शुक्रवार, १२ सप्टेंबर, २००८

|| धर्मांतर ||

धर्मांतर

राजीव उपाध्ये - सप्टेंबर २००८

धर्मांतर हा माझ्या कुतुहलाचा विषय आहे. त्यात हिंदूचे धर्मांतर हा तर विशेष
कुतुहलाचा विषय. हिदूंना वाटत असलेल्या धर्मांतराच्या चिंतेची मला नेहमीच गम्मत
वाटत आली आहे.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते गणेशोत्सवाचे दिवस होते. पुण्यातील एका
मानाच्या गणपतीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका विद्वानाचे "धर्मांतराची
समस्या" या विषयावर प्रवचन होते. वर म्हटल्याप्रमाणे, हा कुतुहलाचा विषय
असल्यामुळे मी या कार्यक्रमास उपस्थित राहिलो होतो. शुभ्र वेष, शुभ्र दाढी आणि
तुळतुळीत टक्कल असलेले प्रमुख वक्ते पूर्वाश्रमीचे अमेरीकेत एमेस केलेले संगणक
अभियंते होते. आता त्यांनी आपले आयुष्य धर्मप्रचारासाठी वाहून घेतले होते. त्या
विद्वान महाशयानी आपल्या व्याख्यानाची सुरुवात चातुर्वण्याच्या "नव्या"
व्याख्येपासून करायला घेतली. चातुर्वण्यातील प्रत्येक वर्णाचा नवा अर्थ
उपस्थितांपुढे तल्लीन होऊन उगाळत असताना एका विघ्नामुळे या महाशयांची निरूपण
समाधी भंग पावली.

तो दिवस गणपती विसर्जानाचा होता. सदर कार्यक्रम ज्या ठिकाणी चालू होता तेथे
बर्‍याच रहदारीचा एक रस्ता आहे. नेमकी त्यावेळी रस्त्यावरून एक मिरवणूक जाऊ
लागली होती. ढोल-ताशांच्या गजरात प्रवचन-स्थळी लावण्यात आलेला ध्वनिक्षेपक
निरूपयोगी ठरला आणि साहजिकच माननीय वक्त्यांची निरूपण-समाधी भंग पावली.
त्यांच्यातला दूर्वास तत्क्षणी जागा झाला आणि चडफडत त्यांनी शापवाणी उच्चारली -
"These all are real shudras!" एका विद्वानापुढे निर्माण झालेले विघ्न, तो
विघ्नहर्ता पण दूर करू शकत नव्हता. त्या नव-शूद्रांना आपण कोणते पाप केले याचे
भान नव्हते. मनातल्या मनात मी पण टिळकांवर चिडलो होतो. त्यांनी पुच्छविहीन
माकडांच्या हाती दिलेले कोलित ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यास उपयोगी
पडले पण त्याने एक नवे शूद्रत्व निर्माण केले होते...

हिंदूच्या धर्मांतराचा मुद्दा जेव्हा जेव्हा ऐरणीवर येतो तेव्हा तमाम
हिंदूत्ववादी एक गोष्ट लक्षात घ्यायला विसरतात.
हिंदूधर्माकडे आकर्षित होऊन तो स्वीकारणार्‍यांची संख्या किती आणि त्याचा
तिरस्कार निर्माण होऊन तो सोडणार्‍यांची संख्या किती? या मूळ प्रश्नाला आणखी
काही पदर आहेत. उदा. एखाद्या हिंदू नसलेल्या व्यक्तीने हिंदू
व्हायचे ठरवले तर वर्णाश्रम व्यवस्थेत त्याचे नवे स्थान कोणते? या प्रश्नाचे
समाधानकारक उत्तर मला अजून तरी मिळाले नाही. असो.

मला असं वाटतं, धर्माचं यश तो किती वर्षे टिकून आहे यापेक्षा तो किती पसरला आहे
या निकषावर तपासायला हवं. धर्म टिकून राहतो तो त्याने निर्माण केलेल्या
मानसिकतेच्या आणि दहशतीच्या जोरावर आणि तो वाढतो त्याने सोडवलेल्या
प्रश्नांच्या जोरावर.

काही दिवसांपूर्वी मी रिक्षातून जात होतो. रिक्षा, टेंपो किंवा ट्रकमध्ये जी
वाङ्‌मय निर्मिती दिसते ती गुंफाचित्रांचा आधुनिक आविष्कार आहेत असे मला वाटते.
मी ज्या रिक्षातून जात होतो ती येशूच्या वचनांनी आणि चित्रांनी सजवली होती
. त्यामध्ये एका छोट्या चित्राकडे माझे लक्ष वेधले गेले
. त्या चित्रात वधस्तंभावरील येशू रेखाटला होता. पण हा येशू आजवर बघितलेल्या
येशूंपेक्षा निराळा होता. कारण त्याच्या अंगावर जे उत्तरीय होते ते मात्र
भगव्या रंगाचे होते. पाव खाऊन हिंदू बाटले गेले पण भगवे उत्तरीय घेतलेला येशू
मात्र न बाटता येशूच राहिला होता...


Regards

Rajeev Upadhye
---------------------------
www.yuyutsu.biz
http://rajeev-upadhye.blogspot.com/
--------------------------

सोमवार, ८ सप्टेंबर, २००८

कथा दोन साधुंची

कथा दोन साधुंची

डिसेंबर २००७

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट काही सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या
खांद्यावर ऒढून घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने
प्रभावित होऊन प्रेतामधला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, "राजा
तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटतॆ. तुझे कष्ट थोडेफार हलके व्हावेत म्हणून
मी तुला एक गोष्ट सांगतॊ."

"आटपाट नगर होतं. त्यात एकदा आपल्या शिष्यपरिवारासह दोन साधूंनी मुक्काम केला
होता. एक साधूमहाराज त्यांच्या यज्ञयागादि तप: सामर्थ्यासाठी प्रसिद्ध होते.
शिवाय प्रत्येक माणसाचे भूत-भविष्य-वर्तमान जाणून घेण्याचे सामर्थ्य त्यांना
प्राप्त झाले होते. गतजन्मीच्या पापांचे प्रायश्चित्त घेतल्या शिवाय याजन्मीचे
भोग संपणार नाहीत अशी त्यांची शिकवण होती. तर दूसरे केवळ आपल्या अमोघ वाणीने
समोर जमलेल्या भक्तांचे दू:ख निवारण करण्यासाठी प्रसिद्ध होते. दोघांनाही आटपाट
नगरात प्रचंड भक्तबल लाभले होते. त्यात नुकतेच मिसरूड फुट्लेले वितर्कतीर्थ
आणि सन्मतितीर्थ या नावाचे दोन तरूण पण होते.

आटपाट नगरात उपजीविकेसाठी फारशी संधी नसल्याने ते दोघे आलेला प्रत्येक दिवस या
दोन महंतांच्या कार्यक्रमांत व्यतीत करत."

"वितर्कतीर्थ यज्ञयागादि तप:सामर्थ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या साधूंच्या
थाटामाटाने भारावून गेला होता. तर सन्मतितीर्थ गावाबाहेर मुक्कामास असलेल्या
महंतांच्या साध्या शिकवणुकीने प्रभावित झाला होता. वितर्कतीर्थाला प्रभावित
करणारे महाराज त्यांची दैनिक पूजाअर्चा संपली की हत्तीवरून गावात मिरवणुकीने
आपला लवाजमा घेऊन फेरफटका मारत.
गावातील सर्व लोक ही मिरवणूक पाहण्यासाठी गोळा होत आणि यथाशक्ती धनधान्याचे दान
करत. कितीही गैरसोय झाली तरी मिरवणूकीबद्दल गावात नाराजीचा जराही सूर उमटला
नव्हता. कदाचित या साधूमहाराजांच्या तप:सामर्थ्याचा दराराच तसा होता. याउलट
आपल्या अमोघ वाणीने समोर जमलेल्या भक्तांचे दू:ख निवारण करण्यासाठी प्रसिद्ध
असलेले साधूमहाराज मात्र गावाच्या वेशीबाहेर मुक्कामाला होते. त्यांच्या
वास्तव्याने आटपाटनगराच्या रोजच्या व्यवहारात फारसा हस्तक्षेप होत नसे.
त्यांच्या प्रवचनास येणा-या भक्तवर्गाकडून मिळणा-या भिक्षेवर सर्वजण
उदरनिर्वाह करीत. सन्मतितीर्थ या साधूमहाराजांना शरण गेला होता..."

एकदा काय झालं, गावातील नदीवर वितर्कतीर्थ आणि सन्मतितीर्थ संध्याकाळी
अंघोळीसाठी आले असताना पाण्यात डुंबताना दोघांमध्ये गप्पा चालू झाल्या.
गप्पांचा विषय होता, गावात मुक्कामास आलेल्या दोन साधूंची शिकवण आणि त्यांचे
आचरण. तपाचे सामर्थ्य श्रेष्ठ की समस्यांचे निवारण करणारे मार्गदर्शन श्रेष्ठ?
वितर्कतीर्थ आणि सन्मतितीर्थ गप्पांमध्ये एवढे बुडून गेले की की सूर्य मावळतीला
कधी गेला याचे त्यांना भानच राहीले नाही. नदीकाठच्या

जंगलात झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट वाढू लागला. निशाचर श्वापदांच्या आरोळ्या
जशा वाढू लागल्या तसे वितर्कतीर्थ आणि सन्मतितीर्थ भानावर आले आणि पाण्यातून
बाहेर आले. कपडे बदलून आणि ओले पिळे खांद्यावर टाकून त्यांनी गावचा रस्ता
पकडला.


जंगल अर्धे पार होईपर्यंत काळोखाने आपले पूर्ण साम्राज्य पसरले होते. आता
मात्र दोघांची पावले झपाझप पडू लागली. पण तेवढयात सन्मतितीर्थाचा पाय एका
खड्ड्यात पडून मुरगळला. त्याला चालता येणे अशक्य झाले. वितर्कतीर्थाला तर
गावाकडे परतायची घाई झाली होती. संध्याकाळची मठातील स्वादिष्ट प्रसादाची वेळ
टळली असती तर रात्रभर भुकेने तळमळून काढावी लागली असती. या विचाराने अस्वस्थ
होऊन तो सन्मतितीर्थाला म्हणाला "तुला आता बरोबर घेऊन गेलो तर आपण दोघे एखाद्या
वन्य श्वापदाच्या भक्ष्यस्थानी पडू. तेव्हा तू सकाळ होईपर्यंत एखाद्या झाडाच्या
ढोलीत विश्रांती घे. सकाळी मी गावातील लोकांना मदतीला घेऊन येईन आणि तुला गावात
घेऊन जाईन." बराच विचार करून सन्मतितीर्थाने या सूचनेस संमती दर्शवली.

त्यावर वितर्कतीर्थाने अंधारात धडपडत एका विशाल वटवृक्षाची ढोली शोधून काढली
आणि तेथे सन्मतितीर्थाची व्यवस्था करून वितर्कतीर्थाने त्याचा निरोप घेतला. दाट
काळोखाने व्यापलेल्या जंगलात काही पावले चालून जातो न जातो तोच काही कळायच्या
आत वितर्कतीर्थ एका कठडा नसलेल्या पाण्याच्या विहीरीत घसरून पडला.

त्या किर्र शांततेत मोठ्ठा धोंडा पाण्यात पड्ल्याचा आवाज आणि "वाचवा वाचवा" असे
शब्द सन्मतितीर्थाच्या कानावर पडले आणि त्यावरून काय घडले असावे हे त्याने
जाणले. पण तो हतबल असल्याने "सकाळ होई पर्यंत त्याने वाट बघू" असा विचार
करतानाच त्याला झोप लागली. सकाळ झाली आणि सूर्याच्या उबदार किरणांनी
सन्मतितीर्थाला जागे केले. पायाचा ठणका कमी झाल्याने तो लंगडत ढोलीतून बाहेर
पडला आणि वाळलेल्या फांदीची कुबडी करून तर्कतीर्थाला हाका मारु लागला...रात्री
ऐकलेल्या आवाजाच्या दिशेने त्याने जेव्हा शोध घेतला तेव्हा त्याला वितर्कतीर्थ
पडला होता ती कठड्यास भगदाड पडलेली विहीर नजरेस पडली.

त्याने विहिरीत डोकाऊन पाहिले तेव्हा विहीरीच्या पाय-यांवर मूर्च्छा येऊन
पडलेला वितर्कतीर्थ दिसला.

आता आपल्या मित्राला बाहेर कसे काढायचे याचा विचार त्याच्या मनात डोकावताच दूर
अंतरावर त्याला एक स्त्री लाकूडफाटा गोळा करताना दिसली. हातवारे करून आणि हाका
मारून वितर्कतीर्थाने तिच्याकडे मदतीची याचना केली.
जेव्हा ती स्त्री विहिरीजवळ आली तेव्हा सर्व वृत्त सन्मतितीर्थाने तीस कथन
केले. तेव्हा ती म्हणाली, "मी अशीच गावात जाते आणि जो भेटेल त्याला घेऊन येते."
जाण्यापूर्वी तीने विहिरीतून कसेतरी पाणी काढले आणि तर्कतीर्थाच्या तोंडावर
मारले. सरपणाची लाकडे गोळा करताना वेचलेली कंदमुळे सन्मतितीर्थाच्या हवाली
करून ती गावाकडे निघाली.

ती स्त्री गावाकडे निघाली तेव्हा तीने सन्मतितीर्थाच्या गुरूंच्या आश्रमात
निरोप दिला व पुढे वितर्कतीर्थाच्या गुरुंच्या आश्रमात निरोप द्यायला गेली
तेव्हा तपस्वी महाराजांची मिरवणूक गावात नेहमी प्रमाणे चालू झाली होती. तिने
जोरजोरात हाका मारून तपस्वी महाराजांच्या शिष्याचे लक्ष वेधायचा प्रयत्न केला.
महाराजांचे लक्ष तीच्याकडे गेले तेव्हा त्यांनी मिरवणूक थांबवण्यास सांगून एका
शिष्योत्तमास चौकशी करण्यास सांगितले. गुरूंच्या आदेशाप्रमाणे शिष्य त्या
स्त्रीकडे चौकशी करून आला आणि म्हणाला, "गुरूवर्य एका क्षुद्र कुळात जन्मलेला
आणि उद्योग नसलेला गावातील एक तरूण आपला भक्त आहे. तो विहीरीत पडला असून, त्यास
बाहेर काढण्यासाठी ही स्त्री मदत मागत आहे." तपस्वी महाराजांनी काही क्षण डोळे
मिटले आणि ते म्हणाले, "हा तरूण गेल्या जन्मी पाखंडी म्हणून प्रसिद्ध होता.
त्यामुळे त्याचा हीन कुळात जन्म झाला आणि त्याच्या वाट्याला हे दू:ख आले. पण
गावातील लोकांची मदत घेऊन त्याला सायंकालीन पूजेच्या वेळी घेऊन या म्हणजे मी
त्यावर मंतरलेले उदक शिंपडतो म्हणजे त्याच्या पीडेचे निवारण होईल." असे म्हणून
मिरवणुकीस त्यांनी पुढे जाण्याचा आदेश दिला. इकडे गावाबाहेर मुक्काम केलेल्या
साधुमहारांजाचे भक्त त्वरेने जंगलाच्या दिशेने निघाले आणि वितर्कतीर्थ आणि
सन्मतितीर्थाला त्यांनी शोधून काढले आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करून
त्यांना गांवात नेले.

वितर्कतीर्थ मात्र या अनपेक्षित माणुसकीच्या अनुभवाने भारावून गेला. त्याची
तपस्वीमहाराजांवर असलेली श्रद्धा पूर्णपणे उडून गेली. "ज्यांचे तप:सामर्थ्य
माझी वेदना दूर करत नाही त्यांची सेवा करून मला काय मिळणार" असा त्याने
स्वत:शीच विचार केला." त्याने त्यांच्या दर्शनाला जाणे पूर्ण थांबवले. तो
ह्ळुहळु सन्मतितीर्थाबरोबर गावाबाहेर मुक्कामाला असलेल्या गुरूंच्या प्रवचनास
जाऊ लागला. गावात जो भेटेल त्याच्या समोर त्यांचे गोडवे गाऊ लागला.

पण झाले काय की या प्रकाराने मात्र तपस्वी महाराज आणि त्यांचा शिष्यपरिवार
अस्वस्थ झाला. त्यांनी वितर्कतीर्थाला एक दिवस पळवून आणले आणि अंधारकोठडीत
डांबून ठेवले. पण या प्रकाराचा मात्र गावात बभ्रा झाला तेव्हा मात्र तपस्वी
महाराजांनी गावातून काढता पाय घेतला.

येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "आम्हा पिशाच्चांचे एक बरे असते. आमच्या
कुठेही श्रद्धा नसतात. तसेच आमच्यात जातपात, धर्म पण नसतात. त्यामुळे धर्मांतर
आणि धर्मबुडवेपणा पण आमच्यात नसतो. पण मला सांग, तुला यातल्या कोणत्या
महाराजांचे शिष्यत्व स्वीकारायला तुला आवडेल." या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असून
दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायाशी लोळू लागतील."

यावर राजा विक्रमादित्य हसून म्हणाला, "तपस्वी महाराजांच्या लेखी वितर्कतीर्थ
एक क्षुद्र माणुस होता. त्यांच्या परिवारास त्याचा तसा काहीच उपयोग नव्हता.
त्यामुळे याला मदत करून काय साधणार असा सुप्त विचार तपस्वी महारांजांनी केला
असावा. संकटातून किंवा बंधनातून बाहेर पडायला प्रत्यक्ष मदत करणारी प्रवृत्ती
मला श्रेष्ठ वाटते. ही प्रवृत्ती आपापसातील दरी कमी करते."

राजाच्या या उत्तराने वेताळ खूष झाला आणि विक्रमादित्याचा मौनभंग झाल्याने
प्रेतासह झाडावर जाऊन लोंबकळू लागला.