शनिवार, २० मे, २०२३

Killer Instinct


Killer Instinct
 ==========

-- राजीव उपाध्ये

चार्वी शाळेत असताना मी अनेक वेळा तिला शाळेतून आणायला जायचो. शाळा सुटायच्या वेळेला काही निरीक्षणे करून मी माझ्या पुरताच एक सिद्धांत मांडला होता. तो असा की शारीरिक चापल्य आणि बौद्धिक चापल्य यांचा घनिष्ठ संबंध असतो. - शाळा सुटल्यावर काही मुले सुसाट गेट मधून बाहेर येत असत. ही सुसाट मुले अभ्यासात पण सुसाट होती, असे माझे निरिक्षणांती मत बनले होते. आमच्या मॅडम सुसाट नव्हत्या आणि अति रेंगाळणार्‍या पण नव्हत्या. त्या "वेल टू डू" वर्गात मोडणा-या होत्या. मी विषारी स्पर्धेच्या वातावरणात वाढल्यामुळे killer instinct चे महत्त्व ओळखून चार्वीला "सुसाट" करण्याचे तूफान प्रयत्न केले, पण ते एका मर्यादेपर्यंतच यशस्वी ठरले.

चार्वीच्या शाळेने विषारी स्पर्धा खुडायचे काम मुळापासून केले. "Killer instinct" हेच अंतिम सत्य मानणार्‍या मला (आणि अधूनमधून अपर्णाला) चार्वीच्या शाळेचा खूप राग यायचा. दर ६ महिन्यांनी आम्ही शाळा बदलायचे मनसूबे रचायचो. पण शाळा बदलणे, हे हॉटेल बदलण्यासारखे सोपे नसल्यामुळे मग तो बेत मग रहित व्हायचा.
आज चार्वी आय० आय० टी० मध्ये आणि अमेरिकेत गेली नाही याचे अजिबात दू:ख नाही. उलट तिला अमेरिकेचे आकर्षण अजिबात नाही याचे जास्त कौतूक वाटते. तिला मी अलिकडे विचारले - "How you will describe Scottish culture in one sentence?". ती उत्तरली - "Baba, live and let live". आज तिच्या तिकडच्या मित्रमैत्रीणी चार्वीने तिकडे परत यावे म्हणून प्रयत्न करतात, तेव्हा मला बाप असूनही स्वत:च्या मुलीचा हेवा वाटतो. मी तिच्या इतका नशीबवान नाही. अनेक जुनी मित्रमंडळी आणि "मास्तरडे" अजुनही माझ्याकडे तुच्छतेनेच बघतात...

हे सगळं आज लिहायचं कारण म्हणजे नुकतंच आय० आय० टी० मुंबई ने मुलांवरील ताण कमी करण्यासाठी दोन कोर्सेस कमी करण्याचे स्वागतार्ह पाऊल उचलल्याचे वाचले. याचे परिणाम दिसायला बराच वेळ जाईल पण परिणाम टिकाऊ असेल. Killer instinct ला अवाजवी महत्त्व देण्याच्या नादात अनेकदा वेगळ्या प्रतीची बुद्धीमत्ता नष्ट होते. वाफेवर अन्न शिजवताना जीवनसत्त्वे आणि पूरक द्रव्ये नष्ट होतात, तसेच काहीतरी. स्वत:च्या मगदूरा प्रमाणे शिकणे यात गैर काही नाही, याची आय० आय० टी० ने दखल उशीरा घेऊन फार नुकसान झाले आहे. Better late than never!