शुक्रवार, १७ जून, २०२२

गोत्राच्या मूर्खपणा विषयी...

 गोत्राच्या मूर्खपणा विषयी...

=================


-- राजीव उपाध्ये (जून २०२२)


(टीप - या लेखात काही त्रुटी आधळल्यास अवश्य लक्षात आणून द्याव्यात. मी माझ्या जनुकशास्त्रातील तज्ञमित्राना हा लेख दाखवला आहेच. त्यांचा स्पष्ट विरोध नसल्याने त्यांची "मूकसंमती" गृहित धरली आहे. :) ) 


गोत्र या संकल्पनेचा संबंध अनेक लोकांना जनुकशास्त्राशी लावायला फार आवडतो. "सापिण्ड्य", शुद्धवंश या कल्पनांमुळे लोक असं करायला प्रवृत्त होतात. पण ही कल्पना साध्यासोप्या गणिती तर्कावर तपासायची ठरवली तर पत्त्यांच्या मनो-यासारखी कोसळून पडते. हे कसे ते आता बघू या!


अ ही एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचे गोत्र क्ष आहे, असं आपण मानू या! 


अ१ अ२ अ३ अ४ अ५ अ६ अ७ अ८ अ९ अ१० अशी अ ला त्याच्या/तिच्याच लिंगाची मुले झाली असे मानू (म्हणजे अ पुरुष असेल तर अ०, अ१, अ२, अ३ ... पण पुरुषच आहेत). प्रत्यक्षात असे वंशसातत्य राहाण्यासाठी, पुढील प्रत्येक पिढीतील वंशजाचे लग्न होऊन त्यांना त्याच लिंगाचे एक तरी मूल होणे अपेक्षित आहे. पण ही शक्यता अनेक कारणांनी प्रत्यक्षात कमी होते, हे सामान्य बुद्धीच्या व्यक्तीला कळायची अडचण नको. असो.


आता अ ही व्यक्ती मूळपुरूष किंवा मूळस्त्री मानली तर पुढच्या पिढीमध्ये "अ"चे जनुक दर पिढीगणिक निम्म्याने कमी होत जाणार (गणिताच्या सोईसाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये आई कडून अर्धा आणि पित्याकडून अर्धा जनुकीय वारसा येतो. प्रत्यक्षात आईकडून जनुकीय वारसा जास्त येतो). म्हणजेच अ१ मध्ये "अ"चे  ५०% जनुक येणार, तर पुढे अ२ मध्ये "अ"चे २५% जनुक येणार तर पुढील पिढ्यामध्ये अ चा जनुकीय वारसा १२.५% (अ३), ६.२५% (अ४), ३.१२५% (अ५), १.५६२५% (अ६), ०.७८१२५% (अ७), ०.३९०६२५%(अ८), ०.१९५% (अ९), ०.०९७% (अ१०)  असा कमी कमी होत जातो.


या साध्या गणितावरून असे दिसते की साधारणपणे क्ष या गोत्राचा जनुकीय अंश दहाव्या पिढीत फक्त ०.०९७% इतकाच असतो. आता अ ही व्यक्ती आणि तिचे वंशज जर युद्ध, व्यापार किंवा व्यवसाय यासाठी स्थानांतर करत  राहीली तर "अ"च्या वंशजांमध्ये इतर ठिकाणचे जनुक मिसळत जातात. हे मिसळलेल्या जनुकांचे एकूण प्रमाण १० व्या पिढीमध्ये १०० - ०.०९७ म्हणजे ९९.९०३%  इतके असते. 


आता धर्मशास्त्रानुसार पुरुषाच्या ७ व्या पिढीमध्ये (मूळ पुरुषाचा जनुकीय अंश ०.७८% असताना) आणि स्त्रिच्या ५ व्या पिढीत (मूळ स्त्रिचा जनुकीय अंश ३.१२५% असताना) सापिण्ड्य संपते किंवा मूळ गोत्राचा रक्तसंबंध संपतो. 


आता इथे काही विचित्र विसंगती डोके वर काढतात - मातेकडील सापिण्ड्य संपते तेव्हा मातेकडील जनुकीय वारसा पुरुषाकडील सापिण्ड्य संपताना असणा-या जनुकीय वारशाच्या जवळजवळ चौपट असतो. जनुकशास्त्र शास्त्रात dominant genes कल्पना आहे. आता बलिष्ठजनुक जर मातृवंशाकडचे असतील तर मातेच गोत्र बलिष्ठ मानायला हवे पण  धर्मशास्त्राला हे विज्ञान कळत नाही. तसेच प्रत्येक पिढी वयाच्या २० ते ३० व्या वयादरम्यान प्रजोत्पादन करते असे मानले तर साधारण २५० वर्षांनी म्हणजे साधारण आठव्या ते दहाव्या पिढीतील व्यक्ती स्थानांतरामुळे तसेच सामाजिक स्थित्यंतरांमुळे पूर्णपणे वेगळी असते! 


आता आणखी काही मजेशीर गोष्टी ...


१. माणसाच्या एका पेशीच्या केंद्रकातील (nucleus) मधले डि०एन०ए पूर्ण उलगडले तर त्याची लांबी २ मी० इतकी भरते. एका व्यक्तीच्या शरीरातील सर्व पेशीमधील सर्व डि०एन०ए पूर्ण उलगडले तर सूर्य ते पृथ्वी हे अंतर ३०० वेळा  कापता येईल! (https://www.nature.com/scitable/topicpage/dna-packaging-nucleosomes-and-chromatin-310/)


पण एका पेशीत १० पिढीतील पूर्वजाचा अंश शोधायचा झाला तर त्याची लांबी २मी गुणिले ०.०९७ म्हणजे १९.४ सेमी इतकी भरते. ही २३ गुणसूत्रांच्या जोड्यामध्ये विभागल्यावर ८.४३ मि.मि. इतका  १० व्या पिढीतील पूर्वजाचा वाटा एका पेशीमध्ये प्रत्येक गुणसूत्रात असतो. 


आता दहाव्या पिढीतील पूर्वजांची एकूण संख्या किती हे शोधू या!  प्रत्येक व्यक्तीला दोन जन्मदाते असतात. एकएक  पिढी मागे गेले त्याची संख्या पिढीगणिक दूप्पट होत जाते. 


आईवडील २‌**१ (दोनाचा १ला घात) 

(२ x २)    आजीआजोबा २‌**२ (दोनाचा २रा घात) 

(२ x २) x २ पणजी-पणजोबा २‌**३ (दोनाचा ३रा घात) 

((२ x २) x २) x २ खापर पणजी-पणजोबा २‌**४ (दोनाचा ४था घात) 


ही शृंखला दहा पिढ्या मागे नेल्यास २ चा १० वा घात म्हणजे १०व्या पिढीतील १०२४ व्यक्ती  (५१२ स्त्रिया आणि ५१२ पुरुष) आपल्या जन्मास कारणीभूत ठरतात. म्हणजे ख-या अर्थाने सापिंड्य टाळायचे असेल तर या १०२४ जणांची गोत्रे तपासून ती गोत्रे टाळायला हवीत. आता काही उपजातींमध्ये गोत्र संख्या ही मर्यादित आहे. उदा० चित्पावनांची मूळ गोत्रे १४ आहेत, तर क-हाड्यांची गोत्रे २४ आहेत (देशस्थांच्या एकूण गोत्र संख्येविषयी मला माहिती नाही कारण त्यांची गोत्रावळी कुणी प्रसिद्ध केलेली माझ्या पहाण्यात नाही. एखाद्या देशस्थाने माझे गोत्र अमूक असे सांगितले तर कशाशी तपासून बघायचे, ही समस्या निर्माण होते). म्हणजे जाती प्रेमाच्या हट्टापायी १०व्या पिढीतील या १०२४ व्यक्तीनी जर जातीमध्येच लग्न करायचे ठरवले तर "सापिंड्य" (आणि तदानुषंगिक संततीदोष) काही झाले तरी टाळता येणार नाही. तसेच १०२४ व्यक्ती मध्ये ज्या गोत्राची frequency सर्वात जास्त येईल ते गोत्र सर्वात जास्त dominant आणि प्रभावी ठरेल. पण धर्मशास्त्राला हे विज्ञान कळत नाही. 


कोणत्याही भटजीबुवाना हे वंशसात्यताचे गणित कळणे केवळ अशक्य आहे. शिवाय प्रश्न विचारणे, चिकीत्सा करणे परंपरेला फारसे रूचत नाही कारण परंपरेचे अस्तित्व धोक्यात येते.


हे सर्व करताना असे लक्षात येते जाती सारख्या संकल्पना जनुकीय वारशापेक्षा आचार-विचार, संस्कार, चालीरीती या आधारांवर उभ्या राहील्या आहेत आणि तग धरून आहेत. 


हे सर्व विश्लेषण केल्यावर शुद्धवंश ही कल्पना आणि त्यावर निर्माण केलेले डोलारे किती तकलादू आणि मूर्खपणाचे आहे, हे कळले तरी या हा उद्योग सत्कारणी लागला असे मी म्हणेन.