सोमवार, २५ जानेवारी, २०२१

कृष्णाला माफ करा...

कृष्णाला माफ करा...

==============

आत्ताच तूनळीवर एक "प्रेरणादायी व्हिडीओ" बघितला. स्वप्ने बघून ती सत्यात उतरवण्यासाठी केलेल्या ढोर मेहनतीची ती एक कहाणी होती. स्वप्ने सत्यात आणायला कष्ट महत्त्वाचे आहेत, असा काहीसा संदेश या व्हिडीओमधून दिला गेला. कष्ट उपसले तर यश तुमचेच आहे, असे काहीसे तत्त्वज्ञान अशा त-हेच्या प्रेरणादायी कथनातून सतत दिले जाते.  पण यशामध्ये कष्टांशिवाय काही  महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. हे घटक भ० गी० मध्ये शेवटच्या अध्यायात एका श्लोकात आहेत. माझ्यामते आणि आधुनिक जनुकशास्त्राच्या संदर्भात हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. तो असा -

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्। विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।।१८.१४॥ 

अर्थ - योग्य जागा (पोषक वातावरण), प्रयत्न करणारा स्वत:, विविध साधने (रिसोर्सेस),  कष्ट आणि सर्वात शेवटी दैव किंवा नशीब हे यशासाठी आवश्यक घटक आहेत. 

आधुनिक जनुकशास्त्र तुमच्या क्षमता विकसित होण्यासाठी पोषक वातावरणाची, ताणमुक्त वातावरणाची गरज अधोरेखित करते. दूर्दैवाने भारतीय समाजाने, तसेच गीतेला डोक्यावर घेणा-या धर्मगुरूंनी या सर्वात महत्त्वाच्या श्लोकाला "फाट्यावर मारले" आहे.

अलिकडेच माझा आणि जनुकशास्त्राचा ब-यापैकी परिचय झाला. मला अजुनही खगोलशास्त्राऐवजी जनुकशास्त्र लोकाभिमुख झाले तर मानवाचे जास्त कल्याण होईल याची मला खात्री आहे. या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर मी यशाचे वरील लोकप्रिय तत्त्वज्ञान तपासले तेव्हा "कष्ट उपसले तर यश तुमचेच आहे"  हे धादांत खोटे आहे, असे लक्षात येते. 

कारण साधे आहे, 

अपार कष्ट = अपार ताण 

अपार ताण = वाढलेली कॉर्टीसॉल पातळी

वाढलेली कॉर्टीसॉल पातळी = जनुकीय आणि पेशीय बदल व त्यातून शारीरिक आणि मानसिक प्रकृतीची हानी   

शारीरिक आणि मानसिक प्रकृतीची हानी = अनारोग्य, वैफल्य इ० इ०

याला एक किंचित अपवाद आहे - तो म्हणजे अपार कष्टातून तुम्हाला जर आनंद मिळत असेल किंवा मेहनतीचा कैफ चढत असेल तर तुमचा संघर्ष थोडाफार सुलभ होतो.

अपार कष्ट करून धनुर्विद्या मिळवलेल्या एकलव्याला अंगठा गमवावा लागला, हे लक्षात ठेवा. हजार सूर्यांच्या तेजाची बरोबरी करणा-या कृष्णाचे जीवशास्त्राचे/जनुकशास्त्राचे ज्ञान शून्यच होतं! तेव्हा फळाची अपेक्षा ठेऊ नको म्हणून सांगणा-या कृष्णाला माफ करा...

शनिवार, १६ जानेवारी, २०२१

विश्वास


© राजीव उपाध्ये, 9 जाने० २०२१
...पण तरीही राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. त्याने ते प्रेत ओढून आपल्या खांद्यावर टाकले आणि स्मशानाचा रस्ता चालू लागला. तेव्हा प्रेतामधला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, "राजा तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतूक वाटते. तुझे श्रम हलके व्हावे म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो,
"फार पूर्वी दक्षिणेत महिलारोप्य नावाचे नगर होते. या नगरात अग्रसेन नावाचा एक धनाढ्य व्यापारी एका टोलेजंग हवेलीमध्ये राहात असे. अग्रसेनाचा व्यापार मोठा असल्याने घरात नोकरचाकरांचा राबता मोठ्या प्रमाणावर होता. लक्ष्मी प्रसन्न असली तरी अग्रसेनाच्या वागण्याबोलण्यात एकप्रकारची घमेंड आणि तुच्छता होती. यामुळे अनेकदा लोक दूखावले जायचे, पण त्याच्या वैभवामुळे त्याला कुणाची बोलायची हिम्मत होत नसे. अग्रसेनाला अनेक शौक होते. त्याने उत्तमोत्तम जातींचे श्वान पाळले होते. या श्वानांना तो वेगवेगळ्या करामती शिकवत असे. हा त्याचा आवडता छंदच बनला होता. अग्रसेनाचे श्वान त्याच्यावर जेव्हढे प्रेम करत असत, तितके त्याचे नोकर मात्र प्रेम करत नसत."
"अग्रसेनाच्या हवेलीबाहेर एक चिंचेचे झाड होते. त्या झाडावर अनेक पिशाच्चे वास्तव्याला होती. पिशाच्चे असूनही त्यांच्यात भांडणे होत नसत (कारण त्यांच्यात जातपात, धर्म, आदर्श नव्हते). त्यात तीक्ष्णदंत आणि लंबकर्ण नावाच्या दोन पिशाच्चांची घनिष्ट मैत्री होती. या दोन्ही पिशाच्चांचे अग्रसेनाच्या हवेलीत चालणा-या घडामोडींचे निरीक्षण करण्याचा परिपाठ असे.
असेच एकदा तीक्ष्णदंत आणि लंबकर्ण ही पिशाच्चे अग्रसेनाच्या हवेलीचे निरीक्षण करीत बसली होती. तेव्हा अग्रसेन आपल्या नोकरांबरोबर श्वानक्रीडेमध्ये रममाण झाला असताना, एका नोकराकडून श्वानाला अंघोळ घालताना काहीतरी क्षुल्लक चूक झाली आणि अग्रसेनाच्या आवडत्या श्वानाला इजा झाली. अग्रसेनाला कोप अनावर झाला आणि त्याने नोकराला ताबडतोब कामावरून काढून टाकले. रागावलेल्या नोकराने मग एक दिवस सूड घेण्यासाठी अग्रसेनाच्या श्वानशाळेला आग लावली आणि त्यात अग्रसेनाने वाढवलेले अनेक लाडके श्वान जळून मेले."
"या घटनांनी तीक्ष्णदंत आणि लंबकर्ण गोंधळून गेले. तीक्ष्णदंत म्हणाला, "मला मनुष्यप्राण्याच्या स्वभावाचे कायम कोडे पडले आहे. हा अग्रसेन कुत्र्यांनी करामत करून दाखवली की त्यांना दरवेळी बक्षिस देतो. त्यांना आंजारतो गोंजारतो, पण नोकरांना मात्र प्रत्येक चुकीला शिक्षा करतो. माणसे माणसांच्या चुकांना जेव्हढ्या शिक्षा करतात, तितक्या प्रमाणात शाबासकी देताना दिसत नाहीत".
लंबकर्णाकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. शेवटी बराच वेळ झाला तेव्हा दोन्ही पिशाच्चे आपापल्या फांद्यावर झोपण्यासाठी गेली."
येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "विक्रमादित्या तू पराक्रमी आणि लोकप्रिय राजा आहेस. तुझ्याकडे पण नोकरचाकर खूप आहेत. तू तुझ्या नोकराला अशा चुकीबद्दल कामावरून काढले असतेस का? या प्रश्नाचे ठाऊक असून दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील."
यावर विक्रमादित्याने आपले मौन सोडले आणि तो म्हणाला, "सृष्टीच्या निर्मात्याकडून मनुष्यप्राणी घडवताना अनेक विसंगती निर्माण केल्या गेल्या. मनुष्येतर प्राणी गरजा पूर्ण झाल्या की शांत होतात आणि जीवाला धोका असेल तरच अंगावर येतात. एरव्ही त्यांच्या सारखा निष्ठावंत सापडणे कठीण. अग्रसेनाने कुत्र्यांना त्यांच्या प्रत्येक करामतीला बक्षिस देऊन आणि गरजा पूर्ण करून त्यांचा विश्वास संपादन केला होता. पण नोकरांना मात्र हिडीसफिडीस करायचा. एकमेकांचा विश्वास संपादण्याचे महत्त्व जेव्हा माणसाला कळेल तेव्हा मनुष्यप्राणी ख-या अर्थाने सुखी होईल. कुणाचा विश्वास संकट काळात मदत केल्याने निर्माण होतो, तर कुणाचा विश्वास व्यवहारातल्या पारदर्शकतेने निर्माण होतो. कुणाला कशाचे महत्त्व वाटते, हे ओळखणे फार महत्त्वाचे...
विक्रमादित्याच्या या उत्तराने वेताळ खूश झाला पण त्याचा मौनभंग झाल्याने पुन्हा झाडावर जाऊन प्रेतासह लोंबकळू लागला.

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

नग्नता

"नग्नता" या विषयावरची माझी मते आता फेसबुकमुळे ब-यापैकी जगजाहिर आहेत. मी "नग्नतेला" मी अश्लील मानत नाही. श्लील/अश्लीलतेच्या कल्पना माणसे अवतीभवतीच्या लोकाचारातून कळत न कळत उचलतात आणि तेच बरोबर किंवा योग्य मानू लागतात. १०० मधल्या ९९ लोकांना आपण जे योग्य मानतो त्यापेक्षा विरुद्ध/वेगळे/योग्य/सामान्य असू शकते, हे मानायची तयारी नसते. माणसांची वैचारिक वर्तूळे जेव्हढी छोटी तेव्हढ्या श्लील/अश्लीलतेच्या कल्पना खुजा आणि दूरभिमान जास्त असतो. असा दूरभिमान नसेल तर माणसे बलाढ्य संस्कृतीच्या संपर्कात आली की त्यांची मूल्ये/श्रद्धा तपासायला उद्युक्त होतात आणि बदलतात. माझे तसेच काहीसे झाले...

आय० आय० टी० मध्ये असताना मी तिथे फिल्म क्लबचा सभासद होतो. फिल्म क्लबचे सभासदत्व १८ वर्षे पूर्ण असलेल्यानाच मिळायचे. फिल्म क्लबमध्ये दाखवले जाणारे चित्रपट सेन्सॉरची कात्री लागलेले नसायचे. हे चित्रपट वेगवेगळ्या देशांच्या दूतावासातून निवडक प्रेक्षकांसाठी वितरित होत असत. बहूसंख्य चित्रपट युरोपिअन देशात तयार झालेले असत. अनेक उत्तमोत्तम युद्धकाळावरील युरोपात निर्माण चित्रपट मला तेव्हा आमच्या फिल्म क्लबमध्ये बघायला मिळाले. अमेरीकन युद्धपट आणि युरोपिअन युद्धपट यात जाणवलेला महत्त्वाचा फरक म्हणजे अमेरिकन चित्रपटात वीरश्रीचे भडक चित्रण असते तर युरोपिअन चित्रपटात युद्धाचा माणसावर आणि समाजावर झालेला भयानक परिणाम वास्तववादी अंगाने चित्रित केला असायचा. या युरोपिअन वास्तववादाला मग काहीही वर्ज्य नसायचे. 

एकदा जर्मन एम्बस्सीमधून एक पूर्ण लांबीचा चित्रपट आला होता. आता नाव आठवत नाही. पण त्या चित्रपटातील एकंदर ४०-५० स्त्री आणि पुरुष पात्रे पहिल्या फ्रेमपासून शेवटपर्यंत पूर्णपणे नग्न होती. पण त्यात आपण ज्याला अत्यंत सैलपणे स्वैराचार संबोधून मोकळे होतो तसे एक ही लैंगिक दृष्य नव्हते. त्या दिवशी माझ्यातल्या सोवळ्या पुणेकराचा फ्युज कायमचा उडाला तो आजतागायत...

वर उल्लेख केलेल्या जर्मन चित्रपटाची आठवण करून देणा-या काही क्लिप्स युट्युबवर/व्हिमिओवर पहायला मिळाल्या. फेसबुकच्या नग्नतेविषयक गाईडलाइन्स अत्यंत आचरट आहेत (उदा० पुरुष स्तनाग्रे अश्लील नाहीत पण स्त्रिची स्तनाग्रे अश्लील (अप्रदर्शनीय) आहेत. तसेच पार्श्वनग्नता अश्लील नाही, पण पुरोनग्नता अश्लील आहे इ०) म्हणून या विषयावर "ससंदर्भ" लिहिता येत नव्हते आणि शेअर करता येत नव्हते. आज अचानक फेस्बुकच्या जाचक अटीतून सुटण्यासाठी जालीय दूवे देण्यासाठी एक उपाय सापडला. म्हणून मला आवडलेल्या दूव्यांचा अर्धसंदर्भ देत आहे...
० 137123723 (https://vimeo.com/)
० 8vL5xXWsgo8 (https://youtu.be/)
० 111078821 (https://vimeo.com/)

अर्धसंदर्भापासून पूर्णसंदर्भ तयार करणे अवघड जायला नकोच...

बुधवार, २० मे, २०२०

डी जीवनसत्त्व

डी जीवनसत्त्व
==========

काही वर्षांपूर्वी जेव्हा डी जीवनसत्त्वाबद्दल नवे ज्ञान निर्माण झाले आणि माझ्या वाचनात आले तेव्हा मी ते वाटायला सुरुवात केली होती. माझी तेव्हा यथेच्छ टिंगलटवाळी झाली.


इतकच नव्हे तर तेव्हा डॉ०ना न सांगता मी माझी डी जीवनसत्त्वाची चाचणी करून घेतली होती. आणि (प्रथमच केलेल्या) चाचणीत डी जीवनसत्त्व प्रचंड कमी आढळले होते म्हणून डॉ० ना दाखवले तेव्हा "न विचारता चाचणी केली" म्हणून डॉक्टरांनी कपाळाला आठ्या पाडून डोळे वटारले होते...पण आज मी शहाणा ठरलो आहे आणि निर्लज्जपणे स्वत: स्वत:चीच पाठ थोपटून घेताना मला अतिशय आनंद होत आहे.

या डी जीवनसत्त्वाने माझ्याबाबतीत झालेला एक महत्त्वाचा चमत्कार म्हणजे मला अचानक अंडी पचायला सुरुवात झाली. तेव्हापासून आजतागायत मला अंडी पोटात गेली नाही तर जीव कासाविस होतो. विश्वास बसत नसेल तर माझ्या बायकोला विचारावे...

ॲलोपथी समस्येच्या मुळाशी जात नाही असे बोलले जाते. पण जनुकीय पातळीवर काम करणारी औषधे आणि द्रव्ये मुळाशीच काम करतात अशी आता माझी ठाम समजूत आहे. डी जीवनसत्त्व जनुकीय पातळीवर आणि म्हणून असंख्य आघाड्यांवर काम करते.

अजुनही बरेच मूर्ख लोक डी जीवनसत्त्वाची चाचणी करायला, तसेच त्याचा पूरक पुरवठा करायला नाखूष असतात. सूर्यप्रकाशात हे जीवनसत्त्व तयार होत असले तरी सध्याच्या काळात सूर्यप्रकाश आणि तो मिळवण्यासाठी आवश्यक असलेला वेळ आणि जागेची अनुपलब्धता, कातडीचा वर्ण, अंग उघडे न टाकण्याबद्दलच्या (विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत) आचरट कल्पना यामुळे आपण कायम याबाबतीत वंचित राहतो.

आज करोनाच्यासाथीमध्ये काही डॉक्टर डी जीवनसत्त्व आपल्या आजुबाजुच्या लोकांना भेट म्हणून वाटा असे सांगतात, तेव्हा आपले सरकार याबाबत मूग गिळून गप्प राहते याचे वाईट वाटते.

गुरुवार, ७ मे, २०२०

एका न झालेल्या पुस्तकाविषयी


नुकताच प्राणायामाच्या अभ्यासातला एक महत्त्वाचा टप्पा गाठला (माझ्या रक्तदाब आणि हृदयगतीच्या प्रगतीचे फोटो नुकतेच इथे टाकले होते). माझ्या दृष्टीने माझ्यासाठी ही एक मोठी उपलब्धी किंवा खरं सांगायच तर एक सिद्धीच आहे (कारण या टप्प्यावर किंवा इथुन पुढे तांत्रिकदृष्ट्या काही औषधांपासून मी मुक्त होऊ शकतो - जे मी सध्या तरी डॉ.च्या सल्ल्याशिवाय करणार नाही). पण या टप्प्यावर काही ठळक अनुभव इथे सांगायचे आहेत.

माझ्या परिचयातले काही जण कुजकटपणे "अरे, तुझ्या त्या पुस्तकाचे काय झालं?" असं विचारत असतात. एका डॉक्टरांनी तर  (डॉ. दीक्षितांना उद्देशून) "रेडिओलॉजिस्ट हे खरे डॉक्टर नसतात" असं सांगून माझा बुद्धीभेद करायचा प्रयत्न केला होता. एका ग्रुपमध्ये एक योगाभ्यासक प्राणायामावरील जुनाट, कालबाह्य ज्ञान लेखांद्वारे प्रसृत करत होते. तिथे आमची प्राणायामावरची लेखमाला मी प्रसृत केली तेव्हा हे योगाभ्यासक अस्वस्थ झाले. त्यांनी ज्ञान आणि माहिती असा सवतासुभा निर्माण करून आमची लेखमाला माहितीपूर्ण असली तरी ते "ज्ञान नव्हे" असा संदेश देऊन स्वत:चे महत्त्व वाढवायचा प्रयत्न केला. आपल्यासमोर आलेली माहिती कोणत्या प्रक्रियेतून निर्माण झाली आहे किंवा ज्ञान आणि माहिती यांच्यात काही परस्पर संबंध असतो (विशेषत: आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकात वेगवेगळ्या जागतिक विद्यापीठामध्ये झालेले ताजे संशोधन हे केवळ माहिती नसते तर ते अत्यंत शिस्तबध्दपणे केलेले, जिज्ञासेने केलेले ज्ञानसंपादन असते, हे समजाऊन घेण्य़ाची कुवत त्या योगाभ्यासकांमध्ये आणि त्या समूहाच्या सदस्यांमध्ये नव्हती.

फार थोडे, अगदी मूठभर वैद्यकीय व्यावसायिक प्राणायामावर नि:संदिग्ध, अभ्यासपूर्ण मत मांडू शकतात असा माझा अनुभव/निरीक्षण आहे. बहुतांश वैद्यकीय व्यावसायिक आणि त्यांची ’रि’ ओढणारे विज्ञानवादी "हे अजून पुरेसे सिद्ध झालेले नाही" असे म्हणून प्राणायामावर बोळा फिरवण्याची हूशारी तत्परतेने दाखवतात. यांना डॉक्टर का मानावे, असा मला आता प्रश्न पडतो. असो.

प्राणायामाच्या अभ्यासात सर्वसामान्य लोकांना येणारी महत्त्वाची अडचण म्हणजे त्यांना स्वत:मध्ये घडून येणा-या बदलांचे निरीक्षण करता येत नाही आणि मग motivation संपते आणि monotony ने प्राणायाम नीरस आणि कंटाळवाणा बनतो. सध्या लॉकडाऊनमुळे माझी पत्नी आणि मुलगी माझ्याबरोबर प्राणायाम करतात. Pulse oximeter सारख्या स्वस्त आणि महत्त्वाच्या साधनाने त्यांना प्राणायामाचा हृदयगतीवर होणारा महत्त्वाचा परिणाम दिसल्याने त्यांचा उत्साह टिकून राहिला आहे.

आमची लेखमाला संपली तरी मी ताजे संशोधन वाचत राहिलो. Autonomous nervous system चा शरीरातील अवाढव्य पसारा, शरीरातील सूक्ष्म व्यवहारांवरील नियंत्रण अचंबित करणारे आहे. त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट निश्चितपणे सांगता येते - एखाद्या व्यक्तीला प्राणायामाचा विवक्षित फायदा होईल की नाही, हे अनेक कारणांनी निश्चितपणे सांगता आले नाही तरी काही ना काही फायदा नक्कीच होईल - कुणाची रक्तदाबाची औषधे सुटतील किंवा कमी होतील तर एखाद्याचा उद्या येऊ शकणारा हार्ट ॲटॅक किंवा कॅन्सर एकतर येणारच नाही किंवा पुढे ढकलला जाईल, किंवा एखाद्याचा मधुमेह नियंत्रणात राहिल किंवा बरा होईल. प्राणायामाचे निंदक याच गोष्टीची कुचेष्टा करतात. पुढे ढकललेल्या किंवा टाळल्या गेलेल्या धोक्याचं महत्त्व समजायची कुवत निसर्गाने दूर्दैवाने सर्वाना समान दिलेली नाही.

मंडळी, तेव्हा आमचं पुस्तक झालं नाही हा आमचा पराभव नसून आम्ही ज्या समाजाच्या भल्यासाठी ते लिहीले होते त्या समाजाचा पराभव आहे (आम्ही आमचे भले करून घेतले आहेच), हे कळले तरी पुरे...

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

मन:सामर्थ्य

एक मजेशीर प्रसंग आहे. आता त्या गोष्टीला १७-१८ वर्षे झाली असतील. मी तेव्हा संगीतोपचारामध्ये काही प्रयोग करत होतो. माझ्या तेव्हाच्या प्रयोगांना मला भारत देश सोडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्या सुमाराला माझ्या परिचयातल्या एका वकीलांनी माझे संगीतोपचारांचे प्रयोग त्यांच्या परिचयाच्या एका तरूणावर करण्यास सुचविले. त्या तरूणाचा प्रेमभंग झाल्यामुळे तो भावनिकदृष्ट्या उध्वस्त झाला होता. त्याचे परिणाम त्याच्या तब्येतीवर आणि रोजच्या व्यवहारांवर व्हायला लागल्यामुळे त्या तरूणाच्या निकटवर्तीयांना काळजी वाटत होती.

  सुदैवाने हा तरूण प्रयोग काय आहे हे समजल्यावर कोणतेही आढे-वेढे न घेता तयार झाला आणि एक दिवस आम्ही त्या वकीलांच्या घरीच प्रयोग करायचे ठरवले. या प्रयोगात कानाला इयरफोन लावून डोळे मिटून विशिष्ट त-हेने तयार केलेले नाद आणि संगीत २०-३० मि. ऐकत पडून राहायचे असते. सुमारे ९०% लोक हा ट्रॅक ऐकताऐकता पहिल्या ५-१० मि० मध्ये झोपी जाऊन घोरायला लागतात आणि ट्रॅक संपल्यावर जागे झाल्यावर वेगवेगळ्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया देतात. बहूतेक सर्वांना प्रयोग संपल्यावर झोपेतून हलवून उठवावे लागते. मात्र या तरूणाच्या बाबतीत असं घडलं, की आम्ही थोडा वेळ घाबरून गेलो होतो. त्याला आम्ही ट्रॅक संपल्यावर ४० मि० गदागदा हलवून उठवायचा प्रयत्न करत होतो. एव्हढी गाढ झोप त्याला लागली होती. मग थोड्या वेळाने वकीलमहाशय माझ्यापाशी येऊन म्हणाले, "हा मेंटली फार वीक आहे. जगात इतकं वीक राहून चालत नाही". त्यांचा रोख मनाच्या ताकदीकडे होता हे लक्षात आले असेलच...
"मनाची ताकद" हे तसे आपल्याकडून अतिशय सैलपणे वापरले जाणारे शब्द! माणूस संकटात सापडला की त्याला हमखास मिळणारा सल्ला म्हणजे - "मनाची ताकद वाढवा". या "मनाच्या ताकदीचे" मला गेले कित्येक वर्षे गूढ कोडे आणि आकर्षण निर्माण झाले आहे. मनाची ताकद आपल्याला किती वाढवता येते? सामान्य माणसे मनाची ताकद वाढवायला बाह्य उपायांवर का अवलंबून राहतात? इत्यादि या संदर्भातले उपप्रश्न आहेत. हा विषय आध्यात्मिक गुरु आणि स्वयंमदत तज्ज्ञ यांनी बळकावला आहे. आध्यात्मिक गुरु हे फक्त गोंधळ वाढवतात (क्वचितच ते मुद्देसूद बोलतात, तसेच सैल विधाने करतात) तर स्वयंमदत तज्ज्ञ फार जुजबी आणि उथळ रितीने हा प्रश्न हाताळतात, असे माझे सध्या मत बनले आहे.

मी वैद्यकाचा विद्यार्थि नाही. जास्तीत जास्त एखादा मुरलेला हौशी खगोल किंवा पक्षी निरीक्षक यांच्या इतकीच माझी आणि वैद्यकाची जवळीक आहे. डॉ. दीक्षितांसारखे फार थोडे वैद्यकीय व्यवसायिक माझ्या नशीबाने मला माझी हौस भागवायला मदत करतात. या आणि काही वाचन एव्हढ्याच भांडवलावर "मनाची ताकद" म्हणजे काय याचा शोध घ्यायचा प्रयत्न मला करायचा आहे.
आता मन म्हणजे काय हे तपासायचा प्रयत्न करू या! मन म्हणजे काय याची आध्यात्मिक गुरुनी, योग्यांनी केलेल्या व्याख्या मला स्वीकारायची नाही कारण त्यात एकवाक्यता व्हायची शक्यता शून्य! दूसरे म्ह० चिकीत्सेचे त्यांना अतिशय वावडे असते. मनाची निर्मिती जडातूनच होते, हे आधुनिक विज्ञानाला गवसलेले सत्य मान्य केले तर मन म्हणजे मानवी मेंदू आणि उर्वरित शरीराचे सर्व ज्ञात आणि अज्ञात व्यवहार. ही कॅण्डेस पर्ट या सुप्रसिद्ध वैज्ञानिक विदुषीने (Molecules of Emotion या पुस्तकाची लेखिका) केलेली व्याख्या मला जास्त योग्य वाटते.
मुळात ताकद, बळ, सामर्थ्य, क्षमता, उर्जा या संज्ञा प्रामुख्याने जड वस्तूंच्या स्थानांतराशी किंवा रुपांतराशी (कार्याशी) निगडीत आहेत. त्यामुळे त्यांची गणिते मांडावी लागतात. स्थानांतर किंवा रुपांतर इच्छित किंवा नियंत्रित नसेल (ते जर अनियंत्रित असेल), तर ताकद, बळ, सामर्थ्य, क्षमता, उर्जा याची गणिते करावी लागत नाहीत. वस्तूवर निश्चित कार्य केले की त्याचे निश्चित फल मिळते. मानवी व्यवहारात हे फल मानसिक पातळीवर समाधान/नैराश्य, आर्थिक पातळीवर नफा/तोटा, शारीरिक पातळीवर पोषण/आरोग्य/अनारोग्य मिळवून देते. थोडक्यात अपेक्षित फल मिळाले तर सकारात्मक परिणाम होतो आणि अनपेक्षित मिळाले तर नकारात्मक परिणाम होतो.
आता मानसिक बळ या संकल्पनेचा अर्थ लावायचा प्रयत्न करता येईल. एखादे कार्य केवळ मानसिक पातळीवर घडण्यासाठी जे बळ लागते त्याला मानसिक बळ किंवा मन:सामर्थ्य म्हणणे योग्य होईल. हे बळ मिळणे म्ह० काही चेतारसायनांचे स्रवण (डोपामाईन?) प्रतिसाद म्हणून होत असणार. जेव्हा एखादी कृती मानसिक पातळीवर (म्ह० केवळ कल्पनेने) घडून येते किंवा केली जाते, तेव्हा शरीर आपल्याला उत्साही किंवा निरूत्साही बनवून मानसिक पातळीवर प्रतिसाद देते आणि कार्यप्रवृत्त अथवा परावृत्त करते. मेंदू मधली reward circuits उद्दीपित होउन, मनातल्या मनात एखादी कृती करताना पुरेसा उत्साह निर्माण झाला नाही तर ध्येय साध्य करण्याचे motivation नाहीसे होते आणि ती व्यक्ती नाउमेद होते.
सांगायचे तात्पर्य असे की एखाद्या काल्पनिक कृतीला शरीराचा अनुकूल प्रतिसाद मिळणे ही ऐच्छिक क्रिया नाही. ती जनुकीय भाग्याने नियंत्रित केलेली क्रिया आहे. जनुकीय भाग्य आहार, ताण-तणाव, आनुवंशिकता व आजुबाजुची परिस्थिती यांनी नियंत्रित केले जाते.
हे सर्व इथे सांगण्य़ाचे कारण असे की "आपलं मानसिक बळ वाढवा" असा सल्ला अनेकजण अनेकांना अत्यंत सैलपणे देत असतात, ते चुकीचे आहे असे मला वाटते. सामान्य आहाराने शारीरिक ताकद एका मर्यादेपर्यंतच वाढते, मग विशिष्ट आहारानेच (आणि व्यायामाने) वाढते, तसेच मानसिक ताकदीचे आहे. आजुबाजुची परिस्थिती एखाद्याला या खुराकापासून वंचित ठेवत असेल तर दोष आजुबाजुच्या परिस्थितीचा आहे. तात्पर्य एखाद्या व्यक्तीच्या मनाची ताकद वाढवण्याच्या प्रयत्नाला मर्यादा आहेत.
प्रार्थना, ध्यान, वेगवेगळे छंद हे ताण-तणाव कमी करतात आणि काही काळ समस्यापासून लांब राहायला मदत करतात, तसेच वेगळ्या दृष्टीकोनातून समस्यांकडे बघण्य़ासाठी जी अवस्था आवश्यक आहे ती मिळवण्यासाठी या उपायांची मदत होऊ शकते. पण मानसिक ताकद वाढवण्यासाठी "आडात असणे" आवश्यक आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

गुरुवार, ५ मार्च, २०२०

झालं-गेलं


आजकाल अनेकजण अनेकांना "झालं-गेलं विसरुन जा"चा सल्ला देत असतात. ब-याच वेळा ही अपेक्षा एकतर्फी ठेवली जाते. तत्त्वत: झालं-गेलं विसरुन तेव्हाच जाता येतं, जेव्हा निश्चित भविष्यकाळ दिसत असतो आणि तो आपल्या प्रगतीसाठी तसेच आनंदासाठी पुरेसा पोषक असतो (प्रगती आणि आनंद हे दोन महत्त्वाचे निकष आहेत). प्रत्यक्षात माणसांच्या स्वभावाचे पीळ काही झालं तरी सुटत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये झालं-गेलं विसरून जाणं हा पायावर धोंडा पाडून घेणे असते... मुळात एखादी गोष्ट विसरणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, आणि त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे लागते. विसरणे कोणत्याही दबावाखाली घडून येत नाही, हे ब-याच मूर्खाना कसं कळत नाही हे एक कोडे आहे.

तरी पण मला जेव्हा "झालं-गेलं विसरून जा"चा सल्ला मिळतो, तेव्हा त्या व्यक्तीला मला एक प्रयोग सुचवासा वाटतो. तो प्रयोग असा- मी त्या सुचवणा-या व्यक्तीला चारचौघात चपलेने दोन्ही गालांवर एकेक ठेऊन देईन आणि मग "झालं गेलं विसरून जाऊया"ची ऑफर करेन. आहे मान्य?

या टप्प्यापर्यंत प्रयोग व्यवस्थित पार पाडल्यावर काही व्यक्तींची यादी मी त्यांच्याकडे सुपूर्द करेन. या व्यक्तीना एखाद्या चौकात दोन्ही गालांवर दहा मारून एक मोजेन आणि "झालं गेलं विसरून जाऊया"ची ऑफर करेन.

व्यवस्थित प्रात्यक्षिक मिळाले तरं झालं-गेलं विसरून कसं जायचं याचा व्यवस्थित अभ्यास/सराव करता येतो...

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

न्याय


काल आमची लेक दोनचार दिवसांच्या सुट्टीसाठी घरी आली. घरी आल्या आल्या तिच्या नेहेमीप्रमाणे गप्पा, प्रगतीचा अहवाल देणे सुरु झाले. पण काल तिच्याशी बोलताना एक गोष्ट ठळक जाणवली. काल तिच्या बोलण्यात आपले आईवडिल इतरांपेक्षा कसे वेगळे आहेत, याचे तिला आकलन झाल्याचे जाणवत होते.


अपर्णा आणि मी नवरा बायको म्हणून किती यशस्वी माहित नाही. आमचे लग्न मोडायचे असंख्य प्रयत्न करण्यात आले. त्यात काही हरामखोर वकील, परिचित, नातेवाईक आणि हितचिंतक म्हणवणारे socalled मित्र पण होते.

Fuck you all folks, you lost!

माझी आई हे जग सोडून जाताना मला दोन आशीर्वाद देऊन गेली - त्यातला १ला होता, "तुझी मुलगी तुला न्याय देईल." तो अक्षरश: खरा ठरला. दूसरा पण जवळपास खरा ठरला

पण आईवडिल म्हणून १०१% यशस्वी ठरलो, यासारखा दूसरा आनंद नाही!

सोमवार, २७ जानेवारी, २०२०

आरती
त्याला दगड मारताना
ते म्हणाले,
फक्त आमचा हत्ती
खरा हत्ती!


तुझ्या वास्तवाला
अर्थ नाही
कसलाच!


मग जखमा
झाल्यावर म्हणाले,

"आता दवाखान्यात जा,
तुझा तूच.
आणि उपचार करून घे.

पण आम्हाला
दगड मारू नकोस.

बरा झालास की
आमची आरती
करायला मात्र विसरू नकोस."
-- राजीव उपाध्ये

रविवार, २६ जानेवारी, २०२०

लवकर शहाणे व्हा!

निर्भयाच्या बलात्का-यांना फाशी लवकरच होईल, पण बलात्कार थांबणार नाहीत. ते चालूच राहतील. जोपर्यंत "किडक्या प्रजे"ची निर्मिती थांबत नाही, तोपर्यंत बलात्कार चालूच राहणार...

माणसाचा विवेक जगण्याच्या ताणातून संपतो, शरीराला (पर्यायाने मेंदूला) सडवणा-या पर्यावरणातून तो संपवला जातो. धान्याला किड लागली की धान्य निवडून किड संपत नाही. धान्याला उन दाखवावे लागते, धान्य साठवायची (पर्यावरण) जागा बदलावी लागतो. दोन-चार बलात्का-यांना फाशी हे फक्त डब्यातून बाहेर येणारे पोरकिडे चिरडून टाकण्यासारखे आहे कारण बाकी डबा किड्यांसकट सडक्या धान्याने भरलेला तसाच राहतो.

Whistle-blower ची कुचेष्टा करणारा समाज हा सहसा चुकीच्या गृहितकांना कुरवाळत राहतो. मूळ प्रश्न नाकारत राहतो किंवा सिक्रेट ग्रुपमधून कुचेष्टा करत राहतो. फार काही मिळवले जात नाही. चुकीची गृहितके केळ्याच्या साली सारखी असतात. कधी आपटवतील सांगता येत नाही.

दीर्घायुष्याची रहस्ये शोधताना शरीरांतर्गत (जनुकीय देणगी) आणि बाह्य घटकांचा (आहार जीवनशैली, सामाजिक घटक) अभ्यास केला जातो. तसा बलात्कार कमी असलेल्या प्रदेशांचा अभ्यास केला जातो का?

लवकर शहाणे व्हा!

https://medicalxpress.com/news/2020-01-high-air-pollution-exposure-one-year-olds.html?fbclid=IwAR1QDX8mS7xd6RgbokydEWzyJe37n8o1wXdF-UkSSVKqt35bEY5YgDSIgWg