रविवार, ३० डिसेंबर, २०१८

भावनिक बद्धकोष्ठ आणि प्राचीन भारतीय मंत्रशास्त्र

भावनिक बद्धकोष्ठ आणि प्राचीन भारतीय मंत्रशास्त्र
=================================

-- राजीव उपाध्ये

कोणत्याही सजीवाच्या या भूतलावरील अवतारात मलनिस्सारणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गात मुक्तपणे संचार करणार्‍या जीवांच्या मलनिस्सारणावर फारसे निर्बंध नसतात, पण सुसंस्कृत (civilized society) समाजात राहणार्‍या मनुष्यप्राण्याच्या मलनिस्सारणावर मात्र अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे कोंडमारा होऊन अनेक व्याधींना आमंत्रण मिळते आणि जगणे असह्य होते, हे सर्वांच्या पुरेसे परिचयाच्या आहे.

मलनिस्सारण म्हटले की सर्वांना फक्त घन-मलाचे म्हणजे पाचित अन्नाच्या मलाचे निस्सारण आठवते. पण मल (मळ) हा केवळ घन स्वरूपात नसतो, तर तो द्रव आणि  वायु स्वरूपात पण असतो आणि तो मूत्र आणि अपानवायुच्या रूपात शरीरातून बाहेर टाकला जातो.  याशिवाय आणखी एका मळाचे अस्तित्व बर्‍याच जणांना ठाऊक नसते. ते म्हणजे भावनिक मळाचे!  भावनिक मळाचा निचरा झाला नाही तर भावनिक बद्धकोष्ठतेचा दूर्धर विकार जडतो आणि त्याचे दूरगामी परिणाम केवळ मानसिक पातळीवर न राहता शारीरिक पातळीवर पण दिसून येतात, हे विज्ञानाने आता पुरेसे सिद्ध केले आहे.

भावनिक बद्धकोष्ठासारखा दूर्लक्षित विकार आधुनिक मानवाच्या आयुष्यात सापडणार नाही. भावनिक बद्धकोष्ठाला कारणीभूत ठरणारे घटक असंख्य आहेत. भावनिक नियंत्रणाच्या अवाजवी उदात्तीकरणातून भावनिक बद्धकोष्ठाची चिकट आणि दूर्धर व्याधी जडते. वेळच्या वेळी शौचाला झाले नाहीतर सुरुवातीला वेळी-अवेळी शौच-विसर्जनाची भावना अनावर होते आणि जवळपास सोय नसल्यास फजितीची वेळ येते.

भावनिक मळाचे पण बरेचसे असेच असते. वेळच्या वेळी त्याचे निस्सारण होणे महत्त्वाचे असते. पण समाजाच्या अवाजवी   निरर्थक कल्पनांमुळे (उदा० रडणे हे बायकी असते आणि ते पुरुषांना शोभत नाही इ०)   तो साठतो. मग काही जण व्यसनाधीन होतात तर काही जण क्षुल्लक कारणांनी प्रक्षुब्ध होतात. काहीवेळा अर्वाच्य शिव्यांच्या रूपात भावनिक मळ उद्रेक होऊन बाहेर पडतो.

या आणि इतर अनेक कारणांनी भावनिक मळाचा निचरा होऊ देणे यासाठी प्रभावी उपाय योजणे श्रेयस्कर ठरते. आम्ही यासाठी 
प्राचीन भारतीय मंत्रशास्त्रात काही उपाय सापडतात का यावर दीर्घकाल संशोधन केले असून, ते लवकरच आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत यथावकाश प्रसिद्ध करू इच्छितो.

प्राचीन भारतीय मंत्रशास्त्र हा खूप गूढ आणि अथांग असा विषय आहे. तो एका लेखाचा विषय नक्कीच नाही. आपल्या मंत्रशास्त्रातील बीजमंत्र ही कल्पना महत्त्वाची असून, बीज मंत्रांच्या प्रभावाची आम्हाला खात्री पटली आहे.

भावनिक बद्धकोष्ठतेला मंत्रशास्त्रात काही उपाय सापडतो का याचा शोध घेताना आम्हाला असे लक्षात आले की ॐ **** फट्‍ स्वाहा।  हा मंत्र भावनिक बद्धकोष्ठतेवर अत्यंत प्रभावी असून यातील "फट्‍" ही बीजाक्षरे "फाट्यावर मारणे" या क्रियेचे गूढ प्रतीक आहेत, असे आम्हाला संशोधनांती लक्षात आले आहे. "मी अमक्याला/अमकीला फाट्यावर मारतो" अशा अर्थाचा हा प्रभावशाली मंत्र असून त्याचा विनियोग करताना यज्ञात आहूती दिली जात असे. अनेक भारतीय शास्त्रे यवनी व्यापार्‍यांबरोबर बाहेर गेली आणि युरोपियन देशात विकास पावली. मंत्रशास्त्राच्या विकासाला हे हितकारकच ठरले. "ॐ **** फट्‍ स्वाहा" हा मंत्र अधिक परिणामकारक स्वरूपात पुढे उपयोगात आला. "फक् यु" या पाश्चात्य मलनिस्सारक मंत्रात पण "फ" हे बीजाक्षर वापरले गेले आहे, हे चाणाक्ष लोकांच्या लक्षात येईलच.

मंत्राच्या परिणामकतेसाठी करण्यासाठी मंत्राची भाषा शुद्ध असणे अतिशय महत्त्वाचे आहे. "ॐ **** फट्‍ स्वाहा" या मंत्राचा जप करताना ज्याला/जिला फाट्यावर मारायचे त्याची/तिची चतुर्थी हे मंत्राच्य़ा विनियोगकर्त्याने लक्षात ठेवणे जरूरीचे आहे (यासाठी शब्दरुपावलीची प्रत विकत घेऊन संग्रही ठेवणे इष्ट ठरेल).

कोणतेही बीजमंत्र अनुष्ठानाने सिद्ध केले जातात. "ॐ **** फट्‍ स्वाहा" या मंत्राच्या सिध्दतेसाठी करायच्या अनुष्ठानाबद्दल लवकरच आम्ही स्वतंत्रपणे लिहू...

(वि०सू० - योग्य श्रेयाशिवाय सदर टिपण पुढे ढकलू नये.)

शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

ध्यास आणि हव्यास


मागे एक प्लासिबॉलॉजिस्ट मी त्यांचे रुग्णत्व स्वीकारावे यासाठी माझ्या हात धुवून मागे लागले होते. तेव्हा मी त्यांना त्यांची हस्तमैथुनावरची मते विचारली तेव्हा त्यांची भंबेरी उडाली होती (कारण त्यांच्या ’पथी’ची पाठ्यपुस्तके हस्तमैथुनाच्या दूष्परिणामांनी भरलेली आहेत). मग मी त्यांना लांब ठेवले आणि तो शहाणपणा ठरला.
आत्ताच त्यांचे "ध्यास आणि हव्यास" विषयावरचे चिंतन वाचले. "ध्यास आणि हव्यास" यात फरक करता येणे फार महत्त्वाचे आहे, असा सूर त्यांनी आळवला आहे.
माझ्या मते "ध्यास आणि हव्यास" हा फरक फक्त अंतिम परिणामांनी निश्चित्त होतो. वास्तविक, जे यशस्वी होतात त्यांचा ध्यास असतो आणि अपयशी ठरतात त्यांचा हव्यास असतो. हे अर्थातच समाज (किंवा व्यक्ती) त्या त्या वेळच्या मूल्यानुसार ठरवतो.
या प्लासिबॉलॉजिस्टांनी विवेकवर्धनाचे पण दूकान थाटले आहे. पण हा फरक त्यांच्या लक्षात आला आहे की नाही याचे कोडे पडले आहे...

रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

संपादक म० टा० स० न० वि० वि०

संपादक
म० टा०

स० न० वि० वि०

कालच्या म० टा० च्या मैफल पुरवणीमध्ये श्री० तन्मय कानिटकर यांचा लैंगिक अनुरुपतेचा प्रश्न उपस्थित करणारा लेख वाचला. काळजीपूर्वक लेख वाचल्यावर  एखादा प्रश्न समाजाला सोडवता आला नाही तर तो प्रश्न येन केन प्रकारेण गैरलागु ठरविण्यात हूशारी खर्च करायची अशातला हा प्रकार आहे असे वाटते.

मुळात लैंगिक-स्वास्थ्याची गरज माणसाला आहे की नाही या गैरसोईच्या प्रश्नाला श्री. कानिटकर हात घालत नाहीत. याची कारणे दोन असू शकतात - एकतर ते स्वत: अनभिज्ञ आहेत (ही शक्यता त्यांचे फेस्बुक प्रोफाईल तपासल्यावर कमी वाटते) किंवा जो समाज डॊळ्यासमोर ठेऊन त्यांनी हा लेख लिहीला आहे त्या मराठी समाजाची हा विषय पचवायची क्षमता नाही ( दूसरी शक्यता जास्त कारण आपण ते वेळोवेळी सिद्ध केले आहे. र. धो. कर्व्यांना दगड मारायची थोर परंपरा अशी ना तशी जपली आहे.). 

पृथ्वीच्या पाठीवर असंख्य मानवसमूह लग्नसंस्था स्वीकारून नांदत आहेत. लग्नसंस्था स्वीकारण्याची दोन कारणे श्री. कानिटकर आपल्या लेखात देतात. पण लग्नसंस्था रूजण्याचे आणखी एक कारण मानववंशशास्त्रज्ञ देतात ते म्हणजे माणसाच्या अपत्यांना असणारी दीर्घकाळ संगोपनाची गरज भागविण्यासाठी असलेली स्थिर कुटुंबाची गरज. स्थिर कुटुंबासाठी सशक्त लग्न-बंधन आवश्यक आहे. सशक्त लग्न-बंधनासाठी   लैंगिक-स्वास्थ्य आवश्यक आहे, याकडे श्री. कानिटकर यांचे दूर्लक्ष झाले याचे सखेद आश्चर्य वाटले.

सशक्त लग्न-बंधनासाठी लैंगिक-स्वास्थ्य आवश्यक आहे हे नाकारणे म्हणजे आपणच आपली फसवणूक करण्यासारखे आहे, असे मला वाटते. लैंगिक-स्वास्थ नाकारताना समाज अनेक घोडचूका करत असतो - त्यातली महत्त्वाची घोडचूक म्हणजे जे लैंगिक वर्तन साधारण (नॉर्मल) आहे त्याला विकृत ठरवणे.   हे लैंगिकस्वास्थ्य सध्याच्या काळात कसे मिळवायचे या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी समाजाला प्रवृत्त केले असते तर कानिटकरांच्या लेखाची उंची वाढली असती. असो.

कळावे आपला
राजीव उपाध्ये

मंगळवार, ३ जुलै, २०१८

कर्जआज कै. चंद्रकांत गोखल्यांच्या हिशेबी स्वभावाची एक इथे आठवण वाचल्यावर माझी एक आठवण जागी झाली.

८३-८४ साल होते. माझ्या वडिलांना दोन मोठे हार्ट-ॲटॅक येऊन गेले होते. तेव्हाच्या प्रचलित उपचार-पद्धतीनुसार हार्ट-ॲटॅक आलेल्या व्यक्तीना कष्ट जास्त करायचे नाहीत, जिने चढायचे नाहीत, वजन उचलायचे नाही इ० निर्बंध पाळावे लागत. माझ्या वडिलांचा स्वभाव स्वस्थ न बसण्याचा होता आणि त्यामुळे आम्हाला कायम चिंता आणि भीतीने ग्रासलेले असायचे. 

"गेलेला दिवस आपला समजा. येईल तो दिवस कसा असेल हे सांगता येत नाही" असे डॉक्टरांनी स्पष्ट सांगीतल्यामुळे वडिलांना एका जागी स्वस्थ बसविण्यासाठी आम्ही टिव्ही घ्यायचे ठरवले. पण टिव्हीसाठी पाच हजार कमी पडत होते. तेव्हा माझ्या नावावर एक पाच हजाराची एफडी होती आणि तेव्हा बॅंकेत १४-१५% व्याज मिळायचे. आईला ते ठाऊक असल्याने आईने माझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवला की माझी एफडी मोडायची आणि ते पैसे टिव्हीसाठी वापरायचे. ते पैसे परत माझ्या नावाने गुंतवेपर्यंत आईवडिल मला बॅंकेइतकेच व्याज देत जातील. मी हा पर्याय स्वीकारला.

मग आमचा १ला टिव्ही ८४ साली आला आणि नंतर ८६ सालच्या डिसेंबरमध्ये वडिल गेले. पण नंतर आईने मला २-३ वर्षे व्याज दिले आणि पूर्ण रक्कम परत केली. आईने नंतर दरवर्षी जायबंदी झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी काम करणार्‍या संस्थेला जशी जमेल तशी मदत केली आणि मला पण करायला सांगितले होते.

सोमवार, २५ जून, २०१८

एक (न घडलेला) विनयभंग!

दोन दिवसांपूर्वीचा प्रसंग.


आमच्या भागातल्या ’राजश्री’ या दूकानात खरेदी साठी गेलो होतो. माझी खरेदी झाल्यावर दोन्ही हातात घेतलेल्या वस्तू आणि डाव्या खांद्यावर भरलेली पिशवी सावरत आतल्या काऊंटरवर पैसे द्यायला जाऊन उभा राहीलो तेव्हा एक तिशीची बाई माझ्यापुढे हिशेब करत उभी होती. तिथल्या काउंटरवर दोघे तिघेजण जमले की दूकानात आत-बाहेर करणे अवघड असते. स्वत:चा नंबर सांभाळत आत बाहेर करणार्‍या नोकरांना रस्ता देताना माझ्या खांद्यावरच्या पिशवीचा माझ्या समोरच्या बाईला ( बहुधा नको त्या ठिकाणी) स्पर्श झाला. दोन्ही हातात वस्तू असल्याने पिशवी सावरणे पण शक्य नव्हते. मग मागे वळून ती बाई माझ्या रागाने बघायला लागली. तिच्या नजरेतला विखार अजून डोक्यातून गेला नाहीये.

तिची भयानक नजर मला हतबुद्ध करून गेली. माझं नशीब असं की काही बोलाचाली न होता ती बाई तिचा व्यवहार पूर्ण करून निघून गेली.

नंतर रात्रभर , जे घडले नाही ते घडले असते तर काय? या भीतीने झोप लागली नाही. मन खूप समजावत होते, "अरे, तुझ्या दोन्ही हातात वस्तू होत्या आणि त्या दूकानात सीसीटीव्ही आहेत. पण पुरूषाला कायम आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍या समाजाने साक्षी-पुरावे तपासायची तसदी घेतली असती का? जरी निर्दोषत्व सिध्द झाले तरी झालेली मानहानी कधीच भरून येत नाही... भारतीय समाजात तर नाहीच नाही.

अजून ही त्या बाईचा चेहेरा आठवला की अंगावर काटा येतो...

सोमवार, ३० एप्रिल, २०१८

मना वाटशी तू मिर्‍या मस्तकी ज्या
उडाला तयांचा जरी पूर्ण फज्जा।
तरी दूष्ट हे ना कधी संपणारे
जगी हेची सत्य मना जाळणारे. ॥ जय० जय० रघु०
- राजीव उपाध्ये (संत जनुकदास)

रविवार, १८ मार्च, २०१८

अधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान

अधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान
--राजीव उपाध्ये

माणसाने विवेकाचा, शिक्षणाचा, आधुनिकतेचा कितीही टेंभा मिरवला तरी गैरसोईचे सत्य पुढे आले की तो गडबडुन जातो, चवताळतो. हे गैरसोईचे सत्य मी-मी म्हणणार्‍या लोकांना अडचणीत आणते. मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्‍याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात.
हे सर्व ठाऊक असून आज एक गैरसोईचे सत्य मला सांगायचे आहे. हे सत्य सांगायचे आणि स्वीकारायचे धाडस फार थोडे लोक करतील.
आपण अन्नधान्याची आधुनिक तंत्रज्ञानाने निर्मिती करतो, तेव्हा त्या अन्नाचे पोषणमूल्य जास्तीत असावे यासाठी उत्तम प्रतीच्या बियाणाचा वापर शेती करताना व्हावा याकडे आग्रह आपला असतो. पशुपालनात जास्तीतजास्त दूध देणार्‍या गाईम्हशी, कुक्कुटपालनासाठी जास्तीत जास्त अंडी देणार्‍या कोंबड्या सर्व जनुकीय तंत्रज्ञान पणाला लावतो. नुकतेच एका प्रसिद्ध दुग्ध उत्पादकाच्या जाहिर मुलाखतीत असे कळले की म्हशीला हमखास म्हैसच होईल असे (म्हणजे लिंगनिश्चितीचे) तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे. या सगळ्या उपद्‍व्यापामागे माणसे इतर जीवांसाठी जी मूल्ये विकसित करतात ती मूल्ये स्वत:साठी मात्र झिडकारतात. (उदा. द्यायचे झाले तर संततीच्या लिंगाची निवड किंवा उत्तम वाणाची संतती हा विचार मनुष्य स्वत:च्या बाबतीत स्वीकारणार नाही. असो.)
मला जे गैरसोईचे सत्य सांगायचे आहे, ते समजण्यासाठी प्राथमिक जीवशास्त्राची उजळणी आवश्यक आहे. सर्व लैंगिक प्रजोत्पादन करणार्‍या जीवांमध्ये जेव्हा मादी गर्भ धारण करते तेव्हा अर्धी गुणसुत्रे (केंद्रकाम्ले) नराकडून शुक्रजंतुच्या मार्फत आणि अर्धी गुणसूत्रे स्त्रीकडून बीजांडाच्यामार्फत येतात आणि गर्भधारणेच्या वेळेला संयोग पावून गर्भ वाढायला सुरुवात होते. यात महत्त्वाचा आणि धक्कादायक पुढे आहे. सध्याच्या काळात शिकून नोकरी करणार्‍या स्त्रिचे लग्नाच्या वेळी सरासरी वय २८-३० असते. म्हणजे आज जन्माला आलेल्या मुलाचे बीजांड त्याच्या आईचा गर्भ तयार होत असताना (तिच्या आजीच्या गर्भधारणेच्या वेळी) तयार झालेले असते. म्हणजे आईकडून मिळणारा जनुकीय वारसा सुमारे ३०वर्षे या जगात अस्तित्वात असतो. त्यात मुंबई, कलकत्ता सारख्या बकाल शहरांमध्ये जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या आईच्या पोटातील बीजांडांवर तेथील प्रदूषण आणि जगण्याचा संघर्ष यामुळे केंद्रकाम्लावर घातक परिणाम होण्यास सुरुवात होते आणि अत्यंत संथपणे बीजांडे किडायला सुरुवात होते आणि सदोष संततीसाठी कारणीभूत ठरते. गर्भधारणेपूर्वी आईला धूम्रपान आणि मद्यपान यांचे व्यसन असल्यास याची गंभीरता अधिक वाढते. यातील काही सदोष संतती नैसर्गिक गर्भपाताच्या रुपाने बाहेर टाकली जाते. पण ते जन्माला येणार्‍या सर्वच जीवांच्या बाबतीत होत नाही आणि काही व्याधी किंवा दोष जन्मत:च घेऊन बाळ जन्माला येते किंवा काही दोष पुढे उत्तर आयुष्यात व्याधींना जन्म देतात. जन्माला येणार्‍या बाळाचा काही (अर्ध्यापेक्षा कमी) जनुकीय वारसा वडिलांच्याकडून येत असला तरी पुरुषांचे शुक्रजंतू तूलनेने ताजे असल्याने सदोष संततीचा दोष (दूर्दैवाने) स्त्रियांकडे जास्त जातो, हा गैरसोईच्या सत्याचा महत्त्वाचा भाग. शुक्रजंतूवर पण ताण आणि प्रदूषणाचे परिणाम होतच असतात आणि प्रजननाची समस्या किती गंभीर बनत चालली आहे, हे अधुनमधुन वाचायला मिळणार्‍या बातम्यांमुळे कळते. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर महानगरे "किडकी प्रजा" निर्माण करत आहेत...
सजीवांच्या पेशीतील केंद्रकाम्लाचा शोध १९५३ मध्ये लागला, त्यानंतर पेशीविज्ञानात अधिकाधिक प्रगतीच होत राहीली. संपूर्ण मानवी जनुकसंचाचे तसे़च पेशीकेंद्रकाच्या अंतर्रचनेचे रहस्य शास्त्रज्ञानी आता उलगडले आहे. पेशीच्या केंद्रकामध्ये केंद्रकाम्लाच्या लडी तयार झालेल्या असतात. हिस्टोन या प्रथिनांभोवती एखाद्या रिळाप्रमाणे केंद्रकाम्लाचे वेढे बसलेले असतात. हे वेढे बसण्याची कारणे गमतीदार आहेत - पेशीतील केंद्रकाम्लाची जर नुसती साखळी उलगडली (जिला इंग्लिश्मध्ये क्रोमॅटिन म्हणतात) आणि तिची लांबी मोजली तर ती सुमारे २ मीटर इतकी भरते. आता इतकी मोठी साखळी एका पेशीच्या सूक्ष्म केंद्रकामध्ये बसवण्याचे काम निसर्ग मोठ्या हुशारीने करतो. हिस्टोन हे धनभारित अल्कली गुणधर्माचे प्रथिन असते तर केंद्र्काम्ल ऋणभारित असते. हीस्टोन प्रथिनांना शेपट्या असतात. केंद्रकाम्लातील जनुक, हिस्टोनच्या शेपट्याना कोणते रेणू चिकटतात यावर ते सक्रिय होणे अथवा निष्क्रीय होणे अवलंबून असते. हिस्टोनच्या शेपट्याना सहसा मेथिल, ऍसिटील आणि फोस्फोरिल रेणू चिकटतात. या प्रथिनांभोवती गुंडाळले गेल्यामुळे केंद्रकाम्लाची लांबी आपोआप बरीच कमी होते आणि ते पेशीच्या केंद्रकात व्यवस्थित बसते.
हीस्टोन प्रथिनांचे चार मुख्य प्रकार आहेत. ते h1, h2 h3 आणि h4 या सांकेतिक नावांनी ओळखले जातात. हिस्टोनच्या शेपट्याना कार्बन आणि नायट्रोजन यातील एका बाजुला कार्बनचा अणु आणि दूसर्‍या बाजुला नायट्रोजनचा अणु असतो. नायट्रोजनचा अणु असलेली शेपटी जरा लांब असल्याने ती केंद्रकाम्लाच्या हिस्टोनभोवती तयार झालेल्या गुंडाळीतून बाहेर डोकावते. ही हिस्टोन प्रथिने एखाद्या कळीप्रमाणे (स्वीच) जनुकांना सक्रिय, निष्क्रिय करण्याचे काम करतात. गर्भधारणेच्यावेळी आद्य पेशीमध्ये जेव्हा मातेचे आणि पित्याचे केंद्रकाम्ल संयोग पावते तेव्हा या लडीं हिस्टोनसह नवीन जिवामध्ये संक्रमित झालेल्या असतात. पूर्वी म्हटल्याप्रमाणे पित्याकडुन फक्त केंद्रकाम्लाची अर्धी साखळी शुक्रजंतू वाहून आणतात. हिस्टोनची देणगी मात्र आईकडूनच मिळते. पित्याकडून जेमेतेम १०% हिस्टोन मिळतात.
आपले पर्यावरण, अन्न आणि जगण्याचा संघर्ष जनुकीय पातळीवर दूरगामी बदल घडवून आणतात, हे सांगणार्‍या अधिजनुकशास्त्राची मुहूर्तमेढ कोनरॅड वॅडींग्टनच्या संशोधनातून 1942 मध्ये रोवली गेली. तेव्हापासून या शाखेची वाढ वेगाने होत असून दरवर्षी प्रसिद्ध होणार्‍या संशोधन निबंधांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे.

आईवडिलांच्या आणि आईच्या आईच्या जीवनशैलीचे संततीवर जनुकांमार्फत कायमस्वरूपाचे दूरगामी परिणाम होतात, हा अधिजनुकशास्त्राचा महत्त्वाचा संदेश आहे. त्याच बरोबर आपले पर्यावरण, जीवनशैली आपल्या जनुकांना अधिजनुकीय बदलांद्वारे नियंत्रित करते. शारीरिक व्यंगापासून कर्करोगासारख्या गंभीर व्याधीपर्यंत अधिजनुकीय बदलांचा प्रभाव कारणीभूत ठरतो. नुकतेच दिवंगत झालेले विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकींग आणि अनेक विद्वान मानवजातीच्या भवितव्यबद्दल धोक्याचे इशारे देत आहे आणि अधिजनुकशास्त्रातील संशोधन या इशार्‍यांना पुष्टी देत आहे. विज्ञानप्रसाराला वाहून घेतलेल्या अनेक व्यक्ती आणि संघटना याबाबत मूग गिळून गप्प आहेत.
आपले जनुक आपल्या कर्तृत्वाचे कारण आपण आजवर मानत आलो आहोत. पण हे जनुक कार्यान्वित होणे अथवा निष्क्रिय होणे हे आपली जीवनशैली आणि पर्यावरण यावर अवलंबून असेल. त्यामुळे आपले कर्तृत्व मनगटापेक्षा आजुबाजुच्या वातावरणाने जास्त नियंत्रित होईल. खगोलशास्त्रापेक्षा जनुकशास्त्र आणि अधिजनुकशास्त्र जर लोकप्रिय झाले तर समाजाचा जास्त फायदा होईल असे वाटते.

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

अश्लील कृत्य!


काल आणि काही दिवसांपूर्वी एक बातमी वृत्तपत्रांमध्ये झळकत आहे. या दोन्ही बातम्यांचे मथळे आणि त्यातील घटनांकडे बघायचा माध्यमांचा आणि (अडाणी) समाजाचा दृष्टीकोन मला कोड्यात टाकतो आहे.

दोन्ही घटनांमध्ये दोन पुरुषांनी सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन केला आहे.

मला मात्र वेगळाच प्रश्न पडला आहे. मुळात हस्तमैथुन ही अश्लील कृती आहे का? या प्रश्नाचे उत्तर वैद्यकीयदृष्ट्या "नक्कीच नाही" असे शहाण्या माणसांचे उत्तर असेल.  मग तो सार्वजनिक ठिकाणी केल्याने अश्लील ठरतो का? हे तपासायला हवे.  सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन करणे हे अश्लील कृत्य नक्कीच नाही (तशा बातम्या वृत्तपत्रांमध्ये नक्कीच येत नाही). पण हस्तमैथुन मात्र बातमीचा आणि निषेधाचा विषय ठरतो हे मात्र अगम्य कोडे आहे.

वास्तविक मलमूत्र विसर्जनाप्रमाणे हस्तमैथुनात लैंगिक भावनांच्या कोंडमार्‍याचा निचरा होतो. मलमूत्र विसर्जनाची सोय नसल्यास लोक उघड्य़ावर ते करतात आणि आपण ते ’स्वीकारतो’! काही आजारात मलमूत्र प्रवृत्तीवरील नियंत्रण कमी होते, ते ही आपण स्वीकारतो. तसेच लैंगिक भावनांच्या विसर्जनाची **सोय नसलेल्या** व्यक्तीने तो उघड्यावर  केल्यास त्याकडे सहानुभूतीने पहायला हवे. "अश्लील, अश्लील" असे ओरडून हस्तमैथुनाबद्दल गैरसमज तसेच वाढत राहतील. 

या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी "कामाच्या ठिकाणी हस्तमैथुन" या विषयावरील पाश्चात्य वृत्तपत्रातील चर्चा वाचनात आली. (http://metro.co.uk/2017/01/20/we-tried-masturbating-at-work-for-a-week-and-this-is-what-happened-6393673/). मग  डोक्यात उजेड पडला - जे प्रश्न समाजाला सोडवता येत नाहीत ते एक तर नाकारायचे किंवा प्रश्न उपस्थित करणार्‍यांचे तोंड दाबून टाकायचे किंवा त्या व्यक्तीला विकृत ठरवायचे, एव्हढेच समाजाला येते.

आय०आय०टीत असताना मी माझ्या एका डॉक्टर मित्राला माझ्या हस्तमैथुनाबद्दलच्या काही शंका विचारल्या होत्या. तेव्हा त्याने एक छान उत्तर दिले होते. तो म्हणाला - "शरीरात जे पदार्थ बाहेर टाकण्यासाठी निर्माण होतात, ते बाहेरच पडायला हवेत. ते शरीरातच ठेवणे अजिबात हितावह नसते." 

असो. या विषयाच्या अनुषंगाने बरेच लिहीण्यासारखे आहे. पण पुन्हा एखादी "अश्लील कृत्याची" बातमी वृत्तपत्रात येईल तेव्हा...

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

श्री० देवेन्द्र फडणवीस

श्री० देवेन्द्र फडणवीस
मुख्यमंत्री
महाराष्ट्र

स०न०वि०वि०

मंत्रालयात आत्महत्या वाढू लागल्याने नायलॉनच्या जाळ्या बसवण्यात येणार असल्याचे वृत्त आत्ताच म०टा०मध्ये वाचले.
जाळ्या बसवल्या तरीही लोक आत्महत्येचे इतर मार्ग अवलंबू शकतात हे आपल्या लक्षात आले असेलच.

तेव्हा या समस्येचे मूलभूत उत्तर शोधण्याची गरज आहे. व्यवस्थेने हतबल झालेल्या आणि आत्महत्येचे टोक गाठणार्‍या प्रत्येक व्यक्तीमध्ये "विवेक संवर्धनाची" गरज आहे, हे आपल्या अजून कुणीही लक्षात आणून दिले नाही याचे सखेद आश्चर्य वाटले.

यासाठी मंत्रालयात प्रत्येक मजल्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीला "विवेक संवर्धन केंद्र" चालविण्याचे कंत्राट द्यावे. सरकारी व्यवस्थेने वैफल्य आलेल्या प्रत्येक व्यक्तीला वेळीच या केंद्रात पाठविण्यात यावे अशी मी नम्र सूचना करतो.

पुढेमागे देशात सर्व मंत्रालयात अशी "विवेक संवर्धन केंद्रे" उघडता येतील.

कळावे
आपला

राजीव उपाध्ये

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८

किडक्या प्रजेचे तर्कशास्त्र आणि नैतिकता’चाळीत निपजलेल्यांचे तर्कशास्त्र चाळीतल्या वातावरणासारखे कुबट आणि सडके असते’ असे विधान मी एका दीडशहाण्या बुद्धीवादी बाईला सुनवण्यासाठी केले होते. एका टुकार विद्यापीठात कसले तरी तुकडे मोडणार्‍या या बाई एका सिक्रेट ग्रुपमध्ये त्यांची हूशारी कुचेष्टा आणि टिंगलटवाळी यात खर्च करण्यात व्यस्त असतात.


नंतर माझ्या विधानातील मथितार्थ समजाऊन घेण्याची कुवत नसलेल्या बाईंच्या चमच्यांनी माझी कोंडी करून मला एकाकी पाडले होते.


अनेक बुद्धीवाद्याना सर्वच विज्ञान समजते असे नाही. अधिजनुकशास्त्रासारख्या आधुनिक विज्ञानशाखेतले संशोधन जे धोक्याचे इशारे देत आहे, ते समजून घ्यायची कुवत या दीडशहाण्या विज्ञानवाद्यांमध्ये नाही. माझे मित्र डॉ. दीक्षित म्हणतात त्याप्रमाणे - म्ह० डॉक्टरांना जिनेटीक्स समजत नाही तिथे इतरांना (आणि कुचेष्टा आणि टवाळी हा परमधर्म असलेल्यांना) जिनेटीक्स आणि एपिजिनेटीक्स कुठुन कळणार?


माझे वरील विधान, ’मुंबईकर किडकी प्रजा निर्माण करत आहेत’ हे मी अलिकडे केलेले विधान आणि आज म०टा० मध्ये प्रसिद्ध झालेली खालील बातमी, आणि माझ्या भिंतीवर शेअर केलेले अधिजनुकशास्त्रातील संशोधनाचे दाखले, हे सर्व कुठेतरी एकमेकांशी जोडलेले आहेत आणि मानवाचे भवितव्य वाटते तेव्ह्ढे उत्साहवर्धक नाही...
असो.