बुधवार, २७ जानेवारी, २०१६

देऊळ


आमच्या सोसायटीच्या समोर २ मोठे टॉवर आणि एक मंगल कार्यालय झाले आणि आमच्या समोरच्या रस्त्याची गल्ली झाली. यथाकाल गल्लीच्या तोंडाचा काही रिक्षावाल्यानी ताबा घेतला आणि तिथे आपला स्टॅण्ड सुरु केला. काही दिवसांनी रिक्षास्टॅण्डला स्थैर्य प्राप्त झाले आणि एका रिक्षासंघटनेचा बोर्डपण लागला. पुढे काय होणार याचा मी अंदाज बांधला आणि माझा अंदाज खरा ठरला...

रिक्षावाल्यानी दत्ताचे देऊळ बांधायचा संकल्प सोडला. बहुधा आमच्या सोसायटीने हरकत घेतली म्हणून रिक्षावाल्यानी पलिकडच्या बाजुला छोटे दत्तमंदिर बांधायला घेतले. रिक्षावाल्याना दत्त का प्रिय आहे हे मला न उलगडलेले कोडे आहे. नुकतीच दत्तजयंती झाली तेव्हा रिक्षावाले माझ्याकडे आले, तेव्हा मी त्यांना मला शक्य होती तेव्हढी वर्गणी पण दिली.

परवाच मी रुपालीत जाण्यासाठी रिक्षा घेतली, तेव्हा एका रिक्षावाल्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.

मी विचारले, "काय हो, सगळ्या रिक्षास्टॅण्डवर दत्त जास्त करून दिसतो. ते का?"

"काय माहित नाही साहेब?"

"पण मग गावात एव्हढी देवळे अगोदरच असताना आणखी ही देवळे कशासाठी?"

"काय आहे साहेब, कामावर निघताना कुठेतरी डॊकं टेकवले की मन प्रसन्न राहतं साहेब".

मग मी त्याला विचारले,

"अहो पण डोकं टेकवायला आपल्या घरात देव असतोच की... घरातला देव काय मन प्रसन्न ठेवायला कमी पॉवरफुल असतो का?"

रिक्षावाला आता एकदम गडबडुन गेला आणि मग स्वत:ला सावरून मोठ्याने हसला आणि म्हणाला,

"देवळाच्या निमित्ताने आमच्या व्यवसायातली चार लोकं एकत्र येतात आणि बांधलेली राहतात"

मग रिक्षावाल्याने मला वेगवेगळ्या रिक्षास्टॅण्डवरचे रिक्षावाले कायकाय उपक्रम चालवतात, ते त्याने मला सांगितले. त्यावर घरातला देव नाक्यावरच्या चार लोकांना एकत्र आणण्यास असमर्थ आहे एव्हढाच मी त्यातुन निष्कर्ष काढला आणि मग मला त्याला अधिक प्रश्न विचारण्यात मला पण, का कुणास ठाऊक, रस उरला नाही.

तोपर्यंत रुपाली आली होती... रिक्षातला वेताळ मग रुपालीत जाउन लोंबकळु लागला.

मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

अजब

 मध्यंतरी माझ्या परिचयाच्या एका आजींना त्यांच्या आप्तांनी आमच्या घराजवळच्या वृद्धाश्रमात ठेवले होते. मी मला शक्य होते म्हणुन आणि वृद्धांशी माझे जुळते म्हणून या आजींना नियमित भेटायला जात असे. यामुळे तिथल्या इतर वृद्धांशी सहजच गप्पा होत. मी प्रामुख्याने श्रोता ही भूमिका त्यांच्यात निभावायचो आणि या लोकांसाठी तेव्हढेही खुप होते...

पुढे काही दिवसांनी माझ्या परिचयाच्या आजीना त्यांच्या आप्तानी अमेरिकेला न्यायचे ठरवले. वृद्धाश्रमातील लोकांनी एक छोटा निरोप समारंभ पण केला. तेव्हा एक आजी माझ्याकडे येऊन म्हणाल्या, "या आता इथुन जाणार असल्यातरी तुम्ही आमच्यासाठी येत चला हं. आपली ओळख आता चांगली झालीच आहे." मला त्यात वावगे वाटले नाही म्हणुन मी पट्‍कन ’हो’ म्हणुन टाकले.

नंतर काय वाटले कुणास ठाउक, माझं मन मला म्हणाले की माझ्या परिचयाच्या आजींच्या नंतर त्या वृद्धाश्रमात जाण्यासाठी आपण संचालकांची रितसर परवानगी काढावी. तो वृद्धाश्रम पेशाने मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या एक बाई चालवत असत.

मी त्या वृद्धाश्रमाच्या संचालिकेला फोन करुन सर्व सांगितले आणि रितसर परवानगी मागितली. त्यावर संचालिकेने मला सांगितले
"तुम्ही त्या आजीना भेटायला अजिबात येऊ नका. त्यांची केस जरा विचित्र आहे. तुम्हाला भेटायचे असेल तर इतरांना भेटा."

ज्या आजीनी मला "येत जा" म्हणुन सांगितले त्यांना टाळुन इतरांना भेटणे अशक्य असल्याने मी माझा वृद्धसेवेचा प्लॅन मग गुंडाळुन ठेवला.

विचित्र केस म्हणजे काय तर त्यांच्या आप्तांनी आजीना ’वेडं’ ठरवुन वृद्धाश्रमात आणुन टाकले होते असे उडत उडत कानावर आले होते. आजी मात्र एकदम खणखणीत गप्पीष्ट होत्या. ज्या काय गप्पा झाल्या त्यात कुठेही ’वेडे’पणा किंवा तर्‍हेवाईकपणाचा मागमूस नव्हता. पण त्याना समाजापासून असे तोडुन काय साधणार होते हे त्या वृद्धाश्रमाची संचालिकाच जाणे...

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

"टवाळी"


नारळीकरांच्या टवाळीवरून एक आठवण जागी झाली ...

१९९३-९४ च्या भटकरांनी माझे रखडवलेले प्रमोशन करायचेच असा विडा एका सहकारी-हितचिंतकाने उचलला.

हा माझा सहकारी अत्यंत बुद्धीमान आणि तितकाच विक्षिप्त. अत्यंत गुंतागुतीची differential equations, tensor calculus तास-न-तास हाताने फक्त कागद आणी पेन घेऊन करत बसायची अचाट क्षमता त्याच्यात होती.

त्याने प्रचंड प्रयत्न करून भटकरांना माझ्या प्रमोशनइंटरव्ह्युसाठी राजी केले. प्रमोशन इंटरव्ह्युसाठी मी अशा माणसाला (expert) आणेन की भटकरच काय  त्यांचा बाप पण तोंड उघडु शकणार नाही, हे त्याने मला दिलेले आश्वासन होते.

त्याचा तो अभिनिवेश बघुन मी त्याला विचारले,
"who is in your mind for my interview"

विनाविलंब विचार करता त्याने सांगितले,
"Prof. Govind Swaroop"

प्रा. गोविंद स्वरुप तेव्हा पुणे टिआयएफआर चे संचालक होते.

माझ्या मित्राने एक दिवस त्यांच्या घरी मला त्यांच्याकडे नेले. त्या दिवशी प्रा. गोविंद स्वरुपांच्या घरी विकांत पार्टी होती. मी काहीसा भांबावुन गेलो  होतो. माझ्या प्रमोशनसाठी प्रयत्न करणार्‍या माझ्या मित्राचे मला खुप कौतुक वाटत होते.  पण सावधपणे पार्टीत जमेल तेव्हढा (दारू सोडुन) सहभाग घेत होतो.

त्या दिवशी  त्या पार्टीत मला नारळीकरांची जी ’टवाळी’ बघायला मिळाली त्यानंतर नारळीकरांची माझ्या मनातली प्रतिमा खाड्‍कन उतरली. एक नमूद करणे आवश्यक आहे, ते असे की प्रा. गोविंद स्वरूप त्या टवाळीपासुन अलिप्त होते. त्या टवाळीचे कारण अलिकडे लक्षात आले - त्या सुमारास नारळीकरांच्या steady state theory चे जागतिकपातळीवर थडगे बांधले गेले होते ( अथवा सुरुवात झाली होती).

असो ...

नंतर भटकरांनी गोविंद स्वरूपांसारख्या व्यक्तीला माझ्या बढतीसाठी बोलावण्याची आवश्यकता नाही, असे सांगुन घूमजाव केले. माझी बढती झाली पण ती होउ नये म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होत होते.

मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

जे झाडांचे तेच माणसांचं


जमीन, हवा, पाणी दिले म्हणुन
कोणतेही झाड
कुठेही रुजत नाहीत.

जे झाडांचे तेच माणसांचं


सगळी झाडे
एका जागेवरून उपटुन
दूसरीकडे लावता येत नाहीत.

जे झाडांचे तेच माणसांचं

काही झाडे रुजतात आणि
झपाझप वाढतात
काही झाडे जागा झाली की
मग वाढतात

जे झाडांचे तेच माणसांचं

काही झाडे फार वाढणार नाहीत
याची काळजी घ्यावी लागते
कारण ’हवी ती झाडे’ मग
नीट वाढत नाहीत

जे झाडांचे तेच माणसांचं

- राजीव उपाध्ये