गुरुवार, २९ एप्रिल, २०१०

कथा प्रवृत्ती निवृत्तीची

पूर्व प्रसिद्धी - रविवार सकाळ, १९.०४. १९९८

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट काही सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या खांद्यावर ऒढून घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने प्रभावित होऊन प्रेतामधला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, "राजा तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटतॆ. तुझे कष्ट थोडेफार हलके व्हावेत म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतॊ."

"फार पूर्वी या पृथ्वीतलावर प्रवृत्तिपाद आणि निवृत्तिपाद या नावाचे दोन फार मोठे राजे होऊन गेले. प्रवृत्तिपादाच्या राज्याचे नाव होते प्रवृत्तिपुर आणि निवृत्तिपादाच्या राज्याचे नाव होते निवृत्तिपुर. एका राज्यातून दूस-या राज्यात जाताना अनेक डोंगरद-या, नद्यानाले, हिंस्र श्वापदांनी भरलेली घोर अरण्ये आणि सात समुद्र पार करावे लागत. दोन्ही राजांच्या प्रजेची राहणी फारच भिन्न होती. दोन्ही राजांच्या नावाप्रमाणे एक राज्य प्रवृत्तीचे उपासक होते तर दूसरे निवृत्तीचे. निवृत्तिपुराची लोकसंख्या प्रवृत्तिपुराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त होती, तर प्रवृत्तिपुराच्या प्रजेची समृद्धी अधिक होती. राजा प्रवृत्तिपाद आपल्या प्रजेला सर्व प्रकारची ऐहिक सुखे उपभोगत यावीत म्हणून झटत असे. त्याने राज्याची भरभराट व्हावी म्हणून व्यापार, उद्योगधंदे, शिक्षण यांना उत्तेजन दिले. प्रवृत्तिपुरातील व्यापारी माती सोन्याच्या भावाने विकत, तर निवृत्तिपुरात सोने मातीच्या भावाने विकले जाई."

"प्रवृत्तिपुरातील विद्यापीठे देशोदेशींच्या विद्वानांनी गजबजून गेली होती. या विद्यापीठांचे जगभरच्या बुद्धिमान विद्यार्थ्यांमध्ये खूप आकर्षण होते. निवृत्तिपुरात मात्र वेगळी परिस्थिती होती. निवृत्तिपुराला हजारो वर्षांचा इतिहास लाभला होता. या इतिहासाचा खराखोटा अभिमान तेथील पौरजन त्यांच्या साध्यासाध्या व्यवहारांमध्ये पण लपवू शकत नसत. निवृत्तिपुरात अनेक उद्योगधंदे चालत. चालणारे चालत, न चालणारे आजारी पडत. आजारी उद्योगांना निवृत्तिपाद मोठमोठी अनुदाने देत असे. निवृत्तिपुरात पण विद्यापीठे होती. काही मोजक्या विद्यापीठातील मोजके विद्यार्थी सोडले, तर एका मोठया ईश्वरी लीलेमुळेच की काय, बाकीचे विद्यार्थी मोठमोठ्या पदव्या प्राप्त करून सुद्धा नोकरीच्या शोधात वणवण भटकत असत."

वेताळ म्हणाला, "हे मित्रा, सांगत काय होतो की जग जिंकण्याच्या ईर्ष्येने प्रवृत्तिपादाने मोठे सैन्य बाळगले होते. सैन्याला लागणारी अद्ययावत आयुधे तयार करणा-या मोठ्मोठ्या यंत्रशाळांची त्याने स्थापना केली होती. देशोदेशींचे कुशल कारागीर तेथे वेगवेगळी यंत्रे आणि आयुधे तयार करण्या साठी अहोरात्र खपत असत. प्रवृत्तीपादाच्या यंत्रशाळामध्ये तयार झालेले रथ मात्र संपूर्ण भूतलावर कीर्ती प्राप्त करून होते. याशिवाय, प्रत्यक्ष आदित्याच्या रथाशीच बरोबरी होऊ शकेल अशा "मरुत्सखा" नावाच्या रथांची निर्मिती तेथील कारागीरांनी केली होती. हे रथ वेगवान असल्यामुळे त्यांच्या जोरावर राजा प्रवृत्तिपाद अनेक युद्धे जिंकला होता. त्याच्या मांडलिकांकडून प्रवृत्तिपुरात निर्माण झालेल्या रथांना मोठी मागणी असे. साहजिकच या रथांची कीर्ती निवृत्तिपुरापर्यंत पोचली होती. अशा रथांची आपल्याला आवश्यकताच नाही या विचाराने प्रत्येकजण आपापल्या दिनचर्येत गुंतला होता."

"प्रवृत्तिपादाला मात्र त्याच्या हूशार प्रधानांनी एकदा सल्ला दिला, की राजा आपण उत्तमोत्तम रथ बनवले तरी ते चालवण्यासाठी लागणारे योग्य सारथी आपल्याकडे नाहीत." यावर राजा प्रवृत्तिपाद चमकला. त्याने प्रधानांना उपाय विचारला. तेव्हा एक प्रधान म्हणाला, "राजा, निवृत्तिपादाची प्रजा खूप मोठी आहे. याशिवाय तेथे विद्वानांची आणि पंडितांची खूप उपासमार होते, असे ऐकले आहे. तेव्हा आपले जुने रथ आपण निवृत्तिपुरात विकायला नेऊ आणि तेथे उत्तमोत्तम सारथी निर्माण करून आपल्या राज्यात आणू." यावर प्रवृत्तिपादाने संमती दर्शवली. पण सर्वाना प्रश्न पडला की निवृत्तिपादाच्या राज्यात रथ विकायचे कसे? यावर सर्व प्रधानांनी एकत्र विचार करून एक नामी शक्कल काढली. निवृत्तिपादाच्या प्रजेचे संस्कृतिप्रेम त्यांना ठाऊक होते. त्यांनी एक वावडी उठवून द्यायचे ठरवले, की मरुत्सखा या रथाची रचना निवृत्तिपुरात होऊन गेलेल्या एका ऋषींच्या ग्रंथात सापडली आहे.

"ही वावडी सात समुद्र, हिंस्र श्वापदांनी भरलेली घोर अरण्ये, डोंगरद-या, आणि नद्यानाले पार करून निवृत्तिपुरात आली तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा एकच धक्का बसला. सगळेजण हे आपल्याला माहित कसे नाही, असे एकमेकांस विचारू लागला. मरूत्सखाचे तंत्रज्ञान आपल्या नगरात विकास पावले, हे ऐकून सगळ्यांचा उर अभिमानाने भरुन आला. बौद्धिक स्वामित्वाची फार मोठी जाणीव निवृत्तिपादाच्या प्रजेला यानिमित्ताने झाली. या घटनेला उपलक्षून निवृत्तिपादाने मोठ्या दक्षिणा देऊन विद्वत्परिषदा आणि पंडितचर्चा घडवून आणल्या. सर्व चर्चा आणि परिषदांतून निवृत्तिपुराच्या प्राचीन संस्कृतीचा अभिमान जोमाने बाहेर पडला. आपल्या राज्यात एखादी कल्पना मांडली जावी आणि ती प्रवृत्तिपादाच्या राज्यात विकास पावावी, हे निवृत्तीपादाला रूचेना. त्याने वाट्टेल ती किंमत मोजून रथांची आयात करायचे ठरविले. आयात केलेले रथ चालविण्यासाठी सारथी तयार करणा-या शाळा काढल्या. या शाळातून बाहेर पडलेले सारथी प्रवृत्तिपादाच्या राज्यात जाऊन उपजीविका करू लागले. पण गमतीची गोष्ट अशी, की प्रवृत्तिपादाने मरूत्सखा सोडून सर्व प्रकारचे रथ निवृत्तीपादास विकले. पण राजा निवृत्तिपाद यामुळे खूप अस्वस्थ झाला.
त्याला चैन पडेना. त्यावर त्याच्या प्रधानांनी सल्ला दिला, "राजन, आपण एका संशोधन मंदिराची स्थापना करून प्रति-मरूत्सखाची निर्मिती करावी." आश्चर्य म्हणजे ही कल्पना राजाला ताबडतोब पटली. त्याने लगेच निधी मंजूर करून प्रति-मरूत्सखा संशोधन मंदिराची स्थापना करण्याच आदेश दिला. रात्रंदिवस खपून एखाद्या मयसभेप्रमाणे वाटणा-या या संशोधन मंदिराची निर्मिती केली गेली. अनेक बुद्धिमान लोकांना निवृत्तिपादाने तेथे नेमले. ही बातमी प्रवृत्तिपुरात जेव्हा पोचली तेव्हा प्रत्येक जण निवृत्तिपुरास परतण्याचे स्वप्न रंगवू लागला."

"प्रति-मरूत्सखा संशोधन मंदिरात अनेक चित्र-विचित्र कौशल्याचे कारागिर अहोरात्र खपू लागले. निवृत्तिपुराच्या इतिहासात लिहिले गेलेले सर्व ग्रंथ, पोथ्या-पुराणे अभ्यासण्यात आले. तसेच, रथाच्या निर्मिती सर्व प्रकारचे सर्व भाग आयात करण्यात आले. एका चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर प्रति-मरूत्सखाची निर्मिती करण्यात आल्याचे निवृत्तिपादाने जाहिर केले. ब्रह्मवृंदाकरवी षोडषोपचारे पूजा करून झाल्यावर प्रति-मरूत्सखा पौरजनांना दर्शनासाठी खुला केला गेला. निवृत्तिपादाच्या राजवाड्यावर प्रति-मरूत्सखा बघण्यासाठी ही मोठी गर्दी लोटली. प्रत्येकाला उत्सुकता होती, की प्रति-मरूत्सखा चालतो कसा? कल्पनेला ताण देऊन प्रत्येकजण आपापसात पैजा मारू लागला. राजाने पण आनंदाच्या भरात एका नव्या रथाच्या निर्मितीची घोषणा केली. अशाच एका चैत्र शुद्ध प्रतिपदेला विधिवत पूजा करून तो सर्वांना बघण्यासाठी खुला केला."

वेताळ पुढे म्हणाला, " ही बातमी दूतांमार्फत प्रवृत्तिपादाच्या राजवाड्यावर पोचली, तेव्हा तो निद्राधीन झाला होता. प्रधानांना कळेना राजाला उठवून सांगावे की नाही. शेवटी एका प्रधानाने धीर करून प्रवृत्तिपादाला उठवून प्रति-मरूत्सखा निर्मितीचे वृत्त सांगितले, पण यावर राजाने मात्र 'ठीक आहे' असे म्हणून कुस बदलली आणि तो पुन्हा घोरू लागला."

येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "मित्रा, प्रवृत्तिपादाला ही बातमी ऐकून काहीच कसे वाटले नाही? या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असून तू दिले नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायाशी लोळू लागतील."

यावर विक्रमादित्याने आपले मौन सोडले आणि हसून तो म्हणाला, " हे बघ, निवृत्तिपादाला जग जिंकायची इच्छा कधीच नव्हती आणि प्रति-मरूत्सखाची निर्मिती फसव्या अभिमानातून झाली, हे लक्षात घे. शिवाय तो चालतॊ कसा हे कुणीच कधी बघितले नव्हते. युद्ध जिंकण्याची गोष्ट दूरच राहू दे."

या उत्तराने वेताळ खूष झाला आणि विक्रमादित्याचा मौनभंग झाल्याने प्रेतासह झाडावर जाऊन लोंबकळू लागला.

बुधवार, २१ एप्रिल, २०१०

"ओ मालक, आमची ब्वाडि पयली घ्या की हो!"

इन्द्रराज पवारांचा (http://misalpav.com/node/12007)पिंडदानाचा अनुभव एक अशीच आठवण जागी करून गेला. त्यांनी पिंडदानाचे दोन वेगवगळे विधी का असा प्रश्न विचारला आहे. मला त्याचे उत्तर असे द्यावेसे वाटते की विधी ज्या समाजाची जशी समूहदृष्टी तसे आकार घेतात.

सतरा अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. माझ्या एका काकांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिव वैकुंठावर घेऊन गेलो तेव्हा त्या दिवशी गर्दी अशी नव्हती पण क्यु मध्ये ४-५ पार्थिवे होती. काकांच्या पार्थिवा अगोदर एका वृद्धम्हातार्‍या मजुराचे पार्थिव होते. तो एका सोसायटीचा वॉचमन म्हणुन काम करत होता. त्याचे क्रियाकर्म करण्यासाठी सोसायटीमधले काही लोक उपस्थित होते. एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन दहनपूर्व विधी करायचे नाही असे काकांच्या आम्ही निकटर्तीयानी ठरवले होते आणि शांतपणे सर्व जण रांग पुढे सरकण्याची वाट बघत होते.

एवढ्यात हळुहळु लोकांची गर्दी वाढायला लागली म्हणता म्हणता १००-१५० मजुर आणि झोपडपट्टीवासीयांचा जमाव जमला. एक शववाहिका भरकन आली आणि एका पोरसवदा मजुराचे पार्थिव बाहेर काढून ठेवण्यात आले. इतका वेळ असलेली शांतता पूर्णपणे भंग पावली होती. जमलेल्या जमावाचा कर्कश्श गोंगाट चालला होता. मरण पावलेला तरूण भाजून मृत्युमुखी पडला होता.

आज दहनासाठी रांग आहे आणि नंबर लागायला वेळ लागेल असे जेव्हा जमावाच्या लक्षात आले तेव्हा त्यांच्या काही जण पुढे येऊन अगोदर वाट पहात असलेल्या लोकांकडे जाउन आम्हाला रांगेत पुढे जाउ द्या म्हणुन आग्रह करु लागले. अगोदर वाट पहात असलेल्या लोकानी शांतपणे जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला तेव्हा जमावाने आवाज वाढवायला सुरुवात केली आणि वैकुंठाचे ऑफिस गाठले. ऑफिसात ते काय करतात याची मला त्या प्रसंगात पण उत्सूकता निर्माण झाली म्हणुन मी पण हळुच मागे गेलो.

"ओ मालक, आमची ब्वाडि पयली घ्या की हो!" जमावातील एकाने अर्ज केला.

ऑफिसातील कर्मचार्‍याने त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला की, एकच दाहिनी चालु असल्यामुळे आज वेळ लागेल याची कल्पना दिली. पण जमाव ऐकायच्या मनस्थितीत नव्ह्ता.

"मालक, तिकडे स्लॅब अर्धवट राहिलीय. तुमचं च्या-पाणी देतो की राव!" गर्दीतून एक आवाज आला. जमाव 'च्या-पाण्या'वर आल्याने वैकुंठातले कर्मचारीपण खजिल आणि हतबल झाले आणि बाहेर येउन रांगेत ताटकळत असलेल्या लोकांची परवानगी मागू लागले.

साहजिकच सुशिक्षितपणाने झुंडशाही पुढे हार खाल्ली. तोवर मृत्युबद्द्लच्या सर्व जाणीवा बोथट होऊन गेल्या होत्या. मी ज्या समाजात जन्माला आलो आणि वाढलो त्याने दिलेला सुसंकृतपणा हा कुचकामाचा असून तो कमकुवतपणा असल्याची खात्री झाली.

अजूनही वैकुंठावर कुणासाठी जायची वेळ आली त्या दिवशीचा कोलाहल आठवतो, आणि कानात घुमत राहतात ते शब्द - "ओ मालक, आमची ब्वाडि पयली घ्या की हो!"

मंगळवार, २० एप्रिल, २०१०

कोडे प्राणायमाचे

काही काही कोडी सुटायला अनेक वर्षे जावी लागतात.

मला एक खोड आहे ती अशी की एखादा उपचार किंवा एखादे औषध कसे काम करते हे जोपर्यंत कळत नाही तो पर्यंत मी बेचैन असतो. त्यामुळे न बोलणार्‍या किंवा कमी बोलणार्‍या डॉक्टरांबरोबर माझे जुळत नाही. प्राणायमाच्या उपयुक्ततेबद्द्ल पण माझे असेच काहीसे झाले होते.

प्राणायमाची महती लहानपणापासून अनेक वर्षे कानावर ऐकू येत आहे. अनेक योगी आणि देशी विदेशी डॉक्टर प्राणायमाचे महत्त्व गाताना ऐकले आहेत. हृद्रोग निवारणासाठी प्रसिद्ध असलेला अमेरीकन डॉक्टर डीन ऑर्निश देखिल प्राणायमाचा पुरस्कार करताना आढळतो. तरी पण प्राणायमाचा उपयोग हृदयविकारामध्ये का आणि कसा होतो याचे समाधानकारक उत्तर काही केल्या मिळत नव्हते. दरम्यान वैद्यकाचे शिक्षण घेत असलेल्या माझ्या मामेभावाने मला त्यांच्या एका प्राध्यापकानी प्राणायमातील संभाव्य कारणपरंपरेबद्द्ल सांगितले आणि माझी उत्सुकता आणखी वाढली. त्याने सांगितले ते असे की योगाच्या विशिष्ट अवस्थांमध्ये मन वेगवेगळ्या पेशीं बरोबर संवाद साधते. हा संवाद नेमका कसा साधला जातो आणि त्यामुळे बरे होण्याची प्रक्रिया जलद गतीने का घडून येते हे कळायला पुढे ४-५ वर्षे जावी लागली. कॅण्डेस पर्ट या बाईंनी केलेल्या न्युरोट्रान्समीटर वरील संशोधनानंतर या कोड्याचा उलगडा झाला.

प्राणायमाच्या कोड्यामध्ये प्राणवायुचा पुरवठा वाढतो हे एकच पालुपद सर्व तज्ज्ञ गाताना दिसतात. पण प्राणायमात असे काय होते की हृदयविकारात अर्धमेल्या स्नायुना प्राणवायुचा पुरवठा नवीन समांतर रक्तवाहिन्यांद्वारे होऊ लागतो? आणि हृदयविकाराचा झटका टाळता येतो. या कोड्याचे उत्तर मात्र मला नुकतेच मिळाले आहे.

युट्युब वर डॉ. प्रकाश मालशे यांच्या सादरीकरणाची एक क्लीप मला नुकतीच पहायला मिळाली. या क्लिप मध्ये त्यांनी प्राणायमातील कुंभकाने हायपोऑक्ज़िया कसा निर्माण होतो हे दाखवले आहे. या कृत्रिम हायपोऑक्ज़ियामुळे मानवी किडनीतील एरिथ्रोपॉयेटीन नावाच्या संप्रेरकाने अस्थिमज्जेला चेतना मिळून रक्तातील तांबड्यापेशींचे प्रमाण वाढते आणि पर्यायाने रक्ताची प्राणवायुधारणक्षमता वाढते, असे स्पष्टीकरण डॉ. प्रकाश मालशे यांच्या युट्युबवरील क्लिप खाली दिले आहे. याला नेट्वर अन्य ठिकाणी दूजोरा दिला आहे. याचा आणखी एक परीणाम म्हणून हृदयाच्या अर्धमेल्या स्नायुमध्ये रक्तवाहिन्यांची वाढ होऊ लागते आणि समांतर पुरवठा चालू झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका टाळायला मदत होते.

सोमवार, ५ एप्रिल, २०१०

श्रीकृष्णाची चूक - कर्मयोगाची ऐशीतैशी

लोकहो

'श्रीकृष्णाची चूक' या माझ्या लेखावर धोंडोपतांची प्रतिक्रिया वाचली. जवळपास अशाच प्रतिक्रिया 'मिसळपाव'वर या लेखावर झालेल्या चर्चेत (http://misalpav.com/node/11675) व्यक्त झाल्या होत्या. काही जणांच्या प्रतिक्रिया मधून "देव चूकेलच कसा" असा सूर डोकावत होता. लोक दैवतांचे मानवीकरण पट्कन करतात. पण मानवीकरण झालेले देव मानवासारखेच चूकू शकतात हे स्वीकारायला ते तयार नसतात.

मला भगवद्गीता ज्यांनी शिकविली त्या टिमविमधल्या देसाईबाईनी गीतेविषयी एकदा एक महत्त्वाचे विधान केले होते. ते असे, गीतेमध्ये प्रश्नांची उत्तरे शोधणार्‍या प्रत्येकाला काही ना काही तरी मिळते. कारण गीतेतील विधाने अर्थनिष्पत्तीच्या दृष्टीने अतिशय लवचिक आहेत. हे तुम्हाला ठाउक असेलच. तेव्हा या लवचिकतेमुळे मी केलेल्या विधानांसंदर्भात गोंधळ होऊ नये म्हणून एक सर्वमान्य संदर्भ स्वीकारणे आवश्यक वाटते. मी हा संदर्भ म्हणून लोकमान्य टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ सुचवू इच्छितो.


"योग: कर्मसु कौशलम्" या दुसर्‍या अध्यायातील ५० व्या श्लोकाचा (ऍनी बेझण्ट आवृत्ती) संदर्भ काही जणांनी दिला. या वाक्याचा अर्थ आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचा विचार करुया. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यात पान क्र. ३५ वर "योग म्हणजे कर्मे करण्याची काही विशेष प्रकारची कुशलता, युक्ती, चतुराई अगर शैली" अशी व्याख्या गीतेनेच केली असल्याचे म्हटले आहे. ही विशेष प्रकारची कुशलता नक्की कोणती हे जाणून घेण्यासाठी त्याच अध्यायातील ४८ व्या श्लोकाचा दुसरा चरण - "सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते" - बघावा लागेल.

'सिद्धी असिद्धी यांचे ठायी समत्व बुद्धि' असाही योग शब्दाचा अर्थ दिल्याचे टिळक म्हणतात. तेव्हा "योगस्थ: कुरु कर्माणि" असा सल्ला देताना समत्व बुद्धीची कुशलता, युक्ती, चतुराई अगर शैली कर्मे करताना वापर असे श्रीकृष्णाला म्हणायचे आहे, यावर कुणाचे दुमत असू नये असे वाटते. यात एफिशियन्सीचा संबन्ध दूरान्वयाने नाही किंवा समत्व बुद्धीने एफिशियन्सी वाढते असेही सिद्ध होत नाही.

इथे मला निर्माण झालेली समस्या अशी की समत्व बुद्धीची "कुशलता, युक्ती, चतुराई अगर शैली" या फलसिद्धीसाठी/यशासाठी "आवश्यक आणि पुरेशा (नेसेसरी आणि सफिशियण्ट)" अटी आहेत का? मला याचे उत्तर नाही असे द्यावेसे वाटते. कारण पुढे १८ व्या अध्यायात "अधिष्टानं तथा कर्ता.." या श्लोकात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या पाच अटी श्रीकृष्णाने सांगितल्या आहेत. तेव्हा योगी होऊन कर्म करणे यशासाठी आवश्यक असेल पण तेव्हढे पुरेसे नक्की नाही.

याशिवाय मला गीतेविषयी आणखी एक विचार सतावत असतो. सश्रद्ध लोकांना त्यामुळे कदाचित धक्का बसेल. मला पडलेला प्रश्न असा - "कर्मण्येवाधिकारस्ते..." इ. गीतावचने किती गांभिर्याने घ्यायची? या वचनांचे उपयोजित क्षेत्र किती?

समजा एखाद्या विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेला बसायाचे आहे. त्यासाठी दोन ढोबळ कर्मे त्या व्यक्तीला करावी लागतील. १ले कर्म म्हणून परीक्षेची पूर्वतयारी करावी लागेल. २ रे कर्म म्हणून प्रत्यक्ष परीक्षा देणे हे होय. योगाची वर दिलेली व्याख्या -
'सिद्धी असिद्धी यांचे ठायी समत्व बुद्धि' - ही आपण जर स्वीकारली, तर परीक्षेसाठी लागणारी पूर्वतयारी पूर्ण होऊ शकेल का? निष्काम कर्माचे तत्व बारावीच्या परीक्षेच्या पूर्वतयारीला लागू पडेल का? माझ्यामते जोपर्यंत फलसिद्धी हे पूर्ण लक्ष्य बनत नाही तोपर्यंत परीक्षेची पूर्वतयारी होणारच नाही. "सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा..." हे तत्त्व बारावीच्या कोणत्याही विद्यार्थ्याला परवडणारे नाही.

आता वर जे २रे प्रत्यक्ष परीक्षा देण्याविषयी चे कर्म सांगितले, त्याचा विचार करू. समजा एखाद्या मुलाने वर्षभर नियमित, उत्तम अभ्यास आणि सराव केला आणि ऐन परीक्षेच्यावेळी जर त्याचे अवसान गळले तर त्याची तुलना अर्जुनाच्या भयगंडाशी करता येईल. तरीही "हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं..." या श्लोकातील विन-विन सिचुएशनचा लाभ पण बारावीच्या परीक्षार्थीना नसतो. कारण परीक्षेत यशस्वी झाला नाही तर तो स्वर्गात न जाता नरकात जाण्याची शक्यता जास्त असते. सांगायची गोष्ट अशी की निष्काम कर्मयोगाचे तत्त्व सर्व कर्माना सारखे लावता येईल असे नाही.

मला तरी निष्काम कर्माचा पुरस्कार हा निरर्थक वाटतो. श्रीकृष्णाने मॅच फिक्सींग अगोदरच केले होते. मी यांना अगोदरच मारले आहे, तू फक्त निमित्त हो (मया एव एते निहता: पूर्वमेव निमित्तमात्र भव सव्यसाचिन् भ. गी. ११.३३) असे म्हटल्यावर, योगी व्हा, फळाची आशा करू नका इत्यादि गप्पा ठीक आहेत.