सोमवार, २५ जुलै, २०११

दिनांक ३१ जुलै २०११ रोजीची शुभ अमावस्या

दिनांक ३१ जुलै २०११ रोजी सायन सिंह राशीत ७ अंश १९ मि.वर होणारी अमावस्या गोचर हर्षल बरोबर नवपंचम योग करते. याशिवाय गोचर प्लुटो बरोबर quincunx () नावाचा एकच त्रासदायक योग करते, आदल्या दिवशी दिनांक ३० जुलै २०११ रोजी चंद्र-शुक्र युती होत असून ही युती हर्षल बरोबर नवपंचम योग करत असल्याने, ही अमावस्या बर्‍याच प्रमाणात शुभ ठरण्याची शक्यता आहे. जन्म पत्रिकेत रवि, चंद्र, लग्न, ख-मध्य व शुक्र हे जर सुस्थितीत असतील तर अमावस्ये दरम्यान केलेले मोठे आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील किंवा पूर्वी केलेल्या व्यवहारांचे लाभ पदरात पडतील.

पुढे दिलेल्या कोणत्याही सनातील जन्मदिनांकाना ही अमावस्या विशेष शुभ ठरेल -

२५ मार्च ते ३० मार्च
२७ जुलै ते २ ऑगस्ट
२७ नोव्हेंबर ते २ डिसेम्बर


अमावस्येच्या आदल्याच दिवशी सायन सिंह रास २ अंश १२ मि वर चंद्र शुक्र युती होत असून सायन सिंह रास ० अंश ते ९, सायन मेष रास ० ते ९ अंश, सायन धनु रास ० ते ९ अंश हे क्षेत्र अत्यंत शुभ झाले आहे. या क्षेत्रात ज्यांच्या जन्म पत्रिकेतील चंद्र, लग्न, ख-मध्य आणि बुध, शुक्र, गुरु हे ग्रह असतील तर त्याना ही अमावस्या शुभ जाईल.

चंद्र-शुक्र युती आणि अमावस्या यांच्यामुळे प्रभावित क्षेत्र बरेच मोठे असल्याने नेहमीचे जन्मतारखांचे गणित देता येत नाही.

शुक्रवार, १५ जुलै, २०११

माझा उत्कर्ष कुठे होईल?

माझा उत्कर्ष केव्हा होईल आणि कुठे होईल? हा ज्योतिषांना कायम विचारला जाणारा प्रश्न.यातल्या "केव्हा"चे उत्तर देण्यासाठी दशा, गोचर ग्रह, चलित ग्रह इत्यादींचा उपयोग केला जातो. तर "कुठे" हा प्रश्न पारंपरिक ज्योतिषात अजब तर्‍हानी हाताळला जातो. प्रश्नांची उत्तरे पण संदिग्ध अशीच असतात. पाण्याजवळ उत्कर्ष होईल किंव जुनाट अथवा वडलोपार्जित वास्तूत उत्कर्ष होणार नाही इ. इ. मात्र आधुनिक ज्योतिषात यातील "उत्कर्ष कुठे" या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जी पद्धत वापरली जाते, ती ज्योतिषातील मूळ गृहितकांशी सुसंगत अशीच आहे.

आधुनिक ज्योतिषातील एक मूलभूत तत्त्व असे आहे - उगवते म्हणजे लग्नबिंदूशी युती करणारे आणि ख-मध्याशी युती करणारे (जन्मवेळी बरोब्बर डोक्यावर असलेले) ग्रह हे फलिताच्या दृष्टीने ताकदवान असतात. म्हणजे एखाद्या पत्रिकेत रवि-गुरु युती जर जन्म वेळेला उगवत असेल किंवा बरोबर डोक्यावर येत असेल तर ती व्यक्ती तिच्या जन्मस्थळी उर्वरीत आयुष्य जगल्यास नक्कीच उत्कर्ष साधेल. पण या व्यक्तीने स्थलांतर केले तर नव्या ठिकाणी पत्रिकेचे स्थानांतर केल्यावर स्थानांतरीत लग्न किंवा ख-मध्य यांच्याशी होणारे योग विचारात घावे लागतात.

पत्रिकेचे स्थानांतर म्हणजे काय?

याला इंग्रजीत रिलोकेशन अशी संज्ञा आहे. ज्या ठिकाणी जातक स्थलांतर करणार असेल ते ठिकाण जन्मस्थळ असे मानून नव्याने पत्रिका मांडली तर लग्न आणि ख-मध्य बदलतात. हे नवीन बिंदू मिळाले की त्यांच्याशी जर इतर ग्रहांचे शुभ योग होत असतील तर पत्रिका बलवान होते आणि उत्कर्षाची शक्यता वाढते.

उदाहरण
नुकतेच माझे एक मित्र माझ्याकडे त्यांची पत्रिका घेऊन आले होते. गेले काही महिने ते पुण्यात गुदमरून गेले आहेत. पुणे सोडून दूसरीकडे कुठे स्थायिक होता येईल का हा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यांनी प्रथम मी कुठे स्थायिक होऊ असा प्रश्न विचारला. नंतर कलकत्त्याचा विचार करू का असा उपप्रश्न विचारला. सोबत सौ बरोबर होत्या. त्यांनी फक्त भारतातलीच ठिकाणे सूचवा असे सांगितले.

आता माझ्या या मित्रासाठी योग्य "स्थळ" शोधायची कामगिरी माझ्याकडे आली होती. हे योग्य स्थळ असे पाहिजे की तिथे नशीबाची साथ मिळावी, स्वीकारलेल्या नोकरी अथवा व्यवसायात यश मिळायला हवे. संपत्ती निर्माण करता यावी. माझ्या मित्राच्या पत्रिकेत संधी किंवा नशीबाची साथ दाखवणारा रवी-गुरूचा मध्यम दर्जाचा (साडेपाच अंशातील अप्लायिंग) नवपंचम योग आहे. हा योग त्यांच्या पत्रिकेत बर्‍यापैकी कार्यरत आहे. आता हा योग कुठे-कुठे बलवान होतो तर माझ्या मित्राचा जन्म झाला तेव्हा (म्हणजे त्या दिवशी आणि त्या वेळी) ज्या ज्या ठिकाणी रवी आणि गुरु लग्न किंवा ख-मध्यावर होते, ती सर्व ठिकाणे जातकाला नशीबाची साथ देणारी किंवा संधी देणारी होतील.

माझ्याकडे असलेले एक अत्याधुनिक सॉफ्ट्वेअर वापरून हा शोध घेतला असता मला खालील नकाशा मिळाला.


या नकाशात सर्वात डावीकडील हिरवी उभी रेषा, गुरु जिथे जिथे ख-मध्यावर येतो ती ठिकाणे दाखवते, तर उजवीकडील तांबडी उभी रेषा, रवी जिथे जिथे ख-मध्यावर येतो ती ठिकाणे दाखवते. हिरवी वक्र रेषा, गुरु जातकाच्या जन्म दिवशी आणि जन्म वेळी जिथे जिथे लग्नावर येतो ती ठिकाणे दाखवते तर तांबडी वक्र रेषा रवि जातकाच्या जन्म दिवशी आणि जन्म वेळी जिथे जिथे लग्नावर येतो ती ठिकाणे दाखवते. या सर्व ठिकाणी माझ्या मित्राच्या पत्रिकेतील रवि-गुरु नवपंचम योग बलवान होतो.

आता इथे माझ्या मित्राच्या पत्नीने "फक्त भारतातलीच ठिकाणे सूचवा" असे बजावल्याने वर समोर आलेले पर्याय उपयोगाचे नाहीत. म्हणून मित्राची इच्छा असलेले कलकत्ता हे ठिकाण कितपत योग्य आहे हे तपासणे आवश्यक ठरते.

कलकत्ता जन्मस्थळ मानून पत्रिका परत मांडली असता सायन कुंभ रास ३ अंश ४२ मि हा ख-मध्य मिळतो. या ख-मध्याशी मित्राचा जन्मशुक्र ३ अंशात युती करत असल्याने शुक्र बलवान होतो, पण जन्म पत्रिकेत शुक्राचा जन्मशनी बरोबर अर्ध केंद्रयोग तर जन्मप्लुटो बरोबर त्र्यर्ध केंद्रयोग(१३५ अंश) आहे. हे दोन्ही योग अतिशय त्रासदायक आहेत ते आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक कलह दाखवतात. त्यामुळे माझ्या मित्राने सुचवलेल्या "कलकत्ता" या पर्यायाला बाद करणे आवश्यक ठरते. आता दूसरा पर्याय सध्या डोळ्यासमोर नसल्याने राहता राहीले पुणे. मित्राचे वास्तव्य बरेच वर्षे पुण्यातच आहे. पुण्यात आल्यावरच या जातकाच्या उत्कर्षास सुरुवात झाली म्हणून मी पुणे हे जन्मस्थान मानून पत्रिका स्थानांतरीत केली (परत मांडली).

पुण्याच्या पत्रिकेत सायन मकर रास १९ अंश ५१ मि हा ख-मध्य मिळाला. या ख-मध्याशी हर्षल, प्लुटो, शनी, नेपच्यून हे चार ग्रह शुभ योग करतात. असे चार-चार शुभ योग असल्यावर उत्कर्ष झाला नाही तरच नवल. कारण ख-मध्यावर एखादा ग्रह गोचर भ्रमणाने आला की ते सर्व एकदम सक्रिय होतात आणि उत्कर्षाच्या संधी निर्माण होतात.

या सर्व विश्लेषणाचे तात्पर्य असे की ज्योतिषातील मूलभूत गृहितकांचा आधार घेऊन उत्कर्ष कुठे या प्रश्नाचे उत्तर शोधता येते, बदली होणार असेल तर बदलीच्या ठिकाण कितपत लाभदायक ठरेल याचाही विचार करता येतो.

शुक्रवार, ८ जुलै, २०११

पत्नी ही पतीची मालमत्ता

मी माझ्या सप्तपदी वरील बहुचर्चित लेखात कायद्याच्या एकांगी आणि पक्षपाती भूमिकेकडे लोकांचे लक्ष वेधले होते. बर्‍याच जणांनी ते हसण्यावारी नेले होते. http://rajeev-upadhye.blogspot.com/2009/07/blog-post_30.html

आज मटा मध्ये प्रसिद्ध झालेल्या खालिल लेखात हा पक्षपातीपणा परत अधोरेखित केला गेला आहे.

"पत्नी ही पतीची मालमत्ता आहे आणि तिच्याशी पतीच्या संमतीविना शरीरसंबंध हे या मालमत्तेवरील अनधिकृत अतिक्रमण आहे, असाच त्यामागील दृष्टिकोन आहे, असा मुख्य आक्षेप आहे. ... विवाहित पुरुषाच्या पत्नीशी शरीरसंबंध ठेवणारा पुरुष हा जर त्या पुरुषाचा गुन्हेगार मानला जात असेल, तर त्याच न्यायाने या गुन्हेगार पुरुषाच्या पत्नीची संबंधित परस्त्री ही गुन्हेगार मानली गेली पाहिजे. तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मुभा असली पाहिजे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9143205.cms