लोक जिवाच्या कराराने स्वत:च्या मालकीच्या वास्तूचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी
झगडतात. हे स्वप्न पुरे झाले की नव्या वास्तुमध्ये स्थलांतरीत होतात, पण कधी
कधी नव्या वास्तूत स्वास्थ्य लाभण्या ऐवजी जुने नष्ट्चक्र चालूच राहते. मग कुणी
तरी सांगते ही वास्तू तुम्हाला लाभत नाही. अमुक करून बघा, तमुक करून बघा.
वास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आलेल्या काही ठळक
गोष्टी अशा -
- घरातील एकाच व्यक्तीच्या अपार जिद्दीने वास्तू उभी राहीली असेल तर बहूधा
कर्जबोजा आणि साठविलेली पुंजी वास्तुच्या निर्मितीत गेली असल्याने नव्या
वास्तूत समस्त कुटुंबाच्या हौशीमौजीला मोठ्या प्रमाणात मर्यादा पडतात. कमावती
व्यक्ती एक असल्यास हे विशेष जाणवते.
- नवी वास्तू बर्याच वेळा मूळ ठिकाणापासून लांब बांधली जाते. वाड्यातून
अपार्टमेंट किंवा, भाड्याच्या ब्लॉकमधून बंगला वगैरे वगैरे. अशावेळेस आपण एका
सामाजिक वर्तूळातून बाजूला पडतो आणि नवीन वर्तूळ तयार व्हायला अनेक कारणांनी
वेळ लागतो.
- जुन्या जागेत अनेक वर्षे अडचणीना तोंड द्यावे लागले असल्यास कुटुंबातल्या
सर्वांच्या स्वभावास वेगवेगळे घट्ट पिळ पडतात. हे पिळ नव्या जागेत सहजा सहजी
सुटत नाहीत.
- नवी वास्तू बांधतांना घरातील एका जरी व्यक्तीचा मनाने सह्भाग नसेल तरी नव्या
वास्तूत मन:स्वास्थ्याला विरजण पडायला वेळ पडत नाही.
ही यादी कदाचित यापेक्षा मोठीही असेल पण मूळ कारणे थोड्याफार तपशीलाच्या फरकाने
हीच असतात. पण लोकांना चमत्काराची अपेक्षा असते. आणि तो घडत नाही म्हणून
पत्रिका बघितली जाते, वास्तूत तोडफोड सूचवली जाते. इतकेच काय, लोक नवे घर
विकायला पण निघतात. माझ्या माहितीतल्या एका आयटी कंपनीच्या मालकाने धंदा वाढावा
म्हणून वास्तूदोष निवारणाचे तर्हेतर्हेचे उपाय केले पण त्याला आपल्या
कंपनीतील गळकी टॉयलेट्स काही केल्या दिसली नाहीत. असो.
तर मित्रहो तुमच्या परीचयात कुणी वास्तू लाभत नाही म्हणून तक्रार करत असेल तर
त्यांच्या हे मुद्दे जरूर लक्षात आणून द्या...