शनिवार, २७ डिसेंबर, २००८

एका चर्चासत्राच्या निमित्ताने...

परवाच पुण्यातल्या एका नामवन्त वधूवर-सूचक मंडळाने आयोजित केलेल्या एका चर्चासत्राला उपस्थित राहिलो होतो. चर्चासत्रासाठी एक ज्योतिषी व एक डॉक्टरीण बाई आमंत्रित म्हणून उपस्थित होते.

या चर्चेत आयोजकांनी विवाह जुळवणे ही सामाजिक समस्या कशी बनते ही बाजू मांडली. विवाहाच्या आरोग्यविषयक शंकांचे समाधान डॉक्टरीणबाईनी केले. याशिवाय लग्न जुळण्यात पत्रिकेचे असलेले अनन्यसाधारण साधारण स्थान लक्षात घेता, त्याविषयीचे संभ्रम दूर करण्याचे काम ज्योतिषीमहोदयांनी केले.

एकंदर चर्चा अतिशय उद्बोधक झाली. पण जाताजाता वक्त्यांनी मांडलेले काही मुद्दे काही प्रश्न उपस्थित करून गेले. उदा. विवाह हा दोन व्यक्तींपुरता मर्यादीत नसतो, तर तो दोन कुटुम्बाना जोडतो, असे मत चर्चेच्या आयोजकांनी मांडले. पण प्रत्यक्षात कायदा मात्र दोन व्यक्तीनी प्रजोत्पादन करण्यासाठी एकत्र येऊन राहणे एवढाच अर्थ मानतो. दोन कुटुम्बांच्या एकत्र येण्याचा कायद्यात कुठेही विचार केलेला दिसत नाही.

कुटुंबात येणार्‍या मुलीला आर्थिक व्यवहारांची माहिती दिली जात नाही असा पण मुद्दा मांडण्यात आला. त्याचा परिणाम मुलगी सासरी एकरूप होण्यावर होतो, असेही सांगितले गेले. पण एका भयाण वास्तवाकडे यावेळी वक्त्यांकडून दूर्लक्ष झाले. ते असे की, ४९८-अ सारख्या एकतर्फी कायद्यांचा दुरूपयोग करणार्‍या मुलीना आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाली तर आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे असते.

दूसरी एक गोष्ट आयोजकांनी मांडली, ती म्हणजे समानतावादी आधुनिक स्त्रीची दुटप्पी भूमिका. ही स्त्री संसारात नव‍र्‍याने बरोबरीने कष्ट करावेत अशी अपेक्षा ठेवताना उत्पन्नाच्या अथवा खर्चाच्या वाटणीची वेळ आली की सोयिस्करपणे घूमजाव करते. खर्चाच्या बाबतीत "नवर्‍याचे उत्पन्न हे आपलं सर्वांचं आणि माझं उत्पन्न हे फक्त माझा पॉकेटमनी" असा समानतावादी आधुनिक स्त्रीचा सूर असतो. हे निरीक्षण सार्वजनिक व्यासपीठावरून आणि तेही एका स्त्रीने मांडले याचेच मला मोठ्ठे कौतुक वाटले.

विवाहाच्या आरोग्यविषयक बाजूवर प्रकाश टाकण्यासाठी ज्या डॉक्टरीणबाई आल्या त्यांनी मात्र "समुपदेशनास दोघेही आले तर ही समस्या सुटू शकते" असे गुळमुळीत उत्तर बर्‍याच प्रश्नांना दिले. HIV testची आवश्यकता प्रतिपादन करताना ती नेमकी कितीवेळा करावी याचा खुलासा त्यांनी केला नाही. माझ्या माहितीप्रमाणे ही टेस्ट तीन महिन्यांच्या अंतराने दोनदा करणे आवश्यक असते. कामजीवनाविषयीच्या गैरसमजुतीना डॉक्टरीणबाईनी अजिबात हात लावला नाही.

या चर्चासत्रातील तिसरे वक्ते एक नामवंत ज्योतिषी आहेत. बरीच स्थळे ज्योतिषाच्या अर्धवट ज्ञानाने नाकारली जातात, असा महत्त्वाचा मुद्दा ज्योतिषी महाशयांनी मांडला. समाजात अनेक निरर्थक आणि निराधार समजुती कशा तग धरून आहेत हे त्यांनी निदर्शनास आणले. सप्तमस्थानातील मंगळ सोडून बाकी सर्व स्थानातील मंगळ फारसे त्रासदायक नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

या अनुषंगाने मला पत्रिका मांडायची पद्धत आणि त्यातून होणारी दिशाभूल याविषयी लिहायचे आहे. आपल्याकडे पत्रिका मांडण्याचे उत्तर आणि दक्षिण भारतीय असे दोन प्रकार आहेत. यात एका आयतामध्ये बारा भाग करून त्यात ग्रह (आणि त्यांच्या राशी) मांडले जातात.

समजा, १ अंश मेष आणि २९ अंश मेष या ठिकाणी अनुक्रमे मंगळ व चंद्र असल्यास कुंडलीत ते एकाच स्थानात मांडले जातात त्यामुळे पत्रिकेत मंगळ-चंद्र युति आहे असे कित्येक अर्धवट ज्ञानी लोक मानतात आणि पत्रिका टाकून देतात. याच्याच उलट रवि-गुरु, चंद्र-गुरु यांच्यात नसलेल्या नवपंचमादि शुभ योगांचा भास केवळ पत्रिका लिहीण्याच्या पद्धतीमुळे होतो व पत्रिका दूर्मिळ योगाची म्हणून खपवली जाते.

वास्तविक योग्य ते दीप्तांश विचारात घेउन रवि,चंद्र इत्यादि ग्रहांचे मंगळ, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांशी अष्टामांश मालिकेतील योग होत असतील तर ते विवाह आणि व्यावसायिक भागिदारीत अडचणी दाखवतात. तसेच जोडीदाराच्या पत्रिकेतील मंगळ, शनि, हर्षल, नेपच्यून व प्लुटॊ हे ग्रह जातकाच्या रविचंद्रांशी अष्टामांश मालिकेतील योग करत असतील तर ते वैवाहिक अथवा व्यावसायिक नात्यात अडचणी निर्माण करतात.

ज्योतिषी महोदयांनी चर्चेत आणखी एक मुद्दा मांडला तो असा की ३६ गुण जुळण्याचा अट्टाहास पालकांनी करू नये. ३६ गुण जुळले की मुलाची आणि मुलीची रास एक यायची शक्यता असते. असे झाल्यास दोघांचीही साडेसाती एकदमच येते...

बर्‍याच वेळा असे दिसते की काही वेळा कौटुंबिक कलह दीर्घकाळ चालू राहतो. अशावेळेस कुटुंबातील सर्वांच्या पत्रिका एकत्र पाहिल्या तर असे दिसून येते की अशा कुटुम्बातील सदस्यांचे रविचंद्रादि ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ (युति नव्हे) असून ते मंदगती ग्रहांच्या भ्रमणांच्या तडाख्यात एका मागे एक असे सापडतात. साहजिकच ही परिस्थिती १+१ = ३ अशा स्वरूपाची असते.

तात्पर्य, आदर्श पत्रिकेच्या शोधात न राहता व्यावहारिक दृष्टीकोन स्वीकारून पत्रिकेचा उपयोग करून घेणे शहाणपणाचे ठरते.


४ टिप्पण्या:

धोंडोपंत म्हणाले...

नमस्कार पंत,
लेख छान आहे. आवडला.
पत्रिकांचे पारंपारिक पद्धतीने केलेले गुणमेलन आता बाजूला ठेवले पाहिजे असे आमचे मत आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या संस्थळावर पूर्वीही बरेच लिहिले आहे. दोन पत्रिका जुळवितांना दोन्ही कुंडल्यात असलेले आयुष्ययोग, वैवाहिक सौख्य, संततीसौख्य, करिअर या दृष्टीने एकमेकांना ते अनुकूल आहेत किंवा नाही हे पाहिले पाहिजे. पुढील २५/३० वर्षात येणार्‍या महादशा दोघांना काय फळे देणार आहेत हे पाहिल्याशिवाय केवळ त्या कोष्टकाच्या आधारे विवाह जुळविणे धोक्याचे आहे. तसेच कुंडलीवरून त्यांचा स्वभाव व आवडीनिवडी एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत की नाही याचा सुद्धा विचार करायला लागतो.त्याचप्रमाणे दोन्ही पत्रिकेतील ग्रह एकमेकांशी कोणत्या संबंधाने वावरत आहेत हे पहाणे आवश्यक आहे. महत्वाचे ग्रह जर एकमेकांशी वाईट योगात असतील तर पत्रिका जुळूनही वैवाहिक सुखाची फारशी अपेक्षा करता येत नाही.

असो. लेख आवडला. विषय आपलाच. म्हणून मतप्रतर्शन केले.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

आपला,
(स्नेही) धोंडोपंत

Rajeev Upadhye म्हणाले...

प्रिय धोंडोपंत

आपली पायधूळ आमच्या चिन्तनिकेला लागली हे आमचे अहोभाग्य...
सदिच्छांबद्दल आभार...


आपला


राजीव उपाध्ये

अनामित म्हणाले...

sahi artical pan ajaun deatil have hote spe when divorce cases vadat astana . such articals r much needed. good luck for ferther articals

अनामित म्हणाले...

लेख आवडला, कायद्याविषयक माहीती नसल्यामुळे ४९८ (अ) गुगल वरती शोधले आसता भरपुर माहीती मिळाली.