सोमवार, २७ मार्च, २०१७

उणीव



काल माझ्या प्रोफाईलवरचा कव्हर फोटो बदलला, त्या निमित्ताने भ० गी० वर परत एकदा चिंतन झाले. सहस्त्रसूर्यांच्या तेजाशी बरोबरी करणार्‍या कृष्णाला एक युद्ध थांबवता आले नाही या माझ्या आक्षेपाबरोबर आता एका नव्या ’ओरिजिनल’ आक्षेपाची भर -

अर्जुनाला कर्म करण्यास प्रवृत्त करण्यासाठी, ’सहस्त्रसूर्यांच्या तेजाशी बरोबर” करणार्‍या कृष्णाला मोक्ष या भ्रामक कल्पनेचे गाजर दाखवावे लागले.      भ्रामक कल्पनेचे गाजर दाखवून काम करवून घेणे हे एक प्रकारचे ’शोषण’च आहे. या शिवाय ’सहस्त्रसूर्यांच्या तेजाशी बरोबरी’ करणार्‍या कृष्णाला भ्रामक कल्पनेचा उपयोग करावा लागला म्हणजे -

० एक तर सामर्थ्यशाली परमेश्वर बुद्धिवादी नसतो, असा निष्कर्ष काढणे चूक ठरणार नाही.
० बुद्धीवाद कर्तव्यपालनास प्रेरणा देण्यास असमर्थ असतो असा एक उपनिष्कर्ष यातून सहज काढता येतो.
० समजा सामर्थ्यशाली परमेश्वर बुद्धिवादी असे क्षणभर मान्य केले तर अर्जुन राजपुत्र असुनही बुद्धिवादी नव्हता असे स्वीकारावे लागेल

तर सध्या माझी समस्या अशी की ’सहस्त्रसूर्यांच्या तेजाशी बरोबरी’  करणारा कृष्ण बुद्धिवादी होता आणि अर्जुन पण बुद्धिवादी होता असे मानले तर भगवतांनी अर्जुनाला नेमके कसे कर्मप्रवृत्त केले असते.

म्हणुन माझे (’या ठिकाणी’ ’फेसबुकच्या माध्यमातून’) तमाम बुद्धिवाद्यांना असे आवाहन आहे की त्यांनी ताबडतोब ’बुद्धिवादी भगवद्गीतेची’ उणीव युद्धपातळीवर भरून काढावी...