संगणक-संगीत विषयक काम थांबवले होते. असे असताना दूरदर्शनला मुलाखत देणे म्हणजे संस्थाचालकांची मूळव्याध चिघळणार होणार हे नक्कीच होते. मग मी दूरदर्शनच्या पथक प्रमुखाला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली. त्यावर त्यांनी मला "काळजी करू नकोस. आपण तुमच्या संस्थाचालकांनाही मुलाखतीत सहभागी करू. ते येतील कसे ते मात्र तू बघ."
आमचे संस्थाचालक लाजत-मुरडत मुलाखतीसाठी तयार झाले. कॅमेरासमोर काय बोलायचे हे माझ्याकडुनच मागविण्यात आले. त्यांच्यानंतर माझी मुलाखत विनाअडचण पार पडली. दोन दिवसांनी राष्ट्रीय प्रसारणामध्ये मुलाखत प्रसारित झाली तेव्हा संस्थाचालकांचा भाग पूर्णपणे कापून टाकला गेला होता...